ओ मेरे सनम, ओ मेरे सनम...

‘संशय’ ही मनातली एक अतिशय वाईट अशी भावना आहे. ‘संशयाचं पिशाच्च’ असंच वर्णन या भावनेचं केलं जातं. संशयाचं हे पिशाच्च एकदा का एखाद्याच्या मनात घुसलं की ते विनाश करूनच थांबतं.
Movie
Moviesakal
Updated on

ओ मेरे सनम, ओ मेरे सनम

दो जिस्म, मगर इक जान है हम

‘संशय’ ही मनातली एक अतिशय वाईट अशी भावना आहे. ‘संशयाचं पिशाच्च’ असंच वर्णन या भावनेचं केलं जातं. संशयाचं हे पिशाच्च एकदा का एखाद्याच्या मनात घुसलं की ते विनाश करूनच थांबतं. हा विनाश ज्याच्या मनात ते पिशाच्च घुसलं त्याचा असेल किंवा ज्याच्याविषयी संशय असेल त्याचा असेल किंवा दोघांचाही असेल किंवा कुटुंबाचा असेल...पण संशय हा विनाशकारकच असतो हे नक्की.

संशयाचं निराकरण करताना कमालीचा समंजसपणा अपेक्षित असतो. प्रसंगी एखाद्या बाजूनं पडतंसुद्धा घ्यावं लागतं, त्यामुळं संशयाचं निराकरण होऊ शकतं. अन्यथा, विनाश हा ठरलेला. संशयाचं पिशाच्च एखाद्याच्या मानगुटीवर जाणीवपूर्वक बसवणारे ‘मंथरा’वृत्तीचे लोकही समाजात असतात. शेक्सपीअरनं ‘ऑथेल्लो’ या नाटकातून अशा प्रवृत्ती ठळकपणे दाखवल्या आहेत.

संशयामुळं दोन मित्रांच्या दोस्तीत बेबनाव होतो. संशयामुळं भाऊ भाऊ एकमेकांपासून दुरावतात. संशयामुळं प्रियकर-प्रेयसीची ताटातूट होते. संशयामुळं पती-पत्नीचा घटस्फोट होतो. इतकंच नव्हे तर, संशयामुळं बऱ्याच वेळेला एखाद्याची हत्याही होते किंवा एखादा आत्महत्याही करतो. समाजात अशा घटना आपल्याभोवती घडत असलेल्या आपण पाहत असतो.

सुंदर-राधा-गोपाल या तिघांचं बालपणापासूनचं मैत्र. सुंदर हा बोलका आणि काहीसा आक्रमक, तर गोपाल हा अबोल आणि संयमी. गोपाल हा राधावर मनोमन प्रेम करतो आणि राधासुद्धा गोपालवरच मनापासून प्रेम करते. ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना’ असं एक प्रेमपत्रसुद्धा गोपाल हा राधाला लिहितो.

तरुणपणी एअर फोर्समध्ये पायलट झालेल्या सुंदरला मात्र याची कल्पना नाही. तो राधाला बिनदिक्कतपणे मागणी घालतो. आपला जिवलग मित्र गोपाललाही तो हे सांगतो. आपल्या मित्रासाठी गोपाल आपल्या प्रेमाचा त्याग करून राधाला सुंदरशी लग्न करायला भाग पाडतो. सुंदर-राधा यांचा संसार सुखानं सुरू असतो. युद्ध सुरू झाल्यानं सुंदर युद्धावर जातो. युद्धात पायलट सुंदर बेपत्ता होतो. तो परत येईल असा दुर्दम्य विश्वास राधाला आहे.

या विश्वासानंच ती त्याची प्रतीक्षा करते. सुंदर सुखरूप परततोसुद्धा. त्यानंतर एकदा अचानक, विवाहपूर्वकाळातलं गोपालनं लिहिलेलं ‘ते’ प्रेमपत्र त्याला सापडतं... पण आपल्या अनुपस्थितीत राधाचा कुणाशी तरी संबंध होता अशा संशयाचं भूत त्याला पछाडतं. हे पत्र कुणाचं...तो कोण आहे...अशी सारखी विचारणा तो तिला करतो. ‘तू समजतो आहेस तसे काहीही नाही’, असं ती परोपरीनं त्याला समजावण्याचा प्रयत्न करते.

विवाहाच्या आधी गोपालनं लिहिलेलं ते पत्र असलं तरी गोपालचं नाव सांगण्याची राधाची इच्छा नाही; कारण, गोपाल व सुंदर यांच्या मैत्रीत वितुष्ट येऊ नये. लष्करी अधिकाऱ्यांच्या एका पार्टीत पायलट सुंदर याचा वरिष्ठ अधिकारी जाहीर करतो : ‘ही पार्टी केवळ सुंदर परतला याची नसून ती राधासाठीही आहे; कारण, सुंदर युद्धात मारला गेला आहे असंच आम्ही सगळे समजून चाललो होतो... मात्र, सुंदर जिवंत असून, तो नक्की परतून येईल, असा अतूट विश्वास एकट्या राधालाच वाटत होता. आणि, सुंदर परतून आला. तेव्हा, राधाच्या या विश्वासाबद्दल आणि सुंदरवरच्या तिच्या प्रेमाबद्दल ही पार्टी आहे.’

अशा प्रसंगी राधाला ते गाणं गायला सांगतात. ती गाणं गाता गाता नाचू लागते. गाण्यातूनसुद्धा ती त्याला समजावण्याचाच प्रयत्न करते...‘हे माझ्या प्रियतमा, आपली शरीरं दोन असली तरी आत्मा एकच आहे. एकाच हृदयातून छेडले गेलेले दोन झंकार आहोत आपण.’

ओ मेरे सनम, ओ मेरे सनम

दो जिस्म, मगर इक जान है हम

इक दिल के दो अरमान है हम

ओ मेरे सनम, ओ मेरे सनम

माझं तन आणि मनसुद्धा मी पूर्णपणे तुझ्या हवाली केलं आहे. देण्यासारखं माझ्याकडं आणखी काही नाही. माझ्या जिवलगा, ईश्वराकडूनसुद्धा जी अपेक्षा मी केली नाही, ती मी तुझ्याकडून करते आहे. विश्वास ठेव, ज्या दिवशी आपण दोघं एकमेकांचे होऊन विवाहबद्ध झालो, तेव्हाच आपण या जगातल्या इतरांना परके होऊन, फक्त आपण आणि आपणच दोघं आपल्यासाठी उरलो आहोत.

तन सौंप दिया, मन सौंप दिया

कुछ और तो मेरे पास नही

जो तुम से है, मेरे हमदम

भगवान से भी वो आस नही

भगवान से भी वो आस नही

जिस दिन से हुए इक-दूजे के

इस दुनिया से अनजान है हम

इक दिल के दो अरमान है हम

ओ मेरे सनम, ओ मेरे सनम

तिचं हे सांगणं त्याला पटत नाही. दोघांच्या प्रेमात तिसऱ्याची सावलीसुद्धा येऊ शकत नाही, असं म्हणतात...तर मग, मला हे काय पाहावं लागत आहे, असं तो अविश्वासानं विचारतो.

सुनते है प्यार की दुनिया में

दो दिल मुश्किल से समाते है

क्या गैर, वहाँ अपनों तक के

साये भी ना आने पाते है

साये भी ना आने पाते है

हम ने आखिर क्या देख लिया?

क्या बात है? क्यूँ हैरान है हम?

ती परत परत कळवळून सांगतेय :‘माझ्या प्रियतमा, आपली दोघांची भेट ही गंगा आणि यमुना या नद्यांच्या संगमाइतकी पवित्र आहे. खरं तेच मी सांगते आहे. हेच सत्य आहे. भूतकाळात जे घडून गेलं ते जणू एखादं स्वप्न होतं असं समजू या. शेवटी, आपणही माणूसच आहोत. माणसाच्या जीवनात अशा काही गोष्टी घडतच असतात.’

सुंदरचा अजूनही विश्वास नाही. घरात तो हातात पिस्तूल घेऊन विचारतो :‘ज्यानं हे पत्र लिहिलंय तो कोण आहे?’ आता मात्र तिचा संयम सुटतो. ती गोपालला बोलावते आणि त्याच्यासमोरच सांगते : ‘होय! गोपालचे आणि माझे आपल्या विवाहापूर्वी प्रेमसंबंध होते; पण तुझ्या मैत्रीसाठी त्यानं प्रेमाचा त्याग करून तुझ्याशी माझं लग्न लावून दिलं. त्यानंतर मात्र आम्ही एकमेकांना पूर्णपणे विसरलो.’

गोपालही सांगतो : ‘राधा सांगते ते सत्य असून राधा गंगेसारखी आजही पवित्र आहे.’ हे सत्य ऐकल्यावर मात्र सुंदर मनानं कोलमडतो. हताश होत पिस्तूल खाली टाकत म्हणतो : ‘गोपाल, तू एकदा जरी बोलला असतास की, ‘माझं राधावर प्रेम आहे’ तरी मी तुझं तिच्याशी लग्न लावून दिलं असतं.’

आता राधामधल्या स्त्रीत्वाचा अभिमान जागा होतो. ती चिडून म्हणते : ‘‘गोपाल मला सांगतो, ‘तू सुंदरशी लग्न कर...’ सुंदर म्हणतोय, ‘मी गोपालशी लग्न करायला सांगितलं असतं.’ मग, मी काय एखादी वस्तू आहे का, जी तुम्ही आपापसात वाटून घ्यावी? मी जितीजागती स्त्री आहे. मलाही भावना आहेत...विचार आहेत...माझ्या भावनांना काही किंमत नाही काय?’’

भावनांचा असा कल्लोळ सुरू असतानाच ‘या दोघांच्या संसारात आपला उपद्रव नको,’ असा विचार करून गोपाल स्वत:वर पिस्तुलातली गोळी झाडून घेऊन आत्महत्या करतो. गोपाल पुन्हा एकदा त्याग करतो. आता केवळ सुंदरच्या मैत्रीखातरच नव्हे तर, राधाच्याही! पण एक तरी बळी जातोच.

राधा एक पत्नी आहे. ईश्वराकडूनही जी अपेक्षा तिनं केली नाही ती पतीकडून ती करत आहे...‘ज्या दिवशी आपण एकमेकांचे झालो तेव्हापासून बाकीचं जग आपल्यासाठी परकं झालं...आपलं हे मीलन म्हणजे गंगा-यमुना या नद्यांच्या संगमाइतकं पवित्र आहे. आपणही शेवटी माणूसच आहोत...’ अशा आपल्या पतीविषयीच्या नाजूक भावना - पत्नीला पतीविषयी असलेल्या विश्वासाच्या नाजूक भावना - गीतकार शैलेंद्र यांनी फार उदात्ततेनं लिहिल्या आहेत.

तर दुसरीकडं ती वारंवार विनवण्या करते तरी पती विश्वास ठेवायला तयार नाही, अशी पतीची कठोरताही त्यांनी मांडली आहे. शैलेंद्र यांची प्रतिभा या गीतातून एका उंचीवर गेल्याचं जाणवतं...कथेतला हा प्रसंग त्या प्रतिभेनं आणखी उंचीवर नेला आहे. गीताच्या सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या आलापाची जी एक लकेर येते तीतच कारुण्य भरलेलं आहे. त्यानंतर लगेचच येणारे सतारीचे सूर त्या कारुण्यात भर टाकतात. इंटरल्यूडलासुद्धा सतारीचा तसाच तुकडा येतो.

स्वरांचे आरोह-अवरोह लता मंगेशकर यांनी असे उत्कृष्टपणे केले आहेत की, त्यांच्या स्वरातून विनवणी, करुणा आणि सत्यसुद्धा स्पष्टपणे जाणवते. मुकेशसुद्धा तशाच सुरातून आपली व्यथा प्रकट करतात. त्यांच्या स्वरातली सानुनासिकता इथं कामी येते. प्रसंगातलं गांभीर्य जाणून संगीतकार शंकर-जयकिशन यांनी शिवरंजनी या रागात हे कर्णमधुर गीत केलं आहे. फारच सुंदर चाल दिली आहे त्यांनी. वाद्यांचं आयोजनसुद्धा तितकंच परिपूर्ण.

‘ओ मेरे सनम...’ असं गीत ती सुरू करते तेव्हा सुंदरच्या भूमिकेतला राज कपूर मद्याचा प्याला हातात घेऊन तिरक्या नजरेनं तिच्याकडं बघत स्वत:शीच छद्मी हसतो. त्या एकाच नजरेतून त्याचा अविश्वास प्रकट होतो. मधल्या कडव्यांदरम्यान त्यांच्या आयुष्यातले बरे-वाईट फ्लॅशबॅक दिसतात. राधाच्या भूमिकेतल्या वैजयंतीमालानं आख्खं गाणं व्यापून टाकलं आहे.

गाण्याच्या सुरुवातीला डोळ्यांतून अभिनय करत तिनं आपली जी अगतिकता दाखवली आहे ती अवश्य बघावी. विनवण्या करणारी तिची नजर आणि देहबोली फार बोलकी आहे. गाता गाता केलेल्या नृत्यातून आणि हातांच्या हालचालींतून ती आपल्या मनातला उद्वेग चांगल्या रीतीनं व्यक्त करते. तिथं जमलेल्या लोकांनासुद्धा नृत्याच्या वेगातून तिचा उद्वेग जाणवतो. तिला पांढऱ्याशुभ्र साडीत दाखवून दिग्दर्शक राज कपूर तिचं पावित्र्य दर्शवू इच्छितो.

गीतातल्या दृश्यात गोपालची उपस्थिती नाही. गोपालच्या भूमिकेत राजेंद्रकुमार आहे. ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमे तेरा ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा’ असं मुकेशचं आणखी एक अविश्वासदर्शक गाणं या चित्रपटात आहे. मैत्रीतला त्याग आणि प्रेमातला संशय या सूत्राभोवती कथा गुंफलेली आहे.

निर्माता-दिग्दर्शक-संकलक-नायक अशा अनेक बाजू स्वत:च सांभाळणाऱ्या राज कपूरचा हा पहिला रंगीत आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘संगम’. सन १९६४ मध्ये तो प्रदर्शित झाला. याच सिनेमानं भारतीय प्रेक्षकांना पहिल्यांदा युरोपची ‘दृश्य सफर’ घडवून आणली. दीर्घ लांबीच्या या चित्रपटाला दोन मध्यंतर होते. त्या वर्षीच्या उत्पन्नाचे सगळे विक्रम ‘संगम’नं मोडले होते.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.