पॅरिसचं ग्रीन ऑलिम्पिक

1924 नंतर बरोबर १०० वर्षांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. २६ जून ते ११ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक रंगणार आहे.
पॅरिसचं ग्रीन ऑलिम्पिक
Updated on

- रोहिणी गोसावी

तोंडावर आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचं शिवधनुष्य पेलायला फ्रेंच प्रशासन सज्ज झालं आहे. थोड्याफार त्रुटी, काही आव्हानं आणि समस्या यांच्या पलीकडे जाऊन पर्यावरणपूरक, दीर्घकालीन शाश्वत विकासाची हमी देत पॅरिसमध्ये होत असलेली ही स्पर्धा भविष्यातील ऑलिम्पिक यजमानांसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासन निर्माण करतंय आणि त्या दिशेनेच जोरदार तयारी सुरू आहे.

1924 नंतर बरोबर १०० वर्षांनी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. २६ जून ते ११ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक रंगणार आहे. २२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान पॅराऑलिम्पिक स्पर्धा होताहेत. त्यानिमित्त आपल्या देशात येणारे जवळपास १६ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक आणि दीड कोटींपेक्षा जास्त पर्यटकांच्या स्वागताला पॅरिस सज्ज झालंय आणि त्याचा प्रत्यय शहरात फेरफटका मारताना पावलोपावली येतोय. पर्यावरणपूरक म्हणजेच ‘ग्रीन ऑलिम्पिक’ असं यंदाचं ब्रीदवाक्य आहे. ते समोर ठेवूनच स्पर्धेची सगळी तयारी करण्यात आली आहे.

२०२४ चं पॅरिस ऑलिम्पिक अनोखं आहे. ते आजवरच्या इतिहासातलं पहिलं पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचं मॉडेल असणारं ऑलिम्पिक ठरणार आहे. कारण ऑलिम्पिकसाठी पॅरिस देश तयार होत असताना कुठेही पर्यावरणाला हानी पोहोचू नये, तसेच स्पर्धा सुरू असताना आणि संपल्यानंतरही इथले पर्यावरण सुरक्षित राहावं याचा विचार करून ही सगळी तयारी करण्यात आली आहे.

त्यासाठी ऑलिम्पिक व्हिलेज सोडलं तर स्पर्धांचे व्हेन्यू तयार करताना कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आलेलं नाही. उलट पॅरिसमधील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणांवर अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उदा., पॅरिसच्या रॉयल पॅलेससारख्या काही ऐतिहासिक इमारतींमध्ये काही स्पर्धा आयोजित केल्या आहेत; तर आयफेल टॉवर, आंवालिद, त्रोकॅदरो, वर्साय पॅलेस इत्यादी ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांसाठी विविध तात्पुरती स्टेडियम बांधण्यात आली आहेत, जी स्पर्धा संपल्यानंतर काढून टाकली जाणार आहेत आणि त्याचा पर्यावरणाला काही धोकाही होणार नाही. शहरातील ग्रीन स्पेसला धक्का न लावता त्यात आणखी झाडं लावून शहराची हवा शक्य तितकी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

प्रथमच ओपन स्पेसवर उद्‍घाटन

पॅरिस ऑलिम्पिक अनेक दृष्टीने वेगळं ठरणार आहे. कारण अनेक स्पर्धांचं आयोजन हे पारंपरिक पद्धत बदलून करण्यात येणार आहे. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांचं उद्‍घाटन हे स्पर्धेच्या मुख्य स्टेडियमवर होत आलं आहे; पण पॅरिसमध्ये ते सेन नदीच्या काठावर मोकळ्या जागेत करण्यात येणार आहे.

येणारे स्पर्धक आणि प्रमुख पाहुण्यांना सेन नदीवरून बोटीतून उद्‍घाटनाच्या ठिकाणी आणलं जाणार आहे. सेन नदीच्या तीरावर आयफेल टॉवरसमोर उद्‍घाटनाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. तसेच काही स्पर्धांचे पुरस्कार प्रदान सोहळेही सेन नदीवर तरंगणाऱ्या फ्लोट्‍सवर करण्यात येणार आहेत.

सेन नदीत होणार जलतरणाच्या स्पर्धा

गेली १०० वर्षे पोहायला बंदी असलेल्या सेन नदीत ऑलिम्पिकच्या स्विमिंग आणि ट्रायथलॉन स्पर्धा भरवण्याचं फ्रेंच सरकारने ठरवलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याची तयारी सुरू आहे. ऑलिम्पिकनंतरही पॅरिशियन नागरिकांना पूर्वीसारखं सेन नदीत पोहता येईल, असं आश्वासन सरकारने दिले आहे; पण या स्पर्धा खरंच होणार का,

याबाबत अजूनही सगळे साशंक आहेत. त्याला अनेक कारणं असली तरीही पाण्यात असलेलं प्रदूषण आणि अचानक येणाऱ्या पावसामुळे खराब होणारं पाणी हे त्याचं मुख्य कारण आहे; पण तरीही प्रशासन मात्र स्पर्धा भरवण्यावर ठाम आहे. त्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन आणि पॅरिसच्या महापौर सेनमध्ये डुबकी मारणार आहेत, जेणेकरून कुणालाही शंकेला वाव राहणार नाही.

ऑलिम्पिक व्हिलेज

पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेज हे शाश्वत विकासाचं एक मॉडेल असल्याचं ऑलिम्पिक आणि फ्रेंच प्रशासनाचं म्हणणं आहे. स्पर्धक आणि इतर अधिकारी असे जवळपास १४ हजार लोक इथे आरामात राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच वेगवेगळ्या देशांतील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे इथे शक्य होणार आहे. खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इथे आरोग्य व्यवस्था, जीम आणि व्यायामाच्या इतर सोयी-सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

इथल्या इमारती एनर्जी एफिशिएंट बनवण्यात आल्यात. एनर्जीचा वापर कमी व्हावा म्हणून सगळीकडे एलईडी लाईट बसवण्यात आले आहेत. स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम बसवण्यात आली आहे.

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये ऊर्जानिर्मितीसाठी सोलार पॅनल आणि पवनचक्की बनवण्यात आली आहे. पाण्याचा हवा तेवढाच वापर व्हावा यासाठी वॉटर फिक्स्चर्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्रे वॉटर रिसायकलिंग सिस्टीम्स बसवण्यात आल्या आहेत. कचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये स्पर्धकांसाठी बांधण्यात आलेली जवळपास सहा हजार घरं स्पर्धा संपल्यानंतर सामान्य नागरिकांना राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारची परवडणाऱ्या घरांची योजना, विद्यार्थी निवास, शाळा इत्यादी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ऑलिम्पिक व्हिलेज वापरण्यात येईल.

ऑलिम्पिकदरम्यान आलेले सगळेच पर्यटक स्पर्धा बघायला जाणार नाहीत, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकासाठी शहरात काही ना काही असणार आहे. कारण पॅरिस हे फक्त आधुनिक शहर नाही, तर फ्रान्सचं सांस्कृतिक आणि कला केंद्रसुद्धा आहे.

त्यामुळे स्पर्धांदरम्यान पॅरिस शहरात अनेक ठिकाणी वेगवेगळी प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे फ्रेंच संस्कृती आणि इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचेल.

दीड कोटी पर्यटकांना सामावून घेण्याची प्रशासनाची तयारी असली तरीही, त्याचा सगळ्यात जास्त ताण येणार आहे तो पॅरिसच्या वाहतूक व्यवस्थेवर. पॅरिसची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम आहेच; पण दीड कोटी पर्यटकांचा भार ती पेलू शकेल का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

मेट्रो, रेल्वे (RER) आणि बस या पॅरिसच्या महत्त्वाच्या वाहतूक सुविधा आहेत. ऑलिम्पिकसाठी या सगळ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. पॅरिसची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मेट्रो अनेक ठिकाणी वाढवण्यात आल्या आहेत.

काही नवीन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पॅरिसच्या उपनगरांमध्ये धावणाऱ्या ट्रेनही वाढवण्यात येणार आहेत. सायकल आणि पायी चालणाऱ्यांसाठी मुख्य रस्त्यांवर वेगळे पाथवेज तयार करण्यात आलेत. पॅरिसमध्ये प्रत्येक स्थानकाच्या बाहेर असणाऱ्या इलेक्ट्रिक सायकल हाही पॅरिशियनांचा एक महत्त्वाचा वाहतूक पर्याय आहे, त्यामुळे या सायकल आणि त्यांच्या पार्किंगच्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

पॅरिस खरंच स्पर्धांसाठी तयार आहे?

पॅरिस हे जागतिक स्तरावरील पर्यटकांचं सर्वात जास्त पसंतीचं शहर आहे. दरवर्षी जवळपास पाच कोटी पर्यटक पॅरिसला येतात. आता फक्त ऑलिम्पिक स्पर्धांच्या काळात जवळपास दीड कोटी पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एवढी गर्दी पॅरिस शहराला झेपेल का, अशी शंका अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

स्पर्धांच्या काळात केलेल्या अनेक बदलांमुळे इथले स्थानिक नागरिक मात्र आनंदी नाहीत. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत पॅरिसमध्ये वाहतुकीचे दर वाढवण्यात आलेत. म्हणजे आता असलेली तिकिटाची किंमत २.१५ युरोवरून ४ युरोवर जाणार आहे, तर १० तिकिटांचे बंडल १७ युरोवरून ३२ युरोवर जाणार आहे.

त्यामुळे स्पर्धांचा भार सामान्य नागरिकांच्या खिशावर का, असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. स्पर्धेच्या जागा निश्चित करताना अनेक ठिकाणी स्थानिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे; पण स्पर्धा संपल्यानंतर मात्र त्यांना पुन्हा त्यांच्या जागा मिळतील की नाही याची काहीही स्पष्टता प्रशासनाने दिलेली नाही.

त्यात ऑलिम्पिक व्हिलेजच्या जागेवर राहणारे रहिवासी, तसेच गेली अनेक शतकं सेन नदीच्या काठावर असलेल्या दुकानदारांनाही तिथून हलवण्यात आलं आहे. त्यांनी अनेक दिवस सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन केलं; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासन सज्ज

स्पर्धांच्या दरम्यान पॅरिसच्या रहिवाशांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी प्रशासनाने ॲडव्हायजरी जाहीर केली आहे. त्यात नागरिकांनी स्पर्धांदरम्यान अगदी गरज असेल तरच बाहेर पडावं, शहरात अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीत बदल केलेले असल्याने शक्य तितका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा इत्यादी सूचना देण्यात आल्या आहेत.

अनेक कंपन्यांना त्यांनी त्यांच्या कामगारांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. घरातून बाहेर पडताना वाहतुकीचे रियल टाईम अपडेट्‍स मिळावेत यासाठी सरकारने काही ॲप्स तयार केले आहेत. शक्यतो त्यांचा वापर करूनच वाहतुकीचा अंदाज घ्यावा, असंही सांगण्यात आलंय.

थोडक्यात, तोंडावर आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांचं शिवधनुष्य पेलायला फ्रेंच प्रशासन सज्ज झालं आहे. थोड्याफार त्रुटी, काही आव्हानं आणि समस्या यांच्या पलीकडे जाऊन पर्यावरणपूरक, दीर्घकालीन शाश्वत विकासाची हमी देत ही स्पर्धा भविष्यातील ऑलिम्पिक यजमानांसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास प्रशासन निर्माण करतंय.

rohinidgosavi@gmail.com (लेखिका फ्रान्समध्ये राहत असून सामाजिक विषयावर लेखन करत असतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.