नको गं! नको गं! आक्रंदे जमीन...

माणसाला माणूस न मानणाऱ्या, आपल्या श्रेष्ठत्वाचा पोकळ आणि फुकटचा दुराभिमान बाळगणाऱ्या या मनोवृत्तीने अनेक शतके तळाशी ढकलून दिलेल्या जातीवर्गाचे दमन केलेच.
Farmer land
Farmer landSakal
Updated on

- प्रतिमा जोशी, pratimajk@gmail.com

माणसाला माणूस न मानणाऱ्या, आपल्या श्रेष्ठत्वाचा पोकळ आणि फुकटचा दुराभिमान बाळगणाऱ्या या मनोवृत्तीने अनेक शतके तळाशी ढकलून दिलेल्या जातीवर्गाचे दमन केलेच; पण १९४७ नंतर अस्तित्वात आलेल्या भारत नावाच्या नव्या आधुनिक राष्ट्रसंकल्पनेनुसार प्रत्येक नागरिक समान मानणाऱ्या आजच्या लोकशाही व्यवस्थेतसुद्धा जुनी विषमतावादी, वर्चस्ववादी मूल्ये सोडलेली नाहीत...

तशा त्यांच्यासंबंधीच्या बातम्या अधूनमधून सतत येत असतात. सहसा त्या आतल्या पानांत येतात. त्याही पटकन दिसतील अशा नाहीत. म्हणजे मुख्य बातमी म्हणून त्या फारशा येत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांत तर धावता उल्लेख असला तर असला अन्यथा नाही.

अगदीच खूप मोठ्ठे काही घडले असेल, म्हणजे कुपोषणाने खूप मुले दगावली असतील तर... किंवा उपचार वेळेवर न मिळाल्याने किंवा रुग्णवाहिका न मिळाल्याने मरण पावलेल्या व्यक्तीचे शव पाठीवर मरून कित्येक किलोमीटर कोणी पायी चालत गेले असेल तर... किंवा प्रकल्पासाठी जंगल मोकळे करताना यांच्या वस्त्या उठवताना दुर्घटना घडली असेल तर... किंवा असेच काही वाचताना/ पाहताना डोके सुन्न करणारे पण पुढच्याच क्षणाला आपल्या डोक्यातून निघून जाणारे काही असेल तर ते जरा ठळकपणे अधोरेखित केले जाते, पण ते तेवढेच... त्याची फार चर्चा होत नाही.

त्यावर विचारविनिमय होत नाही. पॅनेल डिस्कशन होत नाही. निर्णय होणे, कारवाई होणे तर दूरच... पण त्याची साधी आठवणसुद्धा राहत नाही! मुळात त्यांच्याबद्दल आस्था आणि आदरच नाही. आपलेपणा नाही. असलीच तर कीव... दुरावा... ते आपल्यापेक्षा कमी असल्याची, मागास असल्याची मनात ठाण मांडून बसलेली भावना... त्यांच्याविषयी दोन टोकांच्या कल्पना अन्य समाज बाळगत असतो.

म्हणजे एका कल्पनेनुसार तर ते ‘रानाची पाखरं’ किंवा ‘निसर्गाची लेकरं’ असतात आणि नाच, गाणी, दारू, चित्रविचित्र पोशाख नि दागिने परिधान करून मुक्त सहजीवन जगणारे स्वच्छंदी असे कल्पनारम्य लोक असतात किंवा ते अडाणी असतात, गरीब असतात, मजूर म्हणून जगतात आणि मरतातही!

त्यांची मुलेबाळेही न शिकता घरगडी किंवा छोटीमोठी कामे करण्यासाठीच जन्माला आलेली असतात... त्यांच्या जमिनी सहजपणे कमी भावात खरेदी करता येतात... त्यांना पुरेशी आणि वेळेवर मजुरी नाही दिली तरी चालते... मुळात ते दयनीय असल्याचा एक तुच्छता भाव बहुसंख्यांच्या मनात आणि वागण्या-बोलण्यातसुद्धा असतो.

त्यांच्यातील अगदी वयोवृद्ध स्त्री-पुरुषांनासुद्धा अन्य समाजसमूह अरेतुरेच्या भाषेत संबोधतो. सरकारी असो की आणखी कुठले कार्यालय असो, त्यांना बसायला खुर्ची दिली जाईलच याची खात्री नसते. खात्यापित्या घरांतील लोक आपले वापरलेले कपडे, वस्तू त्यांना देऊन दान केल्याचे / समाजकार्य केल्याचे समाधान मानतात आणि तसे बोलूनही दाखवतात. एरव्ही जगाच्या एकंदर व्यवहारात ते तसे बेदखल असतात...

ते आदिवासी. नागरी संस्कृतीच्या अतिक्रमणाने जंगलात लोटले गेलेले. तिथेही सुरक्षित नसलेले, कष्टापलीकडे हाताशी भांडवल नसलेले, व्यवहारी जगात सौदेबाजी न जमणारे, आपल्या भाषा/ संस्कृती जपू पाहणारे; पण त्याला कसले मोल न मिळणारे आदिवासी!

अलीकडे त्यांच्याशी संबंधित दोन बातम्या दोन दिवसांत लागोपाठ आल्या. त्यातील एक धुळे जिल्ह्यात पळासनेर गावाजवळ घडली. भल्यामोठ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो मुंबई-आग्रा हायवेवरील बस थांबा व त्याला लागून असलेल्या हॉटेलात घुसला. हा अपघात एवढा भीषण होता, की कंटेनरने दिलेल्या धडकेत ११ वाहनांसह हॉटेलही चक्काचूर झाले. यात ११ लोकांचा जीव गेला; तर ३० लोक जखमी झाले.

मयतांमध्ये कोळश्यापाणी या एकाच आदिवासी पाड्यातील पाच आदिवासी आहेत. तिथले अनेक जण जखमी आहेत. नेत्यांच्या किंवा बड्या असामींच्या अपघातावर दिवसच्या दिवस चर्चा, पाठपुरावा करणाऱ्या माध्यमांतून या अपघाताची बातमी फारशी ठळक दिली गेली नाही. अपघातग्रस्तांना व त्यांच्या कुटुंबांना कोणी तातडीची मदतही करताना दिसले नाही.

पळासनेर जवळच्या कोळश्यापाणी या छोट्याशा पाड्यातील बरीच मुले धुळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात शिकतात. या मुलांना सुट्या संपल्यानंतर शाळेत सोडायला पालक मुलांना घेऊन निघाले होते. ते पळासनेरला बस थांब्याजवळ थांबले होते.

पालकमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदतही सरकारच्या वतीने जाहीर केली व हे सर्व जण शासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन परत गेले; मात्र ज्या पाड्यात सर्वाधिक मृत्यू झाले व सर्वाधिक जखमी आहेत, त्या गावात पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य वगळता कोणी फिरकले नाही.

कोळश्यापाणी पाड्यात जायला धड रस्ताही नाही. हातावर पोट असणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या या आदिवासी बांधवांना अपघातानंतर मोठा धक्का बसलाय. शाळेत मुलांना शिकवून आपले दिवस बदलतील अशी त्यांनी पाहिलेली स्वप्ने एका क्षणात बेचिराख झाली. अपघातग्रस्त कुटुंबांना भरपाईसाठी आवश्यक कागदपत्रे कशी व कुठे जमा करायची, हेही माहीत नाही. कालांतराने सारेच पुसट होत जाईल.

दुसरी बातमी शरमेने चूर व्हावे अशी आहे. मध्य प्रदेशमधील सिधी येथे एका आदिवासी तरुणावर प्रवेश शुक्ला नावाच्या राजकारणी व्यक्तीने लघवी केली. या हीन कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही राजकारणी व्यक्ती त्या मुलाच्या तोंडावर, अंगावर उद्दामपणे लघवी करताना दिसते आहे.

ज्या मुलावर हा घाणेरडा प्रसंग ओढवला आहे, तो मतिमंद असल्याचे समजते. रस्त्यावर बसलेला, मतिमंद आणि आदिवासी या तिन्ही वर्गवारी उपहास करण्याच्या आणि अपमान करण्याच्या असतात, त्यांना जनावरापेक्षाही वाईट वागवण्याचा आपल्याला हक्क आहे, असेच जणू ही राजकारणी व्यक्ती दाखवून देत आहे.

हे तिन्ही वर्ग दुबळे आहेत आणि दुबळ्यांना पत आणि किंमत नसते हेच वास्तव या उद्दामपणाने अधोरेखित केले आहे. आपल्या समाजातील जातीय उतरंडीने निर्माण केलेल्या विषमतेला खुली मान्यताच देणारी ही नीच घटना आहे.

माणसाला माणूस न मानणाऱ्या, आपल्या श्रेष्ठत्वाचा पोकळ आणि फुकटचा दुराभिमान बळगणाऱ्या या मनोवृत्तीने अनेक शतके तळाशी ढकलून दिलेल्या जातीवर्गाचे दमन केलेच; पण १९४७ नंतर अस्तित्वात आलेल्या भारत नावाच्या नव्या आधुनिक राष्ट्र संकल्पनेनुसार प्रत्येक नागरिक समान मानणाऱ्या आजच्या लोकशाही व्यवस्थेतसुद्धा जुनी विषमतावादी, वर्चस्ववादी मूल्ये सोडलेली नाहीत, याचेच हे उदाहरण आहे.

जात, धर्म, लिंग, वंश, वर्ण यांच्यापलीकडे जात व्यक्तीला नागरिक म्हणून अधिकार बहाल करणाऱ्या भारतीय संविधानाने विषम समाजरचनेतील दुर्बल आणि विशेष लक्ष द्यावयाच्या समूहांसाठी विशेष प्रावधाने केली. त्यानुसार आदिवासींची वर्गवारी अनुसूचित जमातीमध्ये करून घटनेच्या पाचव्या व सहाव्या शेड्युलखाली काही विशेष तरतुदी केल्या.

त्यामागे सामाजिक न्यायाचे तत्त्व आहे; मात्र सरकारी आकडेवारीनुसार २०११ ते २०२० या केवळ दहा वर्षांत अनुसूचित जमातींवरील अत्याचारांची ७६ हजार ८९९ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या गुन्ह्यांचा आलेखही चढता आहे. २०१२ मध्ये एकूण प्रकरणे ५ हजार ९२२; तर २०१६ मध्ये एकूण प्रकरणे ६ हजार ५६८ आणि २०२० मध्ये हाच आकडा गेलाय ८ हजार २७२ वर! म्हणजे वर्षागणिक आपण सुजाण नागरिक बनण्याऐवजी अधिक हिंसक आणि वर्चस्ववादी बनत चाललो आहोत.

आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रकार पाहा : हत्येचा प्रयत्न, हत्या, प्राणघातक, जखमी करणे, महिलांची बेअब्रू, बलात्कार, अपहरण आणि डांबून ठेवणे, दंगल, हल्ले, लूट. या वर्गवारीत शुक्लाने केलेले घृणास्पद कृत्य कशात बसवायचे? हे आणि यापेक्षा कमी-अधिक तीव्रतेचे अपमान, अवहेलना तर सातत्याने घडत असतात. मग कुठे आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना पर्यटकांसमोर सक्तीने नाचायला लावले जाते, कुठे मारहाण केली जाते, कुठे आणखी काही केले जाते!!

आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत; पण आपल्याच माणसांना आपण माणसासारखे वागवत नाही. यात अभिमान वाटण्यासारखे काहीच नाही!!

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.