मित्रांनो, आज २०२१ चा शेवटचा रविवार... वर्षभर ‘जिंदगी वसूल’ हे सदर लिहिताना मनस्वी आनंद आणि समाधान मिळालं. तुम्हा सर्वांसारखे प्रवास-प्रेमी वाचक मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल.
मित्रांनो, आज २०२१ चा शेवटचा रविवार... वर्षभर ‘जिंदगी वसूल’ हे सदर लिहिताना मनस्वी आनंद आणि समाधान मिळालं. तुम्हा सर्वांसारखे प्रवास-प्रेमी वाचक मिळणं हे भाग्यच म्हणावं लागेल. अनेकांचे ईमेल्स यायचे व त्यांना जमेल तसं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीत असे. कित्येकांशी मैत्रीदेखील झाली. तुमच्यात ‘बजेट ट्रॅव्हल’विषयी एक उत्सुकता निर्माण झाली असेल आणि काही लोक नक्कीच ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धत अवलंबून प्रवास करतील अशी अशा करतो. प्रवासासाठी तुमच्याकडं जास्त पैसे असायलाच पाहिजेत असं गरजेचं नाही. तुम्ही फक्त तुमचे प्राधान्यक्रम ठरवून घेतले पाहिजेत, स्वतःला त्याबद्दल जाणीव करून दिली पाहिजे, काही तडजोडी केल्या पाहिजेत आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन प्रवास करणं आवश्यक आहे. हे सारं केल्यास नक्कीच भारी फिरता येईल यात शंका नाही!
बजेट ट्रॅव्हल म्हणजे नेमकं काय? कसं करायचं? याविषयी मी वेळोवेळी काही मुद्दे मांडत आलोय; पण बजेट ट्रॅव्हलचे फायदे काय, असा जर विचार केलात, तर त्यामुळं :-
नवीन, वैविध्यपूर्ण मित्र बनवण्यासाठी बजेट-अनुकूल वसतिगृहं ही उत्तम ठिकाणं आहेत. भरपूर लोकांशी मैत्री होते.
प्रवास करताना जास्तीत जास्त पायी जर फिरलो तर उत्तमच. सर्वत्र चालणं हा व्यायामाचा एक सोयीस्कर प्रकार आहे (आणि तोही विनामूल्य आहे).
स्ट्रीट फूड अधिक चवदार तर असतंच; पण ते स्वस्तही असतं.
खिशात कमी पैसे असण्यानं सर्जनशीलता येईल, क्रिएटिव्ह होऊ, नवीन कल्पना डोक्यात येतील अशा इत्यादी गोष्टी घडतील.
बजेटमध्ये प्रवास केल्यानं आपला पैसा कुठं जातो आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचं आकलन होतं.
आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे पूर्णपणे पुन्हा नव्यानं समजतं.
बजेट ट्रॅव्हलमुळं आपण कायम ‘Down to Earth’ राहतो आणि चौकटीबाहेर स्वप्नं पाहायला लागतो.
बजेट ट्रॅव्हलमुळं आपण आव्हानांना सामोरं जाऊ लागतो, कृतज्ञतापूर्वक वागू लागतो, आत्म-नियंत्रण शिकू लागतो आणि निरोगी जीवनाकडं वाटचाल करू लागतो. एक जगावेगळा दृष्टिकोन हे बजेट ट्रॅव्हल नावाचं विद्यापीठ शिकवतं.
आजच्या सदरात जगातील सर्वांत कमी ज्ञात असलेल्या देशांबद्दल जाणून घेऊ या :
• कोमोरोस (Comoros) :
आफ्रिकेतील मादागास्कर आणि मोझांबिक या दोन देशांमधील महासागरात असलेल्या कोमोरोसमध्ये स्वच्छ पाणी आणि गुलाबी किनारे आहेत, जे पर्यटकांना आकर्षित करतात. तेथील हवेत काहीतरी वेगळं आहे, सहसा ‘परफ्यूम आयल्स’ असं याला म्हटलं जातं. कोमोरोसची बेटं फ्रेंच वसाहती काळापासून सुगंध तयार करण्यासाठी सुगंधी वनस्पतींची लागवड करत आहेत.
• ब्रुनेई (Brunei)
एका बाजूनं मलेशियाच्या बोर्नियोच्या जंगलांनी वेढला गेलेला ब्रुनेई हा आशिया खंडातील देश. सुलतान हसनल बोलकिया या एका व्यक्तिमत्त्वाभोवती बांधलं गेलेलं हे राष्ट्र आहे. त्या राजाकडं पाच हजारहून अधिक गाड्या आहेत. गेली सहा शतकं याच सुलतानाच्या कुटुंबाचं राज्य आहे. गिर्यारोहक आणि साहसी लोकांसाठी ब्रुनेईमध्ये नऊ पर्वत शिखरं, अनेक जंगलं राखीव आहेत.
• डोमिनिका (Dominica)
कॅरिबियन देशांपैकी एक डोमिनिकामधील दमट जंगलाखाली नऊ सक्रिय ज्वालामुखी आहेत. डोमिनिका हे एक वेगळं जग आहे : जंगल, गरीब लोक आणि आश्चर्यकारकपणे सुंदर ठिकाणं. पूर्वीच्या ब्रिटिश कॉलनीत अजूनही स्थानिक लोक चर्चला जाण्यासाठी दर रविवारी सर्वोत्तम पोशाख घालून आलेले दिसतात, तर तिथल्या बंदरांमध्ये क्रूजहून अधिक मासेमारी नौका आहेत. डोमिनिकामध्ये भरपूर धबधबे, नद्या आणि तलाव आहेत.
• माल्टा (Malta)
युरोपातील माल्टा हा देश बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे, तरीही बहुसंख्य लोकांना याबद्दल अधिक माहिती नाही. माल्टाची संमिश्र संस्कृती आहे : थोडेसे ब्रिटीश, थोडेसे इटालियन व थोडेसे मध्य पूर्व आणि येथे समुद्री डाकू, शूरवीर व सुलतान यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. माल्टा समुद्रकिनारे, नाइटलाइफ, कडक उन्हाळा आणि स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे.
• तिमोर लेस्टे (Timor Leste)
एकविसाव्या शतकात तिमोर लेस्टे हा देश उदयास आला. आशियातील सर्वांत नवीन देश म्हणून उदयास आल्याने तिमोर लेस्टेमध्ये काही दशकं अराजक होतं. आश्चर्यकारक नैसर्गिक चमत्कार, धुक्यानं झाकलेल्या पर्वत शिखरांपासून ते खडबडीत, निर्जन समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, पर्यटन पायाभूत सुविधांच्या अभावाला आव्हान देण्यास तयार असलेल्या प्रवाशांची तिमोर लेस्टे वाट पहात आहे. मूळ डायव्ह साइट्स अजूनही शोधल्या जात आहेत.
• मोल्डोव्हा (Moldova)
पूर्व युरोपमध्ये तुम्हाला मोल्डोव्हा हा आकर्षक देश सापडेल. तुम्ही या देशाबद्दल ऐकलं नाही असं एक कारण आहे : हा प्रवाशांनी युरोपमध्ये सर्वात कमी भेट दिलेला देश आहे. मोल्डोव्हामध्ये राजधानी शहर चिसिनौ, ओरहेयुल वेची, सोरोका किल्ला आणि टिपोवा मठ यांसह काही आकर्षक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. तुम्हाला वाइन आवडत असल्यास Miletii Mici येथे नक्की भेट द्या, कारण ती जागा जगातील सर्वांत मोठा अंडरग्राउंड वाइन तळघर आहे.
• गयाना (Guyana)
कोलंबिया, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांची नावं ऐकली की आपल्यासमोर येतं ते ‘दक्षिण अमेरिका’. तिथंच, उत्तरेला व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या सीमेवर असलेल्या गयाना देशाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. देशाचा तीनचतुर्थांश भाग निर्जन आहे. इथं वन्यजीवन व साहसी प्रकार अनुभवण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत.
• सॅन मारिनो (San Marino)
जगातील सर्वात जुनं प्रजासत्ताक आणि युरोपमधील तिसरा छोटा देश. सॅन मारिनो हा देश इतिहासाचं एक जिवंत चित्र आहे, जे आज पर्यटकांना एक सुखद अनुभव देतं. ''सॅन मारिनो : ऐतिहासिक केंद्र आणि माउंट टिटानो'' ही साइट २००८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीचा भाग बनली आहे. निवांत चालत फिरा. अरुंद गल्ल्या आश्चर्यानं भरलेल्या आहेत. पदपथ डोंगराच्या कडेला मनोरंजक मार्गानं वळवतात आणि नवं पाहण्यास आमंत्रित करतात.
तर मित्रांनो, या साऱ्या देशांची नावं तुम्ही ऐकलीच असतील असं नाही, किंबहुना त्याबद्दल माहिती असेलही; परंतु हे देश जास्त ज्ञात नाहीत. येणाऱ्या वर्षात कुठल्याही खंडात फिरायला गेलात तर नवं शोधण्याचा प्रयत्न नक्की करा. गेलं वर्षभर तुम्ही माझ्या या सदराला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि शेवटी एकच सांगतो की, जमेल तेव्हा आणि जमेल तसं ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीनं बजेट ट्रॅव्हल करा. २०२० व २०२१ ही दोन्ही वर्षं तशी सर्वांसाठीच कठीण गेली आहेत. तरीही, जर तुम्ही मागच्या वर्षाच्या आणि त्याहून मागील वर्षाच्या तुलनेत आता थोडे बरे असाल, तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला संयमाची गरज आहे. संयम बाळगा आणि बघा, येणारा काळ हा तुमचा असेल, तुम्हाला प्रवासाचे योग येतील आणि त्यातून निश्चितच ‘जिंदगी वसूल’ होईल!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.