ता म्हटलं, की आपल्याला फक्त राजकारण आठवतं; पण नेता म्हणजे फक्त राजकीय नेतृत्व नसतं. उद्योगातलं नेतृत्व, पत्रकारिता आणि कलेतलं नेतृत्व, सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्व अशा अनेक नेत्यांचं एक राज्य असतं; पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत राजकीय नेतृत्वाने बाकी सगळ्या क्षेत्रातली नेतेमंडळी एक तर विकत तरी घेतलीत किंवा गप्प तरी बसवलीत. त्यामुळे सत्तेला चार खडे बोल सुनावणारा कुणी उद्योगपती दिसणं दुर्मिळ झालंय.
वेळप्रसंगी सरकारला खडे बोल सुनावणारे जेआरडी टाटा किंवा राहुल बजाज आता नाहीत. लोकप्रियतेचा विचार न करता समाजालाही सुनावण्याची हिंमत असणारे निळू फुले किंवा श्रीराम लागू नाहीत. खरं तर दरवेळी दोषच देत बसायचं, असाही मुद्दा नसतो; पण किमान काहीप्रसंगी राजकीय भूमिका घ्यावी लागते. समाजाची वेदना मांडायची असते. खुलेआम कौतुक करायचं असतं. हेसुद्धा होताना दिसत नाही. म्हणून आता नेता म्हटलं की, लोकांना फक्त राजकीय नेता आठवतो. नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व वेगळं होतं.
राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले लोकमान्य टिळकच नाही, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील अशी अनेक नावं होती ज्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव होता. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा शाहू महाराजांचं कर्तृत्व ठाऊक आहे, असं वाटतं; पण नसतं माहीत. आपल्या लोकांची नीट माहिती असली असती तर आपण ‘मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही’ असं म्हणालो नसतो. आपण टिळकांपासून ते प्रबोधनकारांपर्यंत सगळ्यांना नीट समजूनच घेतलेलं नाही किंवा त्यांना आपण भलतंच काहीतरी समजत आलोय.