चळवळ स्वच्छतेची (पोपटराव पवार)

popatrao pawar
popatrao pawar
Updated on

ग्रामविकासात स्वच्छतेची चळवळ खूप महत्त्वाचा वाटा उचलते. महाराष्ट्रात गेली काही वर्षं वेगवेगळ्या माध्यमातून स्वच्छतेची चळवळ विस्तारते आहे. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गातून गावं स्वच्छ होत आहेत. हिवरेबाजारमध्ये गेल्या काही वर्षांत स्वच्छतेची चळवळ यशस्वीपणे राबवण्यात आली. रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असलेल्या या चळवळीचा आढावा.

दोन ऑक्‍टोबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती सुरू होत आहे. त्या निमित्तानं जगभरातले गांधीवादी विचारवंत, संस्था यांनी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेला "स्वच्छ भारत'चा उपक्रमही महत्त्वाचा. हा उपक्रम गावच्या पंचायतीपासून दिल्लीपर्यंत स्वच्छता पंधरवड्याच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. स्वच्छता मानवी आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची. स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य चळवळीबरोबरच गांधीजींनी स्वच्छता आणि शौचालय वापराची चळवळ चालू केली. गांधीजी आणि विनोबाजींच्या सर्वोदय विचारातून त्याला ग्रामविकासाचं स्वरूप मिळालं. त्यातूनच पुढं गावोगावी स्वावलंबनाची चळवळ पुढं आली. संत गाडगेबाबांनी स्वतः झाडू हातात घेऊन तीर्थस्थळं, यात्रेची ठिकाणं अशा ठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन या चळवळीला कृतीची जोड दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून, आपल्या पहाडी आवाजात खंजिरीवर थाप मारून "ग्रामोन्नतीचा दिवा' उजळवण्याचा संदेश दिला. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामगीतेच्या आचारणाची मोठी चळवळ निर्माण केली. शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर भाऊंनी स्वच्छतेतच गजानन महाराजांचं अस्तित्व आहे, हे दाखवून दिलं, तर देवगडच्या भास्करगिरी महाराजांनी नदीच्या घाटाची स्वच्छता आणि मंदिर परिसर स्वच्छता याचं शिक्षण भाविकांना दिलं. या दोन संस्थांनी महाराष्ट्राच्या वारकरी वरंपरेला स्वच्छता आणि शिस्तीचा नवा संस्कार दिला.

तत्कालीन ग्रामविकासमंत्री रणजीत देशमुख यांनी ग्राम अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेची स्पर्धा राज्यामध्ये आणली. 1996-97 मध्ये मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तेव्हाचे ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी राज्यात पाच लाख शौचालयं बांधण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पातून आर्थिक तरतूद करून वैयक्तिक शौचालयासाठी अडीच हजाराची तरतूद करून स्वच्छता चळवळीला आर्थिक आधार दिला. या चळवळीवर भाष्य करताना तेव्हा आमदार असलेले आर. आर. पाटील यांनी या निर्णयाचं अभिनंदन केलं होतं. आर. आर. पाटील यांनीच पुढं 2001 मध्ये ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचं मंत्रिपद मागून घेऊन या चळवळीचा व्यवस्थित अभ्यास करून संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा मेळ घालून "संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान' आणि "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा' राज्यामध्ये आणून संपूर्ण महराष्ट्रात प्रचंड मोठी चळवळ निर्माण केली. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि इतर प्रशासकीय यंत्रणा, उद्योगक्षेत्र, वारकरी मंडळ आदींनी सहभाग घेऊन त्याला मोठ्या चळवळीचं स्वरूप दिलं. याची दखल संयुक्त राष्ट्रसंघानंसुद्धा घेतली. अनेक गावं जात-पात, गट-तट, गरीब-श्रीमंत हे सगळं विसरून संघटितपणे काम करू लागली. प्रसारमाध्यमांनीही याचं तोंडभरून कौतुक करून या अभियानाला जागतिक पातळीवर पोचवलं. यातूनच पुढं "निर्मलग्राम अभियान' संपूर्ण देशामध्ये लागू झालं. या अभियानाच्या काळात अनेक योजनांची अंमलबवाजणी होऊ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून "स्वच्छ भारत'ची घोषणा केली आणि "एक कदम स्वच्छता की ओर' ही हाक देशवासीयांना दिली आणि गावांबरोबरच शहरांमध्येसुद्धा स्वच्छतेची चळवळ उभी राहिली. गावात केंद्रीय अर्थसंकल्पातून बारा हजार रुपयांची तरतूद शौचालयांसाठी करण्यात आली आणि मनरेगातूनही वैयक्तिक शौचालय आणि शोषखड्डा बांधणीसाठी अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी राज्यामध्ये प्लॅस्टिकबंदीचा क्रांतिकारी निर्णय घेतल्यानं स्वच्छता चळवळीला भक्कम आधार मिळाला.

सुरवातीपासून आजपर्यंतच्या या सर्व निर्णयात्मक योजनांकडं पाहिलं, तर एक लक्षात येतं, की शौचालय बांधणं हे अभियान आहे आणि शौचालय वापरणं ही मानसिकता आहे. त्यामुळं अभियानं मानसिकता निर्माण करण्याचं काम करतात. म्हणून बदलत्या काळानुसार ग्रामस्वच्छता अभियानावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. यासाठी शालेय स्तरावरूनच स्वच्छतेची आवड निर्माण करण्याची गरज आहे. त्या सवयीतूनच शौचालयाचा वापर आणि परिसर स्वच्छता हे आपलं कर्तव्य आहे, ही जाणीव प्रत्येक पिढीत निर्माण होईल.

गेल्या 25 वर्षांपासून बक्षिसपात्र गावं आपली स्वच्छता टिकवून आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशी गावं आहेत. भलेही ती चर्चेत येत नाहीत; परंतु आपलं सातत्य ती टिकवून आहेत. निव्वळ स्वच्छतेपुरतं मर्यादित न राहता जलसंधारण, पर्यावरण, तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्री-पुरुष समानता अशा उपक्रमांत सहभागी झाली, ती नव्यानं चर्चेत येत राहिली. काही गावं बक्षिसापुरतीच मर्यादित राहिली. नेतृत्वाअभावी त्यांचं सातत्य राहिलं नाही.

नुकताच हिवरेबाजारला 2016-17 चा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला. तसं पाहिलं, तर हिवरेबाजारनं कुठल्या स्पर्धेत नव्यानं भाग घेऊन काही पुरस्कार मिळवावा, असं नक्कीच नाही. नव्यानं ग्रामविकासामध्ये येणाऱ्या तरुण पिढीला गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. दररोज गावामध्ये देशभरातून, परदेशांतून अनेक विद्यार्थी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था हजारोंच्या संख्येने गावात येतात. या येणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळत रहावी, यासाठी आपल्या कामात सातत्य ठेवणं ही गावची जबाबदारी आहे. 1992 मध्ये ग्राम अभियानात सहभागी होऊन आम्ही जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळविला आणि कामाची सुरवात केली. त्या वेळी सामुदायिक शौचालयं आम्ही बांधली; परंतु त्यांची मानसिकता बदलण्यासाठी वेळ लागला. त्यानंतर जलसंधारण, पर्यावरण या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करून हिवरेबाजार पुढं आलं. मग 1996-97 मध्ये आम्ही गावात शंभर टक्के शौचालयं बांधली, तरीही पन्नास टक्के लोकच शौचालयाचा वापर करत होते. पुढं 2001 मध्ये गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आम्ही सहभाग न घेता शेजारच्या वडगाव आमली आणि पिंपळगाव वाघा या गावांत काम केलं. अतिशय चांगलं काम करून वडगाव आमली हे गाव राज्यात दुसरं आलं. मात्र, हिवरेबाजार स्वच्छतेत मागं पडलं आणि शेजारची गावं पुढं आली, अशी चर्चा व्हायला लागल्यावर गावातली तरुण पेटून पुढं आली आणि 2006-07 मध्ये आम्ही या स्पर्धेत उतरून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यासाठी अगदी अंगणवाडीच्या मुलांचीसुद्धा स्वच्छतेची सवय कामाला आली. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर हिवरेबाजारचे भाऊ येवले यांच्या भाच्याचं देता येईल. तो हिवरेबाजारमध्ये दुसरीपर्यंत शिकला. तिसरीत तो वडिलांकडं आपल्या गावी शिकायला गेला; परंतु तिकडं शौचालयाची सुविधा नसल्यानं घर-शाळेत लागलेली स्वच्छतेची सवय त्याला बाहेर शौचाला जाऊ देईना. तो पुन्हा हट्टानं मामाकडं हिवरेबाजारच्या शाळेत आला. गेली 25 वर्षं स्वच्छतेच्या सवयीं मुलांमध्ये रुजल्या आणि मानसिकताही बदलत गेली. शाळांतले शिक्षक, अंगणवाडी आणि ग्रामस्थ यांचं योगदान यामध्ये मोठं आहे. हेच काम शाश्वत ठेवण्यासाठी आम्ही दर दहा वर्षांनी एखाद्या स्पर्धेत सहभागी होतो, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढीला हे काम आपलं वाटावं आणि या कामात सातत्य टिकून राहावं. येणारं वर्षं योगायोगानं गांधीजींच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीबरोबरच हिवरेबाजारच्या स्वच्छतेचं पंचविसावं वर्षं आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात "आम्ही केले आपण करू या' या संदेशासह आपण सर्वांनाही या स्वच्छता अपक्रमासाठी आपण आपल्या गावाचा स्वच्छतेचा दशकपूर्ती किंवा रौप्यमहोत्सव साजरा करण्याच्या शुभेच्छा देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.