- जुही चावला मेहता
प्लास्टिकच्या बाटल्यांच्या विघटनास ४५० वर्षे लागतात. प्लास्टिक पिशव्यांच्या विघटनास तब्बल दोनशे ते एक हजार वर्षे लागतात. प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्यांच्या ढिगाऱ्यात आपली पृथ्वी गुरफटली जात आहे. दूषित पर्यावरणाचा वारसा आपण मुलांना देत आहोत.
प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय, ते आपल्या आयुष्यात कसे आले आणि पर्यावरणावर त्याचा कसा दुष्परिणाम होतो, याची माहिती मी तुम्हाला सातत्याने देत आहे. स्वस्त किंमत आणि टिकाऊ अन् आकर्षक रंगामुळे प्लास्टिक घराघरात पोहोचले आहे. किचनची ट्रॉली किंवा रॅकवर दिसणारे प्लास्टिक मात्र आपल्या जेवणात, पाण्यात आणि पोटातही पोहोचत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?
प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी इंटरनेटवर माहिती सर्च करताना एक धक्कादायक गोष्ट वाचनात आली, ती तुमच्यासोबत शेअर करते. प्लास्टिक, पेपर टॉवेल, काच किंवा केळ्याच्या सालीचे विघटन होण्यास किती वेळ लागतो? तुम्हाला माहिती आहे का त्याबाबत? नसेल तर वाचा...
पेपर टॉवेलच्या विघटनाला दोन ते चार आठवडे लागतात. केळीची साल तीन-चार आठवडे, कागदी पिशवी एक महिना, वर्तमानपत्र दीड महिना, पुठ्ठा दोन महिने, सुती हातमोजे तीन महिने, संत्र्याची साल सहा महिने, प्लायवूड एक ते तीन वर्षे, वूलसॉक एक ते पाच वर्षे, दुधाचे डबे पाच वर्षे, सिगारेटची थोटके १० ते १२ वर्षे, चामड्याचे बूट २५ ते ४० वर्षे, टिन केलेला स्टील कॅन ५० वर्षे, फोम केलेले प्लास्टिक कप ५० वर्षे, रबर-बूट सोल ५० ते ८० वर्षे, प्लास्टिक कंटेनर ५० ते ८० वर्षे, ॲल्युमिनियम कॅन २०० ते ५०० वर्षे, प्लास्टिकच्या बाटल्या ४५० वर्षे, डिस्पोजेबल डायपर ५५० वर्षे, मोनोफिलामेंट फिशिंग लाईन (मासे पकडण्याचे जाळे) ६०० वर्षे आणि प्लास्टिक पिशव्यांच्या विघटनास तब्बल दोनशे ते एक हजार वर्षे लागतात. आहे ना धक्कादायक...!
ज्या गोष्टी आपण सर्रास वापरतो आणि फेकून देतो त्यांचे विघटन होण्यासाठी लागणारा कालावधी आपल्या वापरापेक्षा खूप जास्त आहे. प्लास्टिकचे विघटन आपल्या काळातील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक बनली आहे. कारण, प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांच्या ढिगाऱ्यात पूर्णपणे आपली पृथ्वी गुरफटली जात आहे.
एव्हरेस्टच्या शिखरापासून महासागराच्या तळापर्यंत प्लास्टिक प्रदूषण पोहोचले आहे. अन्न, पाणी आणि हवेमार्फत प्लास्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण आपल्या शरीरात प्रवेश करतात. एका संशोधनानुसार, आपल्या शरीरात शिरणारे प्लास्टिक आपल्या पेशींना घातक आहे. प्लास्टिकमुळे त्या मरतात. त्यामुळे अॅलर्जीची समस्याही उद्भवते. अर्थात प्लास्टिकच्या मानवी आरोग्यावरील दुष्परिणामांची मात्र पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
कारण, सूक्ष्म प्लास्टिक शरीरात उत्सर्जनापूर्वी किती काळ टिकून राहते याविषयी अजून पुरेशी माहिती उपलब्ध नाही. प्लास्टिकचे पेशींवरील घातक परिणाम होत असल्यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे इंग्लंडमधील ‘हल यॉर्क मेडिकल स्कूल’चे संशोधक एव्हेंजेलॉस डॅनोपाऊलॉस यांनी सांगितले आहे.
भारतात दरवर्षी ५.६ दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. प्लास्टिक कचऱ्याच्या मुख्य घटकामध्ये सिंगल यूज पिशव्यांचे प्रमाण जास्त आहे. दरवर्षी शेळी, कुत्रे आणि गायींसारखे हजारो प्राणी अन्न समजून चुकून प्लास्टिकच्या पिशव्या खात असल्याने मृत्युमुखी पडतात. सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे, त्यांच्या मृत्यूनंतर किंवा त्यांचे शरीर कुजल्यानंतरही प्लास्टिकची पिशवी तशीच राहते आणि दुसऱ्या प्राण्याचा जीव घेण्यास सज्ज होते.
आपण कशा प्रकारचा वारसा आपल्या मुलांसाठी सोडून जातो आहोत? आपले लहानपण हिरवागार निसर्ग पाहण्यात गेले आणि आपल्या मुलांचे लहानपण रंगीत प्लास्टिक पिशव्यांचे डोंगर पाहण्यात जात आहे. दूषित पर्यावरण आपल्या मुलांना वारशामध्ये देणे कितपत योग्य आहे? याचा विचार केला आहे का कधी?
प्लास्टिकच्या बाटल्यांच्या विघटनास ४५० वर्षे लागतात. प्लास्टिक पिशव्यांच्या विघटनास तब्बल दोनशे ते एक हजार वर्षे लागतात. प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्यांच्या ढिगाऱ्यात आपली पृथ्वी गुरफटली जात आहे. दूषित पर्यावरणाचा वारसा आपण मुलांना देत आहोत.
juhichawlaoffice@gmail.com
(शब्दांकन : नीलिमा बसाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.