कुठलाही प्रवास भन्नाटच होतो असं नाही. तो सुखसोयींनी संपन्न असतो असंही नाही. कधी एखाद्या प्रवासात आपले मन दुखावले जाते तर कधी कुठल्या प्रवासात आपण संकटात सापडतो. तरी पण ठीकच आहे ना... निदान आपल्याला अनुभव तर मिळतो. असाच एखादा प्रवास म्हणजेच ‘जर्नी’ आपल्यामध्ये बदल आणतो आणि ते मला जास्त भारी वाटतं. कालपेक्षा आज आपण पुढे आलेलो असतो आणि भविष्यात अजून काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो, सर्वांची दिवाळी आनंदात गेली असेलच... आणि आता आपल्यापैकी बरेच लोक येत्या काळात फिरण्याचे नियोजन करत आहेत यात शंका नाही. मग कुठे कुठे जाण्याचे ठरवले आहे? भारतात की परदेशात? मीही काही दिवसात भारतात कुठेतरी भटकंती करायला निघणार आहे... पण यंदाची माझी भटकंती थोडी अनियोजितच असेल असं वाटतंय. असो... लवकरच भारताबाहेर ही फिरायला जायचा विचार आहे. बघूया...
मित्रांनो, गेल्या काही दिवसात बऱ्याच वाचकांनी मला मेल लिहून काही फिरण्याचे सल्ले विचारले. जमेल तसे मी सर्व वाचकांशी संवाद साधायचा प्रयत्न तर करतोच आहे, शिवाय सल्लेही देतोय. आशिया खंडात फिरायला जास्ती सोपं वाटतंय सध्या... श्रीलंका, दुबई, भूतान, कंबोडिया, उझबेकिस्तान, इत्यादी. त्याचबरोबर ओमान (Oman) या देशाचाही विचार करायला हरकत नाही. ऑक्टोबर ते एप्रिल हे महिने ओमान फिरायला चांगले समजले जातात. संयुक्त अरब अमिराती, येमेन आणि सौदी अरेबिया हे तीन देश ओमानभोवती आहेत. तर पूर्वेकडे समुद्रकिनारपट्टी आहे. ओमानची राजधानी मस्कत (Muscat) असून देशाची लोकसंख्या जवळपास पन्नास लाखाच्या घरात आहे. अराबिक ही तेथील प्रमुख भाषा.
ओमानने अलीकडेच भारत, पाकिस्तान आणि बांगला देशासह १८ देशांतील पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी तिथे येण्याची परवानगी दिली आहे. प्रवाशांसाठी, ओमानचे अधिक संपत्तीचे लोक सोडले तर सामान्य अरबी नागरिकांशी संलग्न होण्याची एक दुर्मिळ संधी आहे. ‘Beauty has an address; Oman,’ असं तेथील सरकार गौरवाने म्हणतं.
ओमान हे अरबी द्वीपकल्पातील सर्वात वेगळं ठिकाण ठरु शकतं. येथे काही विलक्षण किल्ले आणि इतर पारंपारिक स्थापत्यकलेसह बेडूइन (Bedouin) परंपरेचा जोड देणारा महान इतिहास आहे. या देशात मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे असून जागतिक स्तरावर २२ व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या महत्त्वपूर्ण भागामध्ये पर्यटन आणि मासे, खजूर आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे. ओमानची उच्च-उत्पन्न अर्थव्यवस्था म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे आणि जागतिक शांतता निर्देशांकानुसार जगातील ६९ वा सर्वात शांत देश आहे.
विस्तीर्ण वाळवंटाने मध्य ओमानचा बहुतेक भाग व्यापला आहे, ज्यामध्ये उत्तरेकडील पर्वतरांगा अल हजर पर्वत (Al Hajar) आणि आग्नेय किनारपट्टी कारा (Qara) किंवा धोफर (Dhofar) पर्वत, जिथे देशाची मुख्य शहरे आहेत: राजधानी मस्कत, सोहर (Sohar) व उत्तरेस सूर (Sur), आणि दक्षिणेस सलालाह (Salalah) आणि मुसंदम (Musandam). विपुल नैसर्गिक सौंदर्यासह, नेत्रदीपक पर्वत, वाऱ्याने वाहणारे वाळवंट आणि एक प्राचीन किनारपट्टी, ओमान हा अरबस्तानचा आधुनिक चेहरा शोधणाऱ्यांसाठी स्पष्ट पर्याय असून त्याचा प्राचीन आत्मा आपण अनुभवू शकतो. मस्कतमधील मुतराह सौक (Mutrah Souq) येथील बाजारातील चकचकीत सोने आणि उदबत्तीचे हजारो प्रकार प्रसिद्ध आहेत. ओमानचे वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्य हे मुख्य आकर्षण तर आहेच परंतु येथे तुम्हाला अत्यंत सुंदर समुद्रकिनारे, पर्वत रांगांची दातेरी तटबंदी आणि Empty Quarter या वाळवंटातील उत्तम नक्षीदार वाळू पाहायला मिळेल.
ओमानमध्ये अनेक उत्सव होतात. विशेषतः मस्कत व सलालाह या उत्सवांची लोक आतुरतेने वाट पाहतात. तसेच घोडा व उंट स्पर्धा, दुबई-मस्कत सेलिंग स्पर्धा, सिंबाद फिशिंग स्पर्धा, ओमान सायकलस्वार व धावपटू स्पर्धा, फोर व्हीलर्ससाठी ओमान आंतरराष्ट्रीय रॅली स्पर्धा आणि सायकलस्वारांसाठी टूर ऑफ ओमान अशा साहसी स्पर्धा वर्षभर चालू असतात. निसर्गाच्या जवळ जाणारे काही गोष्टी पर्यटकांना करता येतात. त्यामध्ये स्विमींग, डायव्हिंग, बोटिंग, सर्फिंग, काईट सर्फिंग, वाळवंटातील सफारी, इत्यादी गोष्टींचा पर्याय आहे. बैत अल झुबेर, मस्कत गेट संग्रहालय, ओमानी हेरिटेज संग्रहालय, ओमानचे राष्ट्रीय संग्रहालय, ओमान मुलांचे संग्रहालय, ओमान नैसर्गिक इतिहास संग्रहालय, ओमान तेल आणि वायू प्रदर्शन केंद्र, ओमानी मत्स्यालय व सागरी विज्ञान आणि मत्स्यपालन केंद्र, ओमानी फ्रेंच संग्रहालय आणि सुलतानचे सशस्त्र सेना संग्रहालय हे सर्व पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.
बहला किल्ला, बॅट (Bat), अल-खुत्म (Al-Khutm) आणि अल-आयनची (Al-Ayn) पुरातत्व स्थळे, लोबानची भूमी व फलज सिंचन व्यवस्था ही चार ठिकाणं जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहेत. जवळजवळ प्रत्येक ओमानी शहरात एक किल्ला आहे, ज्यापैकी बहुतेक सन १६२४ ते १७४४ च्या दरम्यान अल-यारुबी (Al-Yarubi) राजवंशाच्या काळात बांधले किंवा विस्तारित केले गेले. या किल्ल्यांचा उद्देश लोकांसाठी आश्रय आणि शहरासाठी संरक्षणाची शेवटची तटबंदी असायची. पाण्याच्या विहिरी, अन्न साठवण्याची क्षमता आणि किल्ल्याच्या भिंतीपासून अनेक किलोमीटर दूर जाणारे गुप्त बोगदे यासह लांब वेढा सहन करण्यासाठी हे किल्ले तयार करण्यात आले होते. अल जलाली, अल मिरानी, बहला, अल फिकायन, मुत्रह, नखल, निजवा, सोहर हे काही प्रसिद्ध किल्ले ओमानमध्ये पाहण्याजोगे आहेत. शांततेच्या काळात हेच किल्ले शासकीय, शैक्षणिक आस्थापन किंवा समुदाय सुविधा केंद्रे म्हणून काम करत असत.
मस्कत हे सुंदर खाडी, मोठ्या बाजारपेठा आणि पोर्तुगीज किल्ले असलेले अप्रतिम बंदराचे शहर आहे. मस्कतच्या ग्रँड मस्जिदमध्ये हाताने बनवलेला सर्वोत्तम व सुंदर गालिचा असून संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबीच्या ग्रँड मशिदीने हा विक्रम नोंदवण्यापर्यंत तो एकेकाळी जगातील सर्वात मोठा गालिचा होता. ओमानमध्ये उंटाचे दूध पिले जाते तर सुकलेला शार्क मासा म्हणजेच Ma Owaal आणि Shuwa मटण खाल्ले जाते. तर मित्रांनो, जर ओमानला जायचा विचार असेल तर ‘दुबई एक्स्पो’ पण पाहून या. नवीन संधी आणि आयडिया नक्कीच मिळतील.
प्रवासाविषयीची एक मोठी गोष्ट म्हणजे जगात किती चांगले, दयाळू लोक आहेत हे तुम्हाला जाणवतं. त्याचबरोबर कुठलाही प्रवास आपली कल्पनाशक्ती व उत्सुकता वाढवतो आणि आपल्या सर्वांमध्ये किती साम्य आहे याची आठवण करून देतो. प्रवास सक्रियपणे आपल्याला अपरिचित ठिकाणी घेऊन जातो आणि आपल्याला शिकण्यास व संवाद साधण्यास भाग पाडतो जेणेकरून आपण वाढू/विकसित म्हणजेच Grow होऊ शकतो. आपल्याला अधिक मोकळ्या मनाचे माणसं भेटतात व त्यांच्याशी मैत्री होते. आणि... आपल्या सर्वांना निश्चितपणे माहितीये की आपल्याला जगात अधिक मोकळ्या मनाच्या माणसांची गरज आहे. चला तर मग आपणही या साऱ्याचा एक भाग होऊया आणि प्रवास करुया !
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’असून ‘डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.