मुलांशी मनमोकळा संवाद हाच पर्याय

आपल्या मुलांपर्यंत पोर्न आणि ॲडल्ट कन्टेंट वयाच्या कुठल्या वर्षी पोहोचू शकेल हे सांगता येत नाही. आता तर गेमिंग आणि पोर्नची बाजारपेठही एकत्र होते आहे.
Childrens
Childrenssakal
Updated on

- मुक्‍ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

आपल्या मुलांपर्यंत पोर्न आणि ॲडल्ट कन्टेंट वयाच्या कुठल्या वर्षी पोहोचू शकेल हे सांगता येत नाही. आता तर गेमिंग आणि पोर्नची बाजारपेठही एकत्र होते आहे. ‘ॲनिमे पोर्न’ हा प्रकार अतिशय प्रसिद्ध असतो. शिवाय, गेम्समधल्या व्यक्तिरेखांचे देह, आकार या सगळ्यातही मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत.

पोर्न बघणारे, ॲडल्ट कन्टेंट बघणारे मुलगे आणि मुली असे दोघंही असतात. सातत्यानं पोर्न बघणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा त्याविषयी गिल्ट असतो. आपण बघतोय ते चूक आहे, कुणाला समजलं तर आपल्यावर ओरडलं जाईल हेही त्यांना समजत असतं; पण वाढत्या वयात स्क्रीनसमोर चालणारे नग्न देहांचे व्यवहार बघण्याची उत्सुकता त्यांना शांत बसू देत नाही. स्वतःच्या स्वतंत्र फोनवर एका मर्यादेपलीकडं पालकांना लक्ष ठेवता येत नाही.

लपून-छपून गोष्टी बघण्यासाठी ‘इनकॉग्निटो मोड’पासून ते VPN पर्यंत काय काय लागतं हे मुलांना चांगलं माहीत असतं. आई-बाबांनी लावलेले ‘पेरेंटल कंट्रोल्स’ त्यांना मोडून काढता येतात. त्यामुळं टीनएजर मुलांशी वागताना ‘नियम आणि अटी’ यांच्याबरोबरच संवादाचाही वापर करण्यापलीकडं पालकांच्या हाती दुसरा कुठलाही पर्याय असत नाही.

अस्वस्थ मन

वर म्हटल्यानुसार, मुलांमध्ये अनेकदा गिल्ट असतो. सेक्सबद्दल घृणा हे सगळं बघत असताना निर्माण होत असते. काही वेळा तिथले देह बघून ‘आपण तसे नाही’ म्हणजे ‘आपण आकर्षक नाही’ असाही अर्थ मुलं काढतात. दहाव्या-बाराव्या वर्षी जर पोर्न बघण्याची सवय मुलांना लागली तर ते जे बघत असतात ते करून बघण्याचीही त्यांना इच्छा होत असते. आणि, तसे प्रयत्न आणि प्रयोग मुलं करतात. पुण्याच्या शाळेत जी घटना घडली होती, तशा घटना यातून घडू शकतात. तिथं जे बघितलं आहे ते करून बघावं, असं मुलांना वाटू शकतं.

आभासी आणि वास्तव यांतली सीमारेषा धूसर होत जाते. लैंगिक संबंधांबद्दल विचित्र आणि अवास्तव कल्पना तयार होण्याचा धोका असतो. दुसऱ्याची परवानगी हा विषय बाजूला पडणं यासारख्या अत्यंत गंभीर गोष्टी मनात रुजू शकतात.

मुलग्यांच्या बाबतीत लैंगिक संबंधामधला ‘परफॉर्मन्स’चा ताण तयार होऊ शकतो. ‘संबंधामधल्या पुरुषाच्या भूमिका’ याविषयी अवास्तव कल्पना तयार होऊन त्या बळकट होऊ शकतात, जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी अत्यंत घातक असू शकतं.

स्वतःच्या लैंगिक अग्रक्रमाविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतात. कारण, टीनएजर्स जेव्हा पोर्न बघतात तेव्हा ते त्यातले सगळे प्रकार बघण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच त्यात ‘गे’ आणि ‘BDSM पोर्न’चा समावेश असू शकतो. अशा वेळी आपला लैंगिक अग्रक्रम काय आहे, आवड-निवड काय आहे याबाबत मनात कुतूहल, संभ्रम अशा सगळ्याच गोष्टींचा कोलाहल माजू शकतो, तर मुलींच्या मनात स्वप्रतिमेबाबत चुकीच्या कल्पना तयार होण्याचा धोका असतो. पोर्न व्हिडिओजमध्ये दिसणाऱ्या मॉडेल्स, त्यांचा बांधा आणि त्यांनी केलेल्या क्रिया यांचा प्रभाव पडून तेच आदर्शवत् वाटण्यापासून ते सौंदर्याच्या चुकीच्या कल्पना रुजण्यापर्यंत अनेक धोके असतात.

शरीरात उठलेला कल्लोळ

वाढीच्या मुला-मुलींमध्ये पोर्न बघण्याचं प्रमाण जर अधिक असेल तर हस्तमैथुन करण्याचं प्रमाणही अधिक असू शकतं. मग सातत्यानं हस्तमैथुन केल्यामुळं विविध चुकीच्या कल्पना, धारणा विकसित होऊन परत स्वतःविषयी लाज, शरम वाटणं हे प्रकार होऊ शकतात.

रात्रीची अस्वस्थ झोप, भूक न लागणं, नैराश्य, उदासीनता यांसारखे प्रकार आढळून येतात. स्क्रीनवर बघितलेल्या प्रतिमा सतत डोळ्यासमोर नाचत राहिल्यामुळं अभ्यास, खेळ, अवांतर वाचन, पालक-शिक्षक यांच्याशी होणारा संवाद या सगळ्यावर परिणाम होतो. एकाग्रता कमी होऊ शकते. एकटेपणा वाढत जाऊ शकतो. पोर्न चारचौघांत बघता येत नाही, त्यामुळं ते बघणारे बऱ्याचदा ‘आयसोलेट’ होत जातात.

काय केलं पाहिजे?

  • या संपूर्ण विषयाकडं पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून बघणं टाळलं पाहिजे. शिक्षा करणं हा उपाय नसतो.

  • वाढीच्या वयात लैंगिकतेचे प्रश्न सगळ्याच पिढ्यांमध्ये निर्माण होत होते. आपल्या वेळी आपण काय केलं, याची तुलना निरर्थक आहे. कारण, त्या वेळी मोबाईल नव्हते, त्यामुळे मुलांशी संवाद साधणं, बोलत राहणं आवश्यक आहे.

  • मुलांनी कितीही अडचणीत टाकणारे अवघड प्रश्न विचारले तरी, लैंगिकतेबद्दल प्रश्न विचारले तरी उत्तरं दिली पाहिजेत.

  • लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त लैंगिक संबंध नव्हेत, तर त्यापलीकडं बरंच काही आहे. शरीराची स्वच्छता ते समोरच्याची परवानगी असे अनेक मुद्दे त्यात आहेत, जे मुलांना सांगितले गेले पाहिजेत. ते सांगा. त्यात लाजण्यासारखं काहीही नाही.

  • ‘हेच का आमचे संस्कार?’ अशा छापाचं बोलणं टाळलं पाहिजे. वयानुसार येणारी उत्सुकता, हातातली साधनं या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणाऱ्या असतात. अशा वेळी संस्कारांची भाषा वापरली की आधीच शरमलेलं पोर अधिकच तुटतं आणि त्याचा थेट परिणाम आत्मविश्वासावर होतो.

  • अशा वेळी पालकांनी एकमेकांवर आणि आजी-आजोबांनी पालकांवर आरोप-प्रत्यारोप करू नयेत. त्यामुळं मुलं अधिकच अस्वस्थ होतात.

  • अशा वेळी मुलांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं न करता त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. त्यांची आपल्याला काळजी असली तरीही त्यांना गुन्हेगार ठरवून प्रश्न सुटणार नसतो.

  • पोर्नबद्दल मुलांशी काय आणि कसं बोलायचं हे लक्षात येत नसेल तर एखाद्या तज्ज्ञाची, समुपदेशकाची मदत घेतली पाहिजे.

  • पालक म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं असतीलच असं नाही; पण आपण ती नक्कीच शोधू शकतो. त्यामुळं मुलांनी लैंगिक संबंध, लैंगिक अग्रक्रम, लैंगिकता यांविषयी काहीही विचारलं तरी घाबरून, बावचळून जायचं कारण नाही.

  • आपण कदाचित आपल्या पालकांना हे प्रश्न विचारले नसतीलही; पण आपली मुलं आपल्याला असे प्रश्न विचारू शकतात, त्यामुळं आपला गृहपाठ झालेला असला पाहिजे.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.