‘इथं लहान मुलंही सुरात रडतात किंवा येथील जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं,’ असं आजही मिरज शहरातील जुनीजाणती लोकं अभिमानाने सांगत असतात.
‘इथं लहान मुलंही सुरात रडतात किंवा येथील जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं,’ असं आजही मिरज शहरातील जुनीजाणती लोकं अभिमानाने सांगत असतात. शेकडो वर्षांपूर्वीपासूनची संगीत परंपरा, हे त्याचं कारण. तेव्हा शास्त्रीय गायनच बहरत असल्यामुळे साहजिकच त्यासाठी तानपुरे आवश्यक असत. तत्कालीन पटवर्धन संस्थानिकांनी फरीदसाहेब सतारमेकर यांना तानपुरा बनवण्यास सांगितलं आणि फरीदसाहेब सतारमेकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. आज तंतुवाद्यनिर्मितीचं माहेरघर म्हणून मिरज शहर जगाच्या नकाशावर ठळक आहे. फरीदसाहेब तंतुवाद्यनिर्मितीचे जनक ठरले.
पेशवाईच्या उत्तरार्धात लढाया संपुष्टात आल्याने शस्त्रास्त्रं बनवणाऱ्या शिकलगार कारागिरांच्या हाताला नवं काम देण्यासाठी मिरजेच्या तत्कालीन पटवर्धन संस्थानिकांनी तंतुवाद्यनिर्मितीचा पर्याय सुचवला. फरीदसाहेब सतारमेकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक बनविलेला तानपुरा गायकांच्या पसंतीस उतरला आणि सुरू झालं एक नवं पर्व.
मिरजेच्या शास्त्रीय संगीत परंपरेत ग्वाल्हेर घराण्याची गायकी महाराष्ट्रात आणणारे महादेवबुवा गोखले, गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना दरबारी गायक म्हणून नियुक्त केलं. इथंच बाळकृष्णबुवांकडून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गानविद्या प्राप्त केली. विष्णू दिगंबरांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन, प्रो. बी. आर. देवधरही हेही मिरजेचे. बी. आर. देवधर यांनीच कुमारगंधर्वांना गायनाचे धडे दिले. बाळकृष्णबुवांचेच अन्य एक शिष्य निळकंठबुवा जंगम यांच्याकडे तर ख्यातनाम गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर हेही शिकले. त्यामुळेच शास्त्रीय संगीतात मिरजेची काही काळ ओळख ग्वाल्हेर घराण्याच्या गायकांची कर्मभूमी अशीही राहिली. यामध्ये किराणा घराण्याच्या गायकांनी याच लौकिकास आणखी साज चढविला.
संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या ४० वर्षांच्या वास्तव्यामुळे किराणा घराण्याला ‘मिरज घराणं’ म्हणावं इतका घनिष्ठ संबंध ‘किराणा’चा मिरजेशी आला. ख्यातनाम मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनईवादक एस. बी. माने, तिफ्पाण्णा मुळे यांच्यासारख्या दिग्गज गायक-वादकांनी तर मिरजेच्या सांगीतिक लौकिकास एक वेगळीच झळाळी प्राप्त करून दिली. या सर्व दिग्गजांचं वास्तव्य असलेल्या वास्तू, स्मृतिस्थळं, कागदपत्रं, पुतळे आजही मिरजेत सुस्थितीत आहेत. हे पाहण्यासाठी, त्याबाबत अभ्यास करण्यासाठी जगभरातून अभ्यासक आणि कलाकार मंडळी मिरजेला आवर्जून येतात आणि यांपैकीच गायक आणि वादक मंडळींसह संगीतप्रेमीही आवश्यक तंतुवाद्य खरेदीसाठी मिरजेलाच येतात. जगातील कलाकारांच्या गायन आणि वादनाच्या संगीतविषयक परीक्षा नियंत्रित करणारं गांधर्व महाविद्यालयाचं मुख्य कार्यालयही मिरजेत आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या संगीत नाटकांना वैभव प्राप्त करून देणारं आणि बालगंधर्वांचं रंगभूमीवरील पहिलं पदार्पण ज्या रंगमंचावर झालं, ते प्रसिद्ध बालगंधर्व नाट्यमंदिरही आहे.
संगीतरत्न अब्दुल करीम खाँची समाधी
संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांची समाधी मीरासाहेब दर्गा आवारात आहे. खाँसाहेबांची मीरासाहेबांवर खूप श्रद्धा होती. मीरासाहेबांच्या कृपेनेच प्लेगच्या गंभीर आजारातून आपला पुनर्जन्म झाल्याची खाँसाहेबांची भावना होती, त्यामुळे मृत्यूनंतर आपला देह मीरासाहेबांच्या चरणीच दफन करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचं दर्गा आवारातच दफन करण्यात आलं. तिथे सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं. त्याशेजारीच त्यांच्या पत्नी बनूबाई लाटकर यांचीही समाधी आहे. खाँसाहेबांच्या समाधीवर त्यांच्या आवडत्या ‘दरबारी कानडा’ रागाच्या नोटेशन्स कोरल्या आहेत.
कलाकारांचं श्रद्धास्थान चिंचेचं झाड
शहरातील प्रसिद्ध मीरासासाहेब दर्गा परिसरातील चिंचेचं झाड हे संगीतरत्न अब्दुल करीम खाँच्या गायनसेवेचं साक्षीदार आहे. खाँसाहेब प्रत्येक उरुसाच्या दुसऱ्या दिवशी याच झाडाखाली बसून गायनसेवा करीत. खाँसाहेब देशभरात कुठंही असले, तरी मीरासाहेबांचा उरुस कधीही चुकवत नव्हते. खाँसाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची गायनपरंपरा त्यांच्या शिष्यांनी जपली आहे. अद्यापही मीरासाहेब दर्ग्यातील अब्दुल करीम खाँ साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केल्या जाणाऱ्या संगीतसभेचा प्रारंभ याच चिंचेच्या झाडाखालील उरुसाच्या दुसऱ्या दिवशी किराणा घराण्याच्या शिष्यांच्या गायनानेच होतो.
वर्षभर संगीत महोत्सव
मिरज शहरात गेल्या ८० वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारचे संगीत महोत्सव होत असतात. मिरजेतील संगीतप्रेमींसाठी वर्षभर दहाहून अधिक संगीत महोत्सवांचं संयोजन तंतुवाद्य कारागीर आणि संगीतप्रेमींकडून होतं. वर्षभर जुन्या पिढीतील विविध गायक - वादकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या या संगीत महोत्सवांमध्ये जगद्विख्यात कलाकार सहभागी होतात. दर्ग्यात तीन दिवस होणारा अब्दुल करीम खाँ महोत्सव, अंबाबाई मंदिरात होणारा नवरात्र संगीत महोत्सव, गणपतराव कवठेकर संगीत सभा, उमरसाहेब मिरजकर संगीत सभा, भानुदासबुवा गुरव संगीत सभा, पन्नालाल घोष संगीत सभा, आबासाहेब सतारमेकर स्मृती संगीत सभा, प्रत्येक महिन्याच्या दुर्गा अष्टमीला उदयोन्मुख कलाकारांसाठी संगीत सभा यांसह अन्य संगीतविषयक कार्यक्रमांची रेलचेल असते.
१८५० च्या सुमारास फरीदसाहेब शिकलगार यांनी शहरात पहिलं तंतुवाद्य तयार केलं आणि त्यानंतर तंतुवाद्यनिर्मितीची मोठी परंपरा शहरात निर्माण झाली. फरीदसाहेब, मोईद्दीनसाहेब, पीरसाहेब, हुसेनसाहेब यांच्यासह चाँदसाहेब सतारमेकर, विलायत हुसेनसाहेब, उमरसाहेब मिरजकर यांनी तंतुवाद्यनिर्मितीमध्ये अनेक नावीन्यपूर्ण बदल केले. सतार, तानपुरा, दिलरुबा, सारंगी, रुद्रवीणा, बीन, ताऊस, दिलदुबा, सूरबहार, सरस्वतीवीणा, स्वरमंडल, एकतारा, संतूर, सरोद अशी एकाहून एक सरस वाद्यं या कलाकारांनी तयार केली. आज पस्तीसहून अधिक दुकानं आणि अडीचशेहून अधिक कारागीर तंतुवाद्यनिर्मितीमध्ये व्यग्र आहेत. भोपळा घेतल्यापासून ते जव्हारी (वाद्यांना सूर लावणे) लावण्यापर्यंतची संपूर्ण तंतुवाद्य तयार होण्याची प्रक्रिया खरोखरच पाहण्यासारखी आहे.
तंतुवाद्यनिर्मितीबरोबर शहरात तंतुवाद्यांच्या आकर्षक आणि सुबक छोट्या प्रतिकृती तयार करण्यात येतात, त्यांनाही मोठी मागणी असते. या प्रतिकृतींचं मार्केटिंग करता येऊ शकतं, त्यासाठी मिरजेचं संगीत पर्यटन अधिक विकसित करण्याची आवश्यकता आहे. आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब सतारमेकर यांच्या प्रयत्नातून पहिलं तंतुवाद्य ज्या मिरज शहरात बनलं, त्याच मिरज शहरातील तंतुवाद्यांची मोठी बाजारपेठ ही याच कारागीर मंडळींनी कष्टपूर्वक विकसित केली आहे. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक गायक - वादक मिरजेतील वाद्यांनाच पसंती देतात. भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असलेले परदेशी नागरिकही मिरजेतील वाद्यांची मागणी करतात. देशात आणि देशाबाहेरही मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या तंतुवाद्यांची आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामवंत गायक-वादकांकडून होणारी खरेदी या कारागिरीचं बलस्थान आहे. याच कारागिरांच्या असामान्य कौशल्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून तंतुवाद्यांच्या या माहेरघरातील तंतुवाद्य कारागिरांकडे देश-विदेशांतील नामांकित कलाकारांकडून दोन-तीन पिढ्यांमागची आणि अत्यंत नाजूक अवस्थेतील विविध प्रकारची वाद्यं दुरुस्तीसाठी येतात. ती वाद्यं काळजीपूर्वक दुरुस्त करून ती पोहोच करणारी एक मोठी यंत्रणा याच कारागिरांकडे कार्यरत आहे. हा विश्वास हे येथील व्यवसायाच्या यशाचं गमक आहे.
फरीदसाहेब यांच्यानंतर तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा पीरसाहेब, हुसेनसाहेब यांनी पुढे चालविली. त्यानंतर आबासाहेब सतारमेकर यांनी वैविध्यपूर्ण तंतुवाद्यं तयार केली. आबासाहेब सतारमेकर हे तंतुवाद्यनिर्मितीमधील अत्यंत नावाजलेले आणि कुशल तंतुवाद्यनिर्माते कलाकार होते. अब्दुल करीम खाँसारख्या नामांकित कलाकारास तानपुऱ्याची साथ करण्याचं भाग्य त्यांना बालपणीच लाभलं. त्यांनी वडील हुसेनसाहेब यांच्याकडून तंतुवाद्यनिर्मितीचे धडे घेतले. त्यांनी वैविध्यपूर्ण तंतुवाद्यं बनवली. शहामृगाच्या अंड्यापासून बनविलेली सतार ही त्याकाळात गाजली होती. दरबारी बिलोरी हंड्याचा वापर करूनही त्यांनी सतार बनवली. नामांकित गायक - वादकांबरोबरच साहित्यिक पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, विद्याधर गोखले यांसारख्या संगीतप्रेमी साहित्यिकांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते.
संगीत महोत्सवात सहभाग
मिरजमधील तंतुवाद्य कारागिरांच्या सचोटी आणि प्रामाणिक राबणुकीमुळेच देशविदेशांतील अनेक प्रसिद्ध संगीत महोत्सवांसाठी मिरजेतील तंतुवाद्य कारागिरांना आमंत्रित करण्यात येतं. या महोत्सवांत गायकांसाठी आवश्यक असणारे तानपुरे, सतारी आणि अन्य तंतुवाद्यांना प्रत्यक्ष सादरीकरणावेळी संपूर्ण आणि अतिशय निर्दोषपणे तयार करण्याची जबाबदारी मिरजेतील सतारमेकर यांच्यावर सोपवलेली असते. अलीकडे तर येथील तंतुवाद्य कारागिरीचं महत्त्व जाणून घेऊन या कारागिरांना केंद्र सरकारच्या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. संगीत नाटक अकादमी ही देशातील संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रातील सर्वोच्च शासकीय संस्था आहे. सोळा वर्षांपूर्वी शराफतभाई सतारमेकर यांना याच अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं. शेकडो वर्षांच्या तपश्चर्येनंतर प्रथमच एवढा मोठा सन्मान मिरजेच्या तंतुवाद्य कारागिरास प्राप्त झाला. आता या वर्षीचा याच अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मज्जिदभाई सतारमेकर यांना नुकताच जाहीर झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारामुळे मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात बहुमानाचा तुरा खोवला गेला आहे. मज्जिदभाई सतारमेकर हे आद्य तंतुवाद्यनिर्माते फरीदसाहेब यांचे पाचव्या पिढीचे वंशज आहेत.
फरीदसाहेबांनंतर पीरसाहेब, हुसेनसाहेब, आबासाहेब, गुलाबसाहेब यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली. गुलाबसाहेब यांचे पुत्र मज्जिदभाई सतारमेकर यांनी आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या तंतुवाद्यनिर्मितीचा वारसा तितक्याच निष्ठेने जोपासला आहे. मज्जिदभाई हे गेली ४५ वर्षं तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. देश-विदेशांतील नामांकित गायक-वादकांना त्यांनी दर्जेदार तंतुवाद्यं पुरविली आहेत. तंतुवाद्यनिर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांचं वाद्यनिर्मितीतील कौशल्य पाहून त्यांना जपान आणि फ्रान्समध्ये तंतुवाद्यनिर्मिती कार्यशाळेसाठी आमंत्रित केलं होतं.
पुरस्काराबद्दल मज्जिदभाई सतारमेकर म्हणाले, ‘‘हा पुरस्कार आमचे पूर्वज फरीदसाहेब आणि त्यानंतरच्या पिढीतील कलाकारांनी घेतलेल्या परिश्रमांचं फळ आहे. मिरजेतील तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्रातील सर्वच कलाकारांच्या सहकार्यामुळे हे यश मिळालं.’’ मिरजेच्या तंतुवाद्यनिर्मिती क्षेत्राला बळ देणाऱ्या संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या १५० व्या जयंतीवर्षात हा पुरस्कार मिळणं, हा सुवर्णयोग असल्याचं मज्जिदभाई सतारमेकर यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.