एक प्रासंगिक अनुभव

प्रसाद कुळकर्णी यांनी आपल्या ललित गद्यसंग्रहात आपल्या आकलनक्षमतेने समाजजीवनातील अनेक अर्क टिपून त्यावरील लेख वाचकांसमोर ठेवले आहेत.
prasangik prasad book
prasangik prasad booksakal

- वैभव रा. साटम

प्रसाद कुळकर्णी यांनी आपल्या ललित गद्यसंग्रहात आपल्या आकलनक्षमतेने समाजजीवनातील अनेक अर्क टिपून त्यावरील लेख वाचकांसमोर ठेवले आहेत. केवळ विनोदनिर्मिती करणे हा त्यांच्या लेखसंग्रहाचा उद्देश नाही. अनेक साध्या साध्या गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण त्यात आहे, जे वाचकाला विचार करायला लावतं.

आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, अनेक घटना घडत असतात. त्या सगळ्यांकडे जेव्हा आपण डोळसपणे पाहतो, तेव्हा त्यातून एक संवेदनशील आकृती, अर्थात साहित्यबंध तयार होतो. अशा घटना किंवा गोष्टी शब्दबद्ध करण्यासाठी ललित लेखासारखं दुसरं माध्यम नाही. त्या घटना जेव्हा कागदावर उतरतात, त्याबरोबर आठवणींचा एक पटच डोळ्यांसमोरून जातो. अशाच प्रासंगिक घटनांना प्रसाद कुळकर्णी यांनी आपल्या ‘प्रासंगिक प्रसाद’ या ललित गद्यसंग्रहात शब्दबद्ध केलं आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेला शीर्षक देण्याची फारशी पद्धत मराठीत नाही; परंतु धनश्री लेले यांनी त्याला ‘आरसा’ असं शीर्षक दिलं आहे. मला वाटतं, प्रसाद कुळकर्णी यांनी सामान्य माणूस समोर ठेवून त्यांना आपल्या लेखनातून आरसा दाखवला आहे, असं धनश्री लेले यांना अभिप्रेत असावं.

सदर लेखसंग्रहात एकूण २५ लेख आहेत. वर म्हटल्याप्रमाणे ते रोजच्या जगण्याचा भाग आहेत. लेखकाने आपल्या निरीक्षणक्षमतेने त्यातली गोम नेमकी पकडली आणि आपल्या आकलनक्षमतेने त्यातील अर्क टिपून लेख वाचकांसमोर ठेवले. त्यात ठिकठिकाणी लेखकाने आपलं घर, आजूबाजूचा परिसर, व्यक्ती, त्यांचे जगण्याचे संदर्भ, जीवनशैली, संस्कार हे अधोरेखित केले आहेत. लेखकाचा विचार आणि त्याचं लेखन यातील एकत्व, हा या ललित लेखांचा मध्यवर्ती विचार आहे किंवा तेच या गद्यसंग्रहाचं सूत्र आहे.

केवळ विनोदनिर्मिती हा या लेखसंग्रहाचा उद्देश नाही. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात. उदा., कपडे वाळत घालणं, ही तसं पाहिलं तर अगदी साधी गोष्ट; पण त्यातही लेखकाचं सूक्ष्म निरीक्षण वाचताना, ‘अरे, या गोष्टी आपल्या घरातदेखील घडतात’ हे जाणवून, आपलं त्याकडे कधी लक्ष न गेल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

‘केस भादरणं...’ ही क्रिया ठराविक काळाने घडणारी; परंतु त्यावरही लालित्यपूर्ण लिहिता येऊ शकतं, हे लेखकाने इथे दाखवून दिलं आहे.

या संग्रहात काही सामाजिक कौटुंबिक जाणिवांचा ऊहापोह करताना ‘मदतीचा हातभार’, ‘आलिया भोगासी’, ‘चिंता आणि भीती’, ‘पोचपावती - जन्मापासून मृत्यूपर्यंत’ हे लेख वाचकांच्या मनावर निश्चित परिणाम साधून जातात.

‘जबाबदार कोण?’ या लेखात तर लेखकाने, पालक म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारला आहे.

या लेखातील एक वाक्य, जे पालकांनी मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे ते म्हणजे, ‘पैसा हेच सर्वस्व नसून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग वंचितांसाठी यथाशक्ती करणं, हे आपण माणूस असल्याचं द्योतक आहे.’ हा संदेश लेखकाने पुढच्या पिढीतील पालकांना दिला आहे. यातील लेख आत्मकेंद्रित म्हणून सुरू होऊन बहुकेंद्रित होत जातात आणि आपल्याला चिंतन करायला भाग पाडतात. त्यातील सगळ्या लेखांचं सूत्र पुन्हा एकदा सामान्य माणसाभोवती फिरत राहतं.

लेखक बहुआयामी व्यक्ती असल्याने लेखांत क्रीडा, कला, सुगम नाट्य संगीत, ऐतिहासिक गोष्टी आणि समृद्ध करणारे संस्कार या सगळ्यांची एक वेगळी ओळख होऊन जाते. त्यातूनच ‘आठवणी दाटतात’, ‘जन पळभर म्हणतील’, ‘सुसंवाद साधण्याने’ यांसारखे लालितबंध समोर येतात. त्याचबरोबर, ‘स्पर्श’सारख्या लेखात तर कितीतरी भावनांना लेखकाने स्पर्श केला आहे.

ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे म्हणायचे, ‘ललित लेख हा समुद्रासारखा असतो, त्याला बांध नाही घालता येत.’ प्रसाद कुळकर्णी यांचा गद्यसंग्रहदेखील असाच आहे. नित्याचे जगणे, त्यातील सौंदर्य, त्यातील रसनिर्मिती जाणून घेणे आणि जगण्याकडे डोळसपणे पाहण्याची कला समजून घेण्यासाठी हा लेखसंग्रह वाचकांनी जरूर वाचावा.

चित्रकार संतोष घोंगडे यांनी रेखाटलेल्या अप्रतिम मुखपृष्ठावर एक माणूस आहे. जो लेखक आहे किंवा सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आहे. घोंगडे यांनी उभी केलेली व्यक्ती आपला भवताल सूक्ष्म दृष्टीने अवलोकन करत आहे, जे या संग्रहाचं गमक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com