गिर्यारोहक ऋषिकेश यादव यांनी हिमालय सर करण्याचं स्वप्न पाहिलं. भारतीयांची पहिली नागरी मोहीम, स्वप्न मोठं आणि साहजिकच खर्चही हिमालयाएवढाच.
- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com
गिर्यारोहक ऋषिकेश यादव यांनी हिमालय सर करण्याचं स्वप्न पाहिलं. भारतीयांची पहिली नागरी मोहीम, स्वप्न मोठं आणि साहजिकच खर्चही हिमालयाएवढाच. १९९७ मध्ये पाहिलेलं हे स्वप्न निधीअभावी काही पूर्ण होऊ शकलं नाही; पण १९९८ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय झाला... आणि या टीममध्ये एण्ट्री झाली जय तहसीलदार यांची.
तहसीलदारांनी तोपर्यंत राज्यात भरपूर भटकंती केलेली असली तरी हिमालयाचं स्वप्न साकारणं हे सोपं नव्हतं. त्यातच यादव यांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली ती थेट ज्या कारणाने आदल्या वर्षी मोहीम रद्द करावी लागली होती, ती निधी उभारण्याची. खर्च होता एक कोटी रुपयांचा. १९९८ मध्ये एक कोटी उभारणं हे हिमालय सर करण्यापेक्षा अवघड म्हणावं असंच.
तहसीलदार सांगतात, ‘भारतात क्रिकेटचं प्रचंड वेड असणारा तो काळ. क्रिकेटसाठी पैसा सहज उपलब्ध व्हायचा; पण इतर खेळांसाठी निधी उभा कसा करायचा ? मोठी अडचण होती. प्रत्यक्ष एव्हरेस्ट सर करायच्या आधी आम्हाला हा निधी उभारायचा एव्हरेस्ट सर करायचा होता. तुम्ही क्रिकेटच्या शिवाय अशा खेळांनाही स्पॉन्सर करू शकता, असं आम्ही देणगीदारांना सांगत होतो... आणि त्यातून मग टाटा कंपनीनं टायटल स्पॉन्सर व्हायची तयारी दाखवली. आणि ही मोहीम मग ‘टाटा एव्हरेस्ट इंडिया ९८’ मोहीम म्हणूनच ओळखली गेली.
९८ च्या फेब्रुवारी महिन्यात ही पहिली नागरी मोहीम सुरू झाली आणि मे महिन्यात सुरेंद्र चव्हाण आणि त्यांच्यासह आणखी एकाने समिट केलं. तहसीलदार यांनी या टीमचा भाग म्हणून २.५ महिने तिबेटमधल्या बेस कॅम्पमध्ये घालवले. छोटं असो की मोठं तुम्ही झोकून देऊन काम करा तुम्हाला यश नक्की मिळतं, ही शिकवण मोहिमेतून मिळाल्याचं तहसीलदार सांगतात. तहसीलदार मूळचे जळगावचे. जळगावमध्ये ११ भावंडांत त्यांचे वडील रहायचे. त्यातून स्वतःच्या पायावर उभं रहायचं म्हणून ते मुंबईत आले. आई-वडिलांनी संघर्ष केला आणि मुलांना स्थिर आयुष्य सांगितलं. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचं आयुष्य मुंबईत गेलं. घरून प्रोत्साहन होतंच, शिवाय अपयश आलं तर त्याचा कधीच बाऊ केला जायचा नाही, अशी घरची शिकवण असल्याचं तहसीलदार सांगतात. तहसीलदारांनी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर सिमेन्स आणि टाटा ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली. टाटांसोबत काम करताना त्यांना पुढच्या प्रवासाचं बाळकडू मिळालं, कारण तिथे लीडरशिप आणि न्यू प्रोजेक्ट डेव्हलपमेंटची जबाबदारी दिली जायची. याच अनुभवाच्या जोरावर त्यांचं पाऊल परदेशी पडलं. खरंतर नोकरीची संधी होती अमेरिकेतली; पण टाटामधला अनुभव लक्षात घेता कंपनीने त्यांना यूकेला जाण्यासाठी विचारलं. तिथे बिझनेस सेट-अप करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे यूएसच्याऐवजी तिथे जाण्याचा निर्णय झाला. ६ महिन्यांत व्यवसाय सेट करत असल्याचं पाहून कंपनीने त्यांना तिथेच काम सुरू ठेवायला सांगितलं.
वडिलांच्या शिकवणुकीचा धडा त्यांना यूकेला जाताना मिळाला. तहसीलदार सांगतात, ‘‘आई-वडिलांचं वय झालं होतं आणि त्यांच्याबरोबर रहावं असं वाटत होतं, तर त्यांनी सांगितलं की मी आलो तेव्हा गावातून मुंबईत यायला लागलेला वेळ, तसंच संपर्काची साधनं, हे चित्र आता बदललं आहे, त्यामुळे अंतर जास्त असलं, तरी वेळेच्या गणितामुळे तुम्ही लांब नाही आहात.’’
ज्या कंपनीच्या कामासाठी ते यूकेला गेले होते, त्या संचालकांनी २००४ मध्ये कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी नव्या मालकांसोबत काम करणं किंवा जुन्या मालकांसोबत काही सुरू करणं असे दोन पर्याय त्यांच्याकडे होते; पण त्यांनी तिसरा पर्याय निवडायचं ठरवलं आणि तो म्हणजे, स्वतःचीच कंपनी म्हणजे ‘मर्क्युरियस’ स्थापन करण्याचा. याचं नावही ठरलं ते आधी केलेल्या एका यशस्वी झालेल्या प्रकल्पातून, ज्याचं नाव होतं मर्क्युरी. ही कंपनी सप्लाय चेन, एसएपीमध्ये.
स्वतःचं काम तर सुरू झालं; पण त्याबरोबरीनेच इतरांनाही मार्गदर्शन करता यावं यासाठी त्यांनी OMPEG- Overseas Maharashtrians professionals and entrepreneurs group ची स्थापना केली. याचं उद्दिष्ट असं आहे की, प्रोफेशनल व्यावसायिकांना किंवा कोणाला नवं काही सुरू करायला मदत करणं; त्यांना फंडिंग, नेटवर्क उपलब्ध करून देणं. यात वेगवेगळे मेन्टॉर मार्गदर्शन करतात. यूकेच्या २०० सदस्यांसह आता मुंबईतूनही काही लोक याला जोडले गेले आहेत.
आताच्या काळात परदेशात जाणाऱ्यांची संख्या आहे, तशी पुन्हा भारतात परत येऊन काम करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं तहसीलदार सांगतात. तहसीलदार यांच्या मते तुमच्याकडे जर क्षमता आणि स्वप्नं असतील, तर तुम्हाला मदत करायला अनेक जण तयार आहेत. मदत घ्या आणि स्वप्नाकडे जाण्याचा प्रवास एन्जॉय करा. आपल्याला यश-अपयश याचा सामना करावा लागेलच; पण स्वप्नाच्या दिशेने केलेला प्रवास महत्त्वाचा असं ते सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.