बिहार नितीश कुमारांच्या ताब्यात येण्याआधीची गोष्ट. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचा शब्दशः एकछत्री अंमल होता. लालूप्रसाद स्वतःला जयप्रकाश नारायण यांचे शिष्य म्हणवून घेत. विद्यार्थी चळवळीतून आपण आलो, हे अभिमानाने सांगत. वयाच्या २९ व्या वर्षी १९७७ मध्ये खासदार बनलेल्या लालूंनी पुढच्या दहा वर्षांत संपूर्ण बिहारभर प्रभाव निर्माण केला. १९९० ते १९९७ अशी सात वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिले. चारा गैरव्यवहारात लालूंविरूद्ध कारवाई सुरू झाल्यानंतर पुढची आठ वर्षे त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्रीपदावर राहिल्या. या काळात जनता दलातून फुटून लालूंनी स्वतःचा राष्ट्रीय जनता दल पक्ष निर्माण केला होता. १९९० ते २००५ अशी पंधरा वर्षे लालूंनी बिहारवर सत्ता गाजवली. यातील जवळपास दहा वर्षांच्या कालखंडात बिहार गुंडगिरीसाठी देशभर बदनाम झाला. राजकारण आणि गुन्हेगारी परस्परांत इतकी मिसळून गेली, की नेता कोण आणि टोळीप्रमुख कोण यातला फरक समजेनासा झाला. (Bahubali politics in Bihar) या कालखंडाला 'जंगलराज' असे संबोधत २००५ मध्ये नितीश कुमार सत्तेवर आले, ते आजअखेर मुख्यमंत्रीपदावर आहेत. नितीश कुमार यांनी २००५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त सरकारचे आश्वासन दिले. त्यांचा रोख लालूंचे सरकार भ्रष्टाचारी आणि भयकारी असल्याचे सांगण्यावर होता. कधी भाजप, तर कधी थेट लालू अशी साथ घेत नितीश कुमार यांनी बिहारमध्ये स्थिर सरकार दिले. या काळात 'जंगलराज'चा शिक्का जरूर पुसट झाला; पण त्याच्या खाणाखुणा आजही बिहारमध्ये आहेत. (Criminalization of politics in Bihar)
बाहुबली निवडणुकीत
' जंगलराज'चा शिक्का बसण्याचे कारण १९९० ते २००५ मध्ये बिहारमध्ये कमालीची वाढलेली संघटित गुन्हेगारी. या संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी राजकीय नेत्यांचे संगनमत झाले आणि बिहारमध्ये अपहरण, हत्या, दरोड्यांना ऊत आला. 'बाहुबली' अशी संज्ञा या टोळी प्रमुखांना प्राप्त झाली. बिहारमधली कुठलीही निवडणूक म्हणजे मतदान केंद्रे बळकावणे, बंदूका घेतलेल्या टोळ्यांनी हवं तसं मतदान करून घेणं अशा स्वरूपाची होत गेली. एकापाठोपाठ एक टोळ्या उदयाला आल्या. या टोळ्यांनी राजकारणातही बिनधास्त प्रवेश केला. मोहम्मद शाहबुद्दीन, पप्पू यादव, आनंद मोहन यासारख्या खासदार राहिलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी सातत्याने वादग्रस्त राहिली.
राजकारणाचं गुन्हेगारीकरण
गुन्हेगारी टोळ्यांना लोकशाही व्यवस्थेचा भाग बनविण्याच्या बिहारमधील प्रयत्नांवर देशभरातून टिका झाली. (List of Bahubali leaders who famoused in Bihar) बूटन सिंह, टोला सिंह, शंकर सिंह, लड्डू सिंह, चंदन सिंह अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या ताब्यात बिहारचा बहुतांश प्रदेश राहिला. या टोळ्यांना पोषक वातावरण राज्याच्या सीमावर्ती प्रदेशात होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांशी आणि नेपाळशी सीमा असल्याचा फायदा टोळ्यांनी उठवला. गुन्हे बिहारमध्ये करायचे आणि उत्तर प्रदेशच्या गर्दीत गायब व्हायचे, अथवा पश्चिम बंगालमार्गे बांगलादेश सीमेपर्यंत दूर जायचे अशी टोळ्यांची पद्धत राहिली. नेपाळ हे बिहारच्या अनेक गुन्हेगारी टोळ्यांचं दुसरं घर होतं. टीका होत राहिली, तरीही बिहारमधील राजकारणाचं गुन्हेगारीकरण पूर्णतः थांबलं नाही. अगदी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रीय जनता दलाच्या ७३ टक्के आमदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल असल्याचा दाखला आहे. राजकीय स्वच्छतेचे गोडवे देशभर गाणाऱ्या भाजपमधील ७२ टक्के आमदारांवर गुन्हेगारीचा आरोप होता. ज्या 'जंगलराज'वर टिका करून नितीश कुमारांनी बस्तान बसविले, त्यांच्या संयुक्त जनता दलाच्या ४३ पैकी २० आमदारांवर गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत.
साखळीचं दर्शन
गेल्या पंधरा दिवसात बिहारमधील राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे नव्यानं दर्शन झालं. निमित्त होतं, पप्पू देव नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचा कथित एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याचं. पप्पू देव हा बिहारच्या गुन्हेगारी क्षेत्राच्या राजकीयकरणातली एक साखळी. ती साखळी कशी घट्ट होती, याचं उघड प्रतिबिंब त्याच्या मृत्यूनंतर दिसतं आहे. पप्पू देव याला पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार मारल्याचा आरोप बिहारमधलेच राजकीय नेते करताहेत. त्याला इलेक्ट्रिकचे शॉक देऊन मारले इथंपासून ते गोळी घातली इथंपर्यंतच्या चर्चा रंगल्या आहेत. नव्या अहवालानुसार, पप्पू देवच्या अंगावर जखमा आढळल्या आहेत.
पप्पू देवचा उदय (Criminal Pappu Dev)
पूर्व बिहारमधल्या सहरसा जिल्ह्यातला पप्पू देव म्हणजे १९९० नंतर उगवलेल्या टोळीप्रमुखांपैकी एक. त्याच्या गुन्हेगारीचे किस्से बिहारमध्ये अगदी पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत रंगवून सांगितले जात. भोला तिवारी, मनोज देव, बुलेट सिंग, फंटूश सिंह, सुरजभान सिंह, टुन्नी सिंह या बिहारमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या टोळीप्रमुखांशी पप्पू देवचं सख्य होतं. बिहारमध्ये एका टोळीप्रमुखाशी वाकड्यात शिरल्यानंतर टोळीयुद्ध ठरलेलं. पप्पू देव याला अपवाद. सुरजभान सिंह या टोळीप्रमुखाशी वैर घेऊनही तो जिवंत राहिला. त्यानं त्यासाठई उत्तर प्रदेशच्या श्रीप्रकाश शुक्लाची मदत घेतली. बिहारमधील सीमावर्ती प्रदेशावर त्यानं बस्तान बसवलं होतं. पूर्णिया जिल्ह्यावर त्याचं वर्चस्व राहिलं.
जातीभोवती टोळ्या
बिहारमधली गुन्हेगारी जातींभोवती फिरते. हे या राज्यातल्या गुन्हेगारीचं एक व्यवच्छेदक लक्षण. बिहारमध्ये १९९० ते २००० या काळात जातीय संघर्ष टोकदार होत होता, तेव्हा पप्पू देव आपले हातपाय पसरत होता. जातींभोवती टोळी उभी करायची आणि रॉबीनहूडचे रूप घ्यायचे, अशी बिहारी टोळ्यांची कार्यपद्धती दीर्घकाळ होती. खासदार बनलेले पप्पू यादव, आनंद मोहन एका बाजूला गुन्हेगारीतून राजकारणात प्रवेश करत होते, तेव्हा पप्पू देव बूटन सिंह याच्या टोळीतून गुन्हेगारी विश्वात प्रवेश करत होता. १९९० ते १९९५ पप्पू देव बूटन सिंह टोळीचा म्होरक्या म्हणून कुप्रसिद्ध झाला. १९९५ मध्ये बुटन सिंह विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिला. तोपर्यंत पप्पू देव स्वतंत्रपणे टोळी निर्माण करण्याइतका सक्षम झाला होता.
फसलेला प्रयत्न
राजकारणात प्रवेश करू पाहणाऱ्या गुन्हेगारी टोळीप्रमुखांचा मदतनीस अशा भूमिकेत पप्पू देव पुढची पंधरा वर्षे राहिला. या काळात कित्येक हत्याकांडांमध्ये त्याचं नाव आरोपी म्हणून आलं. नेपाळमध्ये त्याला अटक झाली आणि तब्बल ११ वर्षे तो नेपाळच्या कारागृहातून टोळीची सूत्रे हलवत राहिला. इतर टोळीप्रमुखांची वाट त्यानं २०१५ मध्ये धरली. राजकारणी म्हणून नाव कमविण्यासाठी बिहारचा हा अट्टल गुन्हेगार विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करू लागला. जमीनदारांविरूद्ध लढलो, म्हणून आपल्याला गुन्हेगार ठरवलं गेलं, अशी मखलाशी त्यानं सुरू केली. दीडशे गुन्हे दाखल असलेल्या पप्पू देव याला नेपाळमधून बिहारच्या तुरूंगात डांबण्यात आलं आणि पुढं त्याची जामिनावर सुटका झाली. आधीच राजकीय बुरखा पांघरून बसलेल्या टोळीप्रमुखांना तसंही पप्पू देव नको होता. नितीश सरकारनं त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना पायबंद घातला. अखेर डिसेंबर २०२१ मध्ये पोलीस चकमकीच्या नावावर त्याचा खात्मा झाला.
टोळ्यांमुळं बिहारचं नुकसान
केवळ एक गुन्हेगार संपला, इतकंच पप्पू देवच्या घटनेचं महत्व नाही. बिहारमध्ये गुन्हेगारी आणि राजकारण किती खोलवर रुजले होते, याचा नजिकचा दुवा म्हणजे पप्पू देव होता. हा काही शेकडो वर्षांपूर्वीचा काळ नव्हता; अगदी अलिकडंपर्यंत हे दोन्ही घटक हातात हात घालून चालत होते आणि अल्पप्रमाणात हा होईना अजूनही चालत आहेत. त्याचा परिणाम बिहारची केवळ बदनामीच झाली नाही, तर हे राज्य मागास राहिले. भीती आणि अज्ञान ही गुन्हेगारांची हत्यारे होती. ही हत्यारे त्यांनी सामान्य जनतेवर चालवली. त्यातून स्वतःचे साम्राज्य उभे केले. त्या साम्राज्याला धक्का लागू नये, म्हणून ते राजकारणात गेले आणि तिथे बसून त्यांनी धोरणे नियंत्रित केली.
पुढचं राजकारण
भारताचे दरवाजे जगाच्या उद्योगांसाठी १९९१ मध्ये खुले झाले, तेव्हा देशातली अन्य राज्ये खुल्या दिलानं स्वागत करत असताना बिहार, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी राजकारणाच्या बळावर आपापल्या राज्यांचे दरवाजे बंद करून घेतले. या दरवाजाआड गुन्हेगारांचं साम्राज्य अबाधित राहिलं, वाढत राहिलं. बिहार मागास राहिला, बेरोजगार राहिला. या राज्यातून लाखो तरूण रोजगाराच्या शोधात बाहेर पडले. सुपीक जमिनी नांगरटीविना पडून राहिल्या. एका दुष्टचक्रात बिहार अडकून राहिले. नितीश कुमारांच्या कार्यकाळात बिहारमधील गुन्हेगारीच्या उच्चाटनाचे प्रयत्न जरूर झाले; तथापि त्यांचे प्रयत्न पूर्णपणानं यशस्वी झालेले नाहीत हे पप्पू देवच्या निमित्तानं दिसलं. एकापाठोपाठ एक राजकीय नेते पप्पू देवच्या एन्काऊंटरच्या चौकशीची मागणी घेऊन पुढे सरसावत आहेत. पप्पू देव मरण पावला असला, तरी त्याच्या मृत्यूचा राजकीय लाभ उठविण्याचा खेळ आणखी काही दिवस सुरूच राहिल. तोपर्यंत बिहारच्या क्षितिजावर नवा पप्पू देव उगवू नये, इतकीच अपेक्षा...
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.