प्रत्येकाकडेच स्वत:ची बलस्थाने असतात, त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. त्याच बलस्थानाच्या आधारे आपण उद्योग किंवा नोकरी करत असतो.
प्रत्येकाकडेच स्वत:ची बलस्थाने असतात, त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. त्याच बलस्थानाच्या आधारे आपण उद्योग किंवा नोकरी करत असतो. तो उद्योग किंवा नोकरी का करतो, फक्त पैसे कमविण्यासाठी? उदरनिर्वाहासाठी? छंद किंवा आवड म्हणून की अजून कशासाठी? या प्रश्नांची ठाम उत्तरे प्रत्येकाकडे असायला हवीत. अन्यथा कमावलेली प्रतिष्ठाही टिकवून ठेवणे जड जाते.
मुंबई ही जगासाठी स्वप्ननगरी, मायानगरी, बॅालीवूड, उद्योगनगरी, भारताची आर्थिक राजधानी; पण आमच्यासारख्या कोणताही आधार नसणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या मराठी मुलांसाठी मात्र ‘हक्काची आमची मुंबई.’ याच आपल्या हक्काच्या शहरात मी २००१ च्या फेब्रुवारी महिन्यात करियर करण्यासाठी आलो. अगदी पहिल्याच इंटरव्यूहमध्ये माझे सिलेक्शनही झाले. साधारण आठवड्याच्या आतच मला इथे नोकरी मिळाली.
पहिले काही दिवस इथला प्रवास, दमट वातावरण आणि जेवणाची आबाळ यात ॲडजस्ट होण्यात गेले. त्यात जिथे जाईल तिथे गावरान बोलीभाषेमुळे येणारे अपमान अजून खजिल करायचे. बरं माझे काम खाजगी कंपनीत आणि आजूबाजूला बरेच अमराठी लोकं, त्यामुळे ‘मोडेन पण वाकणार नाही’ किंवा ‘मी बदलणार नाही’ ही असली भंपक वाक्य बोललो तर नोकरी सोडावी लागणार, हे फिक्स होते. त्यामुळे मला स्वतःमध्ये बदल करणे क्रमप्राप्तच होते. त्यात तसे माझे काहीच नुकसान नव्हते. नवे शिकायला मिळत होते. वेगवेगळी इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स पाहायला मिळायची. फिरायला मिळायचे. नवे प्रयोग करता यायचे. त्याचा पगारही मिळायचा. त्यामुळे मीही स्वतःमध्ये बदल करायचा पुरेपूर प्रयत्न करायचो. तांत्रिक बाबतीत मला फार प्रॉब्लेम यायचे नाहीत; पण सॉफ्ट स्किल्सच्या बाबतीत मात्र मी फार मागे होतो.
मला नेहमी वाटायचे की, आपणही शहरात वाढलो असतो तर किती बरे झाले असते. हा स्ट्रगल, हा अपमान आणि जगण्याची केविलवाणी धडपड तरी कमी झाली असती. त्यात मला जे काही मुंबईकर मित्र भेटलेले ते सर्वच भारी होते. ॲकेडमिक्स असो की वागण्याबोलण्यातला स्मार्टनेस, एकमेकांना मदत करणे असो की कसलीही अडचण, मला कायम त्यांनी हात दिला होता. अगदी आजही तो तसाच मिळतो.
अशातच माझी ओळख निलेशसोबत झाली. आमच्या कंपनीसाठी ते सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचे. त्यांचा जन्म मुंबईचा आणि वडील व्यवसायात असल्याने त्यांनी तोच पुढे चालवला होता. (खरे तर त्यांचे वडील खूप कष्टाळू आणि हुशार होते, असे लोकं सांगायचे.) निलेश माझ्यापेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठे. सहा फुटांपेक्षा जास्त उंची. रुबाबदार आणि मराठी, हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व. पण माझ्याशी बोलताना बऱ्याचदा त्यांचा सूर हेटाळणीचा असायचा. मी हे मॅनेजमेंटला सांगितले; पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय लगेच नसल्याने मला कंपनीने त्यांच्यासोबतच ॲडजेस्ट करून घ्यायला लावलेले.
सुरुवातीला आमचे दोघांचे चांगलेच खटके उडायचे. त्यांना माझी भाषा दम दिल्यासारखी वाटायची; पण नंतर त्यांना माझा खरा प्रॅाब्लेम लक्षात आला. माझी भाषाच गावरान होती आणि नेहमी नेहमी भांडण करून तेही थकले होते. शेवटी दोघांनीही एकमेकांना समजून घेतले आणि ठिकठाक संवाद सुरू झाला. नंतर मी भेटेल तेव्हा ते मला माझ्या भाषेविषयीच्या टिप्स द्यायचे. मला त्यामुळे बराच फायदा व्हायचा. अधूनमधून त्यांच्या कारमधून लिफ्ट मिळायची. मुंबईबद्दल आणि इतर अनेक विषयांबद्दल ते बोलायचे. माझ्या माहितीत भर पडायची. निलेश मनाने वाईट वा कपटी नव्हते. पुढे पुढे त्यांनी मला बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या होत्या. त्याचा मला फायदा झाला. मीही त्यांना काहीही टेक्नीकल सपोर्ट लागला तर ताबडतोब सगळी कामे बाजूला ठेवून मदत करायला तत्पर असायचो.
साधारण वर्षभरात आम्ही बऱ्यापैकी मित्र झालो. अगदी अरेतुरेपर्यंतचे. पुढे माझे त्यांच्या ॲाफिसला येणेजाणे वाढले. मीही त्यांना कंपनीकडून चांगली कामे द्यायचो; पण त्यांच्या कंपनीकडून नेहमी काही ना काही इश्यूज व्हायचे. मी स्वतःच जाऊन ते समजून घ्यायचो. त्यावर सोल्यूशन द्यायचो आणि ते काम मार्गी लावायचो, हा जणू नित्यक्रमच झाला होता.
निलेशचे वडील वृद्धापकाळाने अन् आजारपणामुळे रिटायर्ड झालेले. त्यामुळे निलेशला अचानक या व्यवसायात उतरायला लागले होते. खरेतर हळूहळू माझ्या लक्षात येत गेले की, वडिलांनंतर निलेशला हा व्यवसाय करणे जड जात होते. वडील होते तोपर्यंत ते गाडा ओढत होते; परंतु निलेशच्या एकट्याच्या खांद्यावर ही कंपनी आली आणि दोन-तीन वर्षांतच आर्थिक आणि इतर अनेक बाबतीत त्यांना संकटे झेलावी लागली.
निलेश दिवसा जरी नीटनेटका आणि टापटीप राहत होता, मात्र रात्र झाली की त्याचे मित्र जमा व्हायचे. पुढे त्यांची व्यसनं, पार्ट्या आणि इतर अनेक उद्योगांत बिझी होऊन जायचे. त्यात तो मधूनच अचानक गायब होऊन जायचा. तीन-तीन, चार-चार दिवस कोणालाच माहिती नसायचे तो नक्की कुठे आहे. त्यात त्याची दिवसाची सुरुवातही फार उशिरा व्हायची. त्यांच्या कंपनीची एक चांगली बाब म्हणजे आमच्या कंपनीला जो सेटअप हवा होता, तो त्यांच्याकडे होता. रेट मार्केटपेक्षा चांगले होते, ही सर्वात मोठी जमेची बाजू. खरे तर मलाही काही दिवसांतच लक्षात आले की यांचे रेट आमच्या कंपनीसाठी खरंच खूप कमी होते आणि जुने संबंध असल्याने कंपनीही त्यांना काढत नव्हती; पण निलेशच्या स्वभावामुळे आणि दुर्लक्षामुळे मालाचा दर्जा, कामाची वेळ आणि सर्वात महत्त्वाचे कमिंटमेंटवर कमिंटमेंट देत कधीही कोणतेही वचन न पाळणारी कंपनी म्हणून तो फेमस झाला होता. निलेशने दोन-तीन वर्षांत जे जुने जाणते कामगार होते त्यांना लहानसहान कारणांवरून शिवीगाळ आणि काहींना तर अपमानित करून काढून टाकलेले.
कोणत्याही क्षेत्रात पैसा, साधनसंपत्तीत यशस्वी झालेली पहिली पिढी ही माणुसकी, एकमेकांसोबतचे संबंध, सर्वांशी वागण्याबोलण्यात नम्र आणि खरेच कर्तृत्ववान असते; परंतु बहुतांश वेळा दुसरी पिढी ही गर्विष्ठ, फटकळ आणि मग्रुर असते. डोक्यात बुद्घीऐवजी हवा भरलेली. (काही अपवाद असू शकतात, त्यांनी मला माफ करा.) निलेशचेही अगदी असेच काहीसे झालेले. त्यामुळे तसे त्याच्या कंपनीत सर्वकाही आलबेल नव्हते, हे मला लवकरच कळाले. आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत तर बोंबाबोंब होती. पुढे हीच गोष्ट आमच्या कंपनी व्यवस्थापनाच्या लक्षात आली. जे व्हायचे तेच झाले. त्यांना देत असलेली सगळी कामे जास्तीची किंमत देऊन इतर व्हेंडर्सना देण्यात आली.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इतरांपेक्षा आपल्या मालाची किंमत कमी असणे हे तसे काही भूषणावह नाहीच. ती तशी कमी असली तरी त्या किमतीपेक्षा अधिक मौल्यवान बाब म्हणजे वेळेत तो माल मिळणे आणि जसा हवा त्या दर्जाचा मिळणे हे जास्त महत्त्वाचे गणित आहे.
पुढे निलेशने हातापाया पडून कंपनीकडून त्यातील काही कामे पुन्हा मिळवली; पण दोन-तीन महिन्यांत तीच परिस्थिती. याच्या सगळ्या थापा, खोटी प्रॉमिसेस. जिथे आपण व्यवसाय करतो अथवा नोकरी करतो तिथे एकमेकांना गंडवण्याच्या गोष्टी कधीच करू नयेत.
खरे सांगून दोन दिवस उशिरा काम करा; पण नुसतेच खोटे बोलून कोणतीही ठोस कृती न करता या जगात आपल्याला कोणीही प्रतिष्ठा देणार नसते. मी हे करीन, ते करीन, असे करून दाखवेन, तसे करून दाखवेन या स्वप्नातच आपले आयुष्य मग संपते. पुढे त्याने वडिलांच्या कंपनीचे नाव बदलले. अनेक लोकांना नवनव्या, मोठमोठ्या ॲार्डर्स दाखवून इनव्हेस्टमेंट घेतल्या; पण त्याचा मूळ स्वभाव काही गेला नाही... सतत खोटं बोलत आणि मोठमोठ्या कृतिशून्य गप्पा मारत अगदी होत्याचे नव्हते करून बसला.
पुढे काही वर्षांत निलेशच्या कंपनीचे ॲाफिस बॅंकेने जप्त केले. त्याच्या वेगवेगळ्या व्यसनांनी वडिलांनी कमवलेली जवळपास सर्व प्रॉपर्टी तो विकून मोकळा झाला. मुंबईसारख्या शहरात त्याचे वडीलही खेडेगावातून एक स्वप्न घेऊन आलेले. त्यांनी कष्टाने, मेहनतीने, प्रामाणिकपणे ते पूर्ण केले; पण सगळ्या सोयीसुविधा असताना, एक चांगला रेडीमेड बेस असताना त्याची योग्य किंमत निलेशला का करता आली नसेल? निलेशपुढे असे कोणतेच स्वप्न नसेल का? आपल्या प्रत्येकाकडेच अनेक चांगल्या गोष्टी असतात, आपण त्याची योग्य किंमत जाणतो का? आपण उद्योग असो, नोकरी असो, का करतो? फक्त पैसे कमविण्यासाठी? उदरनिर्वाहासाठी? छंद? आवड म्हणून? की अजून कशासाठी? या प्रश्नाचे ठाम उत्तर प्रत्येकाकडे असायला हवे, ते नसेल तर आयुष्याचा प्रवास भरकटायला वेळ लागत नाही.
wankhedeprafulla@gmail.com
(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.