संवेदनशील माणसाचं व्यापक समाजचिंतन

संवेदनशील माणसाचं व्यापक समाजचिंतन
Updated on

प्रतापराव पवार हे सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक म्हणून सर्वांना परिचित आहेत. स्वत: घडताना इतरांचं आयुष्य घडवणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात ओलावा निर्माण करणाऱ्या प्रतापरावांच्या प्रेरक वाटचालीची वेधक कहाणी ‘वाटचाल’ या पुस्तकात आहे. उद्योग आणि वृत्तपत्र एवढ्याच मर्यादित चौकटीत स्वत:ला बांधून न घेता समाजासाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांचे ते सक्रिय कार्यकर्ते बनले. त्यामुळं समाजजीवन त्यांना जवळून पाहता आलं. समाजमानस समजून घेता आलं. आयुष्याला समृद्ध करणारे; तसेच व्यथित करणारे अनुभवही त्यांच्या वाट्याला आले. या प्रवासात त्यांना खूप मोठी माणसं भेटली. वरून साधी दिसणारी; तरीही आपल्या ध्येयवादाच्या बळावर कामाचे डोंगर उभे करणारी माणसंही त्यांनी पाहिली. त्यांनी देश-विदेशात डोळसपणे भ्रमंती केली. तिथलं समाजजीवन समजून घेतलं. या साऱ्या वाटचालीविषयी त्यांनी ‘वाटचाल’ (भाग दुसरा) या पुस्तकात लिहिलं आहे. परिवर्तनाची आस बाळगणाऱ्या संवेदनशील माणसाचं समाजचिंतन या पुस्तकात आहे.

माणूस ज्या वातावरणात वाढतो, त्या वातावरणाचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. जीवनाला समृद्ध करणाऱ्या आणि माणुसकी शिकविणाऱ्या काटेवाडीतल्या रम्य बालपणाविषयी त्यांनी ‘सुटीचे दिवस’ या लेखात लिहिलं आहे. त्यातून माणूसप्रेमी प्रतापरावांची जडणघडण समजते. बिट्‌स पिलानीमध्ये शिकत असताना तिथल्या अनेक मराठी कुटुंबांशी त्यांचे स्नेहबंध जोडले गेले. पुत्रवत स्नेह करणारी माणसं आणि त्यांचे अनुभव ‘पिलानी : माझे दुसरे गाव’ या लेखात वाचायला मिळतात. ‘सकाळ’मुळं प्रतापरावांचं आयुष्य बदलून गेलं; पण या वाटचालीची सुरवात ‘विशाल सह्याद्री’मधून झाली. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्या आग्रहामुळं प्रतापरावांनी ‘विशाल सह्याद्री’ची जबाबदारी घेतली. ती पेलत असताना आलेल्या अनुभवांविषयीचं ‘महागातील रंगीत तालीम’ हा लेख वाचण्याजोगा आहे.
‘उन्नतीसाठी एकत्र’, ‘माणसाची वृत्ती’, ‘भान’, ‘माणसाच्या मनाचे प्रतिबिंब’, ‘मोठ्यांच्या छोट्या गोष्टी’ आणि ‘लॉटरी जरा जपूनच’ हे ‘निरीक्षणे’ या विभागातील लेख प्रतापरावांच्या सार्वजनिक आणि संस्थात्मक कार्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांविषयीचे आहेत. सारेच अनुभव संस्मरणीय नाहीत; काही विदारकही आहेत. त्यांचा लेखाजोखा मांडताना या अनुभवांनी कोणतं शहाणपण आणि दृष्टी दिली याविषयी प्रतापरावांनी केलेलं भाष्य वाचकांनाही जाणतेपण देणारं आहे. ‘समाजाने उन्नतीसाठी एकत्र यायला हवे वगैरे सांगणे खूप सोपे असते, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर टीका करणे तर त्याहून सोपे असते; पण माणसांना एकत्र बांधणे खूप अवघड असते’, ‘आपल्याला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय अशा पद्धतीने सामाजिक अथवा व्यावसायिक वर्तन टिकत नाही; पण संबंधित लोकांना हे मान्य होत नाही’, ‘आपल्या दात्यांकडूनही काय आणि किती अपेक्षा ठेवायच्या याचे भान सामाजिक संस्थात काम करणाऱ्या लोकांना असले पाहिजे’, ‘मोठ्यांच्या छोट्या भेटीमागे फार मोठा आशय दडलेला असतो’ आदी विचार चिंतन करायला लावणारे आहेत.

अनेक कारणांनी प्रतापरावांची जगभर भ्रमंती झाली. या भ्रमंतीदरम्यान त्यांची भूमिका पर्यटकाची कधीच नव्हती. होती ती एका जिज्ञासूची. ते देश पाहताना त्यांनी केवळ तिथली पर्यटनस्थळं पाहिली नाहीत. तिथली माणसं, समाज, त्यांची मानसिकता, संस्कृती आणि त्या देशांची झालेली प्रगती आणि घसरण यासाठी कारणीभूत ठरलेले घटकही अभ्यासले. त्याविषयी त्यांनी ‘परदेश’ या विभागातील लेखांमधून लिहिलं आहे. इस्तंबूलच्या संपन्न परंपरेविषयी ते लिहितात. येशू ख्रिस्तांच्या आईचं देहावसान तुर्कस्तानातील एका गावात झालं. ज्या डोंगराजवळ ही माता राहत असे, ती वास्तू, तिथला परिसर आणि जाण्याचा सबंध रस्ता बांधण्यासाठी ९५ टक्के रक्कम मुस्लिम धर्मीय लोकांनी दिली. तिथले ख्रिस्ती धर्मीय लोक अतिशय अभिमानानं आणि आपुलकीनं ही गोष्ट सांगतात, याकडं ते लक्ष वेधतात. तिथल्या खेड्यात घरावर बाटल्या टांगलेल्या दिसल्या, त्या घरातली मुलगी लग्नाची आहे, असा संदेश त्यामागं असतो. हे साधं वाटणारं, तरीही संस्कृतीचं दर्शन घडविणारं निरीक्षण ते नोंदवतात. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळू लागतील आणि प्रगतीचाही वेग वाढेल, याचा धडा स्विर्त्झलंडनं कसा घालून दिला आहे आणि यातून भारताला काय शिकता येईल याकडं ‘स्वित्झर्लंडचा धडा’ या लेखातून त्यांनी लक्ष वेधलं आहे. कंबोडियावर भारतीय संस्कृतीचा पगडा कसा आहे आणि व्हिएतनामला चीनचं उदाहरण भारतापेक्षा जवळचं आणि महत्त्वाचं का वाटतं, याचं प्रतापरावांनी केलेलं विश्‍लेषण महत्त्वाचं आहे. ‘ब्रिटनमधील सहानुभूतीची लाट’ या लेखात ‘डायनाच्या अंत्यसंस्कारानंतर सहानुभूतीची लाट तिचा मुलगा प्रिन्स विल्यमवर केंद्रित झाल्याचं तिथल्याच वृत्तपत्रानं म्हटलं होतं. ते वाचताना मला वाटलं, आपल्या संस्कृतीत फरक असला आणि भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असली तरी मूळ प्रवृत्तीत फारसा फरक नाही,’ असं मार्मिकपणे ते लिहितात.
‘निरंतर शिक्षण’ या विभागातल्या लेखांमधून त्यांचं शिक्षणाविषयीचं सखोल चिंतन दिसून येतं. संस्था खासगी असो, निमसरकारी असो, वा सरकारी- सर्व बाबींत समाजातल्या जाणकार व्यक्तींना, संस्थांना विश्‍वासात घेतल्यास प्रगतीचा वेग कसा वाढतो, हे पुण्यातल्या शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयातला अनुभव सांगत त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या शैक्षणिक प्रगतीचं रहस्य कशात आहे, हे उलगडून दाखवताना तिथला अध्यापकांचा दर्जा, शैक्षणिक गुणवत्ता, उद्योग आणि शिक्षणसंस्था यांच्यातला संवाद आणि समाजाच्या भल्यासाठी शिक्षण ही मानसिकता कारणीभूत आहे आणि या मुद्‌द्‌यांकडं भारतानं किती गांभीर्यानं लक्ष देणं जरूरीचं आहे, याची जाणीव करून देतात. ज्ञानाधिष्ठित आणि वैभवशाली समाजाकडं वाटचाल करताना कोणती कार्यपद्धती आत्मसात केली पाहिजे आणि सर्जनशील शिक्षणातून शिक्षित मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळात रूपांतर करत जागतिक दर्जाकडं कशी वाटचाल केली पाहिजे, याचा कृती आराखडा ते मांडतात, त्यासाठी प्रश्नांतही संधी शोधल्यानं इस्राईलची प्रगती कशी झाली, याचं ते उदाहरण देतात.

‘नव्या युगातील वृत्तपत्रांचे व्यवस्थापन’, ‘वॅनची कार्यपद्धती’, ‘भाषिक वृत्तपत्रांचे महत्त्व’, ‘भविष्याची पायाभरणी’, ‘वाचक हाच केंद्रबिंदू’ या लेखांतून ते वृत्तपत्रविश्वाची सफर घडवतात आणि या क्षेत्रात झपाट्यानं होत असलेल्या स्थित्यंतरांचा वेध घेतात. प्रचंड स्पर्धेच्या आणि बदलांच्या रेट्यात टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे, याचं मार्गदर्शन करतात

‘परिवर्तन’ ही दुधाचे दही होण्याइतकी जलद प्रक्रिया नाही. काळाचं भान ठेवून, साचेबद्ध विचारांच्या जोखडातून बाहेर पडून, नवतेचा आणि बदलाचा स्वीकार करून, सर्जनशीलता-प्रयोगशीलता-कृतीशीलता यांची कास धरून परिवर्तनाची पावलं टाकता येतात. या ‘परिवर्तनाच्या दिशां’विषयी प्रतापरावांनी केलेलं लेखन खूप महत्त्वाचं आहे. पुण्यातल्या लोकांनी इच्छाशक्ती आणि प्रयत्नवाद दाखवल्यास हे देशातलं सर्वोत्तम शहर बनेल असा आशावाद व्यक्त करताना, विचारमंथन करून जुन्या समस्यांना नवी उत्तरं शोधण्याची संधी दवडता कामा नये याची जाणीव ते करून देतात. प्रदूषण टाळूनच उत्सव साजरे झाले पाहिजेत, अशी ठाम भूमिका मांडतात. पर्यटनातून माणसाची प्रवृत्ती बदलावी, प्रश्न सोडवताना विरोधाबरोबरच तो कशा पद्धतीनं सोडवावा याचं शहाणपण राज्यकर्त्यांना यावं, चाकोरीबाहेरची व्यवहार्य कृती प्रगतीला पोषक ठरावी, संपत्तीनिर्मितीचा ध्यास समाजकल्याणाला पूरक ठरावा, सुव्यवस्था ही सार्वजनिक जबाबदारी व्हावी यासाठी काय स्वीकारलं पाहिजे आणि काय नाकारलं पाहिजे, याविषयी उदाहरणांसहित त्यांनी केलेलं विवेचन परिवर्तनाच्या वाटा चोखाळण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.

‘अर्थकारण’ या सदरातल्या लेखांतून आर्थिक विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. ‘अर्थ’ मिळण्याचे काही ‘संकल्प’ विशद केले आहेत. ‘ब्रेनड्रेन’ या लेखात ‘माणसांची बॅंक भौतिक समृद्धीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे,’ याकडं लक्ष वेधलं आहे. ‘इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर’च्या उभारणीच्या रंजक इतिहासाविषयी लिहिलं आहे. भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या विचारसूत्रांनी काम केलं पाहिजे, याचं त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.

या पुस्तकातून समाजमनस्क प्रतापरावांच्या माणूसवेड्या, समाजाभिमुख, चतुरस्त्र, अभ्यासू, जिज्ञासू, व्यासंगी, उद्यमशील, विचारसंपन्न आणि द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाचं मनोज्ञ दर्शन घडतं. या वाटचालीत त्यांनी केलेलं समाजचिंतन अनेकांना आपल्या भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल. चोखंदळ वाचकांनी आवर्जून वाचावं, असं हे पुस्तक आहे.

पुस्तकाचं नाव : वाटचाल (भाग दुसरा)
लेखक : प्रताप पवार
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे
पृष्ठं : २३९/
मूल्य : १९० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()