लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल
मागील दोन भागांमध्ये अंकुर आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव सकारात्मकतेमुळे कसा वाचला, सकारात्मकता (Positivity) आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले जीवन कसे सुरक्षित, आनंददायी, निरोगी करते, (Happy & Healthy) हे आपण अनुभवले. अंकुरला झटपट पैसा कमवावासा वाटला आणि त्यासाठी त्याने अयशस्वी प्रयत्नदेखील केला. जो अंकुर आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित करत होता, चांगल्या ठिकाणी कामालादेखील होता आणि याआधी त्याच्या स्वभावामध्ये असे कधीही, काहीही आढळून आले नव्हते, की ज्यामधून त्याचा पैसे कमविण्याचा स्वभाव, अट्टाहास समोर येईल. मग अचानक असे त्याला का वाटू लागले असावे? (pankh sakaratmakteche saptarang marathi article by dr hemant ostwal nashik news)
अंकुरच्या मित्राची स्कॉर्पिओ आम्ही परत मिळविली. सर्व काही आम्ही पोलिस ठाण्याला ऑन रेकॉर्ड आणले. ज्यामुळे अंकुर, निशिकांत, निशिकांतचे वडील रमाकांत हे सर्व जण सुरक्षित झाले. अंकुरने जिथे स्कॉर्पिओ गहाण ठेवली होती, ती व्यक्ती आणि पुढील व्यक्तींपैकी एक लष्कराचा अपवाद वगळता, दोन्ही मोठे गुंडच होते. अशा माणसांशी गाठ अंकुर आणि बाकी सर्व परिवाराची पडली होती. त्यामुळेच खासकरून प्रवीण, रमाकांत यांना वाटणारी भीती खरी होती. आता मात्र सर्व सुरक्षित, शांत झाले होते. मात्र अंकुरने असे का केले असावे, हा विषय
माझ्या मनातून जात नव्हता. अंकुरला मी त्याच्या जन्मापासून ओळखत होतो. त्यामुळे अचानक असे काय झाले, की ज्यामुळे अंकुरला झटपट श्रीमंत व्हावेसे वाटले! याच विषयात मी अंकुरशी बोलायचे ठरविले. दोन-तीन वेळेला मी प्रयत्न केला; परंतु अंकुर ताकास तूर लागू देईना.
‘नाही काका, काही खास नाही!’ मी असाच प्रयत्न करून बघत होतो. भरपूर लोक पैसे कमवतात, मग आपण का नाही कमवायचे, असा विचार माझा होता. याच्या पलीकडे काही नाही, काही नाही. मला मात्र अंकुर सांगतोय एवढेच नाही तर, अजूनही काहीतरी नक्की आहे, असे वाटत होते. जे अंकुर काही सांगायला तयार नाही. दहा-पंधरा दिवस अजून जाऊ दिले. मग एका रविवारी सकाळी अंकुशला म्हटले, ‘‘चल, घोटी-इगतपुरीजवळ महामार्गावर एका धाब्यावर छान अख्खा मसूर आणि पराठा खूपच छान मिळतो. आपण रविवार सकाळचा लॉँग ड्राइव्ह अधिक छानसा नाश्ता करू या.’’ अंकुरला ही कल्पना खूपच आवडली आणि तो क्षणार्धात तयार झाला.
अंकुरच्या पूर्ण आयुष्यावरच माझा खूप प्रभाव होता.
मला तो खूप चांगला मानत होता आणि म्हणून तो लगेचच यायला तयार झाला. आम्ही लॉँग ड्राइव्ह अधिक नाश्ता असे बाहेर निघालो. मी पुन्हा एकदा अंकुरकडून त्याच्या झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. या वेळी मात्र मला यश आले. झाले असे होते, की अंकुरला कारखानदार व्हायचे होते. त्याने या विषयात बराच अभ्यासही करून ठेवला होता. त्यांनी पिण्याच्या शुद्ध पाण्याची म्हणजे मिनरल वॉटरची इंडस्ट्री टाकायची ठरविले होते. त्यासाठी त्याला बराच पैसा लागणार होता. पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत घरून भागभांडवल टाकायला लागणार होते आणि उरलेले कर्ज घ्यावयाचे, असे एकंदरीत अंकुरचे नियोजन होते.
मलाही ऐकून आनंद झाला, की अगदीच तरुणपणी अंकुरला कारखानदार व्हावेसे वाटत होते. मग मी त्याच्या बरेच खोलात गेलो. त्यांनी केलेला अभ्यास बघितला, अभ्यासला. त्याला आश्वासित केले, की ‘चिंता करू नकोस, मी प्रवीण आणि श्रद्धाशी बोलतो आणि आपण सर्व मिळून तुझा हा प्रोजेक्ट करण्याकरिता प्रयत्न करू.’ अशारीतीने आमचा नाश्ता कम लॉँग ड्राइव्ह यशस्वी झाला होता. त्या रविवारी सायंकाळी प्रवीण, श्रद्धा, अंकुर, अंकिता आणि मी आम्ही सर्व जण अंकुरच्या कारखानदारीवर विस्तृत चर्चा करण्यासाठी बसलो आणि या विषयाचा सखोल अभ्यास प्रवीण आणि अंकुरने माझ्या मदतीने करावयाचा ठरला. या क्षेत्रातील काही मंडळी माझी मित्रकंपनी असल्याने, माझा रोल अर्थातच महत्त्वाचा होता.
आधी प्रवीण आणि अंकुरला या विषयाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला लावला. दोघांनीही व्यवस्थित मेहनत करून प्रोजेक्ट रिपोर्ट बनविला. कागदावर तरी सर्व चित्र गुलाबी गुलाबी दिसत होते. मग मी दोघांनाही घेऊन ज्यांच्या आधीच मिनरल वॉटरच्या इंडस्ट्री होत्या, अशा माझ्या काही मित्रांकडे त्यांना घेऊन गेलो. योगायोगाने दोघांनीही सुरवात सारखीच केली. आमचीच मिनरल वॉटरची इंडस्ट्री घेऊन टाका! अगदी स्वस्त देऊ. आम्हाला आमचेच गुंतविलेले पैसे मिळाले तरी खूप झाले, अशा प्रकारची सुरवात दोघांनीही केली.
खरेतर आम्ही सगळे तेथे वेगळ्याच अपेक्षेने गेलो होतो, की येथून मार्गदर्शन घेऊन आपण लवकरात लवकर मिनरल वॉटरची इंडस्ट्री टाकू. झाले मात्र उलटेच. ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीचा प्रत्यय आम्हाला त्या दिवशी आला. त्यांनी आम्हाला अगदी सद्यःस्थितीची वास्तव परिस्थिती सांगितली. कित्येक इंडस्ट्रीवाले तोट्यात होते. मिळाला तरी पाच-दहा पैसे बाटलीमागे नफा मोठ्या मुश्किलीने मिळत होता. त्यासाठी आधी प्रचंड मेहनत आणि भरपूर गुंतवणूकदेखील होती. त्यासाठी बराच वेळदेखील लागणार होता आणि एवढे करूनही यश मिळेलच याची शाश्वती अजिबातच नव्हती. त्यामुळेच अगदी या भावात अनेक मिनरल वॉटरच्या इंडस्ट्रीज मिळत होत्या. कुठेतरी अंकुरच्या नशिबात चांगले योग सुरू झाले होते म्हणून पहिल्या मोठ्या संकटातून वाचला.
कारण अंकुरला शेअर बाजारामध्ये भरपूर पैसा मिळाला असता, तर त्याने तो अधिक त्याच्या तिप्पट कर्ज घेऊन या मिनरल वॉटरच्या इंडस्ट्रीमध्ये गुंतविला असता आणि अर्थातच तोट्यात गेला असता. भले मोठे कर्ज अंकुर फेडत बसला असता. यात तिळमात्रही शंका नाही. कारण ना तर अंकुरला या विषयातील काही अनुभव होता, ना तर काही परिपक्वता होती, ना तर या मिनरल वॉटरच्या बाजारामध्ये काही ओळख-परिचय होता, ना तर त्याची स्वतःची कुठल्याही प्रकारची मार्केटिंग सिस्टिम होती. कशातच काही नसताना निव्वळ काही पैसा हाताशी आला म्हणून इंडस्ट्री टाकून दिली, असे झाले असते.
एवढे सगळे ऐकल्यानंतरही अंकुर मात्र आपल्या मिनरल वॉटरचा कारखाना टाकण्यावर ठाम होता. प्रवीण, मी आणि श्रद्धा आम्ही कारखाना टाकावयाचा नाही, या निर्णयाप्रत आलेलो होतो. अंकुरला कसे समजावून सांगायचे हा मात्र अवघड प्रश्न तयार झाला होता. आम्ही त्याला समजावून सांगायला गेलो तर तोच उलट आम्हाला कन्व्हिन्स करायला लागला, की तुमचे मित्र कसे चुकीचे आहेत, त्यांना धंदा करता येत नाही. मी शंभर टक्के नफ्यामध्ये हा कारखाना चालवून दाखवेन. बऱ्याचदा समजावल्यानंतरही अंकुर काही मानायला तयार नव्हता. त्याच्या हट्टापायी आम्ही पुन्हा एकदा सर्व अभ्यास करावयाचा ठरविला. आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचा ठरविला. दोन-चार ठिकाणी आधी आम्ही जागा बघितली. अर्धा एकर ते एक एकर अशी जागा आम्ही बघितली. मशिनरीची किंमत काढली.
इतर खर्च सर्व बघितला. खेळते भागभांडवल किती लागेल याचा अभ्यास केला. थोडक्यात, सर्व विषयांचा सखोल अभ्यास झाला. गुंतवणूक किती लागेल, हे लक्षात आले. मग आम्ही आपले पाणी कुठे कुठे कसे कसे विकले जाईल, याला उठाव किती? आपल्याला काय किंमत मिळू शकते? बाजारामध्ये नावाजलेले ब्रँड्स सोडून अजून फक्त आपल्याच जिल्ह्यामध्ये किती ब्रँड्स स्पर्धेमध्ये आहेत, याचीदेखील लिस्ट तयार केली. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कसा आहे, याचा अभ्यास केला. पैसे रोखीने मिळतात की पाणी उधार द्यायला लागते का आणि तेही किती दिवस याचादेखील अभ्यास झाला. हा सर्व अभ्यास तीन-चार महिने चालला होता. एकंदरीत मिनरल वॉटरचा कारखाना टाकणे हा एक आतबट्ट्याचाच व्यवसाय ठरला असता, हे आम्हाला अंकुर वगळता सर्वांना समजून चुकले होते.
अंकुर अजूनही ऐकत नव्हता. त्याउलट तो आम्हास परत परत काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत होता, की मिनरल वॉटरच्या कारखान्यामध्ये आपले सर्वांचे भविष्य किती उज्ज्वल आहे. अंकुर स्वतः खूपच जास्त मिनरल वॉटरचा कारखाना टाकण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला होता. आम्ही सर्वांनी पुनःपुन्हा समजावून सांगण्याचे प्रयत्न केले. अंकुरने जणू काही कारखाना टाकण्याची शपथच घेतली होती. त्या पद्धतीने त्याने एकच धोशा लावला होता. कारखाना टाकण्याचा मोठा अवघड प्रश्न तयार झाला होता. कारण स्कॉर्पिओच्या भानगडीमध्ये, शेअर मार्केटच्या भानगडीमध्ये प्रवीण, श्रद्धाने आता आत्ताच जवळपास १७-१८ लाख रुपये भरले होते. ते उभे करण्यासाठीदेखील त्यांनी कर्ज काढले होते. ते तर अजून फेडायचेच होते आणि वरतून अंकुर हट्टाला पेटला होता. कारखाना टाकण्यासाठी पुनश्च एकदा चेंडू माझ्या कोर्टात आला, अंकुरला समजावून सांगण्याचा, त्याला कारखाना टाकण्यापासून परावृत्त करण्याचा.
मी काही दिवस शांत बसण्याचे ठरविले.
कारण त्याच वेळी समजावयाचे प्रयत्न करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असे होते. यादरम्यान माझ्या मनातही विचार सुरूच होते, की कुठलीही पार्श्वभूमी नसताना, कुठलाही अनुभव नसताना, कुठलेही कारखानदारीचे स्किल नसताना, कुठलीही पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग) नसताना, कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना अंकुरला का बरे इंडस्ट्री टाकायची? का त्याला एवढी घाई झाली होती? त्यापोटीच त्याने शेअर मार्केटमध्ये केलेली एवढी मोठी गडबड, ज्यामध्ये सर्व कुटुंबच आत्महत्या करता करता वाचले. असे सगळे विचार माझ्या मनामध्ये घोळू लागले आणि मला आतून जाणीव होत होती, की हे प्रकरण दिसते तेवढे सरळ नक्कीच नाही. मग पुन्हा एकदा कामाला लागायचे मी ठरविले. नक्कीच मोठा अवघड टास्क दिसत होता. कारण याचे उत्तर अर्थातच फक्त आणि फक्त अंकुरकडेच असणार होते. पुन्हा एकदा लॉँग ड्राइव्ह, पुन्हा एकदा धाब्यावरचे जेवण, पुन्हा एकदा लॉँग काउन्सिलिंग आणि पुन्हा एकदा छानशी भावनिक रडारड. अर्थातच त्यामागे कारण होते ते म्हणजे सुसंवादाचा बाप-बेटामधील अभाव.
जेव्हा सर्व संपूर्ण सत्य बाहेर आले तेव्हा मात्र हसावे की रडावे हेच कळेना. सत्य फारच वेगळे, उत्कंठावर्धक, गमतीशीर होते.
आमच्या अंकुररावांना खूप मोठे कारखानदार वगैरे व्हायचे होते, खूप पैसेवाले व्हायचे होते, असली काहीही भानगड नव्हती, तर ही होती प्रेमाची भानगड.
आमच्या अंकुरची एक मैत्रीण होती, जी इंजिनिअरिंगला कॉलेजची चारही वर्षे त्याची वर्गमैत्रीण होती. कॉलेजला जाताना एकाच बसने दोघेही जायचे-यायचे. या मैत्रिणीवर म्हणजेच पूर्वावर अंकुरचा प्राणापलीकडला जीव जडला. प्रेमाच्या आणाभाका घेऊन झालेल्या होत्या, ‘साथ जियेंगे-साथ मरेंगे’ ही शपथ घेऊन झालेली होती. पूर्वाच्या वडिलांची एक स्मॉल स्केल इंडस्ट्री होती. व्यवस्थित वेलसेटल्ड होते. तिला एक भाऊ होता. छानपैकी शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये त्यांचा बंगलाही होता आणि त्या मानाने अंकुरच्या घरची परिस्थिती मात्र तेवढी चांगली नव्हती. खाऊनपिऊन सुखी होते. तुलनात्मकदृष्ट्या पूर्वाच्या घरची परिस्थिती खूपच चांगली होती आणि येथेच सर्व मेख होती. अंकुरच्या मनामध्ये अशी भीती होती, की आर्थिकदृष्ट्या आपण पूर्वाच्या तुलनेमध्ये मागे पडतो आहोत आणि जर आपण मागे पडत असू, तर पूर्वाचे वडील पूर्वाचा हात आपल्या हातामध्ये देणार नाहीत.
ते त्यांच्या तुल्यबळ असाच मुलगा शोधतील, ही चिंता अंकुरला सतवायला लागली. अंकुरला तर काहीही करून पूर्वाशी लग्न करायचेच होते. घरच्यांशी सुसंवादअभावी या सर्व गोष्टी त्याने सर्वांपासून लपविल्या. त्याने ना तर त्याच्या प्रेमाबद्दल काही सांगितले, ना तर पुढच्या या सर्व गोष्टी त्याने घरी कोणाला सांगितल्या! आणि आता कारखानदार व्हायला अंकुश राव निघाले होते. आपण कारखानदार असू तर पूर्वाचे वडील पूर्वाचा हात आपल्या हातात द्यायला लवकर तयार होतील ही भाबडी, वेडी आशा अंकुशला होती. या भोळ्याभाबड्या आशेपोटीच अंकुर नको ते वेगवेगळे प्रकार करून कारखानदार होण्याचा प्रयत्न करीत होता. हे सर्व ऐकल्यावर मला हसावे की रडावे, हेच कळेनासे झाले.
पण प्रेमामध्ये सर्व काही क्षम्य असते, या न्यायानुसार मी सर्व गोष्टी बाजूला टाकून पुन्हा एकदा माझी आणि माझ्या सकारात्मकतेची ड्यूटी सुरू झाली. अर्थातच पहिले काम होते ते श्रद्धा आणि प्रवीणला समजावून सांगण्याचे. कारण या विषयामध्ये त्यांची मते काय आहेत, याची मला चांगलीच कल्पना होती. त्यामुळे हे काम किती अवघड आहे हे मला माहिती होते. पण अर्थातच मुलांवरच्या प्रेमापोटी आई-वडिलांना आपली मते, आपली निवड असे सर्वच काही बाजूला ठेवायला लागत असते. येथेही शेवटी तसेच झाले. आधी बरीच आदळआपट झाली. ‘खानदान का नाम मिट्टी में मिला दिया’ असेही संवाद झाले;
परंतु शेवटी मात्र प्रवीण आणि श्रद्धाकडून होकार मिळाला; परंतु खरा अवघड किल्ला हा पुढेच होता, तो म्हणजे, पूर्वाच्या घरच्यांची परवानगी. आता मी थोडक्यात एवढेच सांगेन, की तेथे कामी आली ती म्हणजे फक्त आणि फक्त सकारात्मकता. कसे केले, काय केले, हे आता काहीच न सांगता एवढेच सांगतो, की पूर्वाच्या घरच्यांना या लग्नासाठी राजी करण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्षे लागली. आम्ही सकारात्मकतेने प्रयत्न करीत राहिलो आणि शेवट अर्थातच हिंदी सिनेमाप्रमाणेच गोड झाला.
हीच सकारात्मकता अंकुर, पूर्वा त्याबरोबरच प्रवीण, श्रद्धा आणि पूर्वाच्या आई-वडिलांनी बाळगल्यामुळे, आज अंकुर एक प्रथितयश कारखानदार झालेला आहे. पूर्वा, प्रवीण, श्रद्धा या सर्वांची त्याला ॲक्टिव्ह मदत आहे. मार्गदर्शन आणि इतर सर्व सहकार्य अर्थातच पूर्वाच्या वडिलांचे आहे. आज पूर्वा आणि अंकुरचा संसार अतिशय सुखाने चालला आहे. या प्रेमवेड्या अंकुरच्या गोष्टीवरून आपणा सर्वांच्या लक्षात आले असेलच, की जर खऱ्या अर्थाने आपण सकारात्मक असू तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
(लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.