परिवर्तनाचा ‘विजय’ प्रयोग

स्पोर्टस् टिचर म्हणून विजय बारसे यांनी नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये ३६ वर्षे सेवा दिली. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना ते बसस्टॉपवर उभे राहायचे. नजीकच्या झोपडपट्टीतील बारा-चौदा वर्षांच्या मुलांची टोळी त्यांना रोज दिसायची.
vijay barase
vijay barasesakal
Updated on
Summary

स्पोर्टस् टिचर म्हणून विजय बारसे यांनी नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये ३६ वर्षे सेवा दिली. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना ते बसस्टॉपवर उभे राहायचे. नजीकच्या झोपडपट्टीतील बारा-चौदा वर्षांच्या मुलांची टोळी त्यांना रोज दिसायची.

‘स्पोर्टस् हॅज दी पॉवर टू चेंज दी वर्ल्ड. इट हॅज दी पॉवर टू युनाईट वर्ल्ड इन अ वे दॅट लिटल एल्स डझ. वेल डन बारसे. कीप इट अप.’ शांतीसाठी ‘नोबेल’ पुरस्कारप्राप्त आणि ‘भारतरत्न’ हा बहुमान मिळवणारे दक्षिण आफ्रिकेतील क्रांतिकारी नेते नेल्सन मंडेला यांचे हे उद्‍गार... केपटाऊन येथील २००७ च्या ‘होमलेस वर्ल्ड कप’मध्ये विजय बारसे उपस्थित होते. ‘झोपडपट्टी फुटबॉल’च्या माध्यमातून युवकांमध्ये परिवर्तनाची बीजे पेरण्याचा ध्यास विजय बारसे यांनी घेतला. त्यासाठी दस्तुरखुद्द नेल्सन मंडेला यांनी बारसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि ‘लढ’ म्हणाले. नागपूर ते केपटाऊन हा विजय बारसे यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रवास. पुढे तो जगातील तब्बल १६० देशांत पोहोचला. ‘झुंड’च्या माध्यमातून या प्रवासाला आता अभूतपूर्व ग्लॅमर प्राप्त होणार, यावर सिनेमा प्रदर्शित होताच शिक्कामोर्तब झाले. २१ वर्षांपूर्वी या प्रवासाची सुरुवात मात्र अकल्पित अशीच झाली होती.

स्पोर्टस् टिचर म्हणून विजय बारसे यांनी नागपूर येथील हिस्लॉप कॉलेजमध्ये ३६ वर्षे सेवा दिली. कॉलेज सुटल्यावर घरी जाताना ते बसस्टॉपवर उभे राहायचे. नजीकच्या झोपडपट्टीतील बारा-चौदा वर्षांच्या मुलांची टोळी त्यांना रोज दिसायची. बसस्टॉपवर उभ्या असलेल्या प्रवाशांची बॅग पळवून ने, कुणाला धक्का देत अलगद पाकीटमारी कर, बिडी-सिगरेटचे झुरके मार, पादचाऱ्यांना ‘हपकाना’, म्हणजे भीती दाखव, ही त्यांची नित्याचीच टवाळखोरी. विजय बारसे रोज त्यांच्याकडे बघत. एकदा हीच टवाळटोळी तुटलेल्या प्लास्टिकच्या बादलीला किक मारत हुंदडत होती. देहभान हरवून ती खेळत होती. तेवढ्या वेळात त्यांना त्यांच्या दैनंदिन टवाळखोरीचा पूर्णतः विसर पडल्याचे दिसले. विजय बारसे यांनी हे हेरले. हाच तो क्षण जेथून एका परिवर्तनाच्या जगावेगळ्या बीजारोपणाचा प्रारंभ झाला.

दुसऱ्या दिवशी मग बारसेंनी या गॅंगला बोलावून विचारले, ‘फुटबॉल खेलोंगे क्या. हर एक को पाच रुपये दुंगा.’ पोरं विचित्र नजरेने बघू लागली. मनात चालले होते, ‘पागल हुवा क्या यार ये... लगता है इसके पास बहोत पैसे है. अपने को क्या. पैसे भी मिल रहे. खेलेनेको भी मिलेगा.’ जराशा कुजबुजीनंतर ते तयार झाले. फुटबॉल खेळू लागले. रोज फुटबॉल खेळायचे. रोज प्रत्येकी पाच-पाच रुपये मिळायचे. पंधराएक दिवसांनंतर अचानक पैसे देणे बंद केले. पुढे तीन-चार दिवसांनी फुटबॉल देणेही बंद केले. फालतूगिरीची सवय लागलेल्या या मुलांना फुटबॉलचे व्यसन एवढे जडले होते की, त्यापैकी काहींनी स्वतः फुटबॉल विकत घेतला आणि खेळू लागले. नागपूरमधील एका झोपडपट्टीतील हे परिवर्तन मग शहरातील सुमारे साडेचारशे झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचविण्याचा मनोमन निश्चय विजय बारसे यांनी केला. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी नऊ एकर जमीन विकत घेतली. २००१ मध्ये ‘क्रीडा विकास संस्था’ स्थापन केली. त्यातून ‘झोपडपट्टी फुटबॉल’चा जन्म झाला.

नागपूर शहरात ‘आंतरझोपडपट्टी स्पर्धा’ सुरू केली. पुढे देशभरातील अनेक राज्यांत ही जणू चळवळच झाली. २००१ याच कालावधीत बेघरांच्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी मेल यंग आणि हॅरल्ड स्किमाईड या जोडगोळीने ‘होमलेस वर्ल्ड कप’ची संकल्पना मांडली. २००३ मध्ये ऑस्ट्रियातून पहिल्या टुर्नामेंटची सुरुवात केली. इकडे विजय बारसे योगायोगाने याच कामी लागले होते. ‘ग्रेट माईन्ड्स थिंक अलाईक’ याचेच हे तंतोतंत उदाहरण. केपटाऊनमधील ही स्पर्धा बघायला गेल्यानंतर मंडेला यांची जी कौतुकाची थाप बारसेंना मिळाली, त्यातून त्यांना ‘झोपडपट्टी फुटबॉल’ची चळवळ विस्तारता आली. ‘स्लम सॉकर’ नावाने उभारल्या गेलेल्या या परिवर्तनाच्या चळवळीत आता जगभरातील १६० देशांनी सहभाग नोंदविला आहे. एकट्या नागपूर शहरातील तीस लाख लोकसंख्येपैकी सरकारी नोंदीनुसार एक तृतीयांश नागरिक झोपडपट्टीमध्ये राहतात. अक्कू यादवसारख्या बलात्कारी आणि खुन्याचा उदय नागपूर शहरातील अशाच एका कस्तुरबानगर झोपडपट्टीतून झाला.

पोलिस यंत्रणेला मनासारखे वाकवत धुडगूस घालणाऱ्या या गुंडामुळे महिला प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. त्याला पकडून कोर्टात नेण्यात आले; परंतु त्याच्यावर खटला चालविण्याएवढा संयमही महिलांमध्ये उरला नव्हता. २०० पीडित रणरागिणींनी त्याचा खात्मा केला. ऐन जिल्हा न्यायालय परिसरातील या घटनेने तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती. हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे प्रतिध्वनी आजही नागपूरसारख्या शहरात उमटताना दिसतात; परंतु याच शहरात झोपडपट्टीतील तरुणांना फुटबॉलचे वेड लावत हजारो नव्हे, तर लाखो तरुणांना विजय बारसे यांनी अक्कू यादव होण्यापासून वाचविले. सिनेमात दाखविलेला अंकुश मसराम हा त्यापैकीच एक. झोपडपट्टीतील घराघरांतून उफाळणारी भूक, दारिद्र्य आणि विषमतेची सातत्याने वाढणारी दरी, त्यातून वाढणारी गुन्हेगारी झोपडपट्टीच्या प्रमाणानुसार वाढतच जात आहे. त्यातून अंकुशसारखी तरुणाई विघातक मार्गाने वाटचाल करायला लागते.

जागतिक आरोग्य संघटनेने २०१० मध्ये जागतिक आरोग्य दिनाची घोषणा करताना ‘वन थाऊजंड सिटीज, वन थाऊजंड लाइव्हज्’ या अहवालातून जगात झोपडपट्टी वाढत असल्याचा इशारा दिला होता. जगभरातील निम्मी लोकसंख्या शहरात राहते आणि या निम्म्यापैकी ३० टक्के लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये वाढताना दिसते. दिवसागणिक गावे ओसाड होताना दिसताहेत. भूक स्वस्थ बसू देत नाही. मग रोजगाराच्या शोधात पावले शहराकडेच वळतात. स्थलांतरित होणारी अभावग्रस्त पावले मग शहरातील झोपडपट्‍ट्‍यांमध्ये निवारा शोधतात. मग झोपडपट्ट्या फुगतच जातात. इतर देशांच्या तुलनेत आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये शहरांची लोकसंख्या वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले. चीन आणि भारतातील शहरांमध्ये तर जगाच्या प्रमाणाहून जास्त म्हणजे ३७ टक्के एवढी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. मग उपजीविकेच्या कष्टप्रद डोंगरावर चढत जाणारी पावले आपसूकच विघातक मार्गाकडे ओढली जातात. ‘ऑस्कर’प्राप्त ‘स्लमडॉग मिलेनियर’ सिनेमातून हे चित्र अधिक गडदपणे दाखविले गेले आहे. विजय बारसे यांनी फुटबॉलच्या माध्यमातून ही पावले विधायक मार्गाने नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. आफ्रिकेतील मंडेलांना त्यांचे कौतुक करावेसे वाटते; परंतु आपल्या देशात त्यांच्या कार्याची कदर करण्याची जराही गरज कर्त्याधर्त्यांना वाटत नाही.

झोपडपट्टीमधील मुलांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करणारा एक कार्यकर्ता, एवढीच एक ओळख विजय बारसे यांची नागपूर शहराला असते; परंतु अभिनेता आमीर खान ‘सत्यमेव जयते’ मालिकेतून त्यांची दखल घेतो. सर्वप्रथम ‘सकाळ’त्यांना ‘गुरू गौरव सन्मान’ प्रदान करते. विजय बारसे यांच्या कार्याची माहिती नागराज मंजुळेंपर्यंत पोहोचते. हौशी नेत्यांच्या नावाने पुरस्कार देत युवा मंडळे गल्लोगल्ली क्रिकेट स्पर्धा भरवतात, तशी ही झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धा नाही, हे निक्षून सांगितले जाते. फुटबॉलच्या माध्यमातून युवकांचे परिवर्तन करणारी ही चळवळ आहे, हे मग शहराच्या ध्यानात येते. ‘देर आये...’ या हिशेबाने मग त्यांना ‘नागभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येते. निष्काम कार्य अव्याहतपणे सुरू असणाऱ्या बारसेंना याचे मात्र फारसे काहीच वाटत नाही. त्यांना ना महाराष्ट्रभूषणची आस आहे, ना पद्म पुरस्काराची; ना विधान परिषद, ना राज्यसभेच्या सदस्यस्यत्वाची. ‘झुंड’च्या माध्यमातून त्यांनी आता या सर्वांवर मात केली आहे. विजय बारसे जमिनीवरील कार्यकर्ते आहेत.

म्हणून मग ‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘शाळेत नेऊ सर्वांना’ या अभियानातही सहभागी होतात आणि भरवाडांच्या ‘श्री संत नगा लाखा शिक्षण जागर’ यात्रेतही ते फिरतात. ‘भंडारा जिल्ह्यातील एका खेड्यात माझा जन्म झाला. मी प्राध्यापक झालो. आता तर नागराज मंजुळेंनी माझ्यावर सिनेमा काढला. अमिताभ बच्चन यांनी माझी भूमिका साकारली. यापेक्षा आणखी मला काय हवे आहे’, अशी जणू कृतज्ञता ते व्यक्त करतात. विजय बारसे यांनी आता मुके आणि बहिरे यांच्या फुटबॉल टीम तयार केल्या आहेत. नुकतीच त्यांची मोठी स्पर्धाही पार पडली. नागपूर महापालिकेच्या शाळांमधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘शक्ती गर्ल्स’ ही चळवळ त्यांनी सुरू केली. सोबतच ‘सोनपाखरू’ कादंबरीही त्यांनी लिहायला घेतली आहे.

हिंदीत पदार्पण करताना कार्यकर्ता असलेल्या नागराज मंजुळेंसारख्या संवेनदशील दिग्दर्शकाला विजय बारसे या विदर्भपुत्रावर सिनेमा काढण्याची इच्छा होते. बारसेंसारखी अशी अनेक ‘नोबेल’ माणसे विदर्भभूमीत आहेत. आदिवासींचे हक्क कायद्याच्या पुस्तकातून प्रत्यक्ष आदिवासी गावांमध्ये उतरवून कफल्लक गावे कोट्यधीश करणारे आदिवासींचे सुपरहिरो देवाजी तोफा, जन्मजात गुन्हेगारीचा डाग शिरावर घेऊन जगणाऱ्या फासेपारधी बालकांसाठी आश्रमशाळा उभारणारे मतीन भोसले, भीक मागणाऱ्या, चोऱ्या करणाऱ्या बालकांच्या उद्धारासाठी समर्पित खुशाल ढाक, झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांकडून उच्चभ्रूंच्या बालकांमध्ये ‘अपूर्व’ वैज्ञानिक दृष्टिकोन पेरणारे सुरेश अग्रवाल या माणसांची जीवनकार्येही प्रेरणादायी आहेत.

गडचिरोलीतील सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी तर विजय बारसे यांच्याचप्रमाणे व्हालीबॉल या खेळाच्या माध्यमातून आदिवासी तरुणांना व्यसनांपासून अलिप्त ठेवत त्यांच्यात ऊर्जा भरण्याचे काम कधीचेच सुरू केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावागावांतील तरुण व्हालीबॉल खेळताना दिसतात. स्पर्धांमध्ये शेकडो टीम सहभागी होतात. ‘झुंड’च्या शूटिंगदरम्यान नागराजसोबत मनमोकळ्या चर्चा करताना, यांची माहितीही त्याने मनःपूर्वक ऐकून घेतली. ‘एवढं आटोपलं की जाऊया त्यांच्याकडे’ असे प्रॉमिसही त्याने केले. त्याच्या बोलण्यावरून त्याने सिनेमॅटिक लिबर्टी घेतली असावी, अनेक प्रसंगांत नाट्यमयता आणण्याचा प्रयत्न केला असावा, असे वाटले होते; परंतु ‘झुंड’ बघितल्यावर असे झालेले दिसत नाही. विजय बारसे यांनाही तसेच वाटते. जे घडले तेच सिनेमात त्याने चितारले आहे. त्यामुळेच ही कथा प्रेरणादायी ठरलेली दिसते. आपल्या आजूबाजूला आढळणारे असे आपल्यातीलच प्रेरणादायी रिअल ‘नोबेल’ हिरो आपल्याला जपता येणार नाहीत का?

pramodkalbande@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.