जहागीरदारांचा बुद्धिभेद

आज आपले राजकारण नीतिमत्तेची नीचांकी पातळी गाठतेय. राजकारण्यांना समाज म्हणजे त्यांची जहागीर वाटायला लागली आहे.
actor chinmay mandlekar
actor chinmay mandlekarsakal
Updated on

आज आपले राजकारण नीतिमत्तेची नीचांकी पातळी गाठतेय. राजकारण्यांना समाज म्हणजे त्यांची जहागीर वाटायला लागली आहे. अशा जहागीरदारांचे आपण ठेकेदार होतो आणि त्यातून समाजमाध्यमांवरील टोळ्या जन्माला येतात. लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या जहांगीर नावावरून समाजमाध्यमांवर त्याला ज्या पतीने ट्रोल केले जातेय ते पाहिले तर समाजातील बुिजीवींमध्ये होणाऱ्या गुणात्मक ऱ्हासावर नेमकेपणाने बोट ठेवता येते.

गल्लीच्या, आळीच्या तोंडाशी असलेल्या नळावर भांडणे होतात. भांडणांचे मुद्दे अगदी टुकार असतात. ओळीने उभे न राहता पाणी भरायला येणे, मध्येच आपली बादली घुसवणे वगैरे... पण त्या वेळी हाच मुद्दा जणू आंतरराष्ट्रीय पातळीचा असावा, अशा आवेशाने लोक भांडायला लागतात. किंबहुना या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या निमित्ताने एकमेकांबद्दल असलेली मनातली सर्व गरळ ओकल्यासारखी तेव्हा बाहेर पडते.

भांडण दोघांचे असले तरी बघणारे त्या तुलनेत संख्येने जास्त असतात. त्यातले बहुतेक पाण्याचा प्रपंच सोडून लागलीच प्रेक्षक होतात आणि चिखलफेकीचा आनंद घेत असतात. आजूबाजूच्या घरांमधले लगबगीने खिडक्या-दारांशी येऊन प्रसंगाची मज्जा लुटत असतात. यालाच आपण ‘बघ्याची भूमिका घेणे’ असे म्हणतो. मुळात हा आपला स्वभाव आहे.

दुरून पाहण्यात तोपर्यंत मज्जा असते, जोपर्यंत तो विषय आपल्या घरापर्यंत येत नाही. हा मानवी स्वभावगुण आहे. मग विषय नळावरच्या भांडणाचा असो, राजकारणाचा किंवा कुठल्या तुंबळ युद्धाचा, जोपर्यंत आपला कुणी त्यात नाहीये तोवर आपला त्याच्याशी काही संबंध नसतो.

राजकारणाचा विषयही सर्वसामान्य माणूस ताटात चवीला असलेल्या लोणच्याच्या फोडीसारखाच चघळतो. ती फोड निव्वळ त्याच्या जेवणाची लज्जत वाढवणारी असते. तिचा भुकेशी तसा फारसा संबंध नसतो. त्याचा थेट त्याच्या पोटावर परिणाम होत नाही. मग नुसता घोर लावून घेण्यात काय हशील आहे, असा सर्वसामान्य विचार असतो. राजकारणात चाललेल्या घडामोडींकडेही सर्वसामान्य माणूस अशाच पद्धतीने पाहतो. तो फक्त चर्चा करून मोकळा होतो. खोलात शिरण्याची त्याची तयारी आणि मानसिकता दोन्ही नसते. जे सुरू आहे ते आपल्या घराबाहेरचे आहे, असे त्याला वाटते; त्यामुळे त्याकडे तो सपशेल कानाडोळा करतो.

आज आपले राजकारण नीतिमत्तेची नीचांकी पातळी गाठतेय. अशा वेळी आपण फक्त मत देऊन मोकळे होतो. बाकी गोष्टींशी आपला काय संबंध, अशी आपली भूमिका असते. कारण निवडणुका जरी देशात असल्या, तरी त्या केवळ मतांसाठीच चालल्यात असे नाही. आता होऊ घाललेल्या निवडणुका तुमच्या मतांसोबतच तुमच्या विचारांच्या बांधिलकीची हमीदेखील मागतात. त्या तुम्हाला गटागटांमध्ये वाटायला निघाल्यात.

कळत-नकळत हे राजकारण थेट तुमच्या शयनकक्षात येऊन पोहोचलेय. ते आता केवळ गल्ली आणि दिल्लीपुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यामुळे नीतिहीन राजकारणाचे हे युद्ध तुंबळ तर नक्कीच नाही. कारण तुम्हाला जरी ते तुमच्या उंबरठ्याबाहेर चालले आहे, असे वाटत असले तरी त्याने तुमच्या कुटुंबात प्रवेश करून केव्हाच तुम्हाला नियंत्रित करायला सुरुवात केली आहे.

राजकारण्यांना समाज म्हणजे त्यांची जहागीर वाटायला लागली आहे. अशा जहागीरदारांचे आपण कधी गुलाम होतो, हेच आपल्याला कळत नाही आणि मग त्यातून समाजमाध्यमांवरील टोळ्यांचा जन्म होतो. या टोळ्या अनौरस नसतात. त्यांचा बोलविता धनी असतो आणि त्यांच्याकडून ते बोलवून घेण्यासाठी तो आपले धन खर्चीही घालत असतो; पण अनेकदा याच टोळ्यांचे बळी होऊन आपण कसे वागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही.

राजकीय विचारप्रवाहाच्या प्रभावातून तुम्ही समाजमाध्यमांच्या भिंतीवर एखादी साधी रेघ ओढता आणि तुमच्या नकळत ती कुणाच्या तरी काळजावर वार करून जाते. त्यातून होणाऱ्या वेदना केवळ मानवी संवेदना जागृत असलेल्यांनाच कळू शकतात. मुळात तुम्ही-आम्ही लोकशाही नावाच्या एका धाग्यात ओवलेली स्पंदने आहोत. या स्पंदनांनाही आता स्वार्थाची भेसूर कंपने जाणवायला लागली आहेत.

या संवेदनेच्या धाग्यातून संपन्न झालेल्या संविधानिक ढाच्याला आता धर्मप्रधान राजकारणाची लागण होऊ घातली आहे. लोकांच्या मनात असुरक्षितता आणि खोट्या विकासाचे स्वप्नरंजन करून त्यांना आपसात भिडायला भाग पाडले जाते आहे. आपला समाज आज सुशिक्षित आहे. तो जाणता आहे. संवेदनशील आहे; मात्र तोच आपला बुद्धिजीवी समाज आज औदासीन्य आणि विफलतेच्या चक्रात अडकलेला दिसतो.

एक प्रकारच्या चमत्कारिक अशा कोंडीत तो अडकलाय आणि त्यात आपल्याच माणसांची त्यांच्या रंगांवरून, जातींवरून, धर्मांवरून आणि आता नावांवरूनही पारख करायला लागलाय. तो आता केवळ तेवढ्यावर थांबत नाही; तर सुतावरून स्वर्ग गाठतो आणि एखाद्याच्या वैयक्तिक, हळव्या कोपऱ्यालाही नख लावतो. लेखक-अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या मुलाच्या नावावरून समाजमाध्यमांवर त्याला ज्या पद्धतीने ट्रोल केले जाते ते पाहिले तर आपल्या समाजातील बुद्धिजीवींमध्ये होणाऱ्या गुणात्मक ऱ्हासावर नेमकेपणाने बोट ठेवता येते.

आपल्याकडे जात ही एकच गोष्ट अशी आहे जी माणसाला जन्मत: चिकटवली जाते; मात्र त्यातूनच मार्ग काढत भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. आज माणूस त्याच्या मर्जीने त्याच्या धर्माचे पालन करू शकतो. तो त्याला हव्या त्या ठिकाणी राहू शकतो, त्याच्या सांस्कृतिक समजांनुसार पेहराव करू शकतो. त्याला त्याचे नाव निवडण्याचाही तेवढाच अधिकार आहे.

त्यावरून कुणालाही त्याच्यावर बोट ठेवण्याचा अधिकार नाही. कारण त्याला ते स्वातंत्र्य या देशाच्या संविधानाने बहाल केले आहे; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये नावांवरून लोकांना त्रास देण्यात येतो आहे. चिन्मय हा एक उत्तम नट आहे. त्याने केलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील, अशा आहेत; मात्र गेल्या काही काळात तो विशेष नजरेत भरला तो त्याने साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांमुळे.

चिन्मयची अंगकाठी, उंची आणि त्याच्या पूर्वीच्या भूमिका पाहिल्या, तर तो शिवाजी महाराजांची भूमिका साकार करू शकेल, असे कुणाला वाटले नसते; मात्र त्याने आपल्या अभिनय कौशल्याने महाराजांच्या भूमिकेला न्याय दिला. त्यामुळे साहजिकच त्याच्याबद्दल सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान असेल, असे वाटले होते; मात्र ज्या समाजाने त्याला त्याच्या कामासाठी डोक्यावर घेतले, त्याच समाजातील काही सो कॉल्ड निर्बुद्ध आत्मे त्याला त्याच्या मुलाच्या नावावरून छळायला लागले आहेत.

कारण काय, तर त्याचे नाव जहांगीर आहे म्हणून. तो त्याचा मुलगा आहे. त्याने त्याचे काय हवे ते नाव ठेवावे. जर त्या नावाबद्दल कुणाला काही बोलण्याचा अधिकार आहे तर तो त्याच्या पालकानतर त्या मुलाला आहे; मात्र ते राहिले बाजूलाच. नशीब महापुरुषांच्या भूमिका केलेल्या व्यक्तीला अमुकच पद्धतीचे नाव ठेवायची परवानगी आहे, असा नियम लिहून ठेवलेला नाही कुठे. मुळात एखाद्या अभिनेत्याला तुम्हाला जज करायचे असेल, तर ते त्याच्या कलागुणांवरून निश्चित करावे.

तो प्रेक्षक म्हणून आपल्याला अधिकार असतो; मात्र हल्ली तसे होत नाही. यापूर्वी करिना कपूर आणि शाहरूख खान यांच्या मुलांच्या नावांवरूनही असले निर्बुद्ध वाद झाले होतेच. त्यात नवे असे काहीच नाही; मात्र या वेळी बहुधा पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील कलावंताला अशा वादाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबाला या प्रकरणातून सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय.

चिन्मयच्या पत्नीने या मुद्द्याची कारणमीमांसा करणारी एक चित्रफीत प्रसिद्ध केली; मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. कारण आपण ज्याला समाज म्हणतो त्याने विचार करण्याची शक्ती गमावलेली दिसते. समाजमाध्यमांवरून फोफावणारे अविचारी थवे लोकांचे मेंदू सडवण्याचे काम करायला लागले आहेत.

कुठल्याही मुद्द्यावरून कुणालाही कोंडीत पकडणारे हे वेडे ध्येयवादी मानसिक आजाराने ग्रस्त झालेत. त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे; पण ती केवळ संख्यात्मक आहे. या वाढीत होणाऱ्या गुणात्मक ऱ्हासाची कुणी कल्पनाच करायला तयार नाही. त्यात वाईट एकच आहे, की या टोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिजीवी वर्गाचा समावेश आहे.

ज्या लोकांची विचार करण्याची क्षमता आहे, तेदेखील राजकारण्यांनी तयार केलेल्या धार्मिक वातावरणाला बळी पडतात; मात्र अशा मनोवृत्तीच्या अधीन जाऊन आपण आपल्या देशातील सामाजिक सद्‍भावनेच्या विचारांना नख लावतोय, हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. आपण एक स्वतंत्र देश आहोत आणि येथे राहणाऱ्या प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे, हे तत्त्वच कुणी मान्य करायला तयार नाही.

मुळात संविधानिक मार्गांनी मिळालेल्या मनुष्याच्या सर्वसाधारण हक्कांबाबत जर आपली ही परिस्थिती असेल, तर असंविधानिक आणि छुप्या मार्गाने जी संविधानाची हत्या केली जातेय त्याबद्दल कोण बोलणार, हा प्रश्नच आहे. जगात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना सर्वमान्य झालेली असली, तरी आपल्या लेखी त्या संकल्पनेला अजूनही थारा नाही.

म्हणूनच मग व्यक्ती कुठलीही असो, तिने या मूठभर लोकांनी ठरवलेल्या एकांगी देशप्रेमाच्या संकल्पनेच्या विरोधात जाऊन काही जरी करण्याचा प्रयत्न केला, तर ते तुमच्या अंगावर येतात. काही विशिष्ट समाजाला दोषी ठरवतात. त्यांची संख्या अल्प असली, तरीही तेसुद्धा आपलेच समाजबांधव आहेत, हे विसरून देशाचा प्रमुखच जर त्यांच्यावर नजर रोखत असेल, तर त्यांच्या झुंडींकडून आपण अपेक्षा तरी काय करावी? अशा वेळी मग आपल्या इतिहासाच्या गर्भात दडलेल्या घटनांची उजळणी करून स्वत:ला समाजसत्तावादी जहागीरदार समजणाऱ्यांचा बुद्धिभेद करणेच क्रमप्राप्त ठरते.

rahulgadpale@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.