वाळवंटातली ‘उद्योग फेरी’

शेतकऱ्यांना आणि शेतमाल व्यापाऱ्यांना भारताबाहेर आपला शेतमाल विकायचाय, त्यांना निर्यातदार बनायचंय आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे.
Animal Feed Manufacturers in Dubai
Animal Feed Manufacturers in Dubaisakal
Updated on

तपमान - ४५ अंश. स्थळ - अल अवीर बाजारपेठ, दुबई. महाराष्ट्रातील पंचवीस-तीस शेतकरी व शेतमाल व्यापारी पायपीट करत आहेत या आखाती देशातील सर्वांत मोठ्या फळबाजाराची, त्याला कारणही तेवढंच मोठं आहे.

या शेतकऱ्यांना आणि शेतमाल व्यापाऱ्यांना भारताबाहेर आपला शेतमाल विकायचाय, त्यांना निर्यातदार बनायचंय आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे. यातल्या काहींनी आपल्या उत्पादनांचे नमुने (सॅम्पल) सोबत आणले आहेत, त्यांना ती सॅम्पल संभाव्य ग्राहकांना दाखवायची आहेत.

भलेमोठे कन्टेनर, त्यांना वाहून नेणारी लांबलचक वाहनं, लगबग करणारे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी व इतर देशांतील स्थलांतरित कामगार या सर्वांनी ही अल अवीर बाजारपेठ गजबजून टाकली आहे. याच गर्दीत मूळचे पिंपरी-चिंचवडचे सिद्धेश पवार नावाचे गृहस्थ या तीस लोकांच्या मराठी शेतकऱ्यांच्या समुहाला येऊन भेटतात व त्या सर्वांना अल अवीर बाजारपेठ कशी काम करते, यात कोणते वेगवेगळे घटक आहेत.

भारतीय शेतमालाची स्पर्धा ही पाकिस्तानी, बांगलादेशी, इराणी मालाशी कशी आहे हे सांगत सांगत आपल्या वातानुकूलित ऑफिसमध्ये नेतात व शेतमाल निर्यातीतले खाचखळगे शांतपणे समजावून सांगतात. आज त्यांचा उद्योग नफ्यात आहे, मात्र यापूर्वी अगदी सुरुवातीलाच आपण कसं नुकसान झेललं हेसुद्धा ते आवर्जून सांगतात.

एक-दीड तासाच्या चर्चेनंतर हा समुह परत एकदा आणखी एका मराठी शेतमाल उद्योजकाच्या दारात पोहोचतो. मूळचे कोल्हापूरचे ४२ वर्षीय सुशांत फडणीस हे मागच्या वीसेक वर्षांपासून या उद्योगात आहेत. फडणीस आपल्या ६०० चौरस फूट ऑफिसमध्ये या सगळ्यांचं स्वागत थंडगार पाणी आणि लस्सी देऊन करतात.

दुबईतल्या पवारांच्या आणि फडणीसांच्या ऑफिसमध्ये थंडगार पाणी आणि लस्सी काय व महाराष्ट्रस्थित एखाद्या उद्योजकाच्या ऑफिसातील कडक चहा काय, योग्य ते पेय देऊन स्वागत करणं ही आपली परंपराच. थंड पेयाने स्थिरस्थावर झालेल्या, डोळ्यांत निर्यातीचं स्वप्न व अत्यंत एकाग्रपणे ऐकत बसलेल्या मराठी पाहुण्यांना फडणीस आपला वीस वर्षांचा बरा-वाईट अनुभव व त्यातून झालेली काही लाख ते आता शेकडो कोटींपर्यंतची उलाढाल हा प्रवास विस्तृतपणे सांगतात.

पाहुण्या शेतकऱ्यांच्या व शेतमाल व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरं देतात व कुठलाही बडेजावपणा न आणता आपले अनुभव व आपल्या चुका व त्यातून शिकलेले धडे सांगतात. मी केलेल्या चुका तुम्ही करू नका, हे सांगायलाही ते विसरत नाहीत.

पवार व फडणीसांसोबतच्या चर्चेतून बरेच मुद्दे अधोरेखित होत होते. प्रामुख्याने भारतीय शेतमाल व प्रक्रिया केलेलं अन्न यासाठी जगभरात भलीमोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. दुबई हे या क्षेत्रातील निर्यातीसाठी एक मोठं केंद्र आहे. इथून ७०-८० देशांमध्ये आयात-निर्यात होते. या बाजारपेठत निर्यात करायची असेल, तर अगदी काही लाखांपासूनही सुरुवात करता येते; मात्र इथं दीर्घकालीन यश हवं असेल, तर आपल्या मालाची गुणवत्ता व वर्षभर पुरवठ्याचं सातत्य हे महत्त्वाचे निकष आहेत, या मुद्द्यांवर विशेष भर दिसला.

या दुबईस्थित मराठी उद्योजकांनी पाहुण्या मराठी इच्छुक निर्यातदारांची सॅम्पल पहिली व त्यावर प्रतिक्रिया दिली, मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर हा समुह दुसऱ्या एका बाजारपेठेकडे निघाला. हे सर्व मी याच समुहाचा भाग बनून ऐकत होतो, पहात होतो, अनुभवत होतो. हा समुह म्हणजेच ‘एमसीसीआयए’चे शेतमाल निर्यात प्रतिनिधी मंडळ (ॲग्री बिझनेस डेलिगेशन).

माझे सहकारी शंतनू जगताप यांनी मागच्या चार-सहा आठवड्यांत शेतमाल निर्यातीत रस असणारे असे पंचवीस शेतकरी व शेतमाल उद्योजक व त्यांच्यासोबत ‘एमसीसीआयए’शी जोडले गेलेले दोन शेतमाल निर्याततज्ज्ञ यांचा एक ग्रुप, एक समुह बनविला.

हा सर्व प्रवास आणि दुबईतील भेटी सुखकर व्हाव्यात यासाठी एका संस्थेची मदतही घेतली. या समुहामध्ये यवतमाळ, नांदेड, अहमदनगर, पुणे अशा विविध जिल्ह्यांतून शेतकरी सहभागी झाले.

सकाळच्या अल अवीर सत्रानंतर, दुपारच्या सत्रात आम्ही उत्तर दुबईकडे वळलो. इथं देरा नावाच्या जुन्या दुबईत अल रास बाजारपेठ आहे. या भागात असलेल्या लखलखीत, प्रसिद्ध सोन्याच्या बाजारपेठेचा मोह टाळत, बाजूच्याच मसाले बाजारपेठेकडे वळलो. आमच्यापैकी काही जणांनी हळद, मनुके, गुळाची पावडर, बाजरीसारख्या मिलेटच्या मिठाईचे काही प्रकार सॅम्पल म्हणून आणले होते.

आम्ही ही सॅम्पल आठ-दहा दुकानांमध्ये दाखवली. हा माल विकत घेण्यासाठी काही घाऊक व्यापाऱ्यांनी रस दाखविला. पुढच्या काही दिवसांत थोड्या वाटाघाटी होऊन किंमत ठरेल व भारताच्या कृषी उत्पन्न निर्यातकांच्या यादीत यातली काही नावं जोडली जातील.

या अल रास बाजारपेठेत मी पंढरपूरच्या एका शेतकऱ्यासोबत फिरलो. त्यांचं मनुक्यांचं सॅम्पल घेऊन आम्ही एकापाठोपाठ एक असं जोबी जॉन, स्प्रिंग वेली, जय मुलानी, जी. एन. ट्रेडिंग कंपनी, अहमद अब्दुल्ला संदेश ट्रेडिंग कंपनी हे मोठे व्यापारी गाठले.

त्या सर्वांनी एक नजर आमच्याकडे व एकच नजर सॅम्पलवर टाकली व भारतीय मनुक्यांमध्ये थोडासा सल्फर असतो (म्हणजेच मालाची गुणवत्ता कमी), त्यामुळे हा माल आम्ही घेऊ शकत नाही, असं झटक्यात सांगून आम्हाला निरोप दिला. त्या सर्वांनी याचवेळी इराणी मनुक्यांची खूप स्तुती केली.

शेवटी आम्ही याच बाजारपेठेत आणखी एका घाऊक व्यापाऱ्याला (आयतदाराला) गाठलं आणि त्यांनी मात्र आम्हाला किंमत सांगा, किंमत योग्य असेल तर घ्यायला तयार आहे असं दर्शवलं. त्याच्या बाजूलाच असलेल्या मधुर स्टोअर्सनेसुद्धा आमच्यापैकी इतरांना चांगलीच दाद दिली व आणखी थोडी चर्चा करून किंमत ठरवू असं सांगितलं.

अल अवीर व अल रास या अनुक्रमे फळभाज्यांच्या व मसाल्यांच्या दोन बाजारपेठांत अख्खा दिवस पायपीट केली. असे आम्ही चार दिवस दुबईत होतो. इतर दिवशी आम्ही पोर्ट व वखारी, गोदामांना भेटी दिल्या. दुबईत नवीन कंपनी कशी स्थापन करायची, त्याच्या अटी-शर्ती काय हे जाणून घेतलं.

‘एमसीसीआयए’शी जोडल्या गेलेल्या दोन शेतमाल निर्याततज्ज्ञांच्या विनंतीवरून चार-पाच मराठी आयातदार आम्हाला भेटायला आमच्या हॉटेलपर्यंत आले. या सर्व मराठी मंडळींनी एकानंतर एक आपले निर्यातीचे व दुबईत कंपनी स्थापन करण्याचे व ती चालविण्याचे अनुभव कथित केले.

आता ही मंडळी स्वतः एक ऑफिस महाराष्ट्रात व एक दुबईत या थाटात निर्यात-आयात करतात. यातील काही जणांनी पूर्ण सेल्स स्टेटमेंट उघड केलं. यामध्ये आपला माल शेतीतून बाहेर पडल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती - कोल्ड चेन (शीत साखळी) - मुंबई पोर्ट - जबल अली दुबई पोर्ट - दुबईतील गोदाम - दुबईतील घाऊक व्यापारी - दुबईतील सुपर मार्केट - दुबईतील ग्राहक ते दुबईतील स्वयंपाकघर हा सर्व प्रवास, यातील प्रत्येक पायरीसाठी लागणारा खर्च, त्यापैकी कोणाला (निर्यातदार/आयातदार) कोणता खर्च करायला लागतो... अशी सर्व इत्थंभूत माहिती सांगितली.

या सर्वांचे आभार मानून या प्रवासाच्या शेवटच्या दिवशी आम्ही दुबई एअरपोर्ट गाठलं. रस्त्यात एक-दोन गिफ्ट शॉपना भेट दिली व प्रत्येकाने आपापल्या आप्तेष्टांसाठी काही खरेदी केली. एअरपोर्टकडे धावणाऱ्या गाडीमध्ये एक ऊर्जा होती, एक उत्साह होता, मागच्या चार दिवसांतील भेटींचं समाधान होतं, काहींसाठी डील झाल्याचा किंवा होत असल्याचा आनंद होता.

असा हा समुह महाराष्ट्राच्या चार-पाच वेगवेगळ्या भागांतील मराठी भाषेतील चर्चेचा आस्वाद घेत, हसत-खेळत दुबई एअरपोर्टला पोहचला व वेळेवर विमानात बसून पुढल्या तीन तासांत मुंबई शहर गाठलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.