अपनी आँखों के समंदरमे.... (प्रवीण टोकेकर)

pravin tokekar
pravin tokekar
Updated on

"टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं. पाहतापाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. मृत्यूदेखील देखणा असू शकतो, त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे थिटं ठरतं, हेच "टायटॅनिक'नं दाखवलं होतं. "टायटॅनिक' हे बोटीच्या ऐतिहासिक अपघाताचं निव्वळ चित्रण उरलंच नाही. त्या शोकांतिकेनं त्याच्याही पलीकडं पंख पसरले. "टायटॅनिक' ही एक कशिश आहे. उरातली एक सल. दीर्घकाळ मनोभूमीत हिंडणाऱ्या अहमद फराझच्या एखाद्या गझलेसारखी.

अपनी आँखों के समंदर मे उतर जाने दे
तेरा मुजरिम हूं, मुझे डूब के मर जाने दे

जख्म कितने तेरे चाहत ने दिए है मुझको
सोचता हूं की कहूं तुझसे...मगर जाने दे

आग दुनिया की लगाई हुई बुझ जाएगी
कोई आंसू मेरे दामन पे बिखर जाने दे
- नझीर बकरी, उर्दू शायर.

... सारा माहौल भारून टाकणारी ही जगजीतसिंह यांनी गायलेली गझल सन 1978 मध्ये पहिल्यांदा ऐकू आली. तेव्हापासून समुद्रासारखीच ती कायम सोबत करते आहे. लाटांची घनगंभीर गाज लाभलेल्या या गझलेला जागृतीचा किनारा नव्हता. भळभळत्या भावनांचं ते समुद्ररूप होतं. ऊर्दू शायर नझीर बकरी यांनी ही गझल कधी लिहिली आणि जगजीत यांनी तिला सुरांमध्ये कधी बांधलं? आणखी वीसेक वर्षांनी याच गझलेचं एक अद्वितीय कथारूप पडद्यावर उमटणार आहे, हे त्यांना तेव्हा कळलं असेल का?
"टायटॅनिक' या पडद्यावरल्या समुद्रगाथेला बुधवारी (ता. 19 डिसेंबर) 22 वर्षं पूर्ण झाली. हॉलिवूडच्या पंचपंचताराकित चित्रगृहात त्याचा खास खेळ आयोजित करण्यात आला होता. हॉलिवूडचे यच्चयावत सारे सितारे, महासितारे झकपक पोशाखानिशी तिथं अवतरले होते. दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन स्वत: स्वागतासाठी उभा होता. जंगी स्वागतानंतर चित्रपट सुरू झाला, आणि...गारुड झालं.

...निळ्याशार समुद्राच्या लाटा लटलटत चित्रगृहाच्या भिंतींना जणू बिलगू लागल्या. भावभावनांच्या, अद्‌भुत सुरांच्या सागरानं सारा आसमंत वेढला...उरली एक निगूढ, निळी समुद्रातळीची शांतता. चित्रपट संपला, तेव्हा पोशाखी महासिताऱ्यांना भान उरलं नव्हतं. डोळे आणि मनं भरून आली होती. मानवी इतिहासातल्या एका शोकांतिक अपघाताचं नेत्रदीपक चित्रण बघण्याच्या अपेक्षेनं आलेले हे लोक; पण त्यांना "टायटॅनिक'नं अजरामर प्रेमकहाणीचं समुद्ररूप दाखवलं होतं.
पाहता पाहता या चित्रसुरांच्या गारुडानं सात समुद्र ओलांडले. जगभर "टायटॅनिक'वर रसिकांच्या उड्या पडल्या. भावगर्भ संगीत, त्या कलाकृतीतला अभिजाताचा प्रत्येक चतकोर चंद्रकोरीसारखा उजळून निघालेला. प्रत्येक चित्रचौकट मनात घर करणारी. प्रत्येक व्यक्‍तिरेखा जणू स्वप्नात भेटल्यासारखी समोर अवतरलेली. मृत्यूदेखील देखणा असू शकतो. त्याचं रौद्र स्वरूप प्रीतीपुढे थिटं ठरतं. हेच "टायटॅनिक'नं दाखवलं होतं. "टायटॅनिक' हे बोटीच्या ऐतिहासिक अपघाताचं निव्वळ चित्रण मग उरलंच नाही. त्या शोकांतिकेनं त्याच्याही पलीकडं पंख पसरले. "टायटॅनिक' ही एक कशिश आहे. उरातली एक सल. दीर्घकाळ मनोभूमीत हिंडणाऱ्या अहमद फराझच्या एखाद्या गझलेसारखी.

"टायटॅनिक' हा गेल्या शतकामधल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरला. तो तसाच बनला पाहिजे, असा निर्मात्याचा हट्‌टच होता. आपण एक "एपिक' जन्माला घालतो आहोत, हे भान तो बनवणाऱ्यांना होतं. त्यासाठी त्यांनी कुठलीही कसर ठेवली नाही. या चित्रपटात काय नव्हतं? इतिहासाचा सोस असणाऱ्यांसाठी तपशीलवार, अचूक दृश्‍यं होती. तंत्राची नवलाई असणाऱ्यांसाठी नेत्रदीपक, थरारक प्रसंग होते. कवितेचा किडा चावलेल्यांसाठी काव्यमय संवाद होते, आणि प्रणयाच्या निळ्या-जांभळ्या छटांचं आकर्षण असलेल्यांसाठी तर अवघा समुद्रच होता. आशयाच्या दृष्टीनं ठासून भरलेला, तंत्रशुद्ध, आणि वास्तवाशी इमान राखणारा असा हा महाचित्रपट होता.
नव्वदीच्या दशकात संगणकयुगानं उसळी घेतली होती. तांत्रिक करामतींची एक लाट आली होती. त्या काळात वैज्ञानिक पठडीतले अनेक चित्रपट आले. कारण आता तसं तंत्रज्ञान दिमतीला होतं. "टायटॅनिक'च्या निर्मितीतही तंत्राचा वाटा खूप मोलाचा होता. वास्तविक, त्या 1996-97 या वर्षात जगभर वायटूके नावाच्या राक्षसाची चर्चा सुरू झाली होती. नव्या सहस्रकाला गाठतागाठता सगळे कंप्युटर बंद पडणार, आणि "न भूतो न भविष्यति' गोंधळ होणार, म्हणून भीती घातली जात होती. त्या काळात जेम्स कॅमेरॉन नावाच्या "शायराना' मिजाज असलेल्या प्रतिभावान दिग्दर्शकानं होतं-नव्हतं ते सगळं तंत्रज्ञान पणाला लावून "टायटॅनिक'ची प्रेमगाथा पेश केली. त्यासाठी इतिहासाचं प्रचंड उत्खनन केलं. अगदी समुद्रतळ ढवळून काढला आणि संगणकीय चमत्कारही घडवून दाखवले.

"टायटॅनिक'च्या शोकांतिकेवर अनेक व्याकुळ गाणी लिहून, गाऊन झाली. संगीतिका झाल्या. लघुपट झाले. सन 1958 साली "अ नाइट टू रिमेंबर' नावाचा चित्रपटही येऊन गेला होता. "टायटॅनिक'चा सेकंड डेक ऑफिसर लोटलियर हा त्या अपघातातून जिवंत वाचला. त्याच्या स्मरणांवर आधारित तो चित्रपट होता. पुढे या विषयावर पुस्तकांच्या रूपानं लक्षावधी पृष्ठं लिहून झाली. हा अपघात होता की घातपात, इथपासून ते अगदी अपशकुनांच्या मालिकेपर्यंत काहीही उलटसुलट छापून आलं; पण जेम्स कॅमेरॉनला मात्र त्या शोकांतिकेत दडलेली एक अजरामर प्रेमकहाणी दिसली.
या चित्रपटानं असंख्य विक्रम मोडले. गल्ल्याचे. कलात्मकतेचे. तंत्रकुशलतेचे; पण त्याच्याही वर ही प्रेमकहाणी दशांगुळं वर उरलीच. कारण ती रसिकांच्या मनात कायमची वस्तीला गेली होती.
गेल्या शतकात सर्वोत्कृष्ट मानल्या गेलेल्या या चित्रपटाला कुर्निसात करणं, केव्हाही इष्ट. विशेषत: या डिसेंबरात. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट नवं वर्ष उजाडायच्या आत बघून टाकावा.
* * *

"आरएमएस टायटॅनिक' हे अवाढव्य जहाज ब्रिटिशांच्या खलाशी वृत्तीचं आणि वैभवाचं जणू तरंगतं प्रतीक होतं. कधीही न बुडू शकणारी आलिशान प्रवासी बोट म्हणूनच ती बांधली गेली. अर्थात धनवंतांनाच परवडेल, अशी तिची बांधणी होती. "व्हाइट स्टार लाइन' नामक एका खासगी खलाशी कंपनीनं कोट्यवधी पौंड मोजून बेलफास्टच्या बंदरात तिला बांधून काढलं होतं. जोसेफ ब्रुस इस्मे नावाचा धनाढ्य गृहस्थ या जहाज कंपनीचा मालक होता. तो स्वत: हौसेनं आपल्या जहाजाच्या पहिल्यावहिल्या सफरीसाठी मोठ्या डामडौलानं आला होता.
या जहाजराणीमध्ये काय नव्हतं? बडेजाव होताच; पण त्या काळात, म्हणजे शंभरेक वर्षांपूर्वी जे काही तंत्रज्ञान उपलब्ध होतं, ते सारं इथं कामाला लावण्यात आलं होतं. अर्थात पहिल्या-दुसऱ्या वर्गासह तिथंही थर्ड क्‍लासच्या पाशिंजरांची सोय होतीच. गुळगुळीत, लकाकीदार लाकडी जिने, भक्‍कम वॉटरप्रूफ दरवाजे, सुसज्ज उपाहारगृह, मेजवानीची दालनं, श्रीमंत उद्योजकांना बोटीवरून जगभर संदेश धाडण्यासाठी खास "मार्कोनीग्राम' म्हणजेच तारायंत्राची सोय, उत्कृष्ट सजवलेली शयनगृहं, जागोजाग लावलेली दुर्मीळ पेंटिंग्ज...त्यासाठीही भरपूर खर्च करण्यात आला होता. मादक वस्त्राची सुगंधी सळसळ करत हंसचालीनं जाणाऱ्या एखाद्या रूपगर्वितेकडे इतरांनी माना वळवून पाहत राहावं, तसं "टायटॅनिक'चं रूप होतं.
बोट बांधून तयार झाल्यावर 10 एप्रिल 1910 रोजी ती न्यूयॉर्ककडे प्रस्थान करेल असं जाहीर झालं. पहिल्यावहिल्या सागरसफरीसाठी बोट आणखी सजवली गेली. साऱ्या यंत्रणा कार्यरत झाल्या. श्रीमंत प्रवाशांनी ढीगभर पैसे मोजून आपापल्या जागा रिझर्व्ह केल्या. थर्डक्‍लाससुद्धा फुल्ल झाला. श्रीमंत प्रवासी, सामान्य मुसाफिर आणि कर्मचारी मिळून बोटीवर 2,224 लोक होते. ठरल्याप्रमाणं समारंभपूर्वक साऊदॅम्प्टन बंदर बोटीनं सोडलं.

आयर्लंडच्या किनाऱ्याकडे पाहून हात हलवत, फ्रान्सच्या चेरबर्ग बंदराला खुशालीचा नमस्कार ठोकत "टायटॅनिक' पाणी कापत न्यूयॉर्ककडे निघाली. न्यू फाऊंडलॅंडच्या दक्षिणेकडल्या पाण्यात, आपल्या मार्गामध्ये संकटाचा एक बर्फाचा डोंगर तरंगत उभा आहे, आणि त्यावर पाय रोवून साक्षात मृत्यू आपली प्रतीक्षा करतोय, हे "टायटॅनिक'च्या गावीही नव्हतं. एवढी अत्याधुनिक बोट; पण हिमनगाची चाहूल देणारी सक्षम यंत्रणा तेव्हा अस्तित्वात नव्हती. इतकी तंत्रज्ञानं उपलब्ध असूनही आजही हिमनगामुळे जहाजं फुटतातच. 14 एप्रिलच्या रात्री सारी बोट धूमधमाल मेजवानीत रममाण झालेली असताना टायटॅनिक त्या हिमनगावर आदळली. बोटीचा नवाकोरा लोखंडी सांगाडा पुठ्ठ्यासारखा फाडत हिमनगाचं टोक घुसलं. बोटीचा कणाच मोडला. पाण्याचे लोंढे आक्राळविक्राळ आवाज करत चाल करून आले.
बोटीवर पुरेशी लाइफ जॅकेट्‌स आणि छोट्या संकटकालीन होड्या होत्या. "पहिल्या वर्गास प्राधान्य' या नियमानुसार काही श्रीमंतांनी पळ काढला; पण सगळ्यांना जीव वाचवायची सुविधा नव्हती. 11 वाजून 40 मिनिटांनी हिमनग जहाजावर आदळला, आणि मध्यरात्री दोन वाजून 20 मिनिटांनी "टायटॅनिक' जहाज समुद्रतळाशी गेलेलं होतं. अवघ्या तीन-साडेतीन तासांत खेळ खलास झाला. बोट बुडाल्यानंतर दोनेक तासांनी "आरएमएस कार्पेथिया' हे जहाज तिथं पोचलं. लाइफबोटीत, लाकडी फळकुटांवर तगून राहिलेले सुमारे 705 जण तिनं आपल्या कुशीत सुरक्षित ओढून घेतले; पण पंधराशे जणांना आपले जीव गमवावे लागले. "टायटॅनिक'ची जलसमाधी हा मानवी संस्कृतीवरचा एक कायमचा ओरखडा राहिला आहे.

"टायटॅनिक'चे कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांनी ताठ मानेनं आपल्या जहाजासोबत समुद्रतळ गाठला. या जहाजाचा शिल्पकार थॉमस अँड्य्रूज हादेखील बोटीवर होता. त्यानंही शेवटपर्यंत आपलं लाडकं जहाज सोडलं नाही. कित्येक मोठ्या कुटुंबांना समुद्रानं आपल्या तळाशी ओढून घेतलं. जहाजाचा मालक जोसेफ इस्मे यानं मात्र हिमनगाचा तडाखा बसताक्षणी एक लाइफबोट ओढून पोबारा केला. त्याच्या या अप्पलपोट्या कृतीबद्दल ब्रिटिश जनतेनं त्याला कधीही माफ केलं नाही. आयुष्यभर टीकेचा धनी झालेला हा श्रीमंत माणूस सन 1937 मध्ये वयाच्या 74व्या वर्षी निवर्तला. त्याच्याकडे पैसा होता; पण सार्वजनिक जीवनात तो "टायटॅनिक'च्या दुर्घटनेनंतर कधीही दिसला नाही. ऐनवेळी बोट सोडून पळणाऱ्याच्या कृतीला "इस्मेगिरी' असं इंग्रजीत म्हटलं जाऊ लागलं.
गरीब बिचारी "टायटॅनिक' तिच्या लोप पावलेल्या ऐश्‍वर्यवान अस्तित्वाचे अवशेष सांभाळत बारा हजार फूट खोल सागरतळाशी पडून राहिली. पुढली किती तरी वर्षं. प्रवाळांनी तिच्यावर घरं उभारली. समुद्र वनस्पतींनी ठाण मांडलं. एकेकाळी जिथं सोन्याचा मुलामा दिलेल्या कड्याकुलपांची कपाटं होती, तिथं आता समुद्रजीवांची चहलपहल होत होती.
* * *

सत्तरेक वर्ष गेली असतील... ब्रॉक कोव्हेट नावाचा कुणी एक संशोधक "टायटॅनिक'चे अवशेष शोधू लागला होता. रशियाकडे "अकाडेमिक मिस्तिस्लाव केल्डिश' नावाची एक अत्याधुनिक वैज्ञानिक पाणबुडी होती. खोल समुद्रात विनासायास बुडी मारेल, अशी. ती भाड्यानं घेऊन कोव्हेटनं टायटॅनिकसाठी सागरतळ गाठला. त्याला काय हवं होतं?
"हार्ट ऑफ ओशन' नावाचा एक कमालीचा नायाब हिरा त्याला हवा होता! सोळाव्या लुईच्या खजिन्यातली ही चीज, पृथ्वीमोलाची होती म्हणे. "टायटॅनिक' बुडाली, तेव्हा तो हिरासुद्धा समुद्रार्पण झाला असावा, अशी त्याची अटकळ होती. तो हिरा धुंडाळण्यासाठी त्याचा सारा खटाटोप होता. अर्थात ब्रॉक कोव्हेट हा लालची, खलवृत्तीचा इसम होता असं नव्हे. "टायटॅनिक' नष्ट झाली, तेव्हा खूप कलाकृतीही नष्ट झाल्या. अनेक पेंटिंग्ज, पुतळे समुद्रात अदृश्‍य झाले. त्या सगळ्याचा धांडोळा घेणं, हीसुद्धा काळाची गरज होतीच. कोव्हेटच्या आग्रहापोटी केल्डिश पाणबुडीचे प्रोब्ज अंधाऱ्या सागरतळाशी उतरले. "टायटॅनिक'चे पुरातन अवशेष दिसू लागले. तिची विशाल दालनं, जिने, शयनगृहं सारं काही आता समुद्रविश्‍वाचा भाग झालं होतं. त्या तळअंधारातल्या अवशेषांमध्ये हिंडून त्या केल्डिशनं एक तिजोरी शोधून काढली. काय असेल या तिजोरीत? उत्सुकता ताणली गेली. "हार्ट ऑफ ओशन' असेल?
यांत्रिक हातानं ते कपाट ओढून काढण्यात आलं. बोटीवर आणून कोव्हेटच्या टीमनं ते उघडलं. हिरा नव्हता; पण नीट जपून ठेवलेली एक चित्राची सुरनळी मात्र होती.
...मंचकावर पहुडलेल्या एका अभिसारिकेचं ते पोट्रेट होतं. निर्वस्त्र आणि निमंत्रणोत्सुक. गळ्यात फक्‍त एक पेंडंट. त्या पेंडंटमध्ये "हार्ट ऑफ ओशन'चं रत्न दिसत होतं. कोण असेल ही? जिवंत असेल की...

माध्यमांनी प्रसिद्धीनं काम केलं. ते चित्र प्रसिद्ध झाल्यावर रोझ डॉसन कॅल्वर्ट नामक एका वृद्ध स्त्रीनं कोव्हेटशी संपर्क साधला. ती एक निवृत्त नटी होती म्हणे. आश्‍चर्य म्हणजे तिला "हार्ट ऑफ ओशन'बद्दल माहिती होती. कोव्हेटनं तिला बोलावणं धाडलं. "टायटॅनिक'च्या शोकांतिकेतून वाचलेल्या काही सुदैवींपैकी ती एक होती. म्हातारीनं वयाची शंभरी ओलांडली होती, पण त्या वृद्ध चेहऱ्यावर, देहावर सौंदर्याच्या खुणा आपला माग सोडून गेलेल्या दिसत होत्या. आजी एकेकाळी देखणी होती असणार. "होय, मी "टायटॅनिक'वर होते...' तिनं गूढ स्मित करत सांगितलं. सगळ्यांचंच कुतूहल चाळवलं गेलं. तरुण संशोधकांच्या प्रश्‍नांना उत्तरं देता देता मंद हसत रोझ आज्जीनं एक जगावेगळी कहाणी सांगितली. जी पृथ्वीवर कुणीही ऐकली नव्हती. कुणी पाहिलीही नव्हती. म्हातारीचं गुपित फक्‍त समुद्रालाच ठाऊक होतं. आजी रोझ डॉसन कॅल्वर्ट बोलू लागल्या. बघताबघता तिनं साऱ्यांना सन 1912 मध्ये नेलं. एका प्रेमकहाणीवरला मखमली पडदा हलकेच वर गेला...
* * *

तारीख 10 एप्रिल 1912. साऊदॅम्प्टनच्या बंदरावर धक्‍क्‍याला लागलेली "आरएमएस टायटॅनिक' बघताना भल्या भल्यांचे जबडे खाली पडत होते. हे काय गलबत म्हणायचं की चेष्टा? एका नजरेच्या टप्प्यातही धड येत नाही. सासुरवाडी दादल्याच्या घरी जायला सजलेल्या सालंकृत नववधूसारखी नटलेली ही बोट होती मोठी नखरेल! अंगावरचा रंगही पुरता वाळला नव्हता. सगळीकडे होता तो नवेपणाचा वास. नवे पडदे, नवी चिनी मातीची महागडी क्रॉकरी, नवीन बिछाने.

बंदरावर उद्‌घोषणा होत होत्या. "टायटॅनिक'च्या पहिल्या वर्गाचे डुढ्‌ढाचार्य कुटुंबकबिल्यानिशी बोटीकडे निघालेले होते. पसरट टोप्या आणि त्याहीपेक्षा पसरट झग्यांचे बोंगे सांभाळत कुऱ्यात निघालेल्या मडमा आणि त्यांची गोरी गोरी पोरं. हमालांची वर्दळ. अधिकारी वर्गाचं अदबीनं वागणं...माहौल भारलेला होता.
त्यातच होती रोझ ड्युइट बक्‍काटर. कर्जात बुडालेल्या तालेवार घराण्यातलं हे एक कन्यारत्न. उपवर पोरीला धनवंत घरात उजवली, की कर्जाचा डोंगरही आपोआप खाली येईल, असा तिच्या आईचा, रुथचा साधा हिशेब होता. त्यानुसार कॅल हॉक्‍लीसारखा बकरा हेरून त्याच्याशी तिनं पोरीची सोयरिक जमवलीसुद्धा होती. कॅल श्रीमंत होताच. त्याच्या कुटुंबाचा पीट्‌सबर्गला लोखंडाचा अवाढव्य व्यवसाय होता. अतिप्रचंड संपदेचा मालक असलेल्या कॅलकडे "हार्ट ऑफ ओशन' होता. सोळाव्या लुईच्या खजिन्यातली ही चीज त्याच्याकडे कशी आली, याचीही एक स्वतंत्र कहाणी होती.

'आपणही रॉयल्सच आहोत, रोझ!,'' असं तो मिजाशीत ऐकवे. कॅल स्वत: अत्यंत आत्मकेंद्रित आणि आढ्यतेखोर होताच. उमरावांच्या तरुण मुलग्यानं केलेल्या दिवटेगिरीलाही समाजात मान असतो. त्यालाही होता. जेमतेम सोळावं वरीस संपून सतरावं लागलेल्या रोझला मात्र हे "स्थळ' आवडल नव्हतं. तिची आई म्हणायची ः 'रोझ, आपण स्त्रिया आहोत! आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य कुठं असतं?''
रोझचं तोंड कडूझर पडलं होतं. असलं सोनेरी पिंजऱ्यात जगून काय फायदा? जीवनाची असोशी शिष्टाचारात गाडून आयुष्याचा तुरुंग करणं तिच्या बंडखोर, हट्‌टी स्वभावाला मान्य होत नव्हतं. मुळात कॅल तिला आवडलाच नव्हता. चडफडतच बोटीवरच्या सफरीसाठी ती आली होती. प्रवासातच कुठंतरी बोटीच्या टोकाला गपचूप जाऊन खाली झोकून द्यायचं, असं तिनं ठरवून टाकलं. तशी ती गेलीही...
'हे हे...डोण्ट डू इट!,'' पाठीमागून आवाज आला.
'निघून जा...जवळ येऊ नकोस!,'' जहाजाच्या डेकवरून समुद्रात उडी मारायच्या बेतात असलेली रोझ ओरडली.
'कमॉन, तुझा हात दे...मी ओढतो तुला!''
'जवळ येऊ नकोस! मला जाऊ दे!!''
त्या तरुण पोरानं हातातली सिगारेट दाखवत जस्ट ती खाली फेकायची आहे, असं खुणेनं सुचवलं. ऐन वेळी ही ब्याद कुठून टपकली म्हणून रोझ वैतागली होती. हे जग धड आत्महत्यासुद्धा करू देत नाही.
'मला माहितीये, तू नाही टाकणारेस उडी...एव्हाना टाकलीसुद्धा असतीस. याचा अर्थ तुझा इरादा पक्‍का नाहीये,'' तो म्हणाला. एकीकडे हळूच पायातले बूटमोजेही त्यानं काढायला घेतले होते.
'तू जा ना!''
'कसा जाणार? आता मी या लफड्यात गुंतलो ना! तुझ्यापाठोपाठ मलाही उडी घ्यावी लागणार!!'' तो म्हणाला.
'मरायचंय का?''
'मी बरा पोहू शकतो! पण प्रॉब्लेम असाय, की खालच्या पाण्याचं तापमान जेमतेम दोन डिग्री सेल्सिअस आहे! मरणाचं थंडगार...विस्कॉन्सिनला गेलाय कधी? मी तिथलाच आहे. तिथं असलं दळिद्री गारढोण पाणी असतं!,'' तो गप्पा मारल्यासारखा बोलू लागला.
'असेना का थंड...नुसतं खाली पडतानाच जीव जाईल!,'' ती स्वत:शीच म्हणाली.
'मरणाच्या वेदना होतील, मिस! हजारो सुया टोचल्यासारख्या वेदना. मला आहे ना अनुभव...म्हणूनच मला तुमच्या पाठोपाठ उडी बिलकुल मारायची नाही; पण तुम्हीच नाइलाज केलात तर..,'' त्यानं खांदे उडवले.
'तू वेडा आहेस का?''
'ऐका, मला हात द्या...असलं काही करू नका. कशाला उगाच जीवबीव द्यायचा? काय नाव आपलं?,'' त्यानं विचारलं. एव्हाना रोझचं अवसान पुरतं ढासळलं होतं. तिनं मुकाट्यानं त्याला हात दिला.
'मी जॅक डॉसन!,'' तो म्हणाला.
'मी रोझ ड्युइट बक्‍काटर!''
'हा किस्सा आता लिहून काढा डायरीत!''
...प्रीतीच्या अथांग सागरातला हा पहिलावहिला तरंग होता.
* * *

रोझला शोधत आलेल्या कॅल हॉक्‍लीनं अखेर तिला डेकवर गाठलं. शेजारीच जॅक डॉसन उभा होता. नुकताच तो आत्महत्येचा प्रसंग घडून गेलेला. कॅलला भलताच संशय आला असता. "मी पडता पडता वाचले. या तरुणानं वाचवलं,' असं रोझनं कॅलला सांगितलं. कॅलनं मख्ख चेहऱ्यानं खिशातून काही नोटा काढल्या. 'माझ्या जीवाची किंमत एवढीच का?'' असं तिनं दुखावून विचारलं. शेवटी कॅलनं जॅकला रात्रीच्या जेवणासाठी पहिल्या वर्गाच्या भोजनगृहात येण्याचं निमंत्रण दिलं.
'च्यामारी, तुला हा माठ्या खरंच आवडतो?''
'व्हॉट डु यू मीन?''
'तुझं प्रेम आहे का खरंच या असल्या माणसावर?,''जॅकनं बेधडक विचारलं.
'माय गॉड! आपण एकमेकांना ओळखतही नाही. एका तरुण मुलीला असं कसं विचारू शकतोस तू? शिष्टाचार नाहीत तुला!,'' ती भडकून म्हणाली.
'जस्ट सांग ना, तुझं प्रेम आहे की नाही? सिंपल प्रश्‍न आहे...''
'तू असंस्कृत, अडाणी, आणि उद्धट आहेस...हे संभाषण मला नकोय!'' रोझ जायला निघाली.
'...पण अपमान तुम्ही करताय मिस!,'' तो म्हणाला.
...श्रीमंतांसोबतच्या भोजनप्रसंगी जॅकनं रंगत आणली. सुरवातीला किंचित अवघडलेल्या जॅकनं एका क्षणी सगळं झुगारून दिलं, आणि तो बिनधास्त गप्पा मारू लागला. त्याला कसले गंड नव्हते. भय नव्हतं. संकोचही नव्हता. पोकर गेममध्ये त्यानं "टायटॅनिक'ची थर्ड क्‍लासची दोन तिकिटं जिंकली होती, आणि ऐनवेळी तो बोटीत चढला होता. तो आणि त्याचा इटालियन मित्र फॅब्रिझिओ. जॅक डॉसन हा एक कलंदर चित्रकार होता. हातावर पोट असलेला. आगापीछा काही नाही. आज इथं तर उद्या तिथं...ही माहिती त्यानंच देऊन टाकली. "काल एका पुलाखाली रात्र काढणारा मी आज तुमच्यासारख्या भारी लोकांबरोबर जेवतोय, हेच खरं जीवन,' हे त्यानं त्या भोजनाच्या मेजावर बेधडक सांगून टाकलं. हे असलं दिशाहीन जगणं समजून घेणं, त्या भद्रजनांच्या अकलेबाहेरचं काम होतं; पण त्याचा रगेल आणि मनमोकळा स्वभाव काही उपस्थितांना मोहवून गेला. अर्थात कॅल हॉक्‍ली सोडून. कारण रोझला तो आवडतोय, हे दिसून त्याच्या मनात जणू वखारी पेटल्या होत्या.
...त्याची भीती अनाठायी नव्हती. जॅकचं फुलपाखरासारखं स्वच्छंदी जगणं, खळखळून हसणं, तारुण्याच्या ऊर्मी हेच तर तिला हवंहवंसं वाटत होतं. जॅकनं तिला मग त्या पंचतारांकित कोषातून बाहेर ओढलं आणि थर्ड क्‍लासची धमाल दाखवली. अवघं जहाज हिंडून दाखवलं. बघताबघता दोघांचे हात गुंतले. मनं गुंतली. कॅल हॉक्‍लीचं शिष्टसंमत विश्‍व विरघळून गेलं. जॅकनं रोझला चक्‍क थुंकावं कसं हेही शिकवलं!
जहाजाच्या पुढल्या टोकाशी कठड्याच्या पलीकडे उभं राहून दोन्ही हात पसरून उभं राहिलं, की वाटतं आपण उडतो आहोत...आपल्याला पंख फुटले आहेत आणि एखाद्या आझाद समुद्रपक्ष्यासारखे समुद्राच्या पाण्यावर आपण उडत क्षितिजाकडे चाललो आहोत. जॅक पाठीशी उभा राहिला. दोघांनीही मन:पूत अशा "आभाळफेऱ्या' मारल्या.
'हे, आय ऍम द किंग ऑफ द वर्ल्ड!'' दोन्ही हात फैलावून जॅक ओरडला. तो त्याक्षणी खरंच बोलत होता.
...एका जहाजाच्या मर्यादित परिघात रोझला वेगळंच आभाळ ओळखीचं झालं होतं. दोघंही तरुण होते. आसुसलेले होते. देहाच्या ऊर्मी पेशीपेशींमध्ये वेगळंच रसायन मिसळत होत्या. रितीभातींच्या पल्याड जाणारं काहीतरी अनोखं, दुर्मीळ असं रोझच्या वाट्याला आलं, ज्याच्यासाठी तिनं पुन्हा एकवार समुद्रात उडी घेतली असती.
जहाजाच्या अंतर्भागात ठेवलेल्या मोटारीत दोघांनी बसून भरपूर हसून घेतलं.
'पॉम पॉम...बोला, मॅडम, कुठं जायाचं?,'' बंद मोटारीत चाकापाठीमागे बसून जॅक म्हणाला.
'लांब, तिथं दूरवर...त्या ताऱ्यांच्या जगात!,'' कमालीच्या असोशीनं ती म्हणाली. मग तारांगण स्वत:हून ओणावलं. चांदणं तिच्या देहात भिनलं. समुद्र आणि आभाळ एक झालं.
(उत्तरार्ध : पुढील अंकी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()