तुवालू... जगा‘वेगळा’ देश!

तुवालूचा सुरम्य समुद्रकिनारा.
तुवालूचा सुरम्य समुद्रकिनारा.
Updated on

‘एक दिवस आम्ही अदृश्य होऊन जाऊ...’ तुवालू (Tuvalu) देशाचे नागरिक गेली काही वर्षं असं म्हणतायत. तिथला समुद्र सर्व वाळू खाऊन टाकत आहे. पूर्वी तिथं वाळू लांब लांब पसरली जायची आणि लोकांना तिथं प्रवाळ स्पष्टपणे दिसायचं. आता तिथं सतत ढगाळ वातावरण असतं आणि प्रवाळही नष्टप्राय झालं आहे. तुवालू बुडत आहे...

एखादा देश बुडत आहे...हे वाचून भीतिदायक वाटतं ना? पण खरंच तुवालू बुडत आहे!  तुवालू या देशाला आजवर खूप कमी जणांनी भेट दिली आहे. खूप कमी पर्यटकांचे पाय तुवालूला लागले आहेत. ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड टूरिझम’ या संस्थेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरातून केवळ दोन हजार लोक तुवालूला भेट देतात. ‘फेसबुक’वरच्या माहितीनुसार, केवळ १० हजार लोकांनी तिथं ‘चेक इन्’ केलंय. ‘The least visited place or country on Earth,’ असंही तुवालूचं वर्णन केलं जातं.

प्रत्येक देशाचे व देशातल्या लोकांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न वेगळे असतात. जगभरातल्या विविध लोकांचे वैयक्तिक प्रश्न तर आणखीच भिन्न भिन्न आहेत. या सर्व प्रश्नांची एकमेकांशी तुलना आपण करू शकत नाही. कारण, भौगोलिक, ऐतिहासिक, पारंपरिक, सामाजिक रचना वेगवेगळ्या आहेत; परंतु ‘आपलेच प्रश्न मोठे’ असं काही आपण समजता कामा नये. आयुष्य जगताना आपण सहज म्हणून इतरांच्या प्रश्नांकडेही पाहायला शिकलं पाहिजे. त्या प्रश्नांची तीव्रता आपल्याला संपूर्णपणे लक्षात नाही येणार कदाचित; पण त्यांचा निदान अंदाज तरी येऊ शकतो आणि मग आपलाही आपल्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगल्या अर्थानं बदलत जातो. मग उत्तरंदेखील सापडत जातात आणि त्या प्रश्नांकडेही आपण वास्तववादी दृष्टीनं पाहू लागतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुवालू हा दक्षिण पॅसिफिकमधला नऊ लहान बेटांचा समूह आहे. या देशाचे प्रश्नच जगावेगळे आहेत. तिथल्या नागरिकांना देशाचं आणि पर्यायानं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीच मोठा संघर्ष करावा लागत आहे. या देशाचे प्रश्न किती गंभीर आहेत याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. 

सन १९७८ मध्ये तुवालू ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून स्वतंत्र झाला. पूर्वी या देशाची ओळख ‘एलिस आयलंड्‌स’ अशी होती. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येकडे फिजी देश असून फिजीच्या उत्तरेला तुवालू हा देश आहे. फुनाफुटी ही तुवालूची राजधानी आहे. तुवालूंच्या नागरिकांची भाषा आहे तुवालूअन. ‘गूगल मॅप्स’वर पाहिलं तर हा देश दिसत नाहीच; परंतु नावानं शोध घेतल्यास लगेच सापडतो. गूगलवर हा देश खूपच कमी लोकांनी ‘सर्च’ केला असेल.  तुवालू देश अतिशय छोटा असून त्याचं क्षेत्रफळ २६ स्क्वेअर किलोमीटर आहे.  इथं कुठंही उभं राहिलं की दोन्ही बाजूंचा समुद्र दिसतो. गाडीवरून चक्कर मारायची म्हटलं तर हा देश अवघ्या नऊ किलोमीटरचाच आहे. अर्ध्या-पाऊण तासात संपूर्ण देशभर चक्कर मारता येते!

‘येत्या काही वर्षांत तुवालू देश ग्लोबल वॉर्मिंगमुळे नाहीसा होऊ शकतो,’ अशा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानं सन १९८९ मध्येच दिला आहे. ‘वातावरणातले बदल/ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुवालूची पूर्णपणे वाट लागली आहे, म्हणून तुवालू बुडत आहे,’ असं म्हटलं जातं. समुद्रसपाटीपासून साधारणत: सरासरी दोन मीटर इतकं या देशाचं अंतर आहे आणि सध्याच्या वेगानं महासागराच्या वाढीचा अंदाज घेतला तर पुढच्या ३० ते ५० वर्षांत हा देश अदृश्य होऊ शकतो असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. ‘टाईमलेस तुवालू’ अशीही या देशाची एक ओळख आहे.  तुवालूला कुठल्या भारतीय प्रवाशानं आजवर भेट दिली आहे किंवा कसं याचा शोध मी घेत आहे. या देशाबद्दल कुणाला काही माहिती मिळाली तर ती इतर लोकांपर्यंत पोहोचायला हवी. एखादा देश, एखादं ठिकाण प्रत्यक्ष पाहिल्यानंतरचे अनुभव वेगळेच असतात. त्या संबंधित व्यक्तीकडून त्याबाबतचे किस्से ऐकण्याचा आनंद वेगळाच.

या जगात तब्बल १९६ देश आहेत. यांपैकी किती देशांत मी जाऊ शकेन माहीत नाही; परंतु जमलंच तर तुवालूला मी नक्कीच जाईन. तिथं जायला विमानखर्च खूपच येईल हे खरं आहे; पण मी ‘बजेट ट्रॅव्हल’ नक्कीच करू शकतो यात शंका नाही. तुवालू बुडेल की नाही हे येणारा काळच ठरवेल; पण दुर्दैवानं तसं घडलंच तर ते घडण्यापूर्वी तिथं जाऊन यायलाच हवं. ज्यांना शक्य आहे त्यांनी तरी हे करावं. कारण, असे स्वर्गीय सौंदर्याचे देश पाहण्याची संधी पुनःपुन्हा येत नसते. तर मग, बघू या... जाऊ या कधीतरी तुवालूमध्ये...स्वप्न पाहायला काय हरकत आहे? त्यातूनच तर ‘जिंदगी वसूल’ करण्याची ऊर्जा मिळत असते!

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.