मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रँड

‘पेणचे गणपती’ म्हणजे मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रँड मानला जातो
गणपती’ म्हणजे मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रँड मानला जातो.
गणपती’ म्हणजे मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रँड मानला जातो.sakal
Updated on

‘पेणचे गणपती’ म्हणजे मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रँड मानला जातो. येथील गणेशमूर्तींना देश-विदेशांतून मागणी आहे. मातीला देवपण देणारे अनेक हात आतापर्यंत झटल्याने पेणच्या गणेशमूर्ती सर्वदूर पोहचल्या. त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. टिकाऊपणा, आकर्षक रंगसंगती आणि मनमोहक रूप असलेल्या पेणच्या गणेशमूर्ती बघताक्षणीच नजरेत भरतात. मूर्तिकारांनी केलेली मेहनत दिसून येते. म्हणूनच महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून अनेक जण आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी खास पेणमध्ये येत असतात.

इथे पोहचलो तेव्हा गणेशोत्सवाला जेमतेम एक आठवडा राहिला होता. पेणच्या गणेश गल्लीत सर्वांचीच धावपळ सुरू होती. ११ महिने केलेल्या कामाचा मोबदला मूर्ती कारागिरांना याच महिन्यात मिळतो. साहजिकच त्याचाही एक उत्साह होता. कारखान्यांमध्येही मूर्ती आकर्षकरीत्या मांडून ठेवण्यात आल्या होत्या. भक्तांना आपल्या पसंतीनुसार त्या निवडता येत होत्या. समोरच आम्हाला ‘दीपक गणेशमूर्ती कला केंद्र’चा बोर्ड दिसला. दीपक समेळ यांनी उत्साहात स्वागत केलं.

‘‘आम्हाला मूर्ती नको, तर पेणच्या आंतराष्ट्रीय ब्रॅण्डची माहिती हवी आहे,’’ असं त्यांना सांगितल्यावर त्यांचा हुरूप आणखी वाढला. आपुलकीने ते माहिती देऊ लागले... पेण शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गणेशमूर्तींचे दीड हजारांहून अधिक कारखाने आहेत. तब्बल दीड लाखांहून अधिक व्यक्ती मूर्ती व्यवसायात विविध प्रकारे जोडल्या गेल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या गावागावांत आणि घराघरांत गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू होते, तेव्हा पेण शहरातून बाप्पा रवाना झालेले असतात. वर्षभरातील ११ महिने मूर्तिकाम आणि शेवटच्या महिन्यात विक्री, असं व्यवसायाचं स्वरूप असतं. काहींच्या अनेक पिढ्या मूर्तिकलेत कार्यरत आहेत, असं दीपक समेळ सांगतात.

आम्ही सहजच विचारलं, ‘‘अशा कारागिरांनी आतापर्यंत खूप पैसा कमावला असेल?’’ त्यावर मात्र त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ‘‘हेच तर आमच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डचं वैशिष्ट्य आहे. पेणच्या मातीतल्या कारागिरांनी कधीही मूर्तिकलेकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलेलं नाही. मूर्तीची किंमत इथल्या कारागिरांना कधी करताच आली नाही. त्यांनीही ती कधी केली नाही. त्यामुळेच दिवस-रात्र मेहनत करूनही आमची गरिबी कमी झालेली नाही. घरसंसार चालेल इतकाच रोजगार कारागिरांना मिळतो. जे कारखाने चालवतात, त्या कारखानदारांना कर्जाचे हप्ते फेडता येतील इतकं उत्पन्न मिळतं.’’

दीपक यांनी मांडलेली वस्तुस्थिती खूपच विरोधाभास दर्शवणारी होती. साहजिकच आम्हालाही आश्चर्य वाटलं. आमच्यासाठीही हे नवीन होतं. पेण आणि आजूबाजूच्या कारागिरांच्या गावांतून हिंडताना येथील गरिबी स्पष्टपणे दिसून येते. मूर्ती ठेवण्यासाठी शेड बांधण्याचीही ऐपत नसल्याने अनेक जण आपल्या राहत्या घरातच मूर्ती बनवतात. या मूर्तींमधूनच त्यांची लहान लहान मुलं खेळतात. त्यातच त्यांचा अभ्यास, खेळणं-बागडणं सुरू असतं. घरातली कामं आटोपल्यावर महिलाही मदतीला येतात. वाट्याला आलेला थोडाफार जमिनीचा हिस्सा सांभाळत त्यात भातशेती करतात. बाकी सर्व वेळ ही कुटुंबं मूर्ती बनवण्यातच व्यग्र असल्याने मूर्तिकाम हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे. म्हणूनच इथं इतक्या मूर्ती तयार केल्या जातात की, जिकडे पाहावं तिकडे मूर्तीच दिसून येत होत्या; घरात, पडवीत, ओसरीवर, काहींच्या तर अंगणातही मूर्तीच दिसत होत्या.

कारागीर तासन् तास एकाच ठिकाणी बसून कोणाशीही न बोलता एकाग्रतेने आपलं काम करीत असतात. ते जीव ओतून हात चालवतात तेव्हा मातीला एक विशिष्ट आकार येतो, माती अक्षरशः जिवंत होते. अर्थातच, त्यासाठीचा त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव, कलेशी असलेला प्रामाणिकपणा आणि मेहनतीचं मोल कोणालाही करता आलेलं नाही. पूजा करण्यासाठी मूर्ती घेऊन जातात, तेच दरात घासाघीस करताना आम्हालाही दिसले. वाढत्या स्पर्धेमुळे लवकरात लवकर मूर्ती विकली जाणं गरजेचं असतं, त्यामुळे मिळेल त्या किमतीत मूर्ती विकल्या जात होत्या.

मिळणाऱ्या उत्पन्नातून कारखानदार इतर कामगारांप्रमाणेच मूर्ती कारागिरांना मोबदला देतो; पण ते त्यातही आनंदी अन् समाधानी आहेत... त्याबद्दल सांगताना मूर्तिकार संतोष मोकल म्हणाले, ‘‘मूर्तिकला क्षेत्रात नेहमी चढ-उतार येत असतात. कधी अतिवृष्टी, कधी पीओपीवरील बंदी... अशा एक ना अनेक संकटांचा सामना पेणच्या मूर्ती कारागिरांना करावा लागतो. पेण अर्बन बॅंक बुडीत गेल्याने कारागिरांना मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असते. फक्त श्रीगणेशाची कृपा म्हणून मेहनतीने ते पुन्हा थाटता आले. आमचं कुटुंब अशा तुटपुंज्या उत्पन्नातही समाधानी आहे. गावातच राहून वर्षाचे बाराही महिने रोजगार मिळतो. मुलांचं शिक्षण किंवा शेतीवाडीकडे लक्ष देता येतं यातच माझ्यासारखे अनेक तरुण आनंद मानतात.’’ एका कारागिराला महिन्याला १० ते २० हजारांपर्यंत पगार मिळतो. मूर्तीच्या डोळ्यांची आणि नजरेची आखीव-रेखीव मांडणी करणाऱ्या कारागिरांना थोडं चांगलं मानधन मिळतं. पण जे मिळतं त्यातच ते समाधान मानतात याचं आम्हालाही अप्रूप वाटलं.

पेणच्या मूर्तिकलेलाही तितकीच समृद्ध परंपरा आहे. साधारण १८६० पासून पेणमध्ये भिकाजीपंत देवधर आणि बाबूराव देवधर यांनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी साकारलेल्या मूर्ती आकर्षक असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिल्यानंतर मूर्तिकलेला चांगले दिवस आले. कोकणातून मुंबईत आणि काही प्रमाणात पुण्यात स्थिरावलेल्या भक्तांसाठी पेणच्या मूर्ती उपलब्ध असत. याच कालावधीत महाराष्ट्रात अन्य ठिकाणीही गणेश मूर्तिकार होते. पेण प्रसिद्ध होण्याचं आणखी एक कारण म्हणजे, ते मुंबई आणि पुणे शहरांच्या मधोमध म्हणजे सारख्या अंतरावर आहे, त्यामुळे इथे हा व्यवसाय खऱ्या अर्थाने रुजला. १९२० नंतर देवधरांची पुढची पिढी राजाभाऊ देवधर आणि वामनराव देवधर यांनी आपल्या घरगुती व्यवसायाला कारखानदारीचं स्वरूप दिलं. मग मजुरी, कारागिरी, इतर संलग्न कामं, रंगकाम आणि वाहतुकीसाठी कामगारांची गरज भासू लागली, त्यातून स्थानिकांना जवळपास वर्षभर रोजगार मिळू लागला.

गणेशाची एक मूर्ती तब्बल २५ कारागिरांच्या हातातून जाते. १९८० नंतर अशाच प्रकारे शिकलेल्या काही कारागिरांनी स्वतःचे कारखाने सुरू केले, ते मालक झाले; परंतु इतर व्यावसायिकांसारखी संपत्ती गोळा करता आली नसली, तरी मिळणाऱ्या मोबदल्यात ते समाधानी असतात. मूर्ती विकत घेण्यासाठी आलेल्यांना आपुलकीने योग्य ती माहिती देतात. दरवर्षीच्या ग्राहकांना त्यांनी बुक केलेली मूर्ती व्यवस्थित पॅक करून देतात. काही गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विशेष बदल करून घडवलेल्या असतात. त्या साच्यामध्ये घडवता येत नसल्याने हाताने बनवाव्या लागतात. बारीक कलाकुसर, तितकाच टिकाऊपणा आणि रंगांची काळजी घ्यावी लागते.

सध्या बदलत्या काळानुसार मूर्ती व्यवसायात अनेक बदल झाले आहेत. १९८० नंतर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार होऊ लागल्या. अशा मूर्ती तुलनेने टिकाऊ असतात. त्यामुळे मूर्ती दूरवर पाठवणे शक्य होऊ लागले. नंतर मोठ्या शहरात मूर्ती नेऊन, तेथे त्यांच्यावर रंगलेपन करून, अखेरचा हात फिरवून त्यांची विक्री करण्याची वेगळी बाजारपेठ तयार झाली, त्यामुळे पेण तालुक्यात कच्च्या मूर्ती तयार करणारे कारखानेही उभे राहिले. त्यातूनच ‘पेणचे गणपती’ असा मूर्तिकलेतील आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड उदयास आला; परंतु त्यासाठी झटणारे हजारो हात न थांबता वर्षभर अविरत कार्यरत असतात आणि तेही अगदी तुटपुंज्या मानधनात...

मातीला आकार-उकार नसतो; पण मूर्तिकाराचे हात तिच्याभोवती फिरू लागले, की जादू होते. मातीचा गोळा आकार घेऊ लागतो, तसतसं त्यात देवपण येऊ लागतं. हजारो हात दिवस-रात्र झटतात तेव्हा मातीतून साकारलेली मूर्ती जिवंत भासू लागते... भक्तगणही श्रद्धेने तिची पूजा करतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्याचं साकडं घालतात. गेल्या दीडशे वर्षांपासून पेण तालुक्यातील अशा अनेक किमयागारांचे हात थांबलेले नाहीत. अनेक संकटांना तोंड देत त्यांनी मूर्तिकलेची परंपरा कायम ठेवली आहे. गणेशमूर्तींचं माहेरघर असलेल्या पेण गावातील या उद्योगाचा वेध...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.