- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com
‘इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसिजेस’च्या अकराव्या आवृत्तीत (ICD-११) ‘गेमिंग डिसऑर्डर’ हा आजार म्हणून स्वीकारला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या आणि आपल्या मुलांच्या हातात असलेल्या मोबाईल-गेमिंगकडं बघितलं पाहिजे. आभासी जग जितकं फायदेशीर आहे, उपयोगी आहे तितकंच ते मुलांसाठी घातकही आहे.
सायबर-जगतातले गुन्हेगार जसे मुलांना जाळ्यात अडकवण्यासाठी टपलेले असतात, त्याचप्रमाणे इंटरनेट-जगतातल्या डिजिटल-ड्रग्जचाही धोका मुलांना असतोच. सोशल मीडिया आणि गेमिंगचं व्यसन हे या डिजिटल-जगतानं देऊ केलेलं डिजिटल-ड्रग आहे. त्यातल्या गेमिंगविषयी आजच्या लेखात चर्चा करू या.
गेमिंगकडं टीनेजर्स किंवा कुठलाही यूजर खेचला जातो, याला मेंदूमधलं डोपामाईन जसं कारणीभूत असतं तसेच गेमिंगमधले ट्रिगर्सही कारणीभूत असतात. हे ट्रिगर्स गेमिंग करणाऱ्याच्या भावनांना हात घालतात. त्याला एका अशा विश्वात घेऊन जातात जिथं वास्तव प्रश्नांची दाहकता त्याला जाणवत नाही. मुळात गेमिंग हा एक व्यवसाय आहे, त्यामुळं यूजरनं पुनःपुन्हा यावं यासाठी काही ट्रिगर्स जाणीवपूर्वक गेम्समध्ये पेरले जातात. हे ट्रिगर्स मानवी भावनांना हात घालणारे असतात. त्यासाठी आपलं मन, मेंदू कसा काम करतो याचाही विचार झालेला असतो.
ग्राहकाच्या मानसिकतेचा बारकाईनं अभ्यास करून, त्यानुसार गेमिंगमधले ‘ट्रिगर्स’ कसे आणि कुठं कुठं पेरायचे याचा विचार केलेला असतो. आजवर गेमिंगबद्दल मी जे काही वाचलं आहे, ज्या ज्या लोकांशी बोलले आहे त्यातून काही महत्त्वाचे ‘ट्रिगर्स’ लक्षात आले आहेत, ते याप्रमाणे :
१) गेम पूर्ण करण्याची तीव्र इच्छा,
२) स्पर्धा,
३) गेमिंगचं कौशल्य,
४) नावीन्याचा शोध,
५) हाय स्कोअर,
६) रोल प्ले,
७) पीअर प्रेशर,
८) आनंदाचा आभास...
कुठलाही गेम खेळायला सुरुवात केल्यानंतर खेळणाऱ्याची पहिली इच्छा असते गेम पूर्ण खेळण्याची. अर्थात्, कुठल्याही गेममध्ये किती लेव्हल्स आहेत याची माहिती नसल्यानं गेम कधी संपणार हेही माहीत नसतं. पुढं काय काय वाढून ठेवलेलं आहे याची उत्सुकता असते... इतर स्पर्धक कितव्या लेव्हलवर आहेत...त्यांच्यावर मात करून पुढं जाणं...हे सगळे ट्रिगर्स आपल्या भावनांशी जोडलेले आहेत.
गेमिंगमध्ये अनेकदा बोटं आणि डोळे यांच्या कमालीच्या कोऑर्डिनेशनची गरज असते. मोटार-स्किल्सवर अनेक गेम्स चालतात. विशेषतः वॉर गेम्स, रेसिंग गेम्स वगैरे. गेम खेळताना बोटांचा सफाईदार वापर हा ट्रिगर असू शकतो. मग कोण अधिक कौशल्यपूर्ण गेम खेळू शकतो यावर, कोण किती भारी आहे हे मुलांमध्ये ठरवलं जातं. मुळात सफाईदार शारीरिक कौशल्यांसह गेम्स खेळणं सरावातून येतं, म्हणजेच सतत गेमिंग केल्यामुळंच येतं.
इथं ट्रिगर असतो. मुलांवर हाय स्कोअरचं जबरदस्त प्रेशर असतं. हा ताण दोन्ही प्रकारचा असतो. सकारात्मक आणि नकारात्मक. स्पर्धेत जिंकायचं आहे हा सकारात्मक ट्रिगर असतो, तर आपण काही कारणानं दोन दिवस गेमिंग करू शकलो नाही आणि इतरांचा स्कोअर आपल्यापेक्षा चांगला झाला तर काय, याचा नकारात्मक ताण असतो.
सतत जिंकण्याच्या गरजेतून अनेकदा मनोरंजन कमी आणि ताण जास्त तयार होतो. सतत पुढची लेव्हल गाठायची आहे...ती अमुक एका वेळेत पूर्ण झाली नाही तर कुणी दुसरं आपल्या पुढं जाईल ही भीती... मागं पडलो तर काय ही असुरक्षितता...सतत जिंकण्याची भूक, स्पर्धा आणि त्यांतून निर्माण होणारी असुरक्षितता यातून ताण वाढत जातो.
जिंकलो नाही तर? हाय स्कोअर मेन्टेन करता आला नाही तर? स्किल्स कमी पडली तर? अशा अनेक कारणांमुळं मुलं पुनःपुन्हा गेमिंग करायला लागतात आणि ताणातून मुक्ती मिळण्याऐवजी ती सतत कावलेली, चिडलेली आणि ताणामुळे दमलेली असतात. अनेक गेम्समध्ये खेळणारा ‘अवतार’ घेत असतो. म्हणजे एखादं वेगळं व्यक्तिमत्त्व तो स्वीकारत असतो, खऱ्या जगात जे शक्य नसतं.
जसे आपण नाही तसे बनण्याची संधी गेमिंगमध्ये अनेकदा मिळत असते. मग त्या अवताराचं व्यक्तिमत्त्व, गुणविशेष, दिसणं, शरीररचना हे सगळंच प्रत्यक्षापेक्षा निराळं असतं, अधिक आकर्षकही असू शकतं आणि त्यातूनच ते हवंहवंसं वाटायला लागतं.
अनेकदा खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांपासून दूर जाण्यासाठी मुलं या अवतारांवर अवलंबून राहायला लागतात आणि मग त्या अवतारातच राहण्यासाठी पुनःपुन्हा गेमिंगकडं वळतात. कुठलाही खेळ प्रत्यक्ष न खेळताही अशा मुलांचं शरीर थकतं, मन दमतं आणि मुलं त्यांच्या आणि पालकांच्याही नकळत गेमिंगच्या व्यसनात अडकतात.
गेमिंगमध्ये अडकलेल्या आणि त्यातून प्रयत्नपूर्वक बाहेर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुला-मुलींशी जेव्हा जेव्हा मी बोलले आहे तेव्हा तेव्हा ती दोन गोष्टी ते आवर्जून सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे, आम्हाला करण्यासारखं खूप होतं; पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं... आजूबाजूच्या आमच्या आवडत्या गोष्टीही आम्ही दूर सारल्या; कारण, आम्हाला फक्त सतत गेमिंग करण्याचीच इच्छा होत होती...आम्ही एकलकोंडे बनत होतो हेही आमच्या लक्षात आलं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, जर गेमिंग करण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येणार नसेल तर गेमिंग करूच नका...मुलांच्या गेमिंग करण्यावर नियंत्रण ठेवता येणार नसेल तर त्यांना गेमिंग आणून देऊ नका...त्यांना गेमिंगची परवानगी देऊ नका. कारण, एकदा तुम्ही गेमिंग करायला लागलात आणि त्यावर लगाम नसेल तर तुम्ही वाहवत जाणार हे नक्की. कारण, गेमिंगची लत चटकन लागते.
या दोन्ही गोष्टी खरं तर फक्त मुलांसाठी नाहीत, तर त्या मोठ्यांसाठीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, नाही का?
(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.