दोस्ती और दुश्मनी!

आज तिशी-पस्तिशीच्या घरात असलेल्या एकाही शिवसैनिकाचा यावर विश्वास बसणं केवळ अशक्य आहे; पण हे ढळढळीत वास्तव आहे.
Balasaheb Thackeray and Indira Gandhi
Balasaheb Thackeray and Indira GandhiSakal
Updated on

ते वर्ष होतं १९८० आणि स्थळ होतं मुंबईच्या पूर्व उपनगरातील नेहरूनगर. मध्य रेल्वेवरचं कुर्ला हे एक महत्त्वाचं स्थानक. तिथं कोणे एके काळी हाउसिंग बोर्डानं (म्हणजेच आजच्या भाषेतील ‘म्हाडा’नं!) मध्यमवर्गीयांसाठी बांधलेल्या छोटेखानी इमारती होत्या. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि त्या वसाहतींच्या ‘नेहरूनगर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघातून इंदिरा गांधींच्या काँग्रेसनं बाबासाहेब भोसले यांना उमेदवारी दिली होती.

त्यांची प्रचारसभा सुरू होती आणि प्रमुख वक्ते होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे!

आज तिशी-पस्तिशीच्या घरात असलेल्या एकाही शिवसैनिकाचा यावर विश्वास बसणं केवळ अशक्य आहे; पण हे ढळढळीत वास्तव आहे. त्याआधीच्या पाच वर्षांत इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीचं बाळासाहेबांनी स्वागत केलं होतं आणि नंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात दोन उमेदवार रिंगणातही उतरवले होते. तिथं पदरी पराभव आल्यावर शिवसेनेनं १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही काही उमेदवार उभे केले होते आणि तेव्हा दादर मतदारसंघात शिवसेनेचेच पहिले महापौर डॉ. हेमचंद्र गुप्ते यांनीच मनोहर जोशी यांना पराभूत केलं होतं.

त्यानंतरच्या दोन वर्षांत देशाचं राजकीय नेपथ्य बदलून गेलं आणि जनता सरकारचा प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतर झालेल्या मध्यावधी निवडणुकीत इंदिराजींनी पुनश्च एकवार दिल्ली काबीज केली होती. सत्ता हाती येताच त्यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांचं ‘पुलोद’ सरकार बरखास्त केलं आणि विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याच निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत बाळासाहेब थेट काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब भोसले यांच्या व्यासपीठावर जाऊन पोहोचले होते!

हा सारा इतिहास आज नव्यानं उगाळावा लागतोय. कारण, सरत्या आठवड्यात शिवसेनानेते संजय राऊत यांनी घेतलेल्या राहुल गांधी-प्रियांका गांधी यांच्या भेटी-गाठी. त्यामुळे शिवसेना काँग्रेसबरोबर जाऊच कशी शकते, अशी चर्चा जाणीवपूर्वक काही हितसंबंधी गटांनी सुरू केली आहे. त्यांना शिवसेनेच्या पूर्वेतिहासाची, तसंच काँग्रेसशी असलेल्या बाळासाहेबांच्या दोस्तान्याची आठवण करून द्यायलाच हवी! सन १९८० मधील त्या विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेबांनी एकही उमेदवार रिंगणात उतरवला नाही. शिवाय, काँग्रेसचा प्रचारही केला आणि त्याची किंमत विधान परिषदेत आपले दोन उमेदवार पाठवून काँग्रेसकडून वसूलही केली! त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगोलग झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले हे शिवसेनानेते होते प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक!

अर्थात्, शिवसेनेनं काँग्रेसशी ही अशी उघड दोस्ती काही प्रथमच केलेली नव्हती. शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली आणि त्यानंतर लगोलग वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका आल्या. तेव्हा मुंबईतून साथी जॉर्ज फर्नांडिस, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, द. रा. गोखले, तसंच व्ही. के. कृष्णमेनन हे उमेदवार काँग्रेसच्या विरोधात रिंगणात होते. तेव्हाही बाळासाहेबांनी, तसंच त्यांच्या ‘कडवट’ शिवसैनिकांनी काँग्रेसचाच प्रचार केला होता. दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी तर या सर्वांच्या विरोधात ‘पंचमहाभूतांना गाडा!’ या शीर्षकाचा घणाघाती लेखच ‘मार्मिक’मध्ये लिहिला होता! खरं तर फर्नांडिस हे शिवसेनाप्रमुखांचे घनिष्ठ मित्र आणि फर्नांडिस उभे ठाकले होते तेव्हा ‘मुंबईचे अनभिषिक्त सम्राट’ म्हणून गाजत असलेले स. का. पाटील यांच्या विरोधात. या निवडणुकीच्या आधी संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक म्हणून या पाटीलबुवांचा ‘मार्मिक’मधून बाळासाहेब रोजच्या रोज उद्धार करत होते. तरीही शिवसेना पाटील यांच्याच पाठीशी उभी राहिली होती. अर्थात्, तेव्हा मुंबईकरांनी बाळासाहेबांचं ऐकलं नाही आणि फर्नांडिस यांनाच निवडून दिलं ही बाब अलाहिदा!

शिवसेनेनं १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची तळी खांद्यावर घेतली आणि पुढच्याच वर्षी आलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका मात्र स्वत: लढवण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या सत्ताकारणातील शिवसेनेनं हे पहिलं पाऊल टाकलं, ते मात्र मधू दंडवते यांच्या प्रजासमाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून. त्यानंतर १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतरची पुढची पाच-सात वर्षं काँग्रेसमधील या ना त्या गटाशी साटंलोटं करत बाळासाहेबांनी डॉ. हेमचंद्र गुप्ते, सुधीर जोशी, मनोहर जोशी, वामनराव महाडिक असे आपले चार नेते महापौरपदी निवडून आणले. आणीबाणीच्या कालखंडात तर त्यांनी सोहनसिंग कोहली या समाजवादी नेत्याला महापौरपदासाठी दिलेला पाठिंबा शेवटच्या क्षणी मागं घेतला आणि काँग्रेसनेते मुरली देवरा यांना महापौरपदावर बसवलं.

काँग्रेसशी असलेला आपला दोस्ताना अखेर नऊ सप्टेंबर १९८२ रोजी कामगार मैदानावरील जाहीर सभेत मोठ्या नाट्यपूर्ण रीतीनं घोषणा करून बाळासाहेबांनी तोडला! त्याला अर्थातच डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मुंबईतील गिरणीकामगारांच्या संपाची पार्श्वभूमी कारणीभूत होती. त्यानंतरच्या अडीच-तीन वर्षांतच, म्हणजे १९८५ मध्ये, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळालं आणि मुंबईचं राज्य हाती आलं. तेव्हापासून मात्र शिवसेनेनं काँग्रेसशी उभी दुश्मनीच घेतली होती.

पुढं १९८७ मध्ये मुंबईच्या पश्चिम उपनगरात झालेली विधानसभेची निवडणूक शिवसेनेनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवून जिंकली आणि शिवसेनेचा मराठमोळा बाज पुरता हिंदुत्ववादी होऊन गेला. तेव्हा भारतीय जनता पक्षाला शरद पवार यांच्या ‘पुलोद’चा एक घटक म्हणून जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं भाग पडलं होतं. त्यानंतरच प्रमोद महाजन यांनी, शिवसेनेला सोबत घेणं कसं गरजेचं आहे, ते लालकृष्ण अडवानी यांना पटवून दिलं. त्यानंतर पुढं काय झालं, तो इतिहास आहे! खरं तर शिवसेनेचा दोस्ताना हा पहिल्यापासून काँग्रेसशीच होता आणि त्याच्या आधारेच बाळासाहेब हे स्थापनेनंतरची किमान १५ वर्षं मुंबईच्या सत्ताकारणात आपली पाळंमुळं रुजवू पाहत होते. त्यात त्यांना चांगलंच यश मिळालं आणि त्यानंतरच ते महाराष्ट्र जिंकण्याची स्वप्नं पाहू लागले. ‘आता घोडदौड महाराष्ट्रात’ ही घोषणा शिवसेनेनं दिली ती १९८५ नंतरच, हेही या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यावं लागतं.

खरं सांगायचं तर, भाजपबरोबरची युती हा शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक अपघात होता. अर्थात्, शिवसेनेला तो सुखद ठरला आणि त्यामुळेच मनोहर जोशी, तसंच नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर वास्तव्य करू शकले. शिवाय, त्याच काळात बाळासाहेबांनाही आपला रिमोट कंट्रोल अधिक जोमानं चालवता आला! त्यामुळे आता शिवसेनेनं काँग्रेसशी दोस्ती वाढवायचं ठरवलं असलं आणि त्यामुळे भाजपबरोबर दुश्मनी वाढत चालली असली, तरी त्यात काही धक्कादायक तर सोडाच; आश्चर्य वाटावं असंही काहीच नाहीये...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.