Life
LifeSakal

हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही!

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी एका कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी लंडनला चाललो होतो. विमानात बसायला ऐसपैस जागा होती. हवाईसुंदरी मधूनमधून येऊन काही स्नॅक्स वगैरे देण्याचा प्रयत्न करत होत्या.
Published on

व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी एका कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी लंडनला चाललो होतो. विमानात बसायला ऐसपैस जागा होती. हवाईसुंदरी मधूनमधून येऊन काही स्नॅक्स वगैरे देण्याचा प्रयत्न करत होत्या. आता एक तर भूक मर्यादित लागते आणि मोकळा वेळ असला तरी काही तरी हादडत राहावं हे मला आवडत नाही. मग काय करायचं? विमानात असलेली वर्तमानपत्रं-मासिकं तीन-चार तासांत वाचून काढली.

दुबई असो वा युरोप, तिथल्या वर्तमानपत्रांचं बदलतं स्वरूप काय आहे... मासिकांमध्ये किती आणि कोणते विषय प्रामुख्यानं मांडले आहेत... त्यांचं प्राधान्य कशाला आहे... अशा अनेक चाळण्या माझ्यासारख्यांकडून आपोआप लावल्या जातात. ‘सकाळ’, ‘सकाळ साप्ताहिक’ यांच्यासाठी काही सुचलं तर मी ते लिहून ठेवतो. संबंधित संपादकांशी चर्चाविनिमय करणं सोपं जातं. अर्थात्, यातलं आपल्याला काय लागू आहे हे तर पाहावंच लागतं.

उरलेल्या वेळेचं काय करायचं? एक तर झोप काढणं किंवा एखादा सिनेमा पाहणं, गाणी ऐकणं हाच पर्याय राहतो. कुणाशी गप्पा मारण्याचा प्रश्‍नच नसतो. एक तर शेजारी कुणी नसतोच आणि असला तर तो किंवा ती घुमी असते. ब्रिटिश जसे ओळख असेल तरच किंवा काही कारण असेल तरच संवाद साधतात, तसं होतं अशा वेळी.

मग अशा परिस्थितीत, समोरच्या टीव्हीवर एखादा हिंदी/मराठी सिनेमा सापडतोय का ते पाहत होतो. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हा सिनेमा दिसला. पूर्वी पाहिला होता. त्या वेळी तो आवडला असल्यानं पुन्हा लावला. या सिनेमात स्पॅनिश संस्कृतीची झलक दाखवत त्या देशाची सहल घडवून आणण्यात आली आहे. त्यातली भारतीय प्रेमकथा, लोकप्रिय हीरो या कारणांमुळे हा सिनेमा पुन्हा पाहण्याचा मोह होणं साहजिक होतं.

पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वर्तमानपत्रांच्या जागतिक संघटनेची (वॅन) दहा-बारा वर्षांपूर्वी वार्षिक सभा बार्सिलोना या शहरात होती. स्पेनची राजधानी माद्रिदनंतरचं हे दुसऱ्या क्रमांकाचं शहर. मी आणि भारती माद्रिदला गेलेलो होतो. जगातील वर्तमानपत्रांच्या क्षेत्रातील आमच्या काही मित्रांची भेट होणार असल्यानं आम्ही उभयता गेलो. ही फक्त वार्षिक सभा नसते. तिथं एक भव्य प्रदर्शन असतं.

त्यात सध्याच्या काळातली आणि भविष्यकाळातली अनेक तंत्रज्ञाने, मशिनरी वगैरेंचंही प्रदर्शन असतं. काही नवीन विचारांवर होणारे संभाव्य परिणाम यांवर चर्चासत्रे असतात. यशस्वी प्रयोगशीलतेची त्या कंपनीकडून सर्वांना माहिती करून दिली जाते. म्हटलं तर हा एक ज्ञानसोहळा असतो. शिवाय, एका संध्याकाळी एखादा स्थानिक संस्कृतीचा, करमणुकीचा कार्यक्रम, तसंच जेवण वगैरेही असतं. वेळ छान जातो.

शिकायला मिळतं. जुन्या-नव्या मित्रांच्या भेटी-गाठी होतात. एकमेकांच्या बायकांची मैत्री झालेली असते आणि बायकांसाठी शहरातील काही वैशिष्ट्यं दाखवण्याचे कार्यक्रम असतात. आम्ही आमच्या चर्चासत्रांत गुंतलेलो, तर सर्वांच्या बायका शहरात मनसोक्त भटकंती करण्यात व्यग्र. यामुळे सर्वांचाच वेळ छान जातो.

मी नेहमीच ‘सकाळ’मधील संपादकीय विभाग, तंत्रज्ञान विभाग, मार्केटिंग विभाग यांतल्या तीन-चार लोकांना अशा ठिकाणी पाठवत असे. सर्व अनुभव, विशेषतः भविष्यकाळाची चाहूल, ही ‘सकाळ’ची प्रमुख धुरा वाहणाऱ्यांना जाणवावी हा त्यामागील विचार असतो. दुपारच्या जेवणाच्या वेळी आम्ही एकत्र भेटून चर्चाही करत असू. यातून एक भावनात्मक जवळीक साधली जाते. सर्वजण एका ध्येयातून-विचारातून उत्साहानं पुढच्या कामाला लागतात.

टीव्हीवर पाहत असलेल्या सिनेमाकडे मी आता पुन्हा येतो. त्यात फ्लेमिंगो या जगप्रसिद्ध स्पॅनिश नृत्याच्या निमित्तानं एका छान गाण्याचा प्रसंग गुंफलेला आहे. त्यावरून दहा-बारा वर्षांपूर्वीचा अनुभव आठवला. अशाच एक स्पॅनिश नृत्य-सभागृहात आम्ही जायचं ठरवलं. बरोबर दोन-तीन भारतीय मित्र होते. ज्या ठिकाणी गेलो तिथल्या प्रमुख नर्तिकेचा परिचय तिथं दिलेला होता. त्यात ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमाचाही उल्लेख होता!

आम्ही सर्व यामुळे खूश. कार्यक्रम सुंदर झाला. आपल्याकडील कथक नृत्याचा त्यावर प्रभाव असल्याचं सांगण्यात आलं. कथक नृत्यावर पहिल्यांदा मुघल राज्य आल्यावर त्यांच्या संस्कृतीचा परिणाम झाला. वेशभूषा, दागिने, पदलालित्य यांचा हा संगम होता. अर्थात्, लखनौ त्याचं प्रमुख केंद्र होतं.

उत्तर आफ्रिका जिंकल्यावर मुसलमान धर्मानं स्पेनचा बराचसा भाग जिंकला. मुघलांचं राज्य स्पेनपर्यंत पसरलेलं होतं. असं सांगण्यात आलं की, या फ्लेमिंगो नृत्यामध्ये जे पदलालित्य आहे, त्याचा मोठा भाग आपल्या कथक नृत्यांतून आलेला आहे. बारकाईनं पाहिलं तर, विचार केला की ते पटतं. असो.

कार्यक्रम संपला.

आम्ही सर्वजण परत जायला निघालो तर रस्त्यावर हीऽऽ गर्दी. सर्व तरुण-तरुणींचा जल्लोष! आम्हाला काही समजेना. वाहतूक वगैरे पूर्णपणे कोलमडून गेली होती. कर्कश हॉर्न, आरडाओरडा याला ऊत आला होता. पोलिस आसपासही दिसत नव्हते. रस्त्यावर, फुटपाथवर अगदी झाडांवर किंवा विजेच्या खांबांवर चढून तरुण आपला आनंद व्यक्त करत होते. माहिती घेतल्यावर समजलं की, फुटबॉलची एक प्रमुख स्पर्धा बार्सिलोनाच्या संघानं जिंकली होती. आपल्याकडे गणपती-विसर्जनाच्या वेळी तरुणांमध्ये जशी ऊर्जा संचारते तसंच किंवा त्याहीपेक्षा बरंच मोठं हे स्वरूप होतं.

आता काय करायचं? टॅक्सी मिळणार नव्हती. एका दिशेनं सुमारे मैलभर चालत गेल्यावर टॅक्सी मिळेल असं आम्हाला सांगण्यात आलं. ‘जपून जा, सर्व गोष्टींची काळजी घ्या...’ असाही सल्ला देण्यात आला.

मी माझा पासपोर्ट आणि पाकीट कोटाच्या आतल्या खिशात ठेवलं. भारतीने दागिने वगैरे पर्समध्ये ठेवून दिले. आम्ही सर्वांनी छातीच्या ठिकाणी हाताची घडी घालून जायचं ठरवलं. हैदराबाद इथल्या माझ्या मित्रानं एक खास विजार घातलेली होती. तिला गुडघ्याच्या खाली दोन खिसे होते. त्यानं आपले दोन्ही मोबाइल फोन दोन्ही बाजूंच्या खिशात ठेवले. आम्ही सर्वजण ओळीनं, एकमेकांवर लक्ष ठेवत चालू लागलो.

अर्थातच मी भारतीच्या पाठोपाठ काळजीपूर्वक चालत होतो. कशीबशी वाट वाढत आम्ही टॅक्सी मिळेल त्या ठिकाणी काही वेळानं पोहोचलो. आपल्या सगळ्या चीजवस्तू सुरक्षित आहेत ना याची तपासणी करायला आम्ही सुरुवात केली. पाहतो तर काय, आमच्या मित्राच्या पँटच्या खिशातील दोन्ही मोबाइल गायब! तरी आम्ही सर्वजण एकमेकांशी बोलत, लक्ष ठेवत चालत आलो होतो.

रस्त्यावर कुणीही, कुठंही बसलेला आढळला नव्हता तरीही स्पॅनिश माणसानं चौर्यकला यशस्वीपणे पार पाडली होती. सुदैवानं माझ्याकडे दोन फोन होते. त्यातला एक मी त्याला दिला. एरवी, त्याचा सर्वांशी संपर्कच तुटला असता.

आता थोडकं बार्सिलोनाबाबत. हे शहर सुंदर स्पेनचं सांस्कृतिक केंद्र. महाराष्ट्रातल्या आपल्या पुण्यासारखं. त्यामुळे त्या शहराबद्दल स्थानिकांना प्रचंड अभिमान. अर्थात्, हे सर्वत्र आढळतं. उदाहरणार्थ : जर्मनीमध्ये ‘उत्तर जर्मनी’ आणि ‘दक्षिण जर्मनी’ असा अलिखित भेदभाव आहे. त्यातून बव्हेरिया हा प्रांत स्वतःला सर्व जर्मनांपेक्षा सरस मानतो. याचा त्यांना आजही अभिमान आहे. त्यांची शिस्तही अगदी कडवी, वेगळेपण ध्यानात यावं इतकं.

आपल्यातही पुण्याचं, आणि त्यातही सदाशिव पेठेचं, वेगळं स्थान मानलं जातंच ना, तसंच काहीसं. ...तर बार्सिलोना या शहराबद्दल सांगत होतो. पहिल्या शतकाच्या सुमारास रोमन लोकांनी इथं वसाहत केली. तिथून या शहराचं महत्त्व वाढतच राहिलं व विकास होतच राहिला.

माद्रिद या स्पेनच्या राजधानीनंतर हे दुसरं मोठं आणि महत्त्वाचं गाव/शहर. कला, क्रीडा, सौंदर्यपूर्ण चर्चच्या विविध इमारती यांचा सुरेख संगम असलेलं, सौंदर्यानं नटलेलं, खाण्या-पिण्याची चंगळ असलेलं. सर्वसाधारणपणे वर्षभर हवामान छान असतं...छान समुद्रकिनारा...अनेक गोष्टी सांगता येतील. स्थानिकांना आपल्या या सर्व गोष्टींचा अभिमान आणि गर्वही! स्थानिकांनी प्रेमात पडावं असं हे शहर. मात्र, अशा गोष्टी जगात इतरही आढळतात. कॅनडातील व्हँकुव्हर, ऑस्ट्रेलियातील सिडनी, ऑस्ट्रियातील व्हिएन्ना वगैरे.

माझ्या मनात सहज एक विचार येतो : आपण कोणत्या गावाच्या आजही प्रेमात आहोत? उत्तर येतं : बारामती! कारण, ते आपलं पहिलं प्रेम असतं. विसरता येत नाही. आपल्याकडे महिला वयानं कितीही वाढल्या तरी त्यांना माहेरचं प्रेम, आकर्षण असतंच ना? काहीसं तसंच माझ्या बाबतीत आहे. तिथल्या मातीत मी जन्मलो, वाढलो, त्यामुळे कसं विसरणार? भले, बार्सिलोना कितीही आवडलं तरीही. तुम्हीही माझ्या या मताशी सहमत व्हाल, अशी आशा आहे. आपण प्रांताच्या, देशाच्या बाहेर पडलो की अशी विचारधारणा सुरू होतेच. मग, पडा आता बाहेर आणि अनुभवा, आठवा आपलं माहेरगाव!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.