सूक्ष्म मनोज्ञतेची दार्शनिक रचना

‘स्वप्नासारखा उजेड’मध्ये फँटसीच्या वाटेने जाणारे वास्तव आहे. कादंबरी जसजशी पुढे जाते तसतसा कथेचा प्लॉट लक्षात येतो.
ravi lakhe swapnasarkha ujed
ravi lakhe swapnasarkha ujedsakal
Updated on

- समीर गायकवाड

द्यकाळ हा अनेक सांस्कृतिक अंगे आकसत जाण्याचा नि त्यांचे स्वरूप बदलण्याचा अमृतकाळ होय! सिनेमे घरी बसून पाहिले जाताहेत, पुस्तके ऐकली जाताहेत, ज्यांचा आस्वाद घ्यायला हवा त्या अनेक गोष्टी आभासी स्वरूपात अनुभवल्या जाताहेत.

साहित्यदेखील यास अपवाद नाही. साहित्य वर्गवारीनुसार कथा, लघुकथा, कादंबरी, कविता हे लोकप्रिय वाचनप्रिय रचना प्रकार होत. लघु कादंबरी तुलनेने खूप मागे राहिली, हा साहित्यप्रकार खूप कमी हाताळला गेलाय; मात्र सद्यकालीन भवताल आणि त्यातले बदलते आकार पाहू जाता आगामी काळात लघु कादंबरी हा प्रकार महत्त्वाचा नि प्रभावी ठरू शकतो.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे विख्यात कवी, लेखक रवींद्र लाखे यांची ‘स्वप्नासारखा उजेड’ ही लघु कादंबरी होय. एक वेगळा विषय अत्यंत अनोख्या पद्धतीने मांडताना त्यांना या प्रकारात रचना करावीशी वाटणं हादेखील आगामी काळातील बदलाचा सूचक संकेत मानता येईल. याविषयी लाखेंचं मत स्पष्ट आहे.

ते म्हणतात की, माणसाच्या मनाचा जन्म हीच कथा-कादंबरीची सुरुवात असते. मनाच्या हालचाली व्यक्त होणं ही कथा-कादंबरी असते. आताच्या अवकाशात चपखल बसेल, अशी रचना करताना अनावश्यक फाफटपसारा दूर सारत त्यांनी अचूक आशय प्रसवला आहे. यात त्यांनी बरेच प्रयोग केलेत.

ही शंभर पृष्ठांची कादंबरी आहे. यात फँटसीच्या वाटेने जाणारे वास्तव आहे. लेखक आणि त्याची पात्रे यांची गोष्ट असूनही नसल्यासारखी वाटणारी अक्षरवाट आहे. वाक्यांच्या अंती येणाऱ्या पूर्णविरामांच्या खेरीज कोणत्याही अवतरण चिन्हांचा वापर न करता सलग एकटाकी लेखन वाचल्याचा अनुभव चकित करून जातो.

प्रथमपुरुषी एकवचनी असणारे मानवी मन संवाद साधू लागले, तर त्याचे प्रकटन कसे असेल, याचा हा उत्तम नमुना होय. निव्वळ प्रयोग म्हणून अथवा हौस म्हणून हे लेखन केलेले नाही, त्यामागची भूमिका कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तसतशी स्पष्ट होते. यातला तर्क सहज उमजण्याजोगा असल्याने कथेचा प्लॉट लक्षात येतो.

लेखक, दारू पिणारा लेखकाचा मित्र, निवेदकाची आई, जारणमारणवाला उग्र वासाचा महाराज, बख्खळ वळवळ अंगी असलेली सुनीता, मालगाडीचा ड्रायव्हर असलेला शाहिद अमन, श्रावणातल्या कहाणीतली पात्रं, सिगारेट आणायला जाणारा मुलगा, ट्रक ड्रायव्हर, चित्रकार, चिंबा, बिंब, एक माणूस, अबोलीच्या फुलाच्या गोष्टीतली पात्रं ह्या यातल्या व्यक्तिरेखा आहेत.

कादंबरीच्या सुरुवातीला काहीसं गोंधळल्यासारखं वाटतं; मात्र या सुनियोजित विस्कळितपणाला आपण सरावू असं वर्णन समोर येत राहतं नि मग उमजतं की ही एक सलग साखळी नसून मागेपुढे झालेल्या घटनांची नि माणसांची मांडणी आहे जी आपल्याला काही तरी सांगू इच्छिते, हे मर्म हाच स्वप्नातला उजेड.

ही ज्याच्या त्याच्या आकलनानुसार घडणारी प्रक्रिया असल्याने याचे अंतिम निष्कर्षही व्यक्तिसापेक्ष भिन्न असतील, तरीही ते निष्कर्ष गूढ अनामिक ओढीच्या दिशेनेच नेणारे असेच येतात! पूर्ण कादंबरीत सगळ्या घटना सुटेपणाने समोर येतात आणि त्यातली माणसंही तुटकपणे भेटत जातात.

लेखक आणि त्याची पात्रे हा केवळ लेखकापुरता (म्हणजे इथे रवींद्र लाखे) अनुभव न उरता ही रचना आपली वाटू लागते नि आपण त्यात गुंतत जातो ही यातली फँटसी! अल्झायमर झालेल्या लेखकाची स्वगते मूळ लेखकापुरती न उरता वाचकांचीच होऊन जातात.

कादंबरीला रुढार्थाने सलग कथानक नाही. ती सतत वर्तमानातच वावरते. घटनांचे बारकावे मनोविश्लेषणात्मक पद्धतीने मांडलेले असल्याने त्यात आपले प्रतिबिंब सहज पाहता येते. एका बैठकीत सलग वाचून जितकं काही लागेल त्यापेक्षा अधिक काही उमजू शकतं, जर आपण थोडं थोडं मनन करत वाचत राहिलो तर!

मुळात याचे प्रयोजन काय असावे, याचे पुसटसे उत्तर ब्लर्बमध्ये आलेय - काल्पनिक वास्तव मांडणं म्हणजे खोटं खोटं पण ‘मौलिक खरं’ वाटेल असं बोलणं असतं. हे खोटं बोलणं, प्रत्यक्ष वास्तवाचं प्रखर असं रूप असू शकतं. घटनांचं क्रमिक असं वास्तविक वर्णन म्हणजेच कथा-कादंबरी असते, असं नव्हे.

त्या घटनांची विरचना कथा-कादंबरी किंवा एकूण फिक्शन निर्माण करते. व्यक्तिगत अनुभव जसेच्या तसे मांडणं हे वास्तव झालं; पण स्वतःच्या चिंतनात त्या अनुभवाची अनुभूती व्हायला वेळ लागतो. कुण्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या घटना म्हणजे कथा-कादंबरी नव्हे.

मग त्याचं मरण ही कथा-कादंबरी आहे का? माणसाच्या मनाचा जन्म ही कथा-कादंबरीची सुरुवात असते. मनाच्या हालचाली व्यक्त होणं ही कथा-कादंबरी असते. अशा कथा-कादंबरीतलं प्रत्येक वाक्य ही एक चूक असते.

आपण ती दुसऱ्या वाक्यात सुधारायला जातो तेव्हा ती सुधारणा ही चूक ठरते. असं प्रत्येक वाक्य सुधारत गेल्यावर कथा कादंबरीचा शेवट हाही चूक असतो. ती चूक वाचक सुधारायचा प्रयत्न करतो तर्क वापरून; पण ती त्याच्याकडून सुधारली जात नाही. मग तो तर्काला सोडचिठ्ठी देऊन कथा-कादंबरीकडे पाहतो. तेव्हा त्याला कथेचा-कादंबरीचा गाभा सापडतो.

या कादंबरीत एकसलग सूत्र नसले तरी एक वैचारिक मांडणी आहे तिला समांतर जाणारी काही वाक्यं... शहाणिवा समृद्ध होण्यास यातून बळ लाभते -

  • ‘‘भावभावना स्वतःचं स्तोम इतकं माजवतात की माणसाला महत्त्व उरू नये.’’ (पृष्ठ १३)

  • ‘‘घडून गेलेल्या घटनेतल्या आपल्या वागण्याची बोच ही जिवंत असते. तिचा त्रास नको म्हणून लोक तिला मारून टाकतात किंवा गाडून टाकतात.’’ (पृष्ठ २८)

  • ‘‘भौतिक जगातून तुला सुटका मिळायला हवी असेल तर त्यासाठी तू कुठलीही एक गोष्ट सातत्याने जिचा व्यावहारिक जगाशी काहीही संबंध नाही, तू कार्य असलेली ती गोष्ट टोकाला गेली की तुझी देहजाणीव नष्ट होईल आणि आत्मा जागृत होईल.’’ (पृष्ठ ३९)

  • ‘‘जे दिसतं तेवढंच वास्तव नसतं. पलीकडे खरं वास्तव असतं जे आपल्याला कल्पित वाटू शकतं.’’ (पृष्ठ ९६)

  • ‘‘कलावंताला सत्य वगैरे कधीही गवसणार नसतं. सत्य गवसल्याचा त्याला भास होतो. भ्रम होतो.’’ (पृष्ठ १०८)

ही अवतरणे याच क्रमाने वाचली तरी कादंबरीचे सत्व गवसते!

हा एक वेगळा लेखनप्रयोग आहे.

sameerbapu@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.