चुका आपल्या, शिक्षा मुलांना!

प्लास्टिक प्रदूषणाचे पडसाद दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागणार आहेत, याची जाणीव आता सर्वांनाच होत आहे. धोकादायक प्लास्टिकचे प्रदूषण कुठेतरी थांबायला हवेच.
plastic pollution big concern for the world also future generations
plastic pollution big concern for the world also future generationsSakal
Updated on

- जुही चावला-मेहता

प्लास्टिक प्रदूषणाचे पडसाद दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपल्या मुलांना भोगावे लागणार आहेत, याची जाणीव आता सर्वांनाच होत आहे. धोकादायक प्लास्टिकचे प्रदूषण कुठेतरी थांबायला हवेच.

फक्त गरज आहे ती नेमकी सुरुवात कुठून करायची ते समजून घेण्याची... प्लास्टिक आणि त्यातील रसायनांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे स्त्रीच्या आयुष्यातील विविध महत्त्वाच्या कालखंडांवर गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो.

the legacy we leave for future generations shouldn''t be a sea of plastic, but a world of hope and sustainability.’

प्लास्टिक प्रदूषणामुळे केवळ पर्यावरणच नव्हे; तर आपल्या आणि भावी पिढ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे, हे मागेही मी अनेक लेखांमधून आपल्यासमोर सतत मांडत आले आहे. प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

परिणामी आपण दररोज मायक्रोप्लास्टिक आणि प्लास्टिकमधील विषारी रसायनांच्या संपर्कात येतो आहोत. वर्ल्ड वाईड फंड (WWF) च्या अहवालानुसार, सरासरी व्यक्ती दर आठवड्याला अंदाजे पाच ग्रॅम प्लास्टिक खात आहे.

ते विविध मार्गांनी आपल्या शरीरात प्रवेश करते. जसे की, हवेतील धूलिकणांमधून मायक्रोप्लास्टिकचा आपल्या शरीरात समावेश होतो. समुद्री अन्न, पाणी आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थांच्या माध्यमातून प्लास्टिक आपल्या शरीरात जाते. तसेच त्वचेच्या संपर्कातूनही आपल्या शरीरात ते प्रवेश करते.

प्लास्टिकमध्ये आढळणारे विषारी रासायनिक पदार्थ आणि प्रदूषकांमुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रासायनिक पदार्थ विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण करतात आणि त्यामुळे जगभरात मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे अनेक संशोधन आणि अभ्यासातून आपल्या समोर येते आहे.

प्लास्टिकमध्ये आढळणारे काही रासायनिक पदार्थ कर्करोग निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, बिस्फेनॉल-ए (BPA) आणि काही फ्लेम रिटार्डंट्स हे कर्करोगजनक म्हणून ओळखले जातात. काही संशोधनांतून असे दिसून आले आहे, की मायक्रोप्लास्टिक्स आपल्या आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात आणि विविध रोगांच्या प्रसाराला कारणीभूत ठरू शकतात.

मायक्रोप्लास्टिक्स आपल्या प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी रोगजनकांच्या वाहिन्या म्हणून काम करू शकतात. हे सूक्ष्मजीव बॅक्टेरिया, व्हायरस आणि इतर रोगजनकांना वाहून नेऊ शकतात, ज्यामुळे रोगांचा प्रसार वाढतो. हे विशेषतः पाण्यातील जीव आणि खाद्यसाखळीतील इतर घटकांमध्ये आढळतात.

प्लास्टिकच्या मूल्य साखळीत विविध टप्प्यांवर आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. प्लास्टिक उत्पादन, वापर आणि त्याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेत अनेक आरोग्य समस्या उद्‍भवू शकतात. उदाहरणार्थ...

• प्लास्टिक उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल, जसे की तेल आणि नैसर्गिक वायू, हे उत्खनन प्रक्रियेतून मिळवले जातात. अशा प्रक्रियेतून प्रदूषण निर्माण होते आणि त्यामुळे स्थानिक वातावरणात हानिकारक रसायनांचा प्रसार होतो. अशा प्रदूषणामुळे आजूबाजूच्या क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक उत्पादन आणि प्रोसेसिंग फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार विविध हानिकारक रसायनांच्या संपर्कात येतात. या रसायनांमुळे त्वचेला हानी, श्वासोच्छ्वासाच्या समस्या आणि इतर गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.

• प्लास्टिक कचरा जाळल्याने वातावरणात हानिकारक वायू आणि रसायनांचे उत्सर्जन होते. हे वायू आणि रसायने श्वासोच्छ्वासाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या त्यामुळे उद्‍भवू शकतात.

• प्लास्टिक कचरा योग्य पद्धतीने नष्ट न केल्यास तो पाणी आणि माती दूषित करतो. हे दूषित पाणी आणि माती आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे जलप्रदूषण, मातीचा कस कमी होणे आणि शेतीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत घट होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

लहान मुले, स्त्रिया, अनौपचारिक कचरा क्षेत्रातील कामगार आणि उपेक्षित समुदाय प्लास्टिक प्रदूषणामुळे सर्वाधिक प्रभावित होणारे घटक आहेत. त्यामुळे मानवी हक्क आणि पर्यावरणीय प्रदूषणाच्या चिंतेत वाढ झाली आहे. प्लास्टिकचे प्रतिकूल परिणाम विशेषतः गर्भातील मुले आणि लहान मुलांवर होतात.

परिणामी त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका उद्‍भवतो. Minderoo-Monaco Commission on Plastic and Health (२०२३) च्या अहवालानुसार, प्लास्टिकमधील रसायने आणि प्रदूषकांच्या संपर्कामुळे अकाली जन्म, मृत जन्म, पुनरुत्पादक अवयवांचे जन्म दोष, न्यूरोडेव्हलपमेंटल कमजोरी, फुप्फुसांची वाढ आणि बालपणातील कर्करोग यांसारख्या गंभीर समस्या उद्‍भवू शकतात.

अलीकडील एका संशोधनात मानवी रक्त, फुप्फुस आणि प्लेसेंटामध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहे. ९९ टक्के प्लास्टिक जीवाश्म उत्पत्तीच्या रसायनांपासून तयार केले जात असल्याने, तेलाशी संबंधित विषारी अल्प आणि दीर्घकालीन आरोग्य धोके श्वासोच्छ्वासाच्या लक्षणांपासून प्रतिकूल न्यूरोलॉजिकल परिणामांपर्यंत, तणाव आणि सामान्यीकृत चिंता विकार अशा प्लास्टिक मूल्य-साखळीचा भाग आहेत.

मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनो-प्लास्टिक्सच्या थेट संपर्कामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या वाढत्या पुराव्यांवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. PROJECT TENDR (२०२४) यांच्या अभ्यासानुसार, मायक्रोप्लास्टिक्स आणि नॅनो-प्लास्टिक्सच्या संपर्कामुळे आरोग्याच्या जोखमींकडे अधिक लक्ष वेधले जात आहे.

प्लास्टिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या ॲडिटिव्ह रसायनांच्या संपर्कामुळे पुनरुत्पादक आरोग्य, वाढ, संज्ञानात्मक कमजोरी आणि न्यूरोडेव्हलपमेंट विकारांवर होणारे परिणाम गंभीर आहेत. यूएनईपी आणि बासेल, रॉटरडॅम आणि स्टॉकहोम कन्व्हेन्शन्स सेक्रेटरिएटने मे २०२३ मध्ये जारी केलेल्या ‘केमिकल्स इन प्लास्टिक्स’ या तांत्रिक अहवालात या विषारी रसायनांचा उल्लेख आहे आणि त्यांनी विशेषत: स्त्रिया आणि मुलांवर कसा परिणाम होतो यावर प्रकाश टाकला आहे.

प्लास्टिक आणि त्यातील रसायनांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे स्त्रीच्या आयुष्यातील विविध महत्त्वाच्या कालखंडांवर गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. याचा परिणाम पुढील पिढ्यांवरही होऊ शकतो. हे परिणाम विशेषतः गर्भधारणेच्या आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या बाबतीत गंभीर आहेत.

मार्च २०२२ मध्ये UN पर्यावरण असेंब्लीने (UNEA) प्लास्टिक प्रदूषण समाप्त करण्यासाठी एक ऐतिहासिक ठराव स्वीकारला, ज्यामुळे या समस्येच्या निराकरणासाठी जागतिक स्तरावर नवीन करार विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. हा ठराव जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्याचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

प्लास्टिकशी संबंधित जोखमींपासून मानवी आरोग्याचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी हा नवीन करार एक महत्त्वपूर्ण संधी ठरू शकतो. या कराराच्या माध्यमातून प्लास्टिक प्रदूषणाचे गंभीर परिणाम ओळखून आणि त्यावर उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे.

प्लास्टिक प्रदूषणांचे पडसाद हे दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. याची जाणीव आपल्या सर्वांनाच होते आहे. आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपली मुले आणि भावी पिढीला भोगावे लागणार आहेत, हा विचार आता प्रत्यक्षात उतरतो आहे. हे कुठेतरी थांबवले पाहिजे, याची जाणीव आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे तरी रुजते आहे; पण नेमकी सुरुवात कुठून करायची, हे आपल्याला अजूनही समजत नाहीये. तुम्हाला यावर काय वाटते?

juhichawlaoffice@gmail.com (शब्दांकन : नीलिमा बसाळे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.