काकविष्ठेचे झाले पिंपळ... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar
Updated on

फ्रॅंक अबाग्नेल या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंकनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित हा चित्रपट होता.

मंचकावर रेलून बसत क्रोधाचा कृतक अभिनय करणाऱ्या मदनिकेचे मन वळवताना अचानक शर्विलक म्हणाला : प्रिये मदनिके, कामं नीचमिदं वदन्तु पुरुष: स्वप्ने तु यद्‌वर्द्धते। विश्‍वस्तेसु च वंचनापरिभवशौर्यं न शौर्यहि तत...अगे, चोरी हा माझा धर्म आहे आणि त्याचेही काही नीती-नियम आहेत. मी जे कर्म करतो त्याला समाजमान्यता नाही, हे मान्य; पण मी कधीही आभूषणांनी नटलेल्या गृहिणीचे अलंकार उचलत नाही की यज्ञकर्मानं अथवा शुद्ध मार्गानं मिळवलेल्या ब्राह्मणाची संपदा लुटत नाही. गर्भिणी स्त्री किंवा कडेवर मूल घेऊन चाललेल्या मातेचं धन मी कधी चोरत नाही की धर्माचरणात व्यग्र असलेल्या कुणाचं काहीही हरण करत नाही. विवेकबुद्धीच्या जोरावरच आज तुझ्या या शर्विलकाला उज्जयिनीतील "सर्वोत्कृष्ट चोरा'चा मान मिळतो आहे.
...माझा व्यवसाय प्रतिष्ठित नसेलही; पण खालमानेनं स्वाभिमानशून्य चाकरी करत आयुष्य कंठण्यापेक्षा स्वतंत्र बुद्धीनं चौर्यव्यवसाय केला तर बिघडलं कुठं?
-शूद्रकलिखित मृच्छकटिकम्‌, अंक तिसरा. (सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची दहा अंकी नाट्यकृती.)
* * *

चोराच्या उशाखाली ठेवलेल्या तिजोरीच्या किल्ल्या सर्वात सुरक्षित असतात म्हणे. फ्रॅंक अबाग्नेल ज्युनिअरच्या बाबतीत असंच घडलं. बालपणापासूनच हेराफेरीतली आपली "अलौकिक प्रतिभा' दाखवून जगाला स्तिमित करणाऱ्या या ठकसेनांच्या बापाला शेवटी अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं (एफबीआय) सन्मानाचं सल्लागारपद देऊ केलं. "आपल्या बहुमूल्य अनुभवाचा लाभ कृपया सुरक्षायंत्रणेस द्यावा,' असं आदरयुक्‍त पत्र त्याला धाडावं लागलं. एफबीआयनं फ्रॅंक अबाग्नेलला हा मान दिला तेव्हा त्यानं तिशीसुद्धा धड गाठली नव्हती. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यानं पहिली हेराफेरी करून आपल्या "अद्वितीय कारकीर्दी'ला सुरवात केली. नमन म्हणून त्यानं आपल्या बापाचाच खिसा कापला! तिथून पुढं जगभर ठकसेनी करत जवळपास दशकभर तो तपासयंत्रणांना हुलकावण्या देत राहिला. किमान अर्धा डझन मुल्कों की पुलिस उस के पीछे थी...दोनदा तो तुरुंग फोडून पळाला. त्याच्या उद्योगांमुळे ठकवल्या गेलेल्या बॅंका अक्षरश: जेरीस आल्या होत्या.

पुढं बरंच काही घडलं. एफबीआयच्या जाळ्यात सापडल्यानंतर जेमतेम पाचेक वर्षं तुरुंगवास भोगून झाल्यावर फ्रॅंक अबाग्नेलच्या प्रतिभावान मेंदूला काम मिळालं. बॅंकांच्या धनादेशात, डिमांड ड्राफ्ट किंवा हुंड्यांमध्ये कालाकांडी करून अब्जावधी रुपये लुटणाऱ्या अन्य हरहुन्नरी महाभागांची पावलं ओळखण्यासाठी एफबीआयनं फ्रॅंक अबाग्नेलची मदत घेतली. एखादा चेक बनावट आहे की खरा, हे फ्रॅंक एका दृष्टिक्षेपात सांगत असे. तो अक्षरतज्ज्ञ होता, उत्तम कॅलिग्राफी कज्रू शकत होता. मानसशास्त्र कोळून प्यायलं होतं त्यानं. बोल बोल म्हणता गंडा घालणं त्याच्या डाव्या हातचा मळ होता. नाना वेशांतरं करून त्यानं आपली "लखोबा लोखंडे'गिरी सुरू ठेवली होती. बख्खळ माया जमवायची, ती उडवायची, हा त्याचा खाक्‍या.
...अशा या अफलातून ठकसेनाच्या चरित्रावर आधारित एक चित्रपट सन 2002 मध्ये सुविख्यात दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गनं केला होता. त्याचं नाव होतं ः "कॅच मी इफ यू कॅन.' गुन्हेगारीतून बाहेर पडल्यावर फ्रॅंक अबाग्नेलनं याच शीर्षकाचं आत्मचरित्र लिहिलं होतं. त्यावर आधारित होता हा चित्रपट. अबाग्नेलच्या कोवळ्या वयातलं हे चित्रण होतं. त्यात लिओनार्डो डिकॅप्रिओ भलताच विश्‍वसनीय वाटला. हा जातिवंत शर्विलक जेरबंद करून त्याला सन्मार्गावर आणणाऱ्या एफबीआय एजंटची भूमिका टॉम हॅंक्‍सनं साकारली होती. संपूर्ण चित्रपट पाहताना राहून राहून वाटत राहतं की उघड उघड लोकांची फसवणूक करणाऱ्या या पोराला दैवाची केवढी साथ मिळत होती! दैवदेखील कधी कधी गुन्हेगारांच्या टोळीत सामील होतं का?
विलक्षण गमतीदार, तरीही समाज म्हणून एकंदरीत आपण सारेच ग्लोबल नागरिक काहीसे बावळटच असतो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट निदान एकदा तरी बघावाच.
* * *

ते वर्ष होतं 1969... फ्रान्समधल्या एका भयंकर तुरुंगात खितपत पडलेला तो तरुण, कोवळा गुन्हेगार पार हडकून गेला आहे. अंगात तापदेखील असावा. खुरडत खुरडत, दंडाबेडी सांभाळत सुरक्षारक्षकांच्या गराड्यात निघालेला हा पोरगा बघून एफबीआय एजंट कार्ल हानरॅट्टीचं काळीज हललं. त्याला मायदेशी अमेरिकेत नेण्यासाठीच तो फ्रान्सला आलाय; पण त्या कडेकोट बंदोबस्तातही त्या पोरानं सर्वांदेखत पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहून कार्ल अंतर्मुख झाला.
त्या कोवळ्या गुन्हेगाराचं अल्पकाळातलं पूर्वायुष्य त्याला आठवलं. तो गुन्हेगार निश्‍चितच होता. गंभीर गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर होते; पण पोरगं खरंच कोवळं होतं आणि मनानं तो गुन्हेगार नाही, फक्‍त वाभरट आहे, हे कार्लला कळत होतं. मात्र, खाकी वर्दीला जसं मन असून चालत नाही, तसं कार्ल हानरॅट्‌टीला आपल्या मनाचं गलबलणं परवडलं नाही. तो निर्विकार राहिला...
* * *

सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी हाच तरुण न्यूयॉर्कलगतच्या न्यू रोशेल भागात सोळा वर्षांचा फ्रॅंक अबाग्नेल म्हणून पंचक्रोशीत ओळखीचा होता. आई-वडिलांच्या मोडक्‍या संसारात वाढत होता. वडिलांचं नावसुद्धा फ्रॅंकच...सतराशे साठ उद्योग करत बापाचा संसार कसाबसा चाललेला. आई फ्रेंच होती. तिचं नाव पॉला. नवऱ्याच्याच मित्रासंगे भानगड सुरू करून चांगलेचुंगले कपडे, प्रसाधनं, पार्ट्या आदींचा लुत्फ घेणं यांत ती रमली होती. करील तरी काय? माणसानं पोट तरी कसं जाळायचं? नवरा हा असा. आज आहे, उद्या कुठल्या तरी भानगडीत अडकलेला असणार. शिवाय पॉलाचा पिंड थोडा उच्छृंखलट; पण काहीही असलं तरी पोटच्या पोरावर तिचा विलक्षण जीव होता. फ्रॅंकचेही जमतील तितके लाड होत होतेच. चांगलं प्रशस्त घर होतं. भाड्याचं असलं म्हणून काय झालं? चेस मॅनहॅटन बॅंकेतून आणखी एखादं छोटंसं कर्ज काढून जरा सभ्यशीर धंदा करावा, असा चाळिशीतला पोक्‍त विचार बाप फ्रॅंक सीनिअरच्या मनात हल्ली घोळत होता. मोडत चाललेला संसारही थोडा मार्गी लागला असता. पोराचं भविष्य चांगलं झालं असतं; पण पूर्वायुष्यात केलेल्या करचुकवेगिरीचं भूत फ्रॅंक सीनिअरच्या मानगुटीवर बसलेलं होतं. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची चापलुसी ओळखली. कर्जाला नकार दिला. मोठं घर सोडून आणखी छोट्या घरात तिघांचं कुटुंब स्थलांतरित झालं. नवं घर. नवी वस्ती. नवी शाळा. नवं आयुष्य.
नवी शाळा आपल्याला आवडली नसल्याचं फ्रॅंकच्या लक्षात आलं होतं. अभ्यासातून मन केव्हाच उडालं होतं. एक दिवस शाळेचे प्राचार्य इव्हान्सनी फ्रॅंकच्या आई-वडिलांना तातडीनं बोलावून घेतलं.
""मि. अँड मिसेस अबाग्नेल, मला माफ करा, ही तुमच्या मुलाच्या गैरहजेरीची तक्रार नाहीए; पण गेले आठवडाभर तुमचा मुलगा मिस ग्लासर यांचे फ्रेंच वर्ग घेतोय...आय मीन शिकवतोय!''
""काय म्हणालात?'' फ्रॅंकच्या आईनं, पॉलानं विचारलं.
""मिस ग्लासरचा सब्स्टिट्यूट टीचर म्हणून फ्रॅंकनं परस्पर फ्रेंच वर्ग घेणं सुरू केलंय. विद्यार्थ्यांना गृहपाठ देणं, वह्या तपासणं...सगळं करतोय. मिस ग्लासरची तब्येत बरी नव्हती, आणि अं...आमच्या शाळेच्या व्यवस्थापनाचाही थोडा ढिसाळपणा झालाच...पण हे योग्य आहे का? काल तर त्यानं पालकांसोबत ओपन हाऊसची बैठकही घेतली! ट्रेंटनमधल्या फ्रेंच पावाच्या फॅक्‍टरीत शाळेची सहल नेण्याचा बेत त्यानं रचलाय...माझ्या मते हे सगळं भयंकर आहे!''

...प्राचार्य त्याची तक्रार करताना फ्रॅंक त्यांच्या दालनाबाहेर तंगड्या हलवत बिनधास्त बसलेला होता. तक्रार ऐकून बाहेर आलेल्या बापानं डोळा मारला आणि फ्रॅंक आणखीच रिलॅक्‍स झाला.
अर्थात सगळं काही आलबेल नव्हतंच. एक दिवस शाळेतून लवकर घरी आलेल्या फ्रॅंकनं बघितलं की वडिलांचा मित्र आणि आपली आई खोलीचं दार बंद करून बसले आहेत. फ्रॅंकची चाहूल लागून खोलीबाहेर आलेल्या आईनं त्याला "खायला देऊ का? हे पैसे ठेव थोडे...लागतात खर्चाला' अशी मखलाशी सुरू केली. तिला अपराधी वाटतही असेल; पण फ्रॅंकला ते आवडलं नव्हतं. तो काही बोलला नाही. एक दिवस घरात आई-वडिलांखेरीज आणखी एक माणूस दिसला. तो वकील होता.
""हे बघ फ्रॅंकी... मी आणि तुझी आई सेपरेट होतोय!'' फ्रॅंक आबाग्नेल सीनिअर म्हणाले. ज्युनिअर गप्प राहिला.
""तुला कुणाबरोबर राहायचंय? ते तुला कोर्टात सांगावं लागणार! सांगशील ना?'' आई म्हणाली. फ्रॅंकवर आभाळ कोसळलं होतं. तो घरातून पळूनच गेला. खिशात वडिलांनी दिलेलं एक गॅसोलिन क्रेडिट कार्ड दिलं. त्यावर पेट्रोल पंपावर इंधन भरता येत असे. काही निवडक दुकानांमधून मोटारीचे सुटे भागही खरीदता येत असतं. उदाहरणार्थ ः टायर, ट्यूब, इंजिन ऑइल, वगैरे. फ्रॅंकनं एका दुकानातून टायर्स विकत घेतले. त्याच दुकानात ते पुन्हा विकून रोकड कमावली आणि तिथून तो मग भिडलाच आयुष्याला...
...बापाला तीन हजार 400 डॉलर्सचं बिल आलं तेव्हा त्याला घेरीच आली. पोराचे पाळण्यातले पाय त्याला दिसले असणार.
काही महिन्यांपूर्वी वडिलांनी फ्रॅंकला जीवनाचं एक गुह्य सांगितलं होतं. एक गोष्टच सांगितली. ते म्हणाले होते : "बरं का फ्रॅंकी, एका भांड्यात भरपूर दही असतं. अगदी सायीचं. त्यात दोन उंदीर पडतात. एक उंदीर त्या दह्यात बुडून मरतो. दुसरा मात्र मरेस्तोवर हात-पाय मारतो. त्याच्या हालचालींमुळे दही चांगलं घुसळलं जातं आणि त्याचं होतं लोणी! तो उंदीर लोणीही मटकावतो आणि भांड्यातून सुखरूप बाहेरही पडतो...काय कळलं?'
...पुढलं आख्खं आयुष्य आपल्याला या दह्याच्या भांड्यात काढायचंय, हे फ्रॅंकला तेव्हा कळलं नव्हतं.
* * *

पळालेल्या फ्रॅंककडं काही चेक होते. ते वटवून काही दिवस त्यानं भागवलं. इथं तिथं हिंडत राहिला. पैसे संपत आले, तेव्हा त्याचा मेंदू घोटाळेबाज प्रयुक्‍त्या लढवू लागला. जेमतेम सोळा-सतरा वय होतं. बॅंकांचे चेक्‍स पळवून बनावट सह्या करून त्यानं ते वटवले. ही थाप पचल्यावर त्याला चेव आला. बॅंकांचे चेक्‍स ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे त्याच्या लक्षात आलं. बनावट चेक्‍स हुबेहूब छापून त्यानं वेगवेगळ्या बॅंकांना गंडे घालायला सुरवात केली.
पॅन ऍम या सुप्रसिद्ध हवाई कंपनीच्या पगाराचे चेक्‍स त्यानं बघितले आणि तो हरखून गेला. पॅन ऍमचं एक ओळखपत्र चोरून त्यानं बनावट दुसरं तयार केलं. त्यावर त्याचा स्वत:चा फोटो होता. पॅन ऍमच्या पायलटचा गणवेश ही एक खास बाब होती. त्यांच्या ठराविक टेलरला पटवून त्यानं तोही मिळवला. हातात ब्रीफकेस घेऊन टेचात विमानतळांवर वावरू लागला. हा तरुण पायलट बघून पोरी पागल होत. त्या काळी एका विमान कंपनीचा पायलट दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानातून फुकट प्रवास करत असे. तसा विमान कंपन्यांचा अलिखित करारच होता. त्याला "डेडहेडिंग' असं म्हटलं जायचं. - फ्रॅंक आपलं खोटं ओळखपत्र वापरून कुठं कुठं पंचतारांकित हॉटेलात राहायचा. मजबूत बिलं करायचा. उत्तम ठिकाणी जेवायचा. जमेल तसे पगाराचे चेक वटवायचा. या काळात त्यानं जवळपास अठ्ठावीस लाख डॉलर्स लंपास केले. पॅन ऍमच्या लक्षात आलं तेव्हा फ्रॅंक सटकला होता...
* * *

पॅन ऍमच्या धनादेशांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर एफबीआय एजंट कार्ल हानरॅट्टीकडं ही केस आली. एफबीआयच्या रेकॉर्डला फ्रॅंकचा ना फोटो होता, ना फिंगरप्रिंट्‌स. कार्लच्या डोक्‍याला मुंग्या आल्या. गुन्हेगार शोधायचा कसा, हा प्रश्‍न होता. चेक वटवणाऱ्याचा माग काढता काढता कार्ल एका हॉटेलात पोचला. आश्‍चर्य म्हणजे संशयित गुन्हेगार अजूनही त्या हॉटेलात राहत असल्याचं त्याला कळलं. तो बेधडक त्या खोलीत शिरला.
""कोण हवंय?'' टॉवेलनं अंग पुसत बाथरूममधून बाहेर येत फ्रॅंकनं विचारलं.
""एफबीआय! कपडे घाल...तुला अटक करण्यात आली आहे!'' ओळखपत्र दाखवत कार्ल म्हणाला.
""क्‍काय? मला अटक? मी सिक्रेट सर्व्हिसचा माणूस आहे...बॅंक फ्रॉडचा माग काढत पोचलो इथं; पण पळाला तो!'' फ्रॅंकनं क्षणार्धात थाप मारली. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता, नजरेत सच्चाईही दिसत होती. कार्ल क्षणभर गोंधळला.
"" मी बॅरी ऍलन...सिक्रेट सर्व्हिस!'' हात पुढं करत फ्रॅंक म्हणाला. त्यानंही खिशातून ओळखपत्र काढून दाखवलं. बोल बोल म्हणता हॉटेलबाहेर पडून गेलादेखील. मिनिटभरातच कार्ल हानरॅट्टीला आपण गंडलो, हे लक्षात आलं. पण तोवर पाखरू उडालं होतं.
बॅरी ऍलन हे नाव कॉमिक बुकातल्या एका पात्राचं आहे, हे कळल्यावर तर तो हैराण होऊन हसूच लागला. सगळाच भोटंपणा झाला. हे पोरगं तर टीनएजर आहे. कसला डोंबलाचा पायलट आणि कसला घोटाळेबाज ठकसेन!
* * *

एका इस्पितळात फ्रॅंकला ब्रेंडा भेटली. नुकतीच भरती झालेली ती एक नर्स होती. तिच्या दाताला तारा लावलेल्या होत्या; पण तिला तो म्हणाला ः ""किती छान आहे तुझं स्माइल!'' ती हसली. तिच्याकडून माहिती काढून घेत त्यानं उभ्या उभ्या डॉ. फ्रॅंक कॉनर्स हे पात्र रंगवायला सुरवातही केली. ब्रेंडाशी त्याचं सूत जुळलं. त्या काळात न्यूयॉर्क चुकवून तो रिव्हर बेंड नावाच्या गावात राहत होता. तो डॉक्‍टर नसावा, हे डॉक्‍टरांना कळायचं; पण इस्पितळात त्यानं मेडिकल डिग्रीसुद्धा (अर्थात बनावट) आणून दिली. भंपक बडबड करत तो नुसता वेळ काढायचा. वेळ-वखत पाहून ऑपरेशन टाळायची त्याची प्रयुक्‍ती होती. एक-दोनदा त्याच्या अंगलट आलंही असतं; पण दैव कायम फ्रॅंक अबाग्नेलच्या साथीला असायचं.
ब्रेंडाशी लग्न करायची वेळ आली तेव्हा त्यानं खरं खरं काय ते सांगून टाकलं. लुइझियानातली वकिलीची राज्यस्तरीय परीक्षा मी सध्या देतोय, त्यासाठी मदत कर अशी गळही घातली. ब्रेंडा भोळी होती. तिला फ्रॅंक खरंच खूप आवडला होता. त्याच्याकडं पैसेही होते. त्याला लुइझियानाची बार एग्झॅम देण्याची गरज पडली नाही. वकिलीची सनद त्यानं घरच्या घरीच तयार केली! कोर्टात कोट घालून मिरवलादेखील. एकदा न्यायमूर्तीनी त्याची अक्‍कल काढली, तेव्हा तिथून त्यानं पोबारा केला.
ब्रेंडा आणि फ्रॅंकच्या साखरपुड्याच्या पार्टीत एक बिनबुलाया मेहमान घुसला. तो होता एफबीआय एजंट कार्ल हानरॅट्टी; पण फ्रॅंकनं बेडरूमच्या खिडकीतून उडी मारत तिथूनही पळ काढला. कार्ल आता इरेला पडला.

ब्रेंडाला फसवून फ्रॅंक युरोपला पळाल्याचं तपासात निष्पन्न झालं. सातेक महिन्यांनंतर कार्ल हानरॅट्टीच्या लक्षात आलं की बनावट चेक्‍सची प्रकरणं युरोपातल्या बॅंकांमध्येच घडताहेत. याचा अर्थ फ्रॅंक अबाग्नेल युरोपमध्ये कुठे तरी असणार. शिवाय, हे बनावट चेक फ्रान्समध्येच छापले गेल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली होती. फ्रॅंकची आई पॉला ही फ्रेंच आहे हे त्याला आठवलं. फ्रॅंकच्या आईला गाठून कार्लनं पुढला मार्ग आखला. पोरानं जवळपास तेरा लाख डॉलर्स लुटलेत, हे ऐकून तिला चक्‍करच आली. कार्ल फ्रान्समध्ये पॉलाच्या गावी पोचला. त्याचा अंदाज अचूक होता. फ्रॅंक आपल्या आजोळी राहूनच सगळे उद्योग करत होता.
पुढं घडलं ते थरारकच होतं. एका कोवळ्या घोटाळेबाजाला परत आणणं हा एक व्यापच झाला. कार्लनं फ्रॅंकच्या छापखान्यात जाऊन त्याला पकडलं. "फ्रेंच तुरुंग बदनाम आहेत. तिथं तू मरशीलच, मुकाट्यानं मी सांगतो तसं कर...' कार्लनं त्याला सुनावलं.
- फ्रेंच तुरुंगात फ्रॅंक अबाग्नेल सहा महिने सडत होता. कार्लनं त्याला तिथून बाहेर काढलं. हस्तांतरण योजनेच्या अंतर्गत अमेरिकेत आणलं. त्याला आणतानाही त्याच्या नाकी नऊ आले. न्यूयॉर्कच्या विमानतळावर विमान उतरलं, तेव्हा फ्रॅंक आबाग्नेल चक्‍क गायब झाला होता. त्याचे वडील वारल्याची बातमी त्याला प्रवासातच समजली होती. कार्लनं त्याचा पाठलाग करत त्याला पकडलं. पुढं कोर्टापुढं उभं केलं. खटला चालला.
न्यायमूर्ती म्हणाले ः "आरोपीला कायद्याची पर्वा नाही. नीतिमत्तेची चाड नाही. अत्यंत धोकादायक मनोवृत्तीच्या या तरुणाला अल्पवयीन असल्याची सवलत देणंही शक्‍य नाही. सबब, बारा वर्षं एकांतकोठडीत त्याला ठेवण्यात यावं.'
...फ्रॅंक अबाग्नेल चारेक वर्षं अटलांटाच्या तुरुंगात होता. कार्ल त्याला नियमित भेटत असे.
पुढं तो सुधारला. घोटाळेबाज ठकसेन एका महासत्तेच्या सर्वोच्च देशांतर्गत तपास यंत्रणेचा सल्लागार झाला आणि त्यानं हजारो कोटी डॉलर्सचे बॅंकघोटाळे पकडून दिले! ते सगळं कसं घडलं? हे पडद्यावरच बघावं. त्यात मजा आहे.
* * *

चार्ल्सटन, साऊथ कॅरोलिना इथं एका छानदार घरात फ्रॅंक अबाग्नेल आपली पत्नी केली हिच्यासोबत अजूनही राहतात. वय सत्तरीला आलेलं. अबाग्नेल यांची स्वत:ची खासगी आर्थिक सल्लागार संस्था आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी एफबीआयसाठी भरीव कामगिरी केलीच; पण एक सन्मान्य असं जीवन व्यतीत केलं. बॅंकघोटाळे, त्यासंदर्भात घ्यायची काळजी या विषयांवर ते व्याख्यानं देतात. मध्यंतरी " "ब्लॉकचेन' हे भविष्य आहे, ते टाळून कुणालाही जाता येणार नाही,' असं त्यांनी छातीठोकपणाने सांगितलं आहे. मोठमोठ्या बॅंकांची व्यवस्थापनं फ्रॅंक अबाग्नेल काय म्हणतात, त्याकडे लक्ष ठेवून असतात.
सत्तरीच्या दशकातच फ्रॅंक यांनी स्टॅन रेडिंग या सहलेखकाच्या साथीनं आपलं आत्मचरित्र लिहून काढलं. त्यात बऱ्याच थापा आहेत असं म्हणतात. उदाहरणार्थ, "न्यूयॉर्क विमानतळावर उतरल्यावर मी विमानाच्या शौचकूपातून पळालो,' असं आबाग्नेल यांनी आपल्या कादंबरीवजा चरित्रात म्हटलं आहे; पण विमानाच्या शौचकूपातून पळ काढता येतच नाही, हे अमेरिकी टीव्ही-वाहिन्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिलं. "पायलट म्हणून जाताना एकदा माझ्यावर विमान चालवण्याची पाळी आली. कसंबसं विमान मी ऑटोपायलटवर टाकलं. तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. कारण मी विमानच काय, साधा पतंगसुद्धा मी कधी उडवला नव्हता...' असा खुलासा त्यांनी नंतर केला. काहीही झालं तरी त्यांचं चरित्र हे कुणालाही विस्मयकारक वाटलंच असतं. सन 1981 मध्ये डस्टिन हॉफमनला घेऊन त्यावर चित्रपट काढायचं चाललं होतं. त्याची घोषणाही झाली होती; पण ते काही जुळलं नाही. सन 2002 मध्ये स्पीलबर्गनं हा चित्रपट केला, तेव्हाही त्याला जॉनी डेपला घेऊन हा चित्रपट करायचा होता. अखेर लिओनार्डो डिकॅप्रिओनं बाजी मारली.

स्पीलबर्ग जवळपास 80 टक्‍के आत्मचरित्राशी प्रामाणिक राहिला आहे, असं प्रशस्तीपत्र नंतर अबाग्नेल यांनी दिलं. कार्ल हानरॅट्टी हे एफबीआय एजंटचं पात्र चित्रपटात टॉम हॅंक्‍सनं रंगवलं आहे. पुस्तकात त्याचं नाव शॉन ओरायली असं आहे. प्रत्यक्षात फ्रॅंक अबाग्नेलला सन्मार्गाला लावणाऱ्या या एजंटाचं खरं नाव होतं जोसेफ शिया; परंतु पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा जो शिया एफबीआयमध्ये कार्यरत होते. ऍमी ऍडम्सनं साकारलेली ब्रेंडा, आणि क्रिस्तोफर वॉकननं पेश केलेला फ्रॅंक आबाग्नेल सीनिअर यांच्या भूमिका खरोखर लाजबाब आहेत. या चित्रपटकथेचं नंतर नृत्यनाटिकेतही रूपांतर झालं. तेही रंगभूमीवर खूप गाजलं. "कॅच मी इफ यू कॅन'चं जॉन विल्यम्स यांनी दिलेलं संगीतही त्या काळी बरंच गाजलं होतं.
एखादा गुन्हेगार सुधारतो; पण एवढा आमूलाग्र? खरंच असं होऊ शकतं का? अबाग्नेल यांच्या बाबतीत ते घडलं हे खरं. म्हणूनच तर स्पीलबर्गसारख्या दिग्दर्शकाला त्या जीवनकहाणीचा मोह पडला.

चोरांची म्हणून एक नीतीमत्ता असू शकते...दोन हजार वर्षांपूर्वी "मृच्छकटिका'तल्या शर्विलकाच्या रूपानं शूद्रकानं बहुधा हेच तर सांगण्याचा प्रयत्न केला होता. व्यंकटेशस्तोत्रातल्या ओळी आठवतात इथं : गावींचे होते लेंडवोहळ। गंगेसी मिळता गंगाजळ। काकविष्ठेचे झाले पिंपळ । तयासी निंद्य कोण म्हणे?।।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.