Swat Valley
Swat Valleysakal

स्वात : निसर्गसंपन्न; पण अशांत...

पाकिस्तानातील अशांत खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यात हिंसक जमावानं पोलिस ठाण्यामध्ये घुसून एका पर्यटकाची हत्या केली.
Published on

पाकिस्तानातील अशांत खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यात हिंसक जमावानं पोलिस ठाण्यामध्ये घुसून एका पर्यटकाची हत्या केली. त्याच्यावर कुराणचा अपमान करण्याचा आरोप होता. संपूर्ण स्वात सुंदर असून निसर्गानं संपन्न आहे. एकेकाळी तिथं जगभरातून लोक पर्यटनासाठी येत असत. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई स्वात खोऱ्यातील.

पाकिस्तानातील ईशनिंदा कायदा अमानवी असून गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला मृत्युदंड देण्याचीच त्यात तरतूद आहे. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होतो. १९८७ ते २०२२ च्या दरम्यान किमान २ हजार १२० लोकांवर ईशनिंदा कायद्याखाली खटले दाखल करण्यात आले. न्यायालयाने मुक्त केलं तर जमाव ईशनिंदाच्या आरोपीची हत्या अनेकदा करतात.

आशिया बिबी नावाच्या ख्रिस्ती महिलेवरील खटल्यानं जगाचं लक्ष पाकिस्तानच्या क्रूर ईशनिंदा कायद्याकडे गेलं. तिला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या पंजाबच्या राज्यपाल सलमान तासीर यांची त्यांच्या स्वतःच्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं राजधानी इस्लामाबाद येथे हत्या केली.

सियालकोट येथील मोहम्मद इस्माईल १८ जूनला स्वात खोऱ्यातील माद्यान येथे फिरण्यासाठी गेला होता. त्यानं कुराणचा अपमान केलं असल्याचा आरोप केला गेला. परिस्थिती बिघडण्यापूर्वी काही लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेलं. त्यानंतर मशिदीतून कुराणचा अपमान करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं. ते ऐकून लोकं गोळा झाली आणि जमाव पोलिस स्टेशनला गेला.

आरोपीला आपल्या हवाली करण्यात यावे, अशी मागणी हिंसक जमावाने केली. पोलिसांनी नकार दिल्यानंतर जमाव पोलिस स्टेशनमध्ये घुसला, इस्माईलची हत्या केली आणि पोलिस स्टेशन जाळलं. एखाद्यावर ईशनिंदाचा आरोप झाला तर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं.

एकेकाळी स्वात इथं जगभरातून मोठ्या संख्येत पर्यटक येत असत. पर्यटन व्यवसायामुळं स्वात खोऱ्यातील लोकांकडं पैसे असायचे. तिथं पंचतारांकित हॉटेल देखील होती. दहशतवादामुळं पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त झाला. लोकांना जगणं कठीण झालं आहे. अलीकडं काही प्रमाणात पर्यटक येण्यास सुरुवात झाली होती. स्वातच्या हॉटेल मालकांना आणि व्यापाऱ्यांना भीती आहे की आता परत पर्यटक येण्याचे बंद होईल. अशांत परिसरात कोणी पर्यटक जात नाही.

२५ मे ला सरगोधा शहरात कुराणचा अपमान करण्यात आल्याच्या आरोपावरून जमावाने ख्रिस्ती समाजाच्या लोकांवर हल्ला केला. त्यात नजीर मसीह (७२) यांंचा मृत्यू झाला. ते पाहून नंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं. काही घरांची तोडफोड करण्यात आली. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला बहावलपूर येथील न्यायालयाने नौमान मसीह (२२) याला ईशनिंदाबद्दल फाशी ठोठावली.

ईशनिंदाच्या आरोपींना वकील मिळणं जवळपास अशक्य असतं. वकिलांना देखील अतिरेकी सोडत नाहीत. २०१४ मध्ये मुलतान शहरात एका प्राध्यापकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राशीद रेहमान नावाच्या वकिलाची त्यांच्या कार्यालयात हत्या करण्यात आलेली. रेहमान यांचं मानवाधिकार चळवळीत मोठं नाव होतं.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहराला लागून असलेल्या जरानवाला इथं ईशनिंदाच्या आरोपावरून ख्रिस्ती समुदायावर हल्ला करण्यात आला होता. दोन ख्रिस्ती भावांनी कुराणचा अपमान केला असल्याचा आरोप केला गेला. त्यात २२ लहान चर्च आणि जवळपास १०० घरांची तोडफोड करण्यात आली. जरानवाला हल्ल्याची तीव्र प्रतिक्रिया जगभर उमटली. पाकिस्तान सरकारनं देखील काही कारवाई केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी ख्रिस्ती समाजावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध केला.

तेहरीक-ए-लबायक पाकिस्तान नावाची धार्मिक अतिरेकी संघटना आहे. लबायक आणि इतर काही अतिरेकी संघटना या शिया, हिंदू, ख्रिस्ती आणि अहमदिया समाजाच्या विरोधात आहेत. लबायकला यापूर्वी बऱ्याच वेळा लष्कर आणि आयएसआयनं मदत केली आहे. सलमान तासीर यांचा हत्यारा मुमताज कादरीला फाशी देण्यात आल्यानंतर लबायकची स्थापना झाली आहे. अलीकडे ईशनिंदाच्या खटल्यात झालेल्या वाढीला पण लबायक जबाबदार आहे.

ईशनिंदाचे बहुतेक खटले खोटे असतात. व्यक्तिगत भांडण किंवा दुश्मनी त्यातून काढली जाते. एकदा ईशनिंदाचा आरोप लागला की लोक त्याला खरं मानायला लागतात. ज्यांच्यावर आरोप केला गेला त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला जगणं अशक्य होतं. आशिया बिबीच्या खटल्यातून ही गोष्ट सहज लक्षात येते.

पंजाब प्रांतात प्रसिद्ध नानकाना साहिब जवळच्या एका लहान गावातील ती ख्रिस्ती महिला. पाणी भरण्यावरून एका महिलेशी तिची वादावादी झाली. लगेच आशिया बिबीनं कुराणचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. २०१० मध्ये खालच्या न्यायालयानं आशिया बिबी यांना गुन्हेगार ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.

तुरुंगात असताना सलमान तासीरनी आशिया बिबीची भेट घेतली आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं म्हटलं. तासीरच्या या निवेदनाचा कट्टर धार्मिक संघटनांनी निषेध केला. त्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात आलं. ४ जानेवारी २०११ ला तासीर यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यानेच इस्लामाबादच्या बाजारात त्यांची हत्या केली. नंतर हत्यारा तिथेच बसून राहिला. त्याला पकडण्यात आलं.

२०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात त्याला फाशी देण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ च्या ऑक्टोबर महिन्यात आशिया बिबीला निर्दोष मुक्त केले. पण ईशनिंदाच्या आरोपींसाठी तुरुंगाच्या बाहेर जगणं अशक्य असतं. त्यानंतर कॅनडाने बिबी यांना आश्रय दिला. बिबी यांना कॅनडात गुपचूप पाठवण्यात आलं. २०१९ पासून त्या कॅनडात राहतात.

२ मार्च २०११ ला पाकिस्तानचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री शाहबाज भट्टी यांची तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने इस्लामाबाद येथे हत्या केली. ते ख्रिस्ती होते. ईशनिंदा कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याची भट्टी यांनी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमक्या मिळायला सुरुवात झाली होती. शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. आशिया बिबीच्या बाजूला किंवा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं सांगणारे काही राजकीय नेत्यांना त्या काळात धमक्या मिळाल्या होत्या.

अल्पसंख्यांकाच्या विरोधात ईशनिंदा कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जातो. ख्रिस्ती आणि अहमदिया समाजातील लोक प्रामुख्याने पंजाब प्रांतात राहतात. तर सिंध प्रांतात हिंदू. पाकिस्तानात ख्रिस्ती आणि हिंदू समाजाची मिळून वस्ती जेमतेम साडेतीन टक्के आहे. नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले पाकिस्तानी डॉ. अब्दुस सलाम अहमदिया होते. त्यांना देखील पाकिस्तानात वाईट वागणूक मिळालेली.

१९७४ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी राज्यघटनेत दुसरी दुरुस्ती करून अहमदिया मुस्लिम नसल्याचे जाहीर केले. त्या वेळेस डॉ. सलाम होते भुट्टो यांचे वैज्ञानिक सल्लागार. त्यांनी असं न करण्याची विनंती भुट्टो यांना केलेली. त्यावर भुट्टो यांनी सांगितलेलं, की त्यांच्यावर मुल्ला-मौलवींचा प्रचंड दबाव आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही.

आता अहमदिया मुस्लिम नसल्याचं जाहीर करू आणि नंतर परिस्थितीत सुधारणा झाल्यावर घटनादुरुस्ती मागे घेऊ. तेव्हा डॉ. सलाम यांनी सांगितलेलं, की एकदा अशा स्वरूपाची घटना दुरुस्ती केल्यानंतर ती मागे घेता येत नाही.

शेवटी सलाम यांनी पाकिस्तान सोडलं. भारतातही काही लाख अहमदिया आहेत. कादियानी म्हणून देखील ते ओळखले जातात. भारतात ते मुस्लिम म्हणून जगतात. भारतात पण काही कट्टर संघटना अहमदिया मुस्लिम नसल्याचे सरकारने जाहीर करावं, अशी मागणी अधूनमधून करतात. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि अहमदिया समाजाच्या सोबत उभं राहिलं पाहिजे.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून पाकिस्तानविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com