जगाबद्दलचं ज्ञान वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रवास करणं, असं सांगितलं जातं. सर्व काळातील काही जिज्ञासू लोक हे न दिसणारं पाहण्यासाठी आणि अज्ञात जाणून घेण्यासाठी जगभर प्रवास करत असत. इब्न बतूता (Ibn Battuta) याला सर्व काळातील महान प्रवासी मानलं जातं. चौदाव्या शतकातील इब्न बतूतानं वयाच्या विसाव्या वर्षी प्रवास सुरू केला व पुढं अफ्रिका, आशिया आणि दक्षिण पूर्व युरोपात बऱ्याच ठिकाणी गेला. १३३४ मध्ये इब्न भारतात आला आणि मुहम्मद बिन तुघलक यांच्या साम्राज्यात न्यायी भूमिका बजावण्यासाठी ८ वर्षं राहिला. जवळपास २९ वर्षांत त्यानं एक लाख २० हजार किलोमीटर्सचा प्रवास केला. इब्न बतूतासारखेच मार्को पोलो, वास्को द गामा, ख्रिस्तोफर कोलंबस, जेम्स कुक, चार्ल्स डार्विन इत्यादी अफलातून प्रवासी होऊन गेले. साधन नसताना ही जिज्ञासू माणसं न दिसणारं पाहण्यासाठी फिरायची, एक्सप्लोर करायची आणि जगासाठी काहीतरी नवीन शोधायची!
आता तर आपल्याकडं साधनं आहेत. फक्त गरज आहे ती जिज्ञासू होण्याची, हो की नाही? तर मित्रांनो, जरा विचारपूर्वक काही पावलं उचलायला सुरुवात करा. वय आणि वेळ या दोन्ही गोष्टींचा जास्त विचार करू नका. ठरवलं तर सगळं शक्य आहे!
आज पुन्हा एकदा आग्नेय आशियातील देशाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. इंडोनेशिया हा देश द्वीपसमूहांनी बनलेला असून, तिथं सतरा हजार बेटं आहेत. इंडोनेशिया पूर्वी डच ईस्ट इंडीज (किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीज) म्हणून ओळखलं जात असे. द्वितीय विश्वयुद्धानंतर, इंडोनेशियानं १९४५ मध्ये नेदरलँड्सपासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. तथापि, त्याचा स्वातंत्र्याचा संघर्ष १९४९ पर्यंत सुरू राहिला, जेव्हा डचने अधिकृतपणे इंडोनेशियन सार्वभौमत्वाला मान्यता दिली. सध्या या देशाची लोकसंख्या सत्तावीस करोड आहे, तर ‘इंडोनेशियन’ ही तेथील प्रमुख भाषा आहे. जकार्ता (Jakarta) ही इंडोनेशियाची राजधानी.
‘अद्भुत इंडोनेशिया’ असं तेथील सरकारचं पर्यटन घोषवाक्य आहे. इंडोनेशियातील उष्णकटिबंधीय जंगलं (Tropical Forest) ही ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची जंगलं आहेत आणि तितक्याच भयानक वेगानं तिथं वृक्षतोड केली जाते, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तसंच, इंडोनेशियामध्ये शंभरहून अधिक सक्रिय ज्वालामुखी (Active Volcanoes) आहेत आणि शेकडो अधिक नामशेष मानले जातात. ते चंद्रकोराच्या आकाराच्या रेषेत देशाच्या बाहेरील बाजूने, सुमात्रा आणि जावा (Java) मार्गे फ्लोरेस (Flores) पर्यंत, नंतर उत्तरेला बांदा समुद्रातून (Banda Sea) उत्तरेकडील सेलेब्सच्या (Celebes) ज्वालामुखींच्या जंक्शनपर्यंत धावतात. जावामधील मेरापी पर्वत (Mount Merapi) व केलुड पर्वत (Mount Kelud) येथे वारंवार ज्वालामुखींचा उद्रेक होतो. अनेकदा रस्ते, शेतं आणि गावांचा मोठ्या प्रमाणावर नाश होतो; परंतु मातीला नेहमीच मोठा फायदा होतो. परंतु काहीवेळा ते विशेषतः विनाशकारी असू शकतं, कारण त्याच्या मोठ्या तलावातील पाणी उद्रेकाच्या वेळी बाहेर फेकलं जातं, ज्यामुळे मोठा गाळ पसरतो, जो मैदानात घाईघाईने खाली येतो आणि त्यांच्या समोरील सर्व काही वाहून घेऊन जातो. मित्रांनो, जावामधील काही सक्रिय ज्वालामुखी पाहता येतात. तिथं मोठ्या प्रमाणात पर्यटन होतं आणि तो अनुभव फारच अफलातून असतो.
मे ते सप्टेंबर हे महिने इंडोनेशियात फिरायला जाण्यासाठी चांगले समजले जातात. तिथं बघण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत; जसं की, बोरोबुदुर (Borobudur) येथील बौद्ध स्तुपाची भौमितिक परिपूर्णता, योगकर्तामधील शॅडो कठपुतळी, बाटिक डाइंग आणि इतर प्राचीन कला आहेत. तसंच, ताना तोराजा (Tana Toraja) येथे मृत्यूचे विधी वेगळ्या पद्धतीनं होतात म्हणून तो कायम एक अभ्यासाचा आणि ते विधी पूर्वीपासून बघण्याचं आकर्षण राहिलं आहे. बाली येथील प्रेक्षणीय तांदळाचं टेरेस आणि बांधलेली मंदिरं. बालीजवळ गावंच्या गावं कलाकारी क्षेत्रात फार अप्रतिम कामं करतात. उबुड नावाचं गाव तर जगाच्या नकाशावर कलाकारीसाठी प्रसिद्ध आहे. तिथं विविध पेंटिग्ज् किंवा पुतळे कमी किमतीत मिळतात.
भव्य गिली बेटांवर उष्णकटिबंधीय वातावरणाचा आनंद घेतला पाहिजे. बाली सर्फिंगचं पवित्र ग्रेल, उलुवातु येथे परिपूर्ण लहर पहा. संपूर्ण बेटांवर विखुरलेल्या डाइव्ह साइट्सवर रंगाच्या कॅलिडोस्कोपमध्ये रमून जा. कोमोडो नॅशनल पार्कमधील जगातील सर्वांत मोठ्या सरड्याला समोरासमोर बघण्याचा अनुभव घ्याल तर नक्कीच तो अविस्मरणीय असेल. पापुआच्या बालीम (Papua Baliem) व्हॅलीमधील दानी (Dani) गावाचा ट्रेक असेल किंवा देशभरात इतर बरेच ट्रेक्स करण्यासारखे आहेत. साहसी, जंगल, समुद्र, ज्वालामुखी, इत्यादी सर्वच पर्यटन अनुभवण्यासाठी इंडोनेशिया अतिशय भारी देश आहे.
बाली, मेडान, लेक टोबा, मानाडो, कोमोडो, योग्याकर्ता, गिली बेटं, जकार्ता इत्यादी ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत. तसंच राजा अम्पट बेटं, फ्लोरेस बेटं, बुकिट लावंग, ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यान व लोंबोक या जागांना जगभरातील पर्यटक आवर्जून भेटी देतात. बालीला ‘Island of the Gods’ असंही म्हटलं जातं. तिथं जाण्यास फ्लाइट तिकीट महाग जातं; पण नीट बुक केलं तर स्वस्तही पडतं. इंडोनेशिया हा फार पसरलेला देश आहे; पण तिथं १००% बजेट ट्रॅव्हल होऊ शकतं. कंबोडिया आणि व्हिएतनाम नंतर आग्नेय आशियातील फिरण्यासाठी हा तसा स्वस्त देश आहे. आपण जर नीट बॅकपॅकिंग ट्रिप केली, तर दिवसाला ३५ ते ५० अमेरिकन डॉलर इतका खर्च येतो. २०२१ पर्यंत, इंडोनेशियामध्ये नऊ जागतिक वारसास्थळं आहेत, त्यांपैकी पाच सांस्कृतिक स्थळं आहेत आणि चार नैसर्गिक आहेत. यामुळं सर्वाधिक साइट्स असलेला दक्षिणपूर्व आशियाचा हा देश ठरतो. इंडोनेशिया हे एक विशाल राष्ट्र आहे, ज्यामध्ये स्थानिक प्रदेशातून निर्माण झालेल्या शेकडो संस्कृतींचा समावेश आहे, ज्यामुळं ते जगातील सर्वांत वैविध्यपूर्ण देशांपैकी एक बनलं आहे.
“Traveling—it leaves you speechless, then turns you into a storyteller,” असं इब्न बतूता म्हणायचा. प्रवास करताना आपण जर जिज्ञासू असाल तर भरपूर नवं पाहता येतं, अनुभवता येतं आणि मग ते जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करायचं. सर्वांना स्टोरिज् सांगायच्या, त्यांच्या ऐकायच्या आणि ही अशी पर्यटनाची देवाण-घेवाण वाढवायची. जग लई भारी आहे… थोर लोकांनी कुठल्या काळात कसा प्रवास केला असेल असा नुसता विचार जरी केला, तरी आपण आवाक् होऊन जाऊ. आपल्याकडं तर सारं आहे… वृत्ती मात्र एक्सप्लोर करण्याची पाहिजे. मग बघा, जिंदगी वसूल होते की नाही…!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.