फोटोजीवी

चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक अशी ओळख असलेले अरविंद जगताप आपल्या लेखणीने सातत्याने समाजमन टिपत असतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारे त्यांचे सदर आजपासून दर शनिवारी...
फोटोजीवी
फोटोजीवी sakal
Updated on

डायरी

अरविंद जगताप,jarvindas30@gmail.com

चित्रपट लेखक, गीतकार, दिग्दर्शक आणि ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे पत्रलेखक अशी ओळख असलेले अरविंद जगताप आपल्या लेखणीने सातत्याने समाजमन टिपत असतात. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारे त्यांचे सदर आजपासून दर शनिवारी...

फोटो हे गावोगावच्या फोटोग्राफर लोकांचं जगण्याचं साधन होतं; पण मोबाईल आला आणि सगळा गोंधळ झाला. फोटोसाठी जगणारे वाढू लागले. काही लोकांचं सोशल मीडिया प्रोफाईल बघितलं की वाटतं, यांचा जन्म फक्त फोटो काढण्यासाठीच झालाय. खूप लोकांना काही गोष्टी डोक्यात क्लिक होतात याचाच विसर पडलाय. त्या फोनच्या कॅमेऱ्यात क्लिक करायची धडपड सुरू असते. आता फोटो काढण्यासाठी फोटोग्राफीचं ज्ञान किंवा आवड ही अटच नाही. बटन दाबता येतं तो फोटोग्राफर. पूर्वी कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग असायचा फोटोग्राफर. त्याची आणि लग्न लावणाऱ्या भटजीची तारीख मिळणं सारखंच अवघड असायचं. त्यात त्याच्याकडून फोटो मिळवण्यासाठी खूप चकरा माराव्या लागायच्या. काही महाभाग तर लग्नाचे फोटो जोडप्याला मुलगा झाल्यावर द्यायचे. बारशाचे फोटो काढायची वेळ आल्यावर...

लग्नाच्या फोटोचा अल्बम बघणं हा एक सोहळा होता. आता कित्येक घरात ते वर्षानुवर्ष उघडलेही जात नाहीत. नवरा-नवरीने एका बाटलीत दोन स्ट्रॉ टाकून कोल्ड्रिंक पिणं हाच काय तो मॉडर्न फोटो असायचा, पण प्री वेडिंग फोटोग्राफी आली आणि लग्नाचा सिनेमा झाला. फक्त त्यातलं नाट्य हरवलं. काव्य हरवलं. प्री वेडिंग खरं तर खूप हळवी गोष्ट असायला हवी होती; पण ती विनोदी होत गेली. एखाद्याला हॉरर सिनेमे आवडतात. एखाद्याला विनोदी सिनेमे आवडतात. आमच्या एका मित्राला प्री वेडिंगचे व्हिडीओ आवडतात. तो पोट धरून हसत असतो ते बघून. त्यात शाहरूख खानसारखे हावभाव करणारे नवरदेव खूपच केविलवाणे वाटू लागतात. नाशिकला धरणापाशी एका प्री वेडिंगचं शूटिंग चालू होतं. छोट्या बोटीत नवरी उभी. फोटोग्राफर तिला पोझ दाखवत होता. खूप वेळ हात हातात घेऊन फोटोग्राफर आणि नवरी ‘टायटॅनिक’ चित्रपटातल्या त्या पोझचा सराव करत होते. नवरदेव बघत होता. सात-आठ वेळा फोटोग्राफर नवरीचे हात हातात घेऊन तेच करून दाखवे. एका क्षणी नवरदेव संतापला आणि त्याने फोटोग्राफरच्या थोबाडीत मारली. काठावरचे लोक हसून बेजार झाले होते.

कार्यक्रमात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा एक भारी काळ होता. त्यांना मान होता. वर्षभर मागे लागलेल्या पोराला पोरी आपला नंबर द्यायच्या नाहीत. फोटोग्राफरला मात्र स्वतःहून नंबर द्यायच्या. फक्त ‘माझे फोटो लवकर पाठवा हां दादा’ म्हणायच्या. फोटो स्टुडिओत जाणं व्हायचं. लग्न ठरवताना दाखवायला लागतील म्हणून मुली फोटो काढायला जायच्या. मग त्याच मुली लग्न झाल्यावर डोहाळेवाले फोटो काढायला स्टुडिओत जायच्या. मग लेकराला घेऊन फोटो काढायला... आता किती वर्ष झाली आपल्याला फोटो स्टुडिओत जाऊन? फोटो स्टुडिओत गेलं की भिंत बघून कोण फोटो काढून गेलंय हे कळायचं. आता फार फार तर पासपोर्ट फोटो काढायला स्टुडिओची चक्कर होते. मित्राच्या स्टुडिओत गेलो होतो. तो म्हणाला, ‘तुला कधी लिहायला एकांत पाहिजे असेल, तर येऊन बसत जा.’ ...पण तो एकांत नव्हता. ते त्या स्टुडिओचं एकाकीपण होतं. अस्वस्थ करणारं.

कधी काळी खास डार्करूम असलेले बरेच स्टुडिओ आता अंधाऱ्या खोल्या झालेत. डिजिटल जगाने सगळं बदलून टाकलंय. मुलांचे फोटो काढायला असलेले लाकडी घोडे हरवून गेलेत. पूर्वी गावातल्या स्टुडिओत असलेला पडदा किंवा खुर्ची सगळ्या फोटोत कॉमन असायची. मुळात माणसाचा एखादा फोटो असला पाहिजे एवढीच अपेक्षा असायची. खूपदा वय झालेल्या लोकांचे फोटो काढून ठेवले जायचे. ते गेल्यावर भिंतीवर लावायला होईल म्हणून. फोटो ही पूर्वी माणूस गेल्यावर आठवण म्हणून असणारी गोष्ट होती. पुढे कुटुंबाने एकत्र फोटो काढायची हौस आली. शाळेत ग्रुप फोटो निघू लागले. त्या ग्रुप फोटोत इतरांनी आपल्याला शोधलं, की भारी वाटायचं. मग पासपोर्ट फोटोचा जमाना आला. आवडत्या व्यक्तीचे फोटो पाकिटात ठेवण्याची सवय... आमच्या शेजारच्या काकांना पेपरमध्ये फोटो येण्याचं खूपच अप्रूप. आपल्या मुलाचा पेपरमध्ये फोटो यावा, अशी त्यांची खूप इच्छा होती, पण ४५ टक्के मिळवणारा मुलगा तो. त्याचा पेपरात फोटो कसा येईल? तेव्हा त्यांना एकाने ‘हरवला आहे’ अशी जाहिरात टाका, मग पेपरात फोटो येईल, असा सल्ला दिला. तेव्हा हसू आलं; पण नंतर खूप भयंकर वाटलं. जुनी गोष्ट आठवली. एका गावातला माणूस गायब झाला होता. त्याची बायको पोलिस स्टेशनला गेली; पण तिच्याकडे नवऱ्याचा फोटो नव्हता. शोध कसा घेणार? एकेकाळी एकही फोटो नसलेली असंख्य माणसं होती देशात, पण त्या माणसांच्या आठवणी काढत राहायचं गाव. आता फोटो खूप आहेत; पण माणसांबद्दल किती बोललं जातं? माणसं मोबाईलमध्ये डोकावत असतात फक्त. हेडफोन असतात कानात. त्यामुळे वाटतं की आपल्याकडे खूप ऐकणारी माणसं आहेत; पण सार्वजनिक जागांची अवस्था बघितली की ही ऐकणारी माणसं आहेत, असं मुळीच वाटत नाही. ही कुणाचंच न ऐकणारी माणसं आहेत असं वाटतं.

आपण आता आपल्यातच रमलेली माणसं होतोय. आपल्याला आपल्या फोटोत चुकून कुणी आलेलंही चालत नाही. क्रॉप करतो आपण इतरांना. कोळसेवाडीत फोटो काढून फोटोशॉपमध्ये मागे आयफेल टॉवर टाकणारे लोक झालोय आपण. फोटो काढायची हौस असणं ठीक आहे; पण सतत स्वतःचे फोटो काढायचं वेड असण्याचं काय करायचं? आता गल्लीबोळातला नगरसेवक पण कायम कॅमेरामन घेऊन फिरतो. दिवसातून दहा वेळा सेल्फी काढणारी मुलं-मुली तुम्ही आसपास पाहिली असतील. काही लोकांना फोटो काढताना बघून असं वाटतं की यांना तत्काळ डॉक्टरकडे न्यावं. दिवसात तीन गोळ्या घ्यायला सांगतात तसं दिवसात फक्त तीन सेल्फी घेण्याचं प्रिस्क्रिप्शन द्यायला सांगावं. बरं त्या फोटोत आपण आहोत तसं दिसायला नको आहे लोकांना. आता फिल्टर वापरायचाय. फोटो एडिट करायचाय. आपण जसं नाही तसं दिसणं म्हणजे सौंदर्य असेल तर अवघड आहे. खरं तर हे फिल्टर आपल्याला बदलत नाहीत. फोटोला बदलत असतात; पण नकळत आपण बदलून जातो माणूस म्हणून. आपण त्या साच्यात अडकून जातो. माणसाला बदलणारे फिल्टर फार आवश्यक झालेत.

संक्रातीला सोसायटीत एकमेकांना तिळगुळाचे फोटो पाठवून गोडवा वाढण्याची अपेक्षा कशी करता येईल? शौचालयावर पण नेत्यांचे फोटो असतील तर लोकांचं पोट काय, मनसुद्धा साफ राहणार नाही. आजही गावाचं चित्र म्हणून आभाळाकडे बघणारा शेतकऱ्याचा फोटोच दिसत असेल तर काय समजायचं? फक्त लेन्स बदलली. फिल्टर बदलले. समाज तसाच आहे. शेतकऱ्याने आभाळाकडेच बघायचं असेल तर गावोगाव नेत्यांचे भलेमोठे फोटो कशाला पाहिजेत? खड्डे पडलेल्या रस्त्याला, गटाराच्या वर, बेरोजगार मुलांच्या टोळक्यासमोर दात काढणारे नेत्यांचे फोटो बघून तिडीक जाते लोकांच्या डोक्यात; पण लगेच दुसऱ्या एखाद्या होर्डिंगवर एखाद्या सुंदर नटीचा फोटो दिसतो आणि लोक शांत होतात. नेत्यांच्या नाही; पण आपण आपल्या फोटोवर विचार करू शकतो. आता आपण खातोय कमी आणि फोटो जास्त काढतोय. ते अंगाला लागत नाहीच; पण मनाला जास्त लागतंय. हळूहळू हा बुद्धिजीवी लोकांचा देश फक्त ‘फोटोजीवी’ होऊ नये एवढंच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.