घटनाबाह्य पद्धतीने मिळवलेल्या निरंकुश अधिकाराच्या जोरावर वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात वाट्टेल तसे वागण्याची मुभा अँड्य्रू क्युमो यांनी मिळवली होती. त्यांचे वागणे हे ब्रेक नसलेल्या, मात्र केवळ एक्सलेटर असलेल्या कारप्रमाणे बेफाम झाले होते. अशा परिस्थितीत अपघात निश्चित होतात. तेच अँड्य्रू क्युमो यांचे झाले आहे...
वर्षभरापूर्वी न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्य्रू क्युमो यांची परिस्थिती वेगळी होती. न्यूयॉर्क राज्य क्युमो यांच्या सक्षम नेतृत्वात कोरोना संकटाशी दोन हात करत होता. त्या काळात क्युमो यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदेकडे सबंध अमेरिकेचे लक्ष लागलेलं असायचं. क्युमो मीडियाचे ‘डार्लिंग’ ठरले होते. त्यांना मिळणाऱ्या कव्हरेजमुळे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचादेखील जळफळाट व्हायचा. क्युमो यांची लोकप्रियता एवढी वाढली होती, की ते अध्यक्षपदाचे उमेदवार असणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. क्युमो यांनी त्या नाकारल्या, तरी प्रतिकूल परिस्थितीत लढणारं सक्षम नेतृत्व म्हणून अमेरिकन जनता क्युमो यांच्याकडे पाहत होती. मात्र तीन ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती पूर्णपणे पालटली होती.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नरपदावर असताना अँड्य्रू क्युमो यांनी २०१३ ते २०२० पर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे एका चौकशीतून समोर आलं. शोषण झालेल्या पीडितांमध्ये अनेक आजी-माजी शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. बळजबरीने स्पर्श करणे, चुंबन घेणे, मिठी मारणे आणि अभद्र मत मांडण्यासारखे कृत्य त्यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे हे कारनामे चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर त्यांनी सूडबुद्धीने कारवाई केली. क्युमो यांनी कार्यालयाची शिस्त बिघडवण्याला प्रोत्साहन देण्यासोबतच केंद्र आणि राज्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. एका कार्यकारी पदावरील व्यक्तीने त्या कार्यालयाच्या धोरणांना हरताळ फासणे हे अमेरिकेसाठी धक्कादायक होतं. चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत असताना क्युमो मात्र ते निर्दोष असल्याच्या मतावर ठाम होते. आपणावर लावले गेलेले सर्व आरोप धांदात खोटे आहेत. माझ्या कृतीचा चुकीचा निष्कर्ष काढला गेल्याचा दावा क्युमो सातत्याने करत होते; मात्र या काळात त्यांचे एकापाठोपाठ एक प्रकरण समोर येत असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी क्युमो यांच्या राजीनामा देण्याबाबतची भूमिका मांडली. क्युमो यांच्यावर महाभियोगाची कारवाईची टांगली तलवार होतीच. चौकशी अहवाल समोर आल्याच्या आठवडाभरानंतर अखेर क्युमो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजीनामा देताना क्युमो यांनी सांगितले, की ‘‘मी कायम लढणारा आहे. या सर्व घटना राजकारणाने प्रेरित आहेत; मात्र प्रतिकूल परिस्थितीशी लढणे हे माझ्या स्वभावात आहे. गव्हर्नरपदाची शपथ घेतली, त्या वेळी मी मोठ्या संघर्षासाठी तयार होतो. मी कायम न्यूयॉर्कच्या जनतेच्या हितासाठी लढलो. मी बाजूला झाल्याने सरकारला आपले प्रशासकीय कर्तव्य निभावणे शक्य होईल. त्यामुळे जनतेच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला.’’
क्युमो यांचा राजीनामा हा त्यांच्याप्रमाणे लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या भारतातील राजकीय नेते, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आणि पत्रकारांच्या कृतीच्या एकदम विरुद्ध आहे. भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातीलच एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्या महिलेने गोगई यांचा प्रस्ताव नाकारल्याने तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उघडकीस आणल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली; मात्र सरन्यायाधीश गोगई अध्यक्ष असलेल्या खंडपीठानेच हे प्रकरण सुनावणीसाठी घेतले. हा आपल्याविरोधातील कट असल्याचे सांगत गोगई यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळले. अखेर हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या समितीकडे सोपवण्यात आलं आणि त्या समितीने गोगई यांना सर्व आरोपातून मुक्त केलं.
दुसरं प्रकरण म्हणजे तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्या महिला सहकाऱ्याने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. न्यायालयाने या प्रकरणात तेजपाल यांना निर्दोष ठरवलं; मात्र त्यातील धक्कादायक बाब म्हणजे न्यायाधीशांनी पीडित महिलेच्या वर्तवणुकीवर केलेली टिप्पणी. ही घटना घडल्यानंतर काढलेल्या फोटोवरून त्या मुलीला आघात झाल्यासारखं, धक्का बसल्याचं किंवा घाबरल्यासारखं वाटतं नसल्याचा निष्कर्ष न्यायाधीशांनी काढला होता. तसेच पत्रकारितेनंतर राजकारणात गेलेल्या एम. जे. अकबर यांच्यावरही २० महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला. सर्व स्तरातून प्रचंड टीका झाल्यानंतर आणि दबाव वाढल्याने त्यांना उशिरा का होईना, पदाचा राजीनामा द्यावा लागला होता; मात्र अकबर यांनी नंतर त्यातील एका महिला पत्रकारावर बदनामीचा खटला दाखल केला. न्यायालयाने अकबर यांचा हा दावा फेटाळला; परंतु या निकालाला आव्हान देत अकबर यांनी न्यायालयाने त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवल्याची चूक केल्याचा दावा केला.
२०१४ साली संयुक्त राष्ट्राने केलेल्या एका अभ्यासात भारतात १४ टक्के महिलांना राजकीय लैंगिक हिंसाचार सहन करावा लागतो, तर ४५ टक्के महिलांचे शारीरिक शोषण होत असल्याचे समोर आले. त्यामध्ये महिलांकडून लैंगिक अनुकूलतेची अपेक्षा करणे हा सर्वसामान्य आणि व्यापक छळाचा प्रकार होता.
क्युमो यांचा राजीनामा हा एका मोठ्या राजकीय प्रवासानंतर दिला आहे. १६ वर्षांचे असताना त्यांनी निवडणुकीदरम्यान वडिलांचा प्रचार केला होता. २४ व्या वर्षी वडिलांच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. १९८० साली त्यांनी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर बेघरांसाठी घरे बांधली. या उपक्रमामुळे त्यांनी अवघ्या अमेरिकेचं लक्ष वेधून घेतलं होतं. बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात क्युमो हे नगर विकास विभागाचे सचिव होते. २००० साली त्यांनी तत्कालीन रिपब्लिकन गव्हर्नर जॉर्ज पॅटकी यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक्स पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते प्राथमिक फेरीतच पराभूत झाले. त्यानंतर सहा वर्षांने क्युमो यांनी ॲटर्नी जनरलपदाची निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी झाले. त्यानंतर २०१० साली ते न्यूयॉर्कचे गव्हर्नर म्हणून निवडून आले. सलग तीन वेळा ते गव्हर्नरपदी निवडून आले. आता ते चौथ्या टर्मसाठी लढणार होते.
न्यूयॉर्क येथील कायदेतज्ज्ञ आणि दक्षिण आशियाई सल्लागार परिषदेचे सदस्य रवी बत्रा हे क्युमो यांना अनेक वर्षांपासून ओळखतात. क्युमो न्यूयॉर्कचे ॲटर्नी जनरल असल्यापासून त्यांची मैत्री आहे. ॲटर्नी जनरलपदाच्या निवडणुकीत बत्रा यांनी क्युमो यांची मदत केली होती. बत्रा सांगतात की, क्युमो यांच्यात मला माजी राष्ट्राध्यक्ष थियोडर रुझवेल्ट यांचे गुण दिसायचे. त्यांनी हे लिझ बेंजामिन या पत्रकाराला बोलून दाखवलं होतं. क्युमो यांच्या धमण्यात अमेरिकन सत्तेचं ‘ब्ल्यू ब्लड’ वाहत होतं. मार्क ट्वेन यांनी तर त्यांना ‘प्रिंस ॲण्ड द पॉपर’ अशी उपमा दिली. ‘अँड्य्रू हे असे राजपुत्र आहे, जे सत्तेचा वापर अक्रोड फोडण्यासाठी कधीच करणार नाही. कायद्याचे राज्य असलेल्या अमेरिकेत संविधानाने अधिकाराचे समसमान वाटप केले आहे. त्यामुळे व्यवस्थेचे कुठलेही एक अंग सत्तेला नियंत्रित करू शकत नाही; मात्र अँड्य्रू क्युमो यांनी सत्ता नियंत्रित करून दाखवली,’ असं बत्रा यांनी सांगितले. पुढे अँड्र्यू क्युमो यांच्याशी मतभेद झाल्यानंतर रवी बत्रा यांनी न्यूयॉर्क राज्याच्या पब्लिक इथिक्स कमिटीचा राजीनामा दिला. क्युमो यांच्याशी वाद घालण्यापेक्षा मी राजीनामा देणे पसंत केल्याचे बत्रा यांनी सांगितलं. या संदर्भात क्युमो यांना दिवंगत डिस्ट्रिक ॲटर्नी रॉबर्ट मॉर्गेथा ज्युनियर यांनी एक पत्र पाठवलं होतं. त्यात त्यांनी क्युमो यांच्या भोवताली (यस) होयबा म्हणणाऱ्या स्त्री-पुरुषांचे कोंडाळे तयार झाल्याचा उल्लेख केला होता. या सर्वांना क्युमो यांच्या सत्तेचा फायदा झाल्याचे म्हटले.
अँड्य्रूसारख्या जुन्या मित्राचा लाझारससारखा म्हणजे सर्वोच्च शक्तीच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात स्वतःचाच विनाश होताना पाहून दुःख होत असल्याचं बत्रा सांगतात. क्युमो हे एक संवेदनशील, मध्यममार्गी डेमोक्रॅट होते. अमेरिकेचा अध्यक्ष होण्याची गुणवत्ता त्यांच्यामध्ये होती. एक चांगला अध्यक्ष ज्याच्यामध्ये देशांतर्गत आणि बाह्यशत्रूपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवण्याची क्षमता होती. अँड्र्यू यांनी यातून बाहेर पडावे आणि आपल्या पितृत्वाचा आनंद लुटावा आणि हो, राजकारणाबाहेर असलेल्या स्वतःचा शोध घ्यावा, असा सल्ला बत्रा यांनी जाता जाता दिला.
घटनाबाह्य पद्धतीने मिळवलेल्या निरंकुश अधिकाराच्या जोरावर वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात वाट्टेल तसे वागण्याची मुभा क्युमो यांनी मिळवली होती. अगदी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन ते वागायचे. त्यांचे वागणे हे ब्रेक नसलेल्या, मात्र केवळ एक्सलेटर असलेल्या कारप्रमाणे बेफाम झाले होते. अशा परिस्थितीत अपघात निश्चित होतात. अँड्य्रू क्युमो यांचा अपघात गेल्या १० वर्षापासून होत होता. हळूहळू वाढत जाणाऱ्या एका सुंदर ओपेरासमान असलेल्या अँड्र्यू यांच्या कारकिर्दीचा दुःखद अंत झाला.
दरम्यान, क्युमो यांचा राजीनामा हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा अंत आहे, की विश्रांती हे येणारा काळच ठरवेल; मात्र क्युमो यांचे न्यूयॉर्क आणि तेथील जनतेच्या विकासातील योगदान कुणीच नाकारू शकत नाही. क्युमो यांच्या काही वाईट कृती त्यांच्या पतनासाठी कारणीभूत ठरल्या. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी अत्यंत समर्पक शब्दात हे मांडले आहे. ते म्हणतात की, क्युमो यांनी गव्हर्नर म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली. अगदी लोकांच्या मतदानाच्या अधिकारापासून, पायाभूत सुविधांचा विकास करण्यापर्यंत त्यांनी काम केले. त्यामुळे क्युमो यांचे या पद्धतीने जाणे, हे अधिक दु:खदायक आहे.
- पूनम शर्मा
(लेखिका ‘इंडिया अमेरिका टुडे’ या नियतकालिकेच्या कार्यकारी संपादक आहेत.)
managingeditor@indiaamericatoday.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.