संस्कार चावडीचे (पोपटराव पवार)

संस्कार चावडीचे (पोपटराव पवार)
Updated on

पूर्वी गावाच्या चावडीमध्ये कसणारे गावकारभारी मूल्यांचे आदर्श होते. त्यामुळं गावे संस्कारक्षम होती. गावांच्या गरजा मर्यादित होत्या. गावच्या समस्या गावच्या चावडीवरच सोडवल्या जायच्या. कोर्ट, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय अशा ठिकाणी जाण्याची गरज पडत नव्हती आणि गरज पडलीच तरी समस्या सोडवण्यास ही यंत्रणा पाठबळ द्यायची. त्यामुळंच गावची माणसं मानसिकदृष्ट्या सक्षम होती, शिवाय शेतीच्या श्रमामुळे आरोग्यदायीही होती. 

गावातले सर्व सण आणि उत्सव आनंदी असायचे. त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या विकृतीला थारा नव्हता. डोंगर आणि शिवार हिरवागार असायचा. गावं पाणीदार असायची. होईल त्या उत्पन्नात माणूस आनंदी असायचा. त्यामुळं शिक्षण सोडता इतर कशासाठीही गाव सोडून शहरात जाण्याचं आकर्षण नसायचं. मात्र, हे सगळं असलं, तरी ग्रामपंचायत आणि विकास सेवा संस्था यांना आर्थिक स्थैर्य नव्हतं. फक्त दिवाबत्ती आणि न्यायादानाचं काम चावडीमार्फत चालायचं. पुढं चावड्या मोडल्या आणि पंचायती आल्या आणि विविध योजना गावापर्यंत यायला लागल्या. हळूहळू चावडीचे संस्कार कमी होत गेले, तशी गटबाजी प्रबळ होत गेली आणि त्याला पुढं एकाच गावात वेगवेळ्या पक्षाचं स्वरूप आलं. वाढत्या गटबाजीबरोबर समस्याही वाढत गेल्या. अनेक मूलभूत सुविधांअभावी अनेकांनी शहराकडं स्थलांतर केलं. ही लोक नंतर फक्त सण, उत्सवाच्या कारणानं गावाशी संबंधित राहिली. सण-उत्सवांतले शिस्त आणि एकीचे संस्कार कमी झाल्यामुळं केवळ वर्गणी आणि जेवणावळींचं स्वरूप त्याला आलं. त्याचप्रमाणं डीजे (कर्कश वाद्य) आणि व्यसनाधीनता असंही त्याला स्वरूप आलं. 

कारभारी एकीकडं, तरुणाई दुसरीकडं 
चावडीच्या संस्कारानं काम करणारे कारभारी एकीकडं गेले, तर ग्रामपंचायतीमार्फत नव्या पद्धतीनं काम करणारी तरुणाई दुसऱ्या बाजूला गेली. चावडीतून कारभार करणारे गावकरी गाव डोळ्यासमोर ठेवून काम करायचे. वेळप्रसंगी स्वतःच्या मालमत्ता विकायचे; पण गावातल्या मूल्यांनं जतन करायचे. त्यामुळं त्यांच्या शब्दाला किंमत असायची. ग्रामपंचायतींच्या बाबतीत ऐंशीव्या दशकापर्यंतचा काळ उत्तम होता; पण पुढं त्याला केवळ निवडून आलेल्या गटाचं स्वरूप मिळालं. मग त्याला त्या गटापुरतंच कामाचं स्वरूप राहिलं. पुढं मग दूधसंस्था, पतसंस्था, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट अशा अनेक संस्था गावात आल्या. मात्र, समन्वयाच्या अभावामुळं गावांना विस्कळित स्वरूप प्राप्त झालं. विकासापेक्षा 'एकमेकांना अडवा आणि त्यांची जिरवा' असं स्वरूप त्याला आलं. सण आणि उत्सवाचं स्वरूप एकमेकांना पूरक असण्याऐवजी एकमेकांच्या विरोधात झालं. सामुदायिक सण-उत्सवांपेक्षा वाढदिवसासारखे कौटुंबिक कार्यक्रम मोठाले व्हायला लागले. 

स्थलांतराला आळा 
अशी सगळी परिस्थिती असतानाही काही गावांनी मात्र चावडीचे संस्कार घेऊन पंचायती, पतसंस्था, विकास सेवा संस्था या माध्यमांतून आपली गावं स्वयंपूर्ण केली. त्यामुळं या गावांमधले स्थलांतर थांबले. अनेक ठिकाणी गावातून नोकरीनिमित्त शहरांकडं गेलेल्या तरुण वर्गानं गावासाठी एकत्र येऊन अनेक उपक्रम सुरू केले. त्यात माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांचं निढळ हे गाव, तर प्रभाकर देशमुख यांचं लोधवडे हे गाव यांचं उदाहरण सांगता येईल. दळवी, देशमुख यांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून अनेक क्रियाशील तरुणांनी आपल्या गावांत हे उपक्रम राबवले. त्यात 'आदर्श गाव', 'पाणी फाउंडेशन', 'नाम फाउंडेशन' अशा संस्थांमार्फत देश-विदेशातून अनेक मदतीचे हात गावासाठी पुढं आले आणि अनेक गावं पुन्हा एकदा हिरवीगार, पाणीदार आणि स्वच्छ होऊन गेली. अशा गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी काम करण्याची गरज आहे. 

विदर्भ- मराठवाड्यातल्या अनेक उच्चपदस्थ नोकरदारांनी हिवरेबाजारला गटागटांनी भेटी दिल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गावांसाठी पैसा आणि वेळ देऊन गाव बदलण्याचा मोठा यशस्वी प्रयत्न केला. त्यामध्ये एक गट इंजिनिअर्सचा होता. त्यांनी एक समस्या सांगितली ः ' आम्ही स्वतःच्या पैशातून गावाच्या विकासासाठी काही तरी करण्यास पुढं येतो, मात्र गावातले काही राजकीय गट स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला अडथळे आणतात.' त्यामुळं हा जो उच्चशिक्षित वर्ग आहे, त्याला स्वखर्च करूनही समाधान मिळत नाही. ही समस्या तशी प्रत्येक गावची आहे. यासाठीच चावडीवरचे संस्कार महत्त्वाचे आहेत. गावाच्या विकासासाठी जे योग्य असेल, तेच चावडीवर योग्य ठरवलं जायचं. त्यामुळंच चावडीवरच्या संस्कारांना पालवी फुटण्याची गरज आहे. काही ठिकाणी हे संस्कार बहरत आहेत, याचा नक्कीच आनंद वाटतो. 

पुन्हा संस्कारांचं बीज 
हिवरेबाजारसारखं गाव कधी काळी चावडीच्या संस्कारांपासन दूर गेलं होतं; पण जसजसे चावडीचे संस्कार पंचायतींत रुजत गेले, तसं गावातल्या विविध संस्थांच्या समन्वयातून गाव बदललं आणि गाव सोडून शहराकडं गेलेली अनेक कुटुंबं पुन्हा स्थलांतरित होऊन गावाकडं आली. या चावडीच्या संस्काराचे बीजारोपण गावातल्या प्रत्येकात झालं, त्यामुळं हा बदल शक्‍य झाला. म्हणून हे चावडीचे संस्कार आणि नीतिमूल्यं शाळा, महाविद्यालयांतून घराघरांत पोचवण्याची गरज आहे. त्यामुळंच गावं बळकट होतील आणि शहरं सुरक्षित राहतील. त्यासाठी संस्काराच्या चावड्या आणि नीतिमूल्यांच्या पंचायती गावोगाव उभ्या राहण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.