विमानतळ किती भारी असतात ना… मला तर मी विमानतळावर घालवलेले क्षण खूप मोलाचे वाटतात. त्याठिकाणी अधिक वेळ खर्ची पडला तर आनंद होतो शिवाय भिन्न स्वभावाची माणसं तिथे वाचायला मिळतात. गंमत म्हणजे ते कोणाचेही घर नसते. तुम्ही एकतर आगमन करत असता किंवा तिथून कुठेतरी जात असता पण कधीही तिथे कायमस्वरूपी राहणार नसता. ती अशी काही पुरातत्त्व महत्त्व असलेली जागा नाही परंतु गेल्या शतकात जगभरात बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे विमानतळं विकसित झाली. त्यातून काय साध्य झालं तर पर्यटनाचा अनुभव सुखकर अन् सोपा होत गेला.
पर्यटन जितकं वाढलं तितकं जग एकत्र होत गेलं. ज्या गोष्टी काही दशकांपूर्वी फार अवघड वाटायच्या त्या आता सहजरीत्या करता येतात. एवढंच काय तर जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात २४ तासाच्या आत जाता येतं. ऑस्ट्रेलियापासून ते कॅनडापर्यंत जग फार जवळ आलंय.
प्रवास तर करता येतोच सोबत नोकरी - व्यवसायाच्या संधी आणि नाती - गोती निर्माण झाली. पर्यटनाच्या अंगाने काही गोष्टी विकसित केल्या तर त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतात. असाच विकासाचा विचार ''युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन’ या संघटनेने १९७९ च्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या महासभेत प्रस्तावाचा विचार केला आणि मग धोरणात्मक निर्णय घेऊन १९८० पासून जागतिक पर्यटन दिनाची सुरुवात झाली. गेली ४० वर्षे २७ सप्टेंबर हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवसाची वेळ योग्य अशासाठी आहे कारण ती उत्तर गोलार्धातील उच्च हंगामाच्या शेवटी आणि दक्षिण गोलार्धात हंगामाच्या सुरुवातीस येते.
आपल्यापैकी बरेच जण आपल्या जीवनात कधीतरी ‘पर्यटक’ राहिले असले तरी प्रत्यक्षात पर्यटन म्हणजे काय हे निश्चित करणे कठीण असू शकते. पर्यटन म्हणजे विरंगुळा, व्यवसाय किंवा इतर हेतूंसाठी नेहमीच्या वातावरणाबाहेर राहणे. जगभरात दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी साजरा होणारा जागतिक पर्यटन दिन ही शाश्वत विकासासाठी पर्यटनाच्या प्रत्यक्ष आणि संभाव्य योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्याची एक अनोखी संधी आहे.
जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने आज आपण आपल्या देशाविषयी चर्चा करुयात. भारताबद्दल सांगायचे झाले तर पर्यटनाच्या क्षेत्रात आपला देश एक स्वतंत्र ग्रह आहे असंच म्हणावे लागेल. इतकी विविधता असलेला देश खरंच दुसरा कुठला नाही. आपल्याकडे ही पर्यटनात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत. परंतु अधिक शाश्वत प्रकारे हे बदल व्हावे अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे. सरकार त्याच्या पातळीवर काम करत राहील. मात्र आपण आपले अनुभव व कौशल्यातून जे काही आपल्या आजूबाजूला करता येईल ते केले पाहिजे.
या सदरातून गेले नऊ महिने तुम्हाला जगातील छोट्या मोठ्या ठिकाणांची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. आपल्या देशाबद्दल स्वतंत्रपणे खरं तर खूप लिहिता येऊ शकतं परंतु आज थोडक्यात मांडतो. मी स्वतः आजतागायत भारतातील २१ राज्यात व सहा केंद्रशासित प्रदेशात प्रवास केला, याचे समाधान वाटते. आपला देश अनुभवणं याहून दुसरा आनंद नाही. कारण काय? तर आपल्या देशात बर्फाळ प्रदेशापासून ते वाळवंटी प्रदेशापर्यंत आणि डोंगर-दऱ्यांपासून ते समुद्रकिनाऱ्यांपर्यंत सर्व काही आहे. भारत ही एक ऐतिहासिक भूमी आहे. तसेच भौगोलिकरित्या देखील आपण समृद्ध आहोत. २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश असणारा हा देश. प्रत्येक राज्यात फिरायचे म्हटले तर एक महिना प्रत्येकी दिला पाहिजे.
जम्मू काश्मीर आणि लडाख येथे डोंगर- दऱ्या असल्यामुळे साहसी पर्यटन व शांततेसाठी जाता येतं. तसेच अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप येथे समुद्र पर्यटनासाठी जाता येतं. दादरा नगर हवेली व दमन दीव, पुड्डुचेरी या दोन्ही ठिकाणी समुद्र किनारपट्टी आहे. पुडुचेरीचे आर्किटेक्चर पाहण्यासारखे आहे. तेथील औरोविल हे जगप्रसिद्ध ठिकाण आहे. चंडीगढला ‘City Beautiful’ असे संबोधतात आणि पंजाब व हरयाणाची ती राजधानी आहे. चंडीगढ हे भारतातील सर्वात नियोजित शहर आहे. तसेच दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे. हजारो वर्षांपासून दिल्ली एक सत्ताकेंद्र राहिले आहे. प्रत्येक भारतीयाने दिल्ली बघितलीच पाहिजे. तिथे ‘HOHO’ बस सेवा प्रसिद्ध आहे. दिवसभरात शहरातील १६ प्रेक्षणीय ठिकाणी ती बस घेऊन जाते.
देशात सध्या ४० जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी ३२ सांस्कृतिक आहेत, ७ नैसर्गिक आहेत आणि १ मिश्रित आहे (सांस्कृतिक आणि नैसर्गिक दोन्ही निकषांची पूर्तता करते). भारत हा जगातील सर्वाधिक वारसा स्थळे असणाऱ्या देशांमध्ये सहाव्या क्रमांकावर येतो. महाराष्ट्रात अजंता व वेरुळ लेण्या, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबईचे व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल ही ठिकाणं आहेत. उत्तर प्रदेशात आग्रा किल्ला, ताज महाल व फतेपूर सिक्री ही स्थळे आहेत. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान व मानस वन्यजीव अभयारण्य हे आसाममध्ये आहे.
छोट्या राज्याचा विचार केल्यास सिक्कीमचे खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान व गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स. चंदिगढ येथील ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चरल वर्क, पश्चिम बंगालचे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड येथील नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने, तेलंगनाचे काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर, ओरिसातील कोनार्कचे सूर्य मंदिर, हिमाचल प्रदेशचे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान अशी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तमिळनाडू येथील महाबलीपुरम व ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे, तसेच बिहार मधील बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसर व नालंदा महाविहारचे पुरातत्व स्थळ ही धार्मिकस्थळे बघण्यासारखी आहेत. गुजरात येथे धोलाविरा: हडप्पा शहर, ऐतिहासिक शहर – अहमदाबाद, राणी की वाव (क्वीन्स स्टेपवेल) आणि चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान आहेत. जयपूर शहर, राजस्थानचे हिल फोर्टस्, जंतर मंतर आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान ही सर्व स्थळे राजस्थानमध्ये आहेत. तसेच दिल्ली येथील कुतुबमिनार आणि लाल किल्ला ही जगप्रसिद्ध ठिकाणं आहे. या सर्व स्थळांव्यतिरिक्त जवळपास ३८ अधिक ठिकाणं ही जागतिक वारसाच्या तात्पुरती यादीत समाविष्ट झाली आहेत.
मित्रांनो, उद्याच्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त आपण आपल्या भारतातील ४० वारसा स्थळांना भेटी देण्याचा मानस करुयात. भारतात बऱ्यापैकी सुलभ वाहतूक यंत्रणा आहे. आपण आपल्याच देशात जास्ती फिरलो तर आर्थिकदृष्ट्या ग्रामीण भागात फायदा होईल. आपल्याही ज्ञानात भर पडेल आणि आपण भारताच्या पर्यटन विकासात हातभार लावतोय ही भावना आनंद देऊन जाईल. कधी एके काळी भारतात नीट विमान सेवा नव्हती परंतु आज जगाच्या स्पर्धेत दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद ही चार विमानतळं जगाच्या पाठीवरील शंभर उत्तम विमानतळांच्या यादीत आहेत याचा अभिमान वाटतो. जगाच्या तुलनेत भारतीय पर्यटनाच्या दृष्टीने बदल घडवण्यासारखे खूप आहे पण त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. तर आणि तरच ‘अविश्वसनीय भारत’ म्हणून इथून पुढच्या हजारो वर्षात शाश्वत पर्यटन क्षेत्रात टिकू. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आणि येणाऱ्या काळातील प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.