माझी कविता
संजीव देशपांडे, नेरूळ (पूर्व), नवी मुंबई
अभ्यास करताना
गणित चुकलं म्हणून
तू मला ठेवून दिला होतास
एक सणसणीत धपाटा
मी ओल्या डोळ्यांनी
अविश्वासानं तुझ्याकडं पाहिलं
तर तू सगळं बेअरिंग सोडून
मला जवळ घेतलंस
नंतर किती तरी दिवस
‘फार लागलं का रे बाळा?’
असं विचारत राहिलीस
म्हणालीस :
‘अंक नीट मोजता यायला हवेत रे’
घरी आलेल्या लांबच्या काकांना
मी ‘अरे-तुरे’ म्हणालो
तेव्हाही तू असाच धपाटा
लगावला होतास मला
अन् मग पुन्हा
एकटीच बसली होतीस रडत
मला जवळ घेऊन समजावताना
म्हणाली होतीस :
‘माणसं वयानं मोठी असतात...
परकी असतात...
तेव्हा ‘अहो-जाहो’ म्हणावं त्यांना
मी तुझी कित्ती जवळची किनई
मग मला म्हणायचंस ‘अगं-तुगं’...
नंतर कधीच
धपाटा खाल्ला नाही तुझा
अलीकडं कधी तरी मला विचारलंस :
‘किती वर्षांची झाले रे मी?’
‘शहात्तर...’
‘नाही रे...चुकतोयस
‘त्र्याहत्तर’ असं म्हणून
मला काही तरी समजावू लागलीस...
आताही दे मला
एक सणसणीत धपाटा ठेवून
आणि म्हण ना...
‘चुकतोयस तू’
पाहत राहिलो तुझ्या मोजणाऱ्या बोटांकडं
काल संध्याकाळी
तुझ्या खोलीत आलो तर
विचारलंस :
‘कोण आपण? मी ओळखलं नाही...’
माझ्याकडं बोलण्यासारखं काहीच नव्हतं
हलकेच म्हणालो : ‘आई...’
तू तुझ्या नजरेनं शोधत राहिलीस माझ्यात
‘अरे-तुरे’ म्हणण्यासारखं काही
‘आपलं’ दिसतंय का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.