एका कवितेची शताब्दी

poem
poemsakal media
Updated on

एका कवितेची शताब्दी

‘प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?’

- विद्याविलास पाठक

आज १७ सप्टेंबर. बरोब्बर शंभर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर १९२१ रोजी ज्येष्ठ कवि माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांनी ‘ प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई ’ ही कविता पुण्यात चितळे वाडीत रहात असताना लिहिल्याची नोंद आहे. आई विषयीची प्रेम भावना व्यक्त करणारी ही कविता वाचून डोळ्यात पाणी आलं नाही असा मनुष्य शोधून सापडणे कठीण आहे. शंभर वर्षांनंतरही या कवितेची गोडी किंचितही कमी झालेली नाही. मात्र प्रत्येकाच्या मनातली आई विषयीची भावना व्यक्त करणारं हे गीत माधवरावांनी आपल्या सख्या आईला उदेशून नाही तर त्यांच्या मानलेल्या आईला उद्देशून लिहिलं आहे हे वाचून कदाचित आपल्याला धक्का बसेल.

माधवरावांचे बरेचसे बालपण त्यांच्या मामांच्या घरी बडोद्यात गेले. आयुष्याच्या जडण घडणीचा हा काळ. मामा आणि आई जुन्या विचारांचे तर रेल्वे खात्यात असलेले त्यांचे वडील त्र्यंबकराव हट्टी आणि तापट. सर्वच कुटुंब सोवळे-ओवळे पाळणारे. माधवराव इंग्रजी शिकू लागल्यानंतर त्यांना हे सारे पटेनासे झाले. त्यांना घरात घुसमटल्या सारखे होई. म्हणून त्यांनी कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहायचा निर्णय केला. शिक्षण सुरू असतानाच ते स्वत: शिकवण्या घेत. त्यांना शिष्यवृत्तीही मिळत असे. त्यामुळे होस्टेलवर राहायचे आणि घरी जेवायला घरी जायचे हे त्यांना अधिक सोयिस्कर वाटू लागले. घर सोडल्यानंतर त्यांच्याशी आपुलकीने वागणार्याय, पुरोगामी कशीताई हेरलेकर यांच्याविषयी त्यांना जिव्हाळा वाटू लागला आणि काशीताई, त्यांची कन्या शांता आणि गीता उर्फ पिलूताई या कुटुंबाच्या सहवासात ते चांगलेच रमले. माधवरावांच्या विचारांशी जुळणारे हे कुटुंब होते.

काशीताई यांना ते आई मानू लागले शेवटपर्यंत त्यांनी काशीताईंनाच आपली आई मानले. काशीताई यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे माधवरावांच्या मनात नवी उमेद निर्माण झाली. काशीताई यांचे कुटुंब तसे पुरोगामी. त्यात पिलूबाई यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह केला होता. माधवरावांना त्याचेच फार अप्रूप. सुरुवातीच्या काळात माधवरावांचे त्यांच्या आई उमाबाई यांच्याशी फारसे पटत नव्हते. त्या काळात कशीबाईच त्यांच्या आई झाल्या होत्या. माधवराव पुण्यात आल्यानंतरही उमाबाई त्यांच्या बरोबर आल्या नव्हत्या. माधवराव पुण्यात येऊन स्थायिक झाले. फर्ग्यसन कॉलेजमध्ये त्यांना नोकरी मिळाली.

त्याच सुमारास ‘वरदा’ नावच्या विद्यार्थिनीमुळे त्यांच्या आयुष्यात वादळ आले. त्यांना मानहानि पत्करून दोन वर्षे वरदाला भेटायचे नाही व फर्ग्यसनच्या नोकरीचा राजीनामा द्यावा या अटींवर पुणे सोडावे लागले. ही दोन वर्षे त्यांनी अमळनेरला काढली. पुण्यात परतल्यानंतरही त्या दोन वर्षाच्या काळात त्यांची आणि वरदाची एकदा भेट झाली होती म्हणण्यापेक्षा ती घडवून आणली गेली. त्याचा दाखला देत वरदाला भेटल्याचा ठपका ठेवत त्यांना फर्ग्यसन पासून दूर ठेवण्यात आले. त्यांनी इतरत्र नोकरी केली.

उमाबाई त्यांच्याकडे राहावयास आल्या ते मध्यवरावांनी पुण्यात बंगला बांधल्यानंतर. तोपर्यन्त माधवरावांचे नाव झाले होते. त्याआधी काही काळ माधवरावांची आई, ते स्वत: आणि त्यांचे नातलग पुण्यात असूनही वेगवेगळे राहात. माधवरावांचे कर्तृत्त्व आणि किर्ति पाहून उमाबाईही सुखावल्या होत्या. माधवरावांच्या शेवटच्या दिवसात उमाबाईंनी त्यांची खूप सेवा केली. त्या कायम माधवरावांच्या पायाशी बसून असत. आईत झालेला हा बदल माधवरावांनाही सुखावणारच नव्हे तर आई विषयीची प्रेमभावना जागृत करणारा ठरला. त्यांचे मन आईच्या ठिकाणी पूर्ण रमले हा माधवरावांच्या आयुष्याचा परमोत्कर्ष ठरला. आपण काशीताईंवर दोन कविता केल्या मात्र सख्या आईला कवितेद्वारे कृतज्ञता व्यक्त करू शकलो नाही याची त्यांनाही खंत वाटत असावी. काशीताईंवर माधवरावांनी १७ सप्टेंबर १९२१ रोजी

‘प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?’

ही कविता आणि 24 फेब्रुवारी १९२२ रोजी

“ प्रात:कालिं आता तुझे नच घडे सुस्निग्ध ते दर्शन

की ज्याच्या शकुने सबन्ध मज तो जावा सुखाने दिन ” हे सुनीत लिहिले होते.

उमाबाईंमध्ये झालेला बदल आणि आजारपणात त्यांनी केलेली सेवा याचा माधवरावांवर खूपच परिणाम झाला. आईविषयी त्यांना आत्मियता वाटू लागली आणि त्यांनी उमाबाईंवर एक अभंग लिहिला. तो दिवस होता १७ ऑक्टोबर. त्यानंतर काही दिवसातच ( ३० नोव्हेंबर ) त्यांचे निधन झाले आणि तीच त्यांची अखेरची कविता ठरली. मृत्यू समोर दिसत असताना पायाशी बसून आपल्या सुखासाठी देवाला साकडे घालणारी आई उमाबाई आणि तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माधवरावांनी त्यांच्यावर लिहिवा तोही अभंग ! सारेच हृदय हेलावून टाकणारे !

या अभंगात ते म्हणतात...

“वाटे तुझ्यापाशीं धावतच यावे,

डोके खुपसावे कुशीमधे;

रडून करावा जीवीचा या भार,

हलकासा, फार थोडा तरी;

दुखण्यात धावे पुन्हा बाल्याकडे,

हे वेडे वाकडे मन माझे;

गोंजारू दे मला माऊलीचा हात,

संजीवनी त्यात साठविली;

तुझ्या दृष्टीपुढे न ठरे अदृष्ट,

करावया कष्ट पाठव तू;

काय करू सांग जेणे पर्यायाने,

डोळ्यांचे पारणे तुझ्या फिटे.”

जन्मदेच्या ऋणातून मुक्त होण्याचा यापेक्षा अन्य मार्ग कोणता असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.