एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन

कवी, चित्रकार रामदास खरे यांची ‘द लॉस्ट बॅलन्स’ ही पहिलीच कादंबरी अनघा प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली. लेखकाने चितारलेलं बोलकं मुखपृष्ठ, अर्पण पत्रिकेतला मजकूर आणि मनोगतातील लेखकाची कृतज्ञ, प्रांजळ, प्रयत्नशील वृत्ती यातून या विषयाबद्दलचं गांभीर्य आणि लेखकाची तळमळ दिसून आली.
एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन
एका विनाशाचे अस्वस्थ दर्शन sakal
Updated on

बुकथॉट

डॉ. विजया टिळक

vijayamtilak@gmail.com

कवी, चित्रकार रामदास खरे यांची ‘द लॉस्ट बॅलन्स’ ही पहिलीच कादंबरी अनघा प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली. लेखकाने चितारलेलं बोलकं मुखपृष्ठ, अर्पण पत्रिकेतला मजकूर आणि मनोगतातील लेखकाची कृतज्ञ, प्रांजळ, प्रयत्नशील वृत्ती यातून या विषयाबद्दलचं गांभीर्य आणि लेखकाची तळमळ दिसून आली.

लेखिका डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘ब्लर्ब’ वाचल्यावर देशातल्या सध्याच्या राजकारणाप्रमाणेच या कादंबरीतील बँकिंग क्षेत्रातले घाणेरडे राजकारण वाचून उद्वेगात आणखी भर पडेल का? तसंच मोठा आटोप असलेल्या कादंबरी या प्रकारातलं, मोठा वेळ मागणारं शिवाय बँकिंग क्षेत्राविषयीचा विशेष अनुभव नसेल तर ते सारं समजून घेणं जिकिरीचं, स्वारस्य न वाटणारं असे वाटेल का? अशी नकारात्मक मनोभूमिका असूनही, मी ती वाचायला घेतली आणि वाचतच गेले आणि अंतर्मुख, सुन्न होऊन एक सिनेमाच बघितल्याचा अनुभव घेतला. बँकिंग क्षेत्रातल्या कामकाज, कारभार यांविषयीची लेखकाची मर्मदृष्टी, मुरलेपण याची साक्ष पटावी असे या क्षेत्रातले भ्रष्ट, अनागोंदी कारभार आणि कारभारातले ताणेबाणे लेखकाने यात अतिशय ओघवत्या गतीने, उत्कंठा वाढवत आणि गडद परिणाम करणारे असे गुंफलेले जाणवले. चांगल्या ध्येयाने प्रेरित होऊन दादासाहेब पुराणिक आणि राणोजी मल्हार या दोन तत्त्वनिष्ठ व्यक्तींनी उभ्या केलेल्या आणि शून्याकडून भरभराटीपर्यंत आणून ठेवलेल्या ‘रत्नावली’ आणि ‘आर एम्’ या दोन वैभवशाली बँकांची ही कहाणी. मात्र, त्यांच्या पश्चात पुढील पिढ्यांकडून मूल्यांना पायदळी तुडवत या बँकांचा कारभार पूर्णतः विस्कटून विनाशापर्यंत कसा पोहोचला याचं पारदर्शी दर्शन यात घडवलेलं दिसलं.

संस्था म्हणजे खरं तर त्यातली माणसंच! संस्था चालवणारीही आणि संस्थेशी संबंधित अशीही! इथे बँकेचे अधिकारी, कर्मचारी, संचालक, खातेदार, गुंतवणूकदार, भागधारक, कर्जदार, ठेवीदार, जामीनदार इत्यादी इत्यादी अनेकानेकांच्याच स्वभावांची नस अचूक ओळखण्यातदेखील हा लेखक पूर्ण यशस्वी झाला आहे. स्वभावातली नस ओळखली तरी ती पकडून वाचकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर शब्दप्रभुत्व, भाषाप्रभुत्व, व्यक्तिपरत्वे भाषेची विविध रूपं, त्यात सहजता, सूचकता, काव्यात्मकता असणं यातही लेखक कसाला उतरला आहे. त्रिमूर्ती, कुलकर्णी, टकले यांचं त्रिकूट, पाताळयंत्री शेलार, त्यांच्या हातचं बाहुलं झालेला विक्षिप्त, लहरी, मूर्खांच्या नंदनवनात रमलेला सहदेव, दोघा भावांचं रेल्वेरुळांसारखं नातं असलेला त्याचा विवेकी भाऊ महादेव, मुजोर, कर्जदार, पिचलेले-खचलेले सामान्यजन, ज्येष्ठ नागरिक इत्यादी इत्यादी व्यक्तिरेखा लेखकाने सजीव, समूर्त केल्या आहेत.

लालबाग, परळ, एल्फिन्स्टन रोड यांसारखीच इतरही स्थलचित्रं ही स्पंदनं जागी होतील इतकी जिवंत साकारली आहेत. ‘बँकेतल्या एका कोपऱ्यात उभी राहून नियती सगळं निरखत हसत होती’, ‘पक्ष, साहेब हे एकमेकांना आणि सरकार त्या दोघांनाही सांभाळत होते’ अशी काही चमकवणारी वाक्यं, अल्पाक्षरी, बहुअर्थी, चित्रदर्शी शैली यांमुळे एकूणच क्वचित रटाळ वाटणारा विषय रसाळ करून मांडण्याचं शिवधनुष्य लेखकाने चांगलं पेललं आहे.

इथल्या षडयंत्रात अडकलेल्यांपैकी कोणी मनोरुग्ण अवस्थेत पोहोचून, कोणी आत्महत्या करून, कोणाचा खून होऊन मरण पावला, हे भीषण वास्तव हृदय पिळवटून टाकणारं आहे. कटू वास्तवाचं प्रतिबिंब अप्रत्यक्षरीत्या रास्त प्रतिक्रियेला प्रेरित करणारं असतं आणि साहित्याचं तेच प्रयोजन असतं. अशा या मौलिक कामाचं वाचकांकडून स्वागत होईलंच, ही अपेक्षा. अनघा प्रकाशनाने एका महत्त्वाच्या आगळ्यावेगळ्या विषयाची कादंबरी प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मुखपृष्ठाविषयी प्रा. सुजाता राऊत यांचे निरीक्षणही उत्तम.

बँकिंग क्षेत्राविषयीचा विशेष अनुभव नसेल तर ते सारं समजून घेणं जिकिरीचं वाटेल का? अशी माझी नकारात्मक मनोभूमिका. तरीही मी ‘द लॉस्ट बॅलन्स’ वाचली आणि अंतर्मुख झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.