प्रवास किंवा पर्यटन म्हटलं की देव-धर्म, मंदिर, चर्च, गुरुद्वारा, मशीद असं सगळं आपल्या डोळ्यांसमोर येतं. ‘आयुष्यात अमुक मंदिराला किंवा तमुक दर्ग्याला भेट दिलीच पाहिजे,’ असं आपण ठरवतो व तसं काही प्रमाणात करतोही. मात्र, पर्यटन म्हणजे फक्त तेवढंच असं अजिबात नाही. वेगवेगळ्या प्रकारचा आणि ठिकाणचा प्रवास माणसाला समृद्ध करतो हे आपण जसजसा जास्त प्रवास करत जातो तसतसं उलगडत जातं. त्यामुळे धार्मिक स्थळांव्यतिरिक्तही आपण भटकलं पाहिजे असं ठरवा आणि मग बघा, किती वेगळी मजा येते ते! अशा पर्यटनानंतर आपण नक्कीच जगाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. वयाच्या हिशेबानं आपण जितक्या लवकर जग फिरायला बाहेर पडू तितके आपण बहरत जाऊ, फुलत जाऊ अन् समृद्ध होऊ...
मी ‘बजेट ट्रॅव्हल’ करतो; जेणेकरून शंभरहून अधिक देश मला फिरता यावेत. मात्र, ‘बजेट ट्रॅव्हल’ म्हणजे नेमकं काय? ते कुणालाही जमू शकतं का? ते कसं करता येतं? फिरायचं तर आहे; पण त्याला खूप पैसे लागतात अशी ‘मिथकं’ आपल्या मनात तयार झालेली असतात, ती एकदम बाजूला सारा आणि स्वत:ला ठणकावून सांगा...होय, मीही ‘बजेट ट्रॅव्हल’ करू शकतो...!
मित्रांनो, कुठंही प्रवास करताना तीन गोष्टींसाठीचा खर्च सर्वात जास्त असतो. पहिली गोष्ट म्हणजे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठीचा प्रवासखर्च (Transportation), दुसरी बाब म्हणजे, राहणं/निवास (Accommodation) आणि तिसरी गोष्ट म्हणजे, तिथलं खाणं-पिणं (Food & Beverages).
आता यापैकी जर आपण विमानप्रवासाची तिकिटं तीन महिने आधीच आरक्षित केली तर प्रवासखर्च फारच स्वस्त पडतो. राहण्याच्या सोईबाबत सांगायचं तर, होस्टेल, Couch surfing, Airbnb किंवा अन्य काही वेबसाईट्सवर जाऊन रिसर्च करून आरक्षण केलं तर बऱ्याच ऑफर्सही मिळतात.
आता खाणं- पिणं. हे जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक पातळीवरचंच करायचं. हे सगळं केल्यानं पैसेही वाचतात व नवनवे अनुभवही येतात. असं केलंत की झालात तुम्हीही ‘बजेट ट्रॅव्हलर’!
आपण एका ठरावीक काळानंतर आयते कपडे घालणं बंद करतो व आपल्याला हवे तसे कपडे शिवून घेतो. प्रवासाबाबतही तसंच आहे. आपणही आपला प्रवास कधी तरी स्वत: क्युरेट, क्राफ्ट अन् कस्टमाईझ (Curate, Craft & Customise) करू या ना...म्हणून मी अशा संकल्पनेला नाव दिलं आहे : ‘डू इट युवरसेल्फ’!
एक किस्सा सांगतो. सन २०१९ च्या ऑगस्टमध्ये आपण कुठं तरी परदेशात असायला हवं असं मी ठरवलं. निमित्त काय होतं? तर मी माझा जन्मदिवस कधीच परदेशात साजरा केला नव्हता. आता मला ते करायचं होतं. पंचविशी आली तरी आपण हे करू शकलो नाही ही खंत माझ्या मनात होती. तर ऑगस्टच्या आधी तीन महिने, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, मी लॅपटॉप घेऊन माझ्या दोन-तीन मित्रांबरोबर मध्यरात्रीपर्यंत पुण्यात एका हॉटेलात बसलो होतो. ‘ज्या देशाचं विमानतिकीट स्वस्त, तो देश फिरायला जायचं,’ असा माझा सिम्पल फंडा होता. सिंगापूर-मलेशिया या दोन देशांचा विमानप्रवास अवघ्या १६ हजार रुपयांत होतोय हे त्यात मला दिसलं. क्षणाचाही विलंब न करता निर्णय घेऊन मी चार फ्लाईट्सचं आरक्षण करून टाकलं. मी हे करत असताना हॉटेलात माझ्याबरोबर असलेला मित्र चिन्मय यालाही परदेशवारी करण्याची इच्छा झाली अन् त्यानंही माझ्याबरोबर येण्याचा उत्स्फूर्त निर्णय घेतला. थोड्या दिवसांनी आम्ही दोघं आपापला जन्मदिवस साजरा करण्यासाठी सिंगापूर-मलेशियाला जातोय हे दुसरे दोन मित्र - सागर आणि सुमित - यांना कळलं, तर त्यांनी आमच्याशी वाद घातला. ते म्हणाले : ‘‘आम्हाला का नाही विचारलंत?’’ मग त्या दोघांनीही विमानतिकिटं आरक्षित केली. ‘More the merrier,’ असं काहीसं आमचं झालं व आम्ही मध्यमवर्गीय चार मित्र या दोन देशांच्या परदेशवारीसाठी सज्ज झालो. एकाचा जन्मदिवस सिंगापूरमध्ये, तर दुसऱ्याचा मलेशियामध्ये! सिंगापूरचा व्हिसा एका व्हिसा एजन्सीकडून करून घेतला; पण मलेशियाचा व्हिसा आम्ही आमचा स्वत: केला. दोन्ही व्हिसांचा खर्च प्रत्येकी फक्त चार हजार ५८५ रुपये एवढा आला. एकंदर खर्चापैकी मोठ्या खर्चाचा विषय हा असा मार्गी लागला. आता राहणं, खाणं-पिणं व तिथं फिरणं या खर्चाविषयी विचार करायचा होता. दहा दिवसांचा प्लॅन ठरला अन् मग पुन्हा एक-दोन दिवस नीट रिसर्च करून राहण्यासाठी विविध ठिकाणांसाठी Airbnb वर आरक्षण केलं. हे आरक्षण करताना, जिथं आमचा आम्हाला स्वयंपाक करता येण्याची सोय असेल अशीच ठिकाणं निवडून त्यांचं आरक्षण केलं.
एका पर्यटकाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर भारतात राहणं (Aaccommodation) खर्चाच्या दृष्टीनं परवडणारं नसतं. इतर काही देशांत एका रात्रीच्या मुक्कामासाठी सरासरी आठशे ते हजार रुपयांचा खर्च येतो. सिंगापूरला पाच दिवस व चार रात्री राहण्याचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३२२ इतका आला, तर मलेशियात चार दिवस व तीन रात्रींचा खर्च प्रत्येकी तीन हजार ३६६ इतका आला. आम्ही चौघांचा ग्रुप असल्यामुळे हा निवासखर्चही स्वस्तात पडला.
एक रात्र सिंगापूर ते क्वालालंपूर, मलेशिया असा बसप्रवास आम्ही ९५० रुपयांत केला. त्यामुळे एका रात्रीचा राहण्याचा खर्चदेखील वाचला. स्वयंपाकासाठी जेमतेम किरणासामान आम्ही इथूनच नेलं होतं. सागर-सुमितनं स्वयंपाक केला आणि मी-चिन्मयनं भांडी घासली. गंमत म्हणजे, प्रत्येकानं ‘टूर लीडर’ म्हणून एकेक दिवस जबाबदारी घ्यायची असं ठरवलं आणि तसं केलं. विशिष्ट बजेटमध्ये जो तो दिवस पार पाडायचा असा नियम केला होता, त्यामुळे अंतर्गत प्रवास, खाण-पिणं व पर्यटनस्थळांच्या तिकिटांचा दहा दिवसांचा प्रत्येकी खर्च २० हजार ४८६ इतकाच आला. संपूर्ण सिंगापूर व मलेशियातल्या क्वालालंपूर, जॉर्जटाऊन आणि लांकावी आयलंड या ठिकाणी आम्ही फिरलो. काही तडजोडीही कराव्या लागल्या. नाही असं नाही. आम्ही १० दिवसांत जवळपास ८० किलोमीटर पायी चाललो, मेट्रोचाही वापर केला. रात्रभर फिरत राहिलो, स्थानिक खाद्यपदार्थ चाखले, काही ठिकाणी कहर केला अन् काही ठिकाणी स्वयंपाकही केला! असे १० दिवस आम्ही चार वेळा विमानप्रवास, दोन देश पूर्णपणे भ्रमंती करून प्रत्येकी एकूण ४८ हजार ७०९ रुपयांमध्ये वसूल केले.
थोडक्यात काय तर, आम्ही ‘बजेट ट्रिप’करून आमची ‘जिंदगी वसूल’ केली.
तर मग, तुम्हीही करणार ना ‘बजेट ट्रॅव्हल’? कधी करताय सुरुवात...?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.