संकट आणि नवीन संधी

व्यावसायाच्या अगदी सुरुवातीला आमचे ठराविक असे एक-दोन खूप मोठे आणि महत्त्वाचे ग्राहक होते. आजही ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बॉस बदलून आले.
Disaster and Opportunity
Disaster and Opportunitysakal
Updated on
Summary

व्यावसायाच्या अगदी सुरुवातीला आमचे ठराविक असे एक-दोन खूप मोठे आणि महत्त्वाचे ग्राहक होते. आजही ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बॉस बदलून आले.

अपमान आणि एखाद्याने केलेले दुर्लक्ष हे तुम्हाला नवी ऊर्जा, नव्या कल्पना देऊन जातात. आपण त्याकडे नवीन संधी म्हणून पाहायला हवे. संकट आले की आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देत बसतो किंवा दुसऱ्यांनाच प्रश्न विचारायला लागतो. त्याऐवजी शांतपणे उत्तर शोधले तर यशाचा तोच हमखास मार्ग ठरू शकतो. संकटं संधी घेऊन येत असतात. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. समोर दिसतो त्या प्रश्नापलिकडे पाहून स्वत:वरचा विश्वास आणि मनाचे संतुलन कायम ठेवले तर संकटातून बाहेर पडण्याची प्रशस्त वाट नक्की गवसते.

व्यावसायाच्या अगदी सुरुवातीला आमचे ठराविक असे एक-दोन खूप मोठे आणि महत्त्वाचे ग्राहक होते. आजही ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. एकदा त्यापैकी एका कंपनीत नवीन बॉस बदलून आले. महिनाभर होऊन गेला तरी ते भेट टाळत होते. मला ते अगदी स्पष्ट जाणवतही होते. तासन् तास त्यांच्या ॲाफिसच्या बाहेर मी वाट पाहात बसायचो. त्यांना ते दिसायचेही; पण ते वेळ द्यायचे नाहीत. आमच्या क्षेत्रात तेव्हा आमची कंपनी नवखी असली तरी जे अद्ययावत तंत्रज्ञान आणि त्यातला अनुभव आमच्याकडे होता तो अगदी भारतातल्या मोठमोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांकडेही नव्हता.

व्यावसायिकदृष्ट्याही आम्ही कुठेही कमी नव्हतो; पण काही केल्या नवे साहेब वेळच द्यायला तयार नव्हते. नजरानजर झाली तरी ते माझ्याकडे इतक्या तुच्छतेने बघायचे की, माझीच मला लाज वाटायची. मी ओशाळून जायचो. तिथले ऑफिसबॉय, रिसेप्शनचे लोकही मला हसायचे. पूर्वी एक तरुण उद्योजक म्हणून जे लोक रिस्पेक्ट करायचे, तेच लोक त्यांचे साहेब बदलले म्हणून लगेच त्यांच्यासारखे झाले होते. हळूहळू मला काय कळायचे ते कळाले होते.

माझ्यासमोर खूपच मोठा पेच होता. कारण नवीन व्यवसाय, छोटे का होईना; पण एक वर्कशॅाप होते, ॲाफिस घेतलेले, कामगार वाढविलेले, नव्या मशिन्स घेतलेल्या आणि आता या रोजच्या अपमानाने एक अस्वस्थता आली होती. तो अपमानही सहन करत होतो, पण हाती काहीच लागत नव्हते. समोर फक्त अंधार दिसत होता. त्या कंपनीतील इतर बऱ्याच जणांना फोन लावले; पण काही उपयोग नाही. आतापर्यंत आपल्यासोबत असे काही होईल, याचा कधी विचारच केला नव्हता. प्रामाणिकपणे फक्त काम, काम आणि काम करणे हाच ध्यास होता. पण आता वेगळा विचार करण्याची वेळ आली होती.

आम्ही आहे ते मनुष्यबळ अन्‌ तंत्रज्ञान वापरून दुसऱ्या दोन क्षेत्रांत (Industry Verticals) वेगाने प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू केले. पाच-सहा दिवस तर सलग मी घरीच गेलो नाही. लोकांचे स्किल बिल्डिंग, ट्रेनिंग झाले. पुढे काही नव्या ॲार्डर्सही घेतल्या. त्या पंधरा-वीस दिवसांत दोन नव्या दिशांचा शोध लागला म्हणा. आता आत्मविश्वास वाढला होता आणि पुढच्या काही ठोस योजनाही तयार झाल्या.

त्यातीलच एका योजनेचा भाग म्हणून मी परत एकदा त्याच साहेबांना फोन केला अन्‌ भेटीची वेळ मागितली. आश्चर्य म्हणजे लगेच अर्ध्या तासाच्या आत भेटायला ये, असे ते म्हणाले. तो तसा ४५ ते ५० मिनिटांचा प्रवास; पण मी स्वत: ड्रायव्हिंग करत अत्यंत वेगाने त्यांच्या ॲाफिसमध्ये पोचलो आणि पाच मिनिटे आधीच त्यांच्या केबिनबाहेर उभा राहिलो. (मनातल्या मनात माझे नक्की काय करायचे ते ठरले होते.)

तब्बल दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी बोटाच्या इशाऱ्याने मला आत बोलावले आणि परत एकदा माझ्याकडे एकदम तुच्छतेने पाहात अगदी अपमानकारक टोनमध्ये, ‘‘आमच्याकडे लोकांना काही अक्कल नाही, त्यामुळे तुम्हाला ॲार्डर मिळत होत्या. आता इथून पुढे तुम्ही L1 (सर्वात स्वस्त) असाल तरच या कंपनीत यायचे, अन्यथा नाही,’’ असे ते एका दमात बोलले.

आता माझा नंबर होता, ‘‘मी आपल्यासोबत काम करू नये अशीच जर तुमची इच्छा असेल तर काही हरकत नाही. तुम्हाला जिथून योग्य वाटेल तिथून आपण काम करून घ्या.’’ मी हाताने माझे व्हिजिटिंग कार्ड सरकवले आणि पुढे म्हटले, ‘‘जर काही अडचण आली तर हे माझे कार्ड, मला केव्हाही परत बोलवा. मी नक्की येईन. कारण या कंपनीने गेले दीड वर्ष मला, माझ्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबालाही सांभाळलेय...’’ माझ्या या अनपेक्षित, थंड, शांत प्रतिक्रियेनंतर ते साहेब अचानक अस्वस्थ झाले.

तसा मी क्षणाचाही विलंब न करता म्हटले, ‘‘सर, आपल्या आता सुरू असलेल्या किंवा यापूर्वी झालेल्या कामांचीही काळजी करू नका. मी ती पूर्ण करूनच देईन आणि पुढेही आपल्याला कायम सर्व्हिस देईन.’

खरेतर ही मीटिंग माझ्यासाठी सर्वात निर्णायक होती. साहेबांना काय बोलावे हे समजत नव्हते. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. मी तेवढ्यात माझी खुर्ची सर्रकन मागे सरकावून उठलो. शेकहॅंडसाठी हात पुढे केला आणि नम्रपणे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहून स्मितहास्य केले, पण आता तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. त्यांना अगदी खरोखर घाम फुटला होता. मी असे काहीतरी म्हणेन याचा त्यांना तीळमात्रही अंदाज नव्हता.

ते खाडकन जागेवरून उभे राहिले आणि एकदम जोरात ओरडले, ‘‘ही कसली पद्धत? असे कसे तुम्ही जाऊ शकता, माघारी फिरू शकता? आता अचानक आम्ही काय करू? वरिष्ठांना काय सांगू? आमच्याकडे तर अजून पर्यायी व्यवस्था पण केलेली नाही, आम्ही खूप मोठ्या संकटात पडू, तुम्ही आम्हाला या वेळी मदत केलीच पाहिजे.’’ त्याचा हा असला अवतार पाहून, मी सन्मानपूर्वक त्यांच्या डोळ्यात पाहून पॉज घेत हलकेच म्हणालो, ‘‘बसा, आता आपण शांतपणे बोलू या’’ आणि आता मला माझी योजना सफल झाल्याची जाणीव स्पष्टपणे साहेबांच्या घाबऱ्याघुबऱ्या चेहऱ्यावर दिसत होती.

खरे पाहता मी हे सर्व जाणीवपूर्वक केले होते, पण त्यासाठी आमच्या सर्व टीमची पूर्वतयारीही जोरदार होती. मानसिक शांतता, कष्ट करायची तयारी, प्रत्यक्ष कृती आणि त्याला सुबुद्धीची जोड असेल तर दहाही दिशा तुम्हाला मोकळ्या असतात. अपमान आणि एखाद्याने केलेले दुर्लक्ष हे तुम्हाला नवी ऊर्जा, नव्या कल्पना देऊन जातात, आपण त्याकडे नवी संधी म्हणून पाहिले तर काहीच अशक्य नाही. मी तर अगदी मनापासून त्यांचा कायम ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळे अत्यंत कमी वयात पायाखालची जमीन सरकणे म्हणजे काय हे कळाले होते आणि त्यामुळेच आमच्याकडे ‘मल्टी प्रॅाडक्ट बास्केट’चा जन्मही झाला.

संकट आली की आपण स्वत:ला किंवा इतरांना दोष देत बसतो किंवा दुसऱ्यांनाच प्रश्न विचारायला लागतो. त्याऐवजी अशा वेळी शांतपणे उत्तर शोधायचे, यशाचा तोच हमखास मार्ग असतो... संकटं संधी घेऊन येत असतात, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. फक्त समोर दिसतोय त्या प्रश्नापलिकडे पाहायला शिकायचे आणि सर्वात महत्त्वाचे स्वत:वरचा विश्वास आणि मनाचे संतुलन कायम ठेवायचे. मग सर्वात समर्पक उत्तर अगदी सहज सापडते.

टीप : त्या साहेबांनाही पुढे जाऊन त्यांच्यामुळे आम्ही कशी इतर प्रॉडक्टचीही डेव्हलपमेंट केली आणि चांगला मार्ग सापडला हे काही दिवसांनी सांगितले आणि आभारही मानले. त्यांनीही अगदी मनापासून पुढे आमच्या इतरही कंपन्यांना मदत तर केलीच, शिवाय आजही ते काही लागले तर अगदी आपुलकीने मार्गदर्शन करतच असतात.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.