- व्हॉट्सॲप मेसेज : ८४८४९ ७३६०२
‘सकाळ’मध्ये सर्व स्तरांवर सामाजिक जाण आहे. एकदा आमच्या निवृत्त कामगारांच्या सत्काराचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सुरू होता.
‘सकाळ’नं मला काय दिलं वगैरे याबद्दल एक कामगार ऋण व्यक्त करत होता. नोकरी करत असताना आणि त्यानंतर काय सामाजिक कामं करणार याबद्दल तो मनापासून बोलत होता. संपादकांनी माझ्याकडे मिश्किलपणे कटाक्ष टाकला. ते सुचवत होते, ‘हे तुमचंच बाळ बोलत आहे!’
थट्टेचा भाग सोडला तर ‘सकाळ’मधील अधिकारीवर्गही, आपण काय काय सामाजिक प्रकल्प करू शकू, अशा सूचना करत. त्यांत सहभागी होण्याची त्यांची तयारी तर असेच; परंतु मुख्यतः जबाबदारी घ्यायलाही ते तयार असत आणि असतात...अशाच आग्रही कल्पनांतून दोन न्यासांचा जन्म झाला.
पुण्यातल्या वाहतुकीबद्दल बोलायलाच नको. विशेषतः शाळा भरते किंवा सुटते तेव्हा मोठी गर्दी तर होतेच; परंतु मुलांच्या आयांची मोठी धांदल उडत असते. अनेक चौकांत, मुख्य रस्त्यांवर येणाऱ्या बोळांतून अथवा छोट्या रस्त्यांच्या ठिकाणी हमखास गर्दी होते.
कारण, प्रत्येक जण आपलं घोडं दामटत मार्ग काढत असतो; मग तो पादचारी असो अथवा मोटार चालवणारा. जिथं सिग्नलचे दिवे लागलेले आहेत अशा चौकांत हा प्रश्न फारसा येत नाही; परंतु ही सोय म्हटलं तर मर्यादित आहे.
कल्पना अशी आली की, सकाळी किंवा संध्याकाळी वाहतूक कमाल स्तरावर असते तेव्हा आपण सामाजिक कार्यकर्ते, कमी वेतनावर काम करू इच्छिणारे, गरजू विद्यार्थी यांना प्रशिक्षित करून वाहतुकीबाबत मार्गदर्शन करायचं.
हे काम सर्व साधारणतः वाहतूक पोलिस करतात; परंतु ते कमी पडतात. हा प्रयोग ‘निर्धार’ या न्यासांतर्गत सुरू झाला. अर्थातच चांगले-वाईट अनुभव आले.
माझा आग्रह असतो की, सामाजिक कामांमध्ये ‘सकाळ’बरोबर ज्यांचा फायदा होतो त्यांचेही सर्व प्रकारे योगदान, सहभाग हवा. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात No free lunch असाच काहीसा दृष्टिकोन; परंतु सामाजिक भूमिकेतून.
अंदाजे ५५ वर्षांच्या एक बाई या कामासाठी पुढं आल्या. त्यांना पाहून या कसं काम करू शकणार ही शंका आली; परंतु त्यांचाच उत्साह आणि निर्धार पाहून आम्ही मान्यता दिली. त्यांचं नाव प्रभा नेने. या बाईंचं आयुष्य मोठं उद्बोधक आहे. आज ऐंशीव्या वर्षीही त्या ‘निर्धार’साठी रस्त्यावर उभ्या असतात!
आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या रहिवाशांना, दुकानदारांना आर्थिक भार उचलण्याची विनंती केली. काही शाळांमध्ये पालकांना महिना १० रुपये या स्वयंसेवकांना देण्यासाठी विनंती केली. कारण, त्यांच्याच पाल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. बहुतांश यश आलं.
वाहतूकनियोजनाचं हे काम सुरू असताना वाहनचालकांना शिस्त व नियम यांचं ज्ञान व्हावं म्हणून आरटीओ कार्यालयाच्या सहमतीनं, शिक्षण देणारी फिल्म तयार करून एका बसमध्ये दाखवायला सुरुवात केली.
आपल्याकडे वाहन चालवण्याचं अपुरं, अशास्त्रीय किंवा काही वेळा संपूर्ण अज्ञान असतानाही परवाना मिळू शकतो. याच लोकांकडून अपघात होतात. मी अमेरिकेत मोटार चालवण्याच्या लायसन्ससाठी अर्ज केला होता.
त्या काळात मी आणि आमचा प्रतिनिधी अक्षरशः हजारो किलोमीटर मोटारनं प्रवास करून आमची उत्पादनं विकत असू. त्याच्या एकट्यावर मोटार चालवण्याचा ताण पडू नये ही यामागं भूमिका होती. एक वयस्कर महिलेनं माझी लेखी परीक्षा तर घेतलीच; परंतु मी परीक्षा देत असताना ती स्वतः माझ्या शेजारी बसली होती.
मोटार चालवून झाल्यावर मी दार उघडून बाहेर येईपर्यंत ती प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत होती. मी परीक्षेत उत्तीर्ण झालो. तिनं मला विचारलं : ‘‘तुम्ही भारतीय आहात की इजिप्शियन?’’ मला आश्चर्य वाटलं. मी उत्तर दिल्यावर, माझ्या कुठल्या दोन छोट्या चुका झाल्या त्या तिनं दाखवून दिल्या आणि त्या न सुधारल्यास कोणत्या परिस्थितीत अपघात होऊ शकतो ते मला समजावून सांगितलं. मोटार चालवताना ही गोष्ट कायम माझ्या ध्यानात असते. ज्यांना नवीन परवाना काढायचा आहे त्यांना हाच उद्देश समजावा असा ‘निर्धार’चा हेतू होता.
‘परिवारमंगल’मध्ये मुख्यतः महिलांच्या भल्याचा विचार होता. कुटुंबनियोजन अत्यावश्यक असलं तरी आणि ते महिलेला पटलं व नवऱ्याची मान्यता असली तरी नवऱ्यापेक्षा सासू-सासरे, शेजारीपाजारी अथवा नातेवाईक यांचाच विरोध असतो. सर्व जाती-धर्मांमध्ये हे आढळतं.
त्यातून एखाद्या कष्टकरी महिलेला कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करायची म्हटलं तरी दिवसभर वेगवेगळे फॉर्म भरणं, या खिडकीवरून त्या खिडकीकडे जात, रांगेत उभं राहत पुढं जावं लागत असे. हातावरील पोट असलेल्या अथवा लहान मुलं असलेल्या महिलेला हे फार अवघड जात असे.
जवळपास ९० टक्के पुरुष शस्त्रक्रियेला, म्हणजे आपल्या बायकोच्या शस्त्रक्रियेला, मान्यता देत असत! पठ्ठ्या स्वतः मात्र काही गैरसमजांपोटी सहसा तयार होत नसे. खरं तर पुरुषाची नसबंदी अगदी सोपी, कमी वेळाची आणि कमी त्रासाची असते. यावर आमच्यातील वरिष्ठ महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक सोपा उपाय शोधला आणि त्याच्या मान्यतेसाठी त्या माझ्याकडे आल्या.
कल्पना अशी होती की, ज्या महिलेला शस्त्रक्रिया करायची आहे तिनं ‘सकाळ’मध्ये अथवा ‘परिवारमंगल’च्या एका विशिष्ट नंबरवर फोन करायचा...तिचं नाव, पत्ता, वय वगैरे सांगून सोईस्कर दिवस सांगायचा...आम्ही पाच-सहा हॉस्पिटलना या योजनेत विनामोबदला सहभागी होण्याची विनंती केली होती. ती सुदैवानं मान्य झाली. योजनेनुसार ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आमचं वाहन त्या महिलेच्या घराजवळ थांबेल...अगदी झोपडपट्टीतही.
तिला एखाद्या ‘व्हीआयपी’ म्हणजे महत्त्वाच्या व्यक्तीप्रमाणे वागवले जाईल याची काळजी घेतली जाईल...दवाखान्यात तपासण्या करून नोंद करून योग्य असल्यास शस्त्रक्रिया केली जाईल...औषधोपचार, खाणं-पिणं दवाखाना करेल...पुणे महानगरपालिकेचे यासाठी उत्तेजनार्थ असलेले पैसे तिला दिले जात.
डॉक्टरांनी परवानगी दिली की, संध्याकाळच्या आत ‘सकाळ’च्या वाहनानं तिला घरी सोडलं जाईल... यासाठी झोपडपट्ट्यांतून, दाट वस्ती असलेल्या पेठांमधून आमच्या महिला-अधिकाऱ्यांनी प्रचार केला, पत्रकं वाटली, सभा घेतल्या.
‘सकाळ’च्या तत्कालीन संचालिका डॉ. बानूबाई कोयाजी यांनी आपलं आयुष्य अशा कामासाठी वेचलं होतं. त्यांना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी ‘केईएम’ हॉस्पिटल उपलब्ध करून दिलं. शस्त्रक्रियेबरोबर कुटुंबनियोजनाचा प्रचार हाही महत्त्वाचा भाग होताच.
आणखी काही इतर गोष्टी याअनुषंगानं केल्या गेल्या. अर्थात्, आमचा हा अधिकारीवर्ग निवृत्त झाल्यावर त्या कामात शिथिलता आली. मग हे सर्व आम्ही एका प्रथितयश हॉस्पिटलला आमच्या बस, जमवलेला पैसे देऊन पुढं चालवण्याची विनंती केली. तो काही प्रमाणात आजही सुरू आहे.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, या सर्व सामाजिक कामात, कर्तव्यात आमच्या महिला-अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये कुठंही कमतरता पडू दिली नाही. वाढत्या प्रदूषणाची जाणीव निर्माण व्हावी म्हणून ‘निर्धार’तर्फे चौकाचौकात प्रदूषणाची आवश्यक असलेली पातळी, धोक्याची पातळी आणि त्या ठिकाणी असलेली प्रदूषणाची पातळी यांचे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते. रोजच प्रदूषणाची वरची पातळी गाठली गेली आहे, हे पाहून बहुधा परिणामकारकता कमी झाली! हा मनुष्यस्वभावच आहे. म्हणतात ना, ‘रोज मरे त्याला कोण रडे!’
‘सकाळ’मधील असं व्यक्तिगत, संस्थात्मक पातळीवर अखंड चाललेलं सामाजिक काम करताना गमतीनं म्हणावंसं वाटे, ‘आम्ही वर्तमानपत्रसुद्धा चालवतो!’
अर्थात्, हे सर्व तुम्हा वाचकांच्या भक्कम पाठिंब्यावर उभं आहे, याची आम्हा ‘सकाळ’करांना पुरेपूर जाणीव आहे (छान आहे की नाही?). ‘निर्धार’ आणि ‘परिवारमंगल’चं कार्य वाचून बरं वाटलं ना? मग तुम्ही काय करू शकता?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.