जरा विचार करा...

स्पेनची राजधानी माद्रिद येथे काहीच दिवसांपूर्वी लाखो लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. स्पेनच्या अलीकडील इतिहासातील ही मोठी घटना मानली जाते.
spain population
spain populationsakal
Updated on
Summary

स्पेनची राजधानी माद्रिद येथे काहीच दिवसांपूर्वी लाखो लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. स्पेनच्या अलीकडील इतिहासातील ही मोठी घटना मानली जाते.

- प्रतिमा जोशी pratimajk@gmail.com

स्पेनच्या कित्येकपट अधिक लोकसंख्या असलेल्या, दरडोई उत्पन्न किती तरी कमी असलेल्या, आरोग्य सेवांचे जाळे छोटे असलेल्या आपल्या देशात आरोग्य सेवांविषयी जागृती का नाही? पोकळ अस्मितांच्या मुद्द्यावर मोर्चे, निदर्शने करणे हे आपल्याला चांगले जगण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे का वाटते? विचार करा...

स्पेनची राजधानी माद्रिद येथे काहीच दिवसांपूर्वी लाखो लोकांनी रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. स्पेनच्या अलीकडील इतिहासातील ही मोठी घटना मानली जाते. ‘अल-जझिरा’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या मते, निदर्शकांची संख्या दोन लाखांच्या वर होती. यात महिला, पुरुष, मुले, वयस्कर लोक अशा सर्व स्तरांतील नागरिकांचा समावेश होता. अजूनही माद्रिदचे रस्ते मोकळे नाहीत. नागरिक हर तऱ्‍हेने आपला आवाज उठवत आहेत. कशाचा निषेध करत आहेत ही लाखो माणसे? काय हवे आहे त्यांना?

खासगीकरणाच्या झपाट्यात जर्जर झालेल्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेला मजबूत बनवण्यासाठी, सरकारचा कान पकडण्यासाठी ही निदर्शने सुरू आहेत. आरोग्य क्षेत्राच्या खासगीकरणास मोठ्या प्रमाणात चालना दिल्याने नफेखोर खासगी कंपन्या आणि सेवांमुळे स्पेनमधील आरोग्य सेवा महागली आहे. आधीपासून अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवांकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करू लागल्याने या सेवा हळूहळू मोडकळीला येऊ लागल्या आहेत.

माद्रिदमधील स्थानिक सरकार या आरोपांत तथ्य नाही असे म्हणत आहे; पण सार्वजनिक क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचारी आणि त्यांना समर्थन देणारे लाखो नागरिक मात्र सरकारचा दावा आकडे देऊन खोडून काढत आहेत. माद्रिद हा स्पेनमधील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला प्रांत आहे; मात्र या प्रांतातील नागरिकांनी भरलेल्या करांच्या उत्पन्नातील फारच कमी वाटा आरोग्य क्षेत्रावर विशेषतः प्राथमिक आरोग्य व्यवस्थेवर खर्च केला जात आहे. निदर्शकांच्या म्हणण्यानुसार आरोग्य सेवेवर खर्च केल्या जाणाऱ्या प्रत्येक दोन युरोंपैकी एक युरो खासगी क्षेत्राच्या खिशात जात आहे. माद्रिदचे लोक कररूपाने सरकारला घसघशीत उत्पन्न मिळवून देतात. सबब चांगली आणि किफायतशीर आरोग्य सेवा मिळणे, डॉक्टर वेळेवर उपलब्ध होणे हा त्यांचा अधिकार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेत असलेली मनुष्यबळाची कमतरता भरून काढली जावी, पुरेसा प्रशिक्षित स्टाफ तैनात केला जावा, सेवेचा दर्जा सुधारावा. एकूणच माद्रिदवासीयांचे म्हणणे आहे, की महागडे उपचार देणाऱ्या खासगी आरोग्य सेवांवर आमचा पैसा उडवू नका, सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत करा, आम्हाला आमचे खिसे रिकामी करणारी खासगी सेवा नको!

या पार्श्वभूमीवर एक गमतीची बाब सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. उत्कृष्ट आरोग्य सेवा असलेल्या सहा देशांमध्ये स्पेन आणि कोलंबिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मध्य अमेरिकेतील कोस्टारिका अव्वल स्थानावर आहे. तेथील नागरिकांचे आयुर्मान सर्वाधिक आहे आणि नागरिकांसाठी उपयुक्त योजना देणाऱ्या आरोग्य सेवांच्या बाबतीत जागतिक आरोग्य संघटनेने समाधानकारक स्थिती असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या स्थानावर कोलंबिया आणि स्पेन आहेत. लॅटिन अमेरिकेतील उत्कृष्ट अशा ५८ पैकी २४ रुग्णालये एकट्या कोलंबियात आहेत. एवढेच नव्हे, तर चालत निघालात तरी स्पेनमध्ये दर १५ मिनिटांच्या अंतरावर एक तरी हॉस्पिटल किंवा आरोग्य केंद्र सापडतेच. जिथे दरहजारी लोकसंख्येमागे चार डॉक्टर आहेत. स्पेनमधील सार्वजनिक आरोग्य सेवेबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसोद्‍गार काढलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पोर्तुगाल; तर चौथ्या क्रमांकावर मलेशिया आणि मेक्सिको आहेत.

जो देश आरोग्य सेवेत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न चांगले या सदरात मोडते, त्या देशातील नागरिक सार्वजनिक आरोय सेवेचा दर्जा सुधारावा आणि सरकारतर्फे खर्च होणाऱ्या पैशांमध्ये खासगी क्षेत्राचा वाटा नको, या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात, हे निश्चितच विचार करण्याजोगे आणि आगळेवेगळे आहे. या वेगळेपणाचा वेध घेताना आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हणजे स्पेनवासीयांच्या मते कोविड काळात आरोग्य यंत्रणांचा दर्जा जसा असायला हवा होता, तसा नव्हता आणि याच काळात सरकारच्या पाठिंब्याने खासगी आरोग्य सेवांचे जाळे देशभरात हातपाय रोवून उभे राहिले. स्पेनवासीयांत असलेला असंतोष आजचा नाही, तो कोविड काळापासून धगधगत आहे. स्पेनचे नागरिक सार्वजनिक आरोग्य सेवांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत.

या पार्श्वभूमीवर आपल्याकडे काय स्थिती आहे? भारतातील सार्वजनिक सेवा कोणत्या स्थितीत आहे? खासगी आरोग्य सेवांबाबतचा सामान्य नागरिकांचा सोडाच, पण सुस्थित नागरिकांचा काय अनुभव आहे? दरहजारी रुग्णांमागे डॉक्टरांचे किती प्रमाण आहे? औषधे/ उपचार/ चाचण्या आणि रुग्णांचे हक्क याबद्दल काय अवस्था आहे? कोविड काळात आरोग्य क्षेत्राची काय परिस्थिती होती?

या सर्व प्रश्नांची उत्तरे गंभीर आहेत. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील कोणत्याही सरकारी/ महापालिका दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रांत उसळलेली गर्दी, या गर्दीला अपुरे पडणारे डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी, अत्याधुनिक उपकरणांची अपुरी व्यवस्था, औषधांची अनुपलब्धता हे अगदी सर्वसामान्य चित्र आहे. रुग्णांसाठी असलेले बेड अपुरे पडतात, जिथे जागा मिळेल, तिथे रुग्णांची झोपण्याची सोय करावी लागते. सततची वर्दळ असल्याने स्वच्छतेबाबतही फार काटेकोर राहता येत नाही. मनुष्यबळ अपुरे असल्याने दिवसच्या दिवस उपचारांची वाट बघत रुग्णांना ताटकळावे लागते.

आपल्या देशातील डॉक्टर/ रुग्ण यांचे प्रमाण १५११ रुग्णांमागे एक डॉक्टर आणि ६७० रुग्णांमागे एक परिचारिका असे आहे. हे सरासरी प्रमाण आहे. सर्व राज्यांत ही अशीच स्थिती नाही आणि ग्रामीण व शहरी भागातही अशीच स्थिती नाही. ही विभागणी राज्याचे मागासलेपण, शहरांचा विकास यानुसार उघडच विषम आहे. आपल्या देशातील एकंदर रुग्णखाटांची संख्या १८ लाख ९९ हजार २२८ असल्याचा सरकारीच आकडा आहे. हे प्रमाण दर हजारी लोकांमागे १.४ खाटा इतके येते. त्यातही या खाटांपैकी ६० टक्के खाटा या खासगी क्षेत्रातील आहेत. सार्वजनिक क्षेत्रांत केवळ ४० टक्के आणि सर्वाधिक लोकसंख्या अपुऱ्या उत्पन्नामुळे सार्वजनिक सेवेवरच अवलंबून असल्याची विसंगती आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा तर २३ ते २८ टक्क्यांपर्यंत तुटवडाच आहे. साध्या साध्या उपचारांसाठी मैलोन् मैल चालत जावे लागते हे आपल्याकडील नेहमी दिसणारे चित्र आहे. असे चालत चालत पोहोचले तरी दुर्गम भागात डॉक्टर उपलब्ध असतील याची खात्री नसते. ते असले, तरी औषधे असतील किंवा उपकरणे नीट काम करत असतील याची खात्री नसते. कोविड काळात तर औषधांच्या तुटवड्यापासून ते खाटांच्या अनुपलब्धतेपर्यंत आणि प्राणवायूच्या कमतरतेपासून ते संरक्षक साधनांच्या दर्जांपर्यंत अनेक समस्यांना आपण तोंड दिले आहे. महाराष्ट्र, केरळ अशी काही मोजकी राज्ये सोडली तर कोविड उपचार नियोजन, समायोजन आणि प्रतिबंध याबाबत आपण सर्वांनीच किती कठोर परिस्थितीला तोंड दिले आहे, ते सांगण्याची गरज नाही. खासगी क्षेत्राचे वर्तन तर या महामारी काळात चिंताजनकच होते. लाखो रुपयांची बिले आकारण्यापासून ते दाखल करून घेण्यात दिरंगाई करण्यापर्यंत, महागड्या औषधांची शिफारस करण्यापासून ते बाजारात त्यांची टंचाई निर्माण करण्यापर्यंत नागरिकांनी असंख्य प्रकारचे त्रास सहन केले आहेत.

मग स्पेनच्या कित्येक पट अधिक लोकसंख्या असलेल्या, स्पेनपेक्षा दरडोई उत्पन्न किती तरी कमी असलेल्या, स्पेनपेक्षा आरोग्य सेवा जाळे छोटे असलेल्या आपल्या देशात आरोग्य सेवांविषयी जागृती का नाही? आपण सार्वजनिक आरोग्य सेवा कार्यक्षम व्हावी यासाठी आग्रही का नाही? खिशाला परवडत नसतानाही खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याची बढाई मारणे आपल्याला स्टेटस सिम्बॉल का वाटते? सार्वजनिक सेवांचा दर्जा सुधारावा, जाळे विस्तारावे यासाठी सरकारवर दबाव टाकावा असे कधी आपल्या मनात येतच नाही का? पोकळ अस्मितांच्या मुद्द्यावर मोर्चे, निदर्शने करणे हे आपल्याला आपल्या स्वतःच्याच चांगल्या आणि सुविधापूर्ण जगण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे का वाटते? विचार करा. खरंच विचार करा. आपण भारताचे लोक, नेमका कसा विचार करतो याचा धांडोळा घ्या.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.