दो हंसो का जोडा...

सुशीलकुमार शिंदे जानेवारी १९९५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पुनश्च एकवार अध्यक्ष झाले, तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद विलासराव देशमुख यांना होणं हे अगदीच साहजिक होतं.
Sushilkumar Shinde and Vilasaro Deshmukh
Sushilkumar Shinde and Vilasaro DeshmukhSakal
Updated on

सुशीलकुमार शिंदे जानेवारी १९९५ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पुनश्च एकवार अध्यक्ष झाले, तेव्हा त्याचा सर्वाधिक आनंद विलासराव देशमुख यांना होणं हे अगदीच साहजिक होतं. त्या दोघांचा अद्भुत असा दोस्ताना ही महाराष्ट्र काँग्रेसच्या १९८० आणि १९९० या दोन दशकांतील एक अविस्मरणीय अशीच घटना होती.

सुशीलकुमार यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद १९९५ मध्ये पुन्हा चालून आलं त्याला अनेक ऐतिहासिक संदर्भ होते. चार वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ च्या संक्रातीला याच सुशीलकुमार आणि विलासराव यांच्या दुकलीनं रामराव आदिक व अन्य काहींच्या पाठिंब्यावर थेट मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलं होतं. मात्र, पवारही असे खमके की नंतरच्या आठ-पंधरा दिवसांतच या बंडखोरांना पांढऱ्या शेल्यात हात बांधून तहाच्या वाटाघाटी कराव्या लागल्या होत्या! तेव्हाच सुशीलकुमारांना प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं होतं आणि त्यांची रवानगी दिल्लीला काँग्रेस महासमितीचे सरचिटणीस म्हणून झाली होती.

या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार पुनश्च प्रदेशाध्यक्ष झाल्यावर विलासरावांना ‘आए दिन बहार के...’ असंच वाटू लागलं होतं. सुशीलकुमारांच्या महाराष्ट्रातील पुनरागमनामुळे ‘दो हंसो का’ बिछडलेला जोडा आता परत एकत्र आलाय, असं विलासरावांनी प्रदेश काँग्रेसच्या त्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत बोलून दाखवलं होतं...तर सुशीलकुमारांनीही त्याच दिवशी सकाळी ‘फिर वही दिल लाया हूँ...’ असं विलासरावांना ऐकवलं होतं!

ही अशी फिल्मी डायलॉगबाजी करणं हा या दुकलीच्या डाव्या हातचा खेळ असायचा. शिवाय, १९८०-९० च्या त्या दोन दशकांत या दोघांचं वागणं-बोलणं हेदेखील फिल्मी ढंगाचंच असायचं. दोघंही कोणे एकेकाळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री राहिलेले आणि सिने-नाट्यकलावंतांच्या गोतावळ्यात रमलेले. नाटक-सिनेमा-रेकॉर्डस्-गाणी-गझला हा तर दोघांच्याही जणू अभ्यासाचाच विषय असायचा. जणू त्यांनी राज्याच्या ‘सांस्कृतिकीकरणा’चा झेंडाच त्या काळात खांद्यावर घेतलेला. शिवाय, या दोघांचाही आपापसातील मैत्रीइतकाच पत्रकारांशीही अजब दोस्ताना असायचा.

विलासराव कायम उल्हासदादा पवार, डॉ. सारडा, लालसिंग राठोड यांसारख्या आपल्या मित्रांच्या गोतावळ्यात कायम रंगलेले तर रस्त्यावरच्या सामान्य कार्यकर्त्यालाही झटकन आपलंसं करण्याची सुशीलकुमारांची एक ढंगदार शैली निदान त्या काळात तरी होती. त्यामुळे त्यांच्यावर कुणी नाराज होण्याचा प्रश्नच नसायचा आणि अगदी तशी वेळच आली तर समोरच्यानं नाराजी व्यक्त करण्याच्या आधीच ‘क्यूँ पट्टूसिंग, आप नाराज तो नहीं...?’ असा उलटा सवाल करून सुशीलकुमारच त्याची हवा काढून घ्यायचे!

त्यातच मुंबईहून लातूरला जाताना विलासरावांना व्हाया सुशीलकुमारांच्या सोलापूरला ओलांडूनच जावं लागायचं! त्यामुळे त्या दोघांच्या दोस्तीच्या मैफली मग सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या फर्स्ट क्लासच्या कुपेमध्येही रंग भरायच्या...

पण १९९९ मध्ये पवारसाहेब काँग्रेसमधून बाहेर पडले आणि लगोलग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा तिरंगी सामना रंगला. मग त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणं यात नवल ते काहीच नव्हतं. त्यानंतर सत्तास्थापनेचं राजकारण बराच काळ रंगलं. तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची माळ विलासरावांच्या गळ्यात पडल्यावर त्यांना फोन केला आणि ‘भावी मुख्यमंत्री!’ म्हणून शुभेच्छा दिल्या तेव्हाचे त्यांचे उद्गार आजही आठवतात. ते म्हणाले होते : ‘कुणास ठाऊक, सीएम की विरोधी पक्षनेता?’ याचं कारण, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शिवसेना-भाजप युतीबरोबर हातमिळवणी करणार अशा वावड्या उठवण्यात अनेक मातब्बर पत्रकारच पुढं होते.

मात्र, यथावकाश सारं जुळून आलं आणि अखेर विलासरावच मुख्यमंत्री झाले. सुशीलकुमार काही त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले नव्हते...आता विलासरावच प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहणार असंच वाटत होतं. कारण, राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांसमवेत ते राज्यशकट कौशल्यानं हाकत होते. मात्र, २००४ मधील निवडणुकांना जेमतेम दीड वर्ष राहिलेलं असताना त्यांना मुख्यमंत्रिपद गमावावं लागलं. तेव्हा राज्यावर दुष्काळाचं सावट होतं आणि त्या बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले चिरंजीव रितेश यांच्या एका सिनेमाचा प्रीमिअर मोठ्या धूमधडाक्यात वडाळ्याच्या ‘आयनॉक्स’मध्ये आयोजित केला होता. मग काँग्रेसमधील रोहिदासदाजी पाटलांसारखे त्यांचे विरोधक कामाला लागले. त्याच वेळी या दोन काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आदी पक्षांनीही उचल खाल्ली आणि विलासरावांच्या जागी दरम्यानच्या काळात विजनवासात जाऊन पडलेले सुशीलकुमार यांचीच मुख्यमंत्री म्हणून स्थापना झाली!

मग दीड वर्षानंतरच्या विधानसभा निवडणुकाही काँग्रेसनं सुशीलकुमारांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या आणि राष्ट्रवादीच्या साथीनं राज्यही टिकवलं. मात्र, त्यानंतर जे काही घडलं ते मात्र या दोन जिगरी दोस्तांच्या मैत्रीत निश्चितच मिठाचा खडा टाकणारं होतं.

सुशीलकुमारांनी निवडणुका जिंकून दिल्यावरही त्यांच्या हातात पुन्हा राज्य न देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडनं तर घेतलाच; शिवाय आणखी एक अत्यंत धक्कादायक फैसलाही केला. तो होता पुनश्च एकवार विलासरावांनाच मुख्यमंत्री करण्याचा! त्या वेळी सुशीलकुमारांच्या ओठावर मग ‘दोस्त दोस्त ना रहा...’ हे गीत आलं होतं का, हा प्रश्न, त्यानंतर त्यांच्या अनेकदा भेटी-गाठी होऊनही, विचारण्याचं धाडस मात्र कधीच झालं नाही...

मात्र, विलासरावांचं पुत्रप्रेम आणि त्या पुत्राच्या सिनेमावरचं त्यांचं प्रेम इतकं अगाध होतं की हे दुसऱ्यांदा आणि तेही अवचित हाती आलेलं मुख्यमंत्रिपदही विलासराव पुढची पाच वर्षं टिकवू शकले नाहीत. सन २००८ मध्ये २६/११ च्या त्या काळरात्री मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला आणि साऱ्या देशाला काळजीनं घेरलं. मात्र, पुढच्या चारच दिवसांत आपल्या सुरक्षायंत्रणांना तो हल्ला मोडून काढण्यात यश आलं. अमाप हानी झाली होती. ‘गेट-वे ऑफ इंडिया’ समोरच्या ख्यातकीर्त ताजमहाल हॉटेलची दहशतवाद्यांनी पुरती दुर्दशा केली होती. दहशतवाद्यांचं सावट ओसरल्यावर विलासरावांनी मग त्या हॉटेलला भेट देणं हा निव्वळ उपचार नव्हता. मात्र, विलासराव तिथं गेले ते चक्क रामगोपाल वर्मा या चित्रपटनिर्माता-दिग्दर्शकला सोबत घेऊन...आणि मुख्य म्हणजे त्याची चित्रफीतही मग अनेक वृत्तवाहिन्यांच्या हाती लागली...

विलासरावांना पुनश्च एकवार मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं लागलं.

त्यानंतर मग त्यांना असाध्य आजारानं घेरलं आणि पुढच्या चारच वर्षांत महाराष्ट्र काँग्रेसनं, आपली राज्याच्या सीमेबाहेरही ओळख असलेला, खुसखुशीत भाषणांनी हजारोंची सभा आपल्या कवेत घेणारा एक झुंजार नेता गमावला...

आज विलासराव असते तर महाराष्ट्रात ही अशी काँग्रेसची पडझड आणि परवडही निश्चितच झाली नसती यात शंकाच नाही...आणि त्यांचे एकेकाळचे सख्खे मित्र सुशीलकुमारही हे वास्तव कायमच जाहीरपणे मान्य करत आले आहेत...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.