चाहूल तंत्रज्ञानाधारित युद्धाची...

पेजर नावाचं उपकरण काही वर्षांपूर्वी खूप वापरलं जात होतं. संदेश देण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. कमरेला एका काळ्या सॉकेटमध्ये साखळीला लटकवलेले पेजर त्या वेळी आकर्षक वाटायचे.
Pager Device Blast
Pager Device Blastsakal
Updated on

- डॉ. संजय तुंगार, saptrang@esakal.com

पेजर नावाचं उपकरण काही वर्षांपूर्वी खूप वापरलं जात होतं. संदेश देण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. कमरेला एका काळ्या सॉकेटमध्ये साखळीला लटकवलेले पेजर त्या वेळी आकर्षक वाटायचे. काळ बदलत गेला तसतसं तंत्रज्ञान बदलत गेलं, पेजरच्या जागी मोबाइल आला, त्यानं मोठी क्रांती घडवली. त्यामध्ये पेजर नावाचे उपकरण लुप्त होऊन गेलं होतं.

नव्या पिढीला या पेजरची कितपत कल्पना असेल हे माहीत नाही. लुप्त झालेला पेजर, १७ सप्टेंबरला चर्चेत आला. त्याचं कारण होतं, लेबनॉन इथं झालेल्या पेजरच्या स्फोटामुळं. लेबनॉनध्ये तीन हजार पेजरचे स्फोट झाले आणि साडेचार हजार लोक जखमी झाले.

दुसऱ्या दिवशी १८ सप्टेंबरला हिज्बुल्ला संघटनेच्या आणि इस्राईलविरोधी संघटनेचे लोक वापरत असलेल्या वॉकी-टॉकीचे अचानक स्फोट होऊन त्यात किमान २० लोक ठार झाल्याचे व ४५० पेक्षा जास्त जखमी झाल्याचे हिज्बुल्लाच्या प्रवक्त्याने जाहीर केले. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त हानी निश्चित झाली असणार. प्रत्यक्ष किती लोक जखमी झाले, मृत्युमुखी पडले त्यापेक्षा शत्रुवर मानसिक आघात करणे, शत्रूचे मनोबल खच्ची करणे, भीती निर्माण करणं महत्त्वाचं असतं. या घटनेमुळे आता सामान्य लोक आपल्या मोबाइलकडे देखील संशयाने पाहू लागतील.

हिज्बुल्लाचे लोक वापरत असलेले पेजर आणि वॉकी-टॉकीचे ब्लास्ट अभ्यासणे, समजून घेणे गरजेचे आहे. कारण पुढील युद्ध हे तंत्रज्ञान आधारित युद्ध आहेत. नागरिक किती तंत्रज्ञानस्नेही आहेत यावर कोणत्या देशाची किती हानी होणार हे ठरणार आहे. यामागील तंत्रज्ञान समजून घेणे महत्त्वाचं आहे.

हिज्बुल्लानं या हल्ल्यासाठी इस्राईलला जबाबदार धरले असून लवकरच प्रतिउत्तर देऊ, असं म्हटलंय. इस्राईलनं अर्थातच या घटनेची जबाबदारी नाकारली आहे. या घटनेचा तपास लेबनॉन सिक्युरिटी एजन्सी करत असून त्यांनी असं सांगितले, की पेजरच्या बॅटरीमागे एक सर्किट असलेलं बोर्ड बसवलं गेलं. ज्यामध्ये प्रत्येकी २० ग्रॅम स्फोटक होते. हे सर्किट तेव्हा पूर्ण झालं, जेव्हा त्या पेजरवर एक कोड असलेला मेसेज पाठवण्यात आला. पेजरवर एक मेसेज आला आणि बॅटरीमधील बोर्डवरील सर्किट पूर्ण झाले, डेटोनेटर आणि २० ग्रॅम स्फोटकाचा धमाका झाला.

अशा इन्फेक्टेड बॅटऱ्या हिज्बुल्लाचे लोक अनेक महिने वापरत होते. त्यापैकी कोणालाही त्याची काहीच शंका आली नाही. ९० ग्रॅम वजनाचे ७.५ सेमी लांब, ५ सेमी रुंद व २.९ सेमी जाडीचे हे पेजर A३ बॅटरीवर चालणारे होते. आपण वापरत असणारे सर्वच मोबाइल हे लिथियम बॅटरीवर चालणारे आहेत. पेजरवर झालेल्या ब्लास्टमध्ये जेव्हा पेजरवरील मेसेज वाचण्यासाठी तो हातात घेतला गेला, तेव्हा त्याचा ब्लास्ट झाला आहे.

म्हणजे त्यावर मेसेज आल्यानंतर ब्लास्ट होण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी देण्यात आला होता. ब्लास्ट झालेले पेजर आणि वॉकी-टॉकी हे पाच महिने अगोदर खरेदी करण्यात आले होते. शक्यता आहे की यात टाइमबॉम्बचा संबंध असेल. बरोबर पाच महिन्यांनंतर काही फंक्शन्स सुरू होतील अशा प्रकारचा यामध्ये प्रोग्राम केलेला असू शकतो. अशा तांत्रिक गुन्ह्यांचा तपास करणे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील माहिती शोधणे हे सोपे काम नाही.

मिशन सक्सेसफुल झाल्यानंतर शोधणे तर जवळपास अशक्य आहे. ज्या वॉकी-टॉकीचा स्फोट झाला त्यावर ICOM या कंपनीचे स्टिकर असून त्यावर made in Japan असे लिहिलेलं होते. ICOM ही ओसाका, जपान येथील कंपनी असून अमेरिका, जर्मनी, चीन येथे कार्यालये आहेत. वायरलेस कम्युनिकेशनमध्ये काम करणारी कंपनी आहे. याचे IC-V८२ या मॉडेलची मागणी हिज्बुल्लाने केली होती. तैवान येथील गोल्ड अपोलो कंपनीकडून पाच हजार पेजर खरेदी करण्यात आले होते.

पेजरमध्ये प्रॉडक्शन लेव्हललाच फेरफार करण्यात आले की नंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये यांच्या चिप आणि बॅटरी बदलण्यात आल्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ब्लास्ट झालेले पेजर तैवानमधल्या कंपनीत तयार करण्यात आले नसून हंगेरीमधील बुडापेस्टला बनवण्यात आले आहे. तैवानच्या कंपनीने ते स्वतःचे नाव लावून विकले आहे. युरोपियन देशाचे इस्रायलशी चांगले संबंध असल्याने मोसादला पेजरमध्ये ते तयार होतानाच स्फोटक पदार्थ त्यात घुसवणे शक्य झाले असेल.

आपल्या सर्वांना माहितीच आहे, की आजकाल पेजर हे आउटडेटेड झालेले आहेत. १९९० च्या आसपास जगात आणि १९९५ नंतर भारतात थोड्या प्रमाणात पेजर वापरले गेले. या पेजरवरून कॉल करता येत नाही, तर फक्त स्क्रीनवर मेसेज दिसतो. म्हणजे संघटनेचे प्रमुख पाहिजे त्या पेजरला फक्त एक-दोन ओळींचा मेसेज पाठवून कॉल करा, इथे जा, हे करू नका असे मर्यादित मेसेज करून सांगू शकतो.

पेजर हे एकतर्फी कम्युनिकेशन आहे. तुम्हाला दुसऱ्या पेजरला काही निरोप द्यायचा असेल, तर तुम्ही मेसेज पाठविणाऱ्या केंद्राला कळवू शकता, की या विशिष्ट नंबर असलेल्या पेजरला हा मेसेज द्या. असे आउटडेटेड, कमी कम्युनिकेशनची सोय असलेले कमी दर्जाचे तंत्रज्ञान असलेले पेजर वापरण्यामागे एक मुख्य फायदा असा आहे, की याद्वारे इतरांना फार कमी माहिती कळते.

आपण जे स्मार्टफोन वापरतो त्यामधून प्रचंड माहिती इतरांना कळत असते. स्मार्ट फोन हे जास्त धोकादायक आहेत. त्यावर हल्ला करणे सोपे आहे. त्यामानाने पेजर, वॉकी-टॉकी हे जास्त सुरक्षित आहेत. तरीसुद्धा इतक्या पद्धतशीरपणे यावर सायबर हल्ला होऊ शकतो याचा अनुभव जगाने या घटनेमधून घेतला आहे.

स्मार्ट फोनद्वारे एखाद्याचे लोकेशन शोधणे, त्याचा कॅमेरा, माइक सुरू करून आजूबाजूला काय सुरू आहे ते बघणे, ऐकणे शक्य आहे, तसेच स्मार्ट फोनद्वारे होणारे SMS, WhatsApp सारखे सोशल मीडियावरील संभाषण, कॉल यांची माहिती घेणे शक्य आहे. म्हणूनच की काय फेब्रुवारी महिन्यात हिज्बुल्ला संघटनेच्या जनरल सेक्रेटरीने आपल्या संघटनेतील लोकांना स्मार्ट मोबाइल फोडून टाका, गाडून टाका किंवा लोखंडी पेटीत लॉक करून ठेवा, असे सांगितले होते.

आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याला स्मार्ट फोन हे मोठेच आव्हान आहे. एकदा तुम्ही स्मार्ट फोन वापरायला लागलात, की तुमचे आयुष्य खासगी राहत नाही. तुमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. हे सिद्ध करणारे अनेक प्रसंग राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण बघितले आहेत. जगभरात असे हल्ले होणे काही नवीन नाही. इराणच्या अणुभट्टीवर स्टक्सनेट (Stuxnet) चा व्हायरसचा वापर करून हल्ला करण्यात आला होता.

SCADA (स्काडा) या ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर इंडस्ट्रीमध्ये ऑटोमॅटिक कृती करण्यासाठी केला जातो. म्हणजे एक विशिष्ट तापमान झाले, की मशीन बंद व्हावे ही विशिष्ट कृती केली गेली पाहिजे, यांसारख्या आज्ञावली स्काडामध्ये तयार करून कारखाने वापरतात. इराणच्या अणुभट्टीत सुद्धा ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात येत होती. असे म्हटले जाते, की इस्राईलने एक पेनड्राइव्हमधून Stuxnet अणुभट्टीच्या कॉम्प्युटरपर्यंत पोहोचवला आणि या व्हायरसने इराणची अणुभट्टीचे प्रचंड नुकसान केले.

जगात तेलअव्हिव्ह हे सातव्या नंबरचे प्रगत तंत्रज्ञान केंद्र मानले जाते. इस्त्रायलचे युनिट ८२०० हे वायरलेस तंत्रज्ञान व सायबर सुरक्षामध्ये काम करते. चेकपॉइंट सॉफ्टवेअर, सायबर आर्क, कॅटो नेटवर्क, राडवेअर, विझ या काही महत्त्वाच्या इस्त्राईली कंपन्या आहेत. वादग्रस्त पेगासस सॉफ्टवेअर इस्त्राईलच्या सायबर आर्म्स नावाच्या कंपनीने तयार केलेले आहे. या पेगाससवरून भारतातही बरीच चर्चा झाली आहे.

२००७ मध्ये इस्टोनिया देशातील बँक, पार्लमेंट, मीडिया हाउस यांच्यावर सायबर हल्ला झाला होता आणि तो मुख्यतः डिनायल ऑफ सर्व्हिस (Dos) ॲटॅक होता. लोकांना बँकेची व इतर सेवा घेता येणार नाहीत अशा पद्धतीने त्यांचे सर्व्हरवर वारंवार पिंग करून सर्व्हर बिझी ठेवण्यात आले आणि सर्व देशाला वेठीस धरण्यात आले. या हल्ल्यामागे रशियन हॅकर होते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार पुरस्कृत हल्ले करून दुसऱ्या देशाला अडचणीत आणणे हा एक युद्धाचाच भाग आहे. आपण सर्वच तंत्रज्ञानावर इतके अवलंबून आहोत की आपले फोनच नाही तर धरणे, वीज, आरोग्य यंत्रणा, वाहतूक यंत्रणा, शेअर मार्केट, बँक व्यवस्था, पिण्याचे पाणी सर्व काही इंटरनेट, तंत्रज्ञान कॉम्युटर यांच्या वर अवलंबून आहे. पूर्वी युद्ध फक्त जमीन, पाणी, हवेत खेळली जात होती, ती आता सायबर स्पेसमध्ये खेळली जात आहेत.

मायक्रोसॉफ्टचे एक अपडेट व्यवस्थित न झाल्यामुळे जगभरात आणि भारतात किती समस्या निर्माण झाल्या, अनेक विमाने रद्द करावी लागली याचा अनुभव आपण सर्वांनी नुकताच घेतला आहे. हिजबुल्लाहने फोनऐवजी पेजर वापरण्याचा निर्णय घेण्यामागे एक तांत्रिक कारण असल्याची शक्यता जास्त आहे. ते म्हणजे आपले फोन हे सतत जवळच्या टॉवरला सिग्नल पाठवत असतात आणि "मी इथे आहे" हे सांगत असतात. पेजर तसे करत नाही.

पेजरमधून कोणतेही सिग्नल बाहेर पाठवले जात नाहीत तर फक्त रिसिव्ह केले जातात. म्हणून पेजरचे लोकेशन सिग्नलच्या आधाराने शोधणे शक्य नाही. पेजर हे फक्त ऐकण्याचे काम करते स्वतः काहीही बोलत नाही. तरी पेजरमध्ये एक बॅटरी असते ज्याचा स्फोट करता येतो हे हिज्बुल्ला संघटनेचे लोक बहुतेक विसरले होते.

वॉकी-टॉकीचा विचार करता वॉकी-टॉकी ही रेडिओ लहरींचा वापर करत असल्याने त्यांचे लोकेशन शोधून काढता येते परंतु ते स्मार्ट फोन सारखे सहज शोधून काढता येत नाही. स्मार्ट फोनपेक्षा वॉकी-टॉकीचे लोकेशन शोधणे अवघड आहे आणि सिग्नल वरून पेजर शोधणे अशक्य आहे. वॉकी-टॉकी आणि पेजर हे बॅटरी असल्याने हत्यार म्हणून वापरणे, बॉम्ब म्हणून वापरणे शक्य आहे.

पेजर आणि वॉकी-टॉकीचा शस्त्र म्हणून वापर करून स्फोट घडवण्याच्या घटनांना सायबर ॲटॅक म्हणावे की फिजिकल ॲटॅक म्हणावे का मिश्रहल्ला म्हणावे? हा सायबर हल्ला म्हणता येणार नाही. पेजर किंवा वॉकी-टॉकी ही हॅक कऱण्यात आली नाही. तसेच लांबून त्या पेजर किंवा वॉकी-टॉकीची बॅटरी गरम करून स्फोट केलेला नाही.

त्या मध्ये स्फोटके भरून स्फोट केला असण्याची शक्यता जास्त आहे. कोणतेही तंत्रज्ञान हे पूर्ण सुरक्षित असतच नाही. तेव्हा त्यातल्या त्यात सुरक्षित हार्डवेअर, सॉफ्टवेअर वापरल्यानंतर सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये घुसखोरी करून शत्रूवर हल्ला करण्याचे तंत्र वापरून हा हल्ला यशस्वी करण्यात आला.

वस्तूंच्या पुरवठा साखळीमध्ये घुसखोरीचे तंत्र तसे जुनेच आहे. आज पेजर, वॉकी-टॉकी, मोबाइल, लिफ्ट, कॉम्प्युटर, सोशल मीडिया यावर ठरावीक देशांतील ठरावीक कंपन्यांची जवळपास मक्तेदारी आहे. जगातील ९० टक्के मोबाइलचे चिप हे TSMC म्हणजे "तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी" तयार करते. भारतातील ९० टक्के इलेक्ट्रॉनिक्स साहित्य हे परदेशी आहे. आपण साधी लिफ्ट पण बनवलेली नाही.

आपल्या सोसायट्यामध्ये असलेल्या लिफ्ट या बहुतेक परदेशी आहेत. लहान मुलांची खेळणीसुद्धा चीनमधून येतात. डेकोरेशन साहित्यापासून पुतळे, पूल, बिल्डिंग, कॉम्प्युटर अशा सर्व गोष्टीसाठी आपण अमेरिका, चीन, रशिया, जपान, जर्मनी, तैवानवर अवलंबून आहोत. भारताने अधिकाधिक स्वावलंबी होण्याची गरज अधोरेखित करणारी घटना आहे. जेव्हा आपण पेगासससारखे मालवेअर भारतात वापरतो, तेव्हा त्यातून मिळणारी माहिती भारताबाहेर सुद्धा जात असते.

आजचे जग हे माहिती तंत्रज्ञानावर चालणारे आहे. ज्या देशाकडे लोकांची माहिती, डाटा असेल आणि त्याचा वापर करण्याचे कौशल्य असेल, तोच देश, कंपनी, संस्था ही सशक्त आहे असे म्हणता येईल. माहिती तंत्रज्ञान आणि डाटा ज्याचे ताब्यात तो जगाचा राजा अशी आजची परिस्थिती आहे. भारतानं आपली सायबर आर्मी उभी करावी आणि त्यासाठी शाळा, कॉलेजमधून नवीन तंत्रज्ञानाचे धडे देणे सुरू करावे. यातूनच सशक्त भारत, स्वावलंबी भारत तयार होईल हा या प्रकरणाचा धडा आहे.

तंत्रज्ञान सोय आणि जोखीमही

सर्व प्रकरण पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटणे साहजिकच आहे. आपले मोबाइल हे सहजपणे बॉम्ब होऊ शकतात, ही भीती खरी आहे. पण यामध्ये आपण एका गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शत्रूसाठी मोबाइल ही बॉम्बपेक्षा अधिक काम करणारी गोष्ट आहे. स्फोट करून एकवेळेला अधिक नुकसान करता येऊ शकते. मात्र, मोबाइल चालू ठेवून त्या व्यक्तीच्या आजूबाजूची भरपूर माहिती, डेटा जमा करता येऊ शकतो.

अधिकची माहिती जो जमा करेल तोच जगावर राज्य करू शकले. त्यामुळे आपल्या मोबाइलचा स्फोट होण्याचा धोका कमी आणि तो सुरू राहण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीने बदल घडवले असले, तरी त्याच्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे देखील तितकेच खरे आहे. तंत्रज्ञानमुळे जगणे सुसह्य झाले असले, तरी ते तेवढेच जोखमीचे सुद्धा झाले आहे याची जाणीव या स्फोटाने करून दिली आहे.

(शब्दांकन : सुधीर साबळे)

(लेखक हे ‘सायबर ॲटॅक’ या पुस्तकाचे लेखक व ‘सायबर क्राईम’ या विषयातले तज्ज्ञ असून महाराष्ट्र पोलिस दलात ज्येष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.