एका वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आलं की, अखिल महाराष्ट्रात जवळपास पस्तीस लाखांहून अधिक नागरिक कुठल्या ना कुठल्या तणावाचे बळी आहेत. त्यापैकी पाचेक लाख चिंतातुर; तर एकट्या पुणे जिल्ह्यात राहतात म्हणे. खरं-खोटं देव जाणे, पुणेकरांना चिंता सर्वाधिक का सतावतात, हे मुळात हुडकून काढण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार आम्ही आमच्या पतीने वेगळी अशी पाहणी केली. हे सर्वेक्षण अर्थातच गुप्त होते...
रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाएगा
वो मुकद्दर का सिकंदर, जानेमन वो कहलायेगा
- सिकंदर ऊर्फ श्री. रा. रा. बच्चनसाहेब.
(‘मुकद्दर का सिकंदर’ या बोधपटातून साभार)
जिवाला घोर न लागू द्यायचा नसेल तर बिनघोर घोरणे, हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. पण दुर्दैवाने हा उपाय कुणाला सुचत नाही. उगीच चिंतांचे डोंगर वाढवत बसायचं, आणि चिंता वाढतात म्हणून पुन्हा पुन्हा चिंताग्रस्त होत स्वत:चीच झोप उडवून घ्यायची, याला काही अर्थ तसा नाही. चिंता ही अशी व्याधी आहे की जितकी बाळगाल तितकी बळावते. उडवून लावाल तर तिची तुमच्याजवळ फिरकण्याची बिशाद नाही.
उपरोक्त बोधपंक्तींमध्ये नशिबाच्या शिकंदराचे मनोज्ञ व्यक्तिविशेष वर्णिले आहे. ऐशा नरपुंगवास ताणतणाव, चिंता, त्रागा आदी व्याधींची बाधा कधीही होत नाही. चिंतामुक्त जगण्यामुळे रक्तदाब, मधुमेह, मेदवृद्धी असे विकारही संभवत नाहीत. तस्मात तो पुरुष यशस्वी ठरतो.
दुर्दैवाने अशा शिकंदरांची संख्या अत्यल्प असते. बाकीचे सारेच चिंतातुर जंतू! जगण्याच्या विविध ताणतणावांना तोंड देत देत त्यांची कालक्रमणा सुरू असते. ताणतणाव कमी करण्यासाठी हे गरीब बिचारे चिंतातुर जंतू यथाशक्ती काही प्रयत्न करत असतात, नाही असे नाही. तणाव कमी करण्यासाठी माणसं काय काय करतात. कुणी बिनघोर जगण्याच्या नादात भरपूर खादाडी करतं. खात सुटल्यामुळे शरीर ‘सुटतं.’ ते सुटलं म्हणून व्यायाम करायचा, बाबा-बापू गाठून कुठंतरी अध्यात्मात मन:शांती धुंडत बसायचं.
काही लोकांना तर चिंता करण्याचा छंदच असतो. आपल्याला आता कसलीच चिंता उरली नाही, अशी अवस्था प्राप्त झाली तरी ‘छे, असं कसं झालं?’ असं मनाशीच म्हणत अशी माणसं नवी चिंता मागे लावून घेतील. जित्याची खोड ती! धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी या चिंतातुर जंतुंची अवस्था असते.
स्थळ : रुपाली किंवा वैशाली किंवा वाडेश्वर किंवा तत्सम खादाडीकट्टा. शहर : अर्थात पुणे!
‘याला काय अर्थय... मोवाफी भाफॉठेई... याय... पोळवई नाफ्रा...,’’ चिंत्या पुरंदरेनं उत्तप्प्याचा तुकडा काट्याने मोडून तोंडात कोंबला. त्यात फक्त चिंता तेवढी कळली, कारण कळणे अशक्य होते. कुठल्यातरी एका गोष्टीला काहीही अर्थ नाही, एवढे मात्र कळले.
‘फुर्रर्र... चुक,’ समोर आलेल्या कॉफीवर जमलेली साय हुकवत मी सावध प्रतिक्रिया दिली.
आता इथे चिंत्या पुरंदरे या प्राणीमात्राची ओळख करून देणे भाग आहे. त्याच्या आई-बापाने त्याचे नाव चिंतामणी ठेवले, हा काळाचा महिमाच केवळ! भविष्यात आपले पोर लोणीविक्या दामल्यांच्या आळीत बसून जगाची चिंता वाहील, हे त्यांना तेव्हा कळले असावे! चिंत्या पुरंदरेला खूप चिंता सतत छळत असतात. त्याच्या मते, या घटकेला मराठी भाषा, लोकशाही मूल्ये, ज्यो बायडेन, भूगर्भातील इंधनसाठे, उत्तर ध्रुवावरील ग्लेशियर, सूर्य, शिक्षणक्षेत्र, आणि शिवसेना या मूलभूत गोष्टींची अवस्था अत्यंत शोचनीय असल्याने जगणे कठीण होऊन बसले आहे. काळजीने त्याच्या पोटात खड्डा पडतो, मग तो भरून काढण्यासाठी त्याला सतत खावे लागते. मागल्या वेळेला गाझा पट्टीवर इस्रायली क्षेपणास्त्रं पडली तेव्हा प्रचंड तणावात येऊन त्याने तीन प्लेट इडल्या उडवल्या होत्या.
‘डोसा ऐंशी रुपये? लूटमार आहे ही, लूटमार!’ चिंत्या भडकला होता.
‘चालायचंच चिंत्या, आपल्याला कोण आता वीस रुपयात डोसा द्यायला बसलंय?’ दोन ब्रेड स्लाइसच्या मधला बटर नावाच्या सूक्ष्मतरल थराचा शोध घेता घेता मी नेमस्त भूमिका घेतली. ‘महागाई हा तुझ्या मते चिंतेचा विषय नाही तर... उडीदवडा लाव, सांबार अलग!,’ चिंत्याने बिलाच्या चिंतेत थोडी वाढ करत वादाचा मुद्दा काढला.
‘महागाई कोणाला चुकलीये चिंत्या! मुद्दा एवढाच की ती आपल्या हातात नाही, उद्या डोसा एकशे ऐंशी रुपये झाला तर आपण इथं यायचं बंद करणार आहोत का?,’ ब्रेडचा तुकडा कॉफीत बुडवत मी प्रामाणिकपणाने म्हणालो. एवढी महागाई असूनही पुण्यात नव्वद टक्के हाटेलांमध्ये या घटकेला ‘वेटिंग’ आहे, याकडे मला लक्ष वेधायचे होते; पण असल्या धोक्याच्या क्षेत्रात पाऊल घालू नये, हे मला कळते.
‘तुमची लेको पोटं भरलेली, तुम्हाला कसल्या चिंता?,’ चिंत्याने उगाचच उत्तप्प्यासोबत माझ्या काळजाचा तुकडा मोडला. वास्तविक याच चिंत्याकडून गेल्या आठवड्यात मी पैसे उसने घेतले होते. पण ते जाऊ दे. मंथेंड कोणाला चुकली आहे?
‘श्रेयस, दुर्वांकुर, कृष्णा, शबरी, जनसेवा... कुठंही दुपारी जाऊन बघ! कधी न मिळाल्यासारखी माणसं टुकत वाट बघत बसलेली असतात! चिंत्या, ही अन्नछत्र नाहीत, चांगली तीनशे-चारशेला बसते थाळी... तीही व्हेज! कुठंय लेका महागाई?,’ न राहवून मी वर्मी घाव घातला. चिंत्याचा घास घशात अडकला.
रुमालाने खसाखसा तोंड पुसून त्याने बिल मागवले, आणि म.सा.प.च्या कार्यक्रमासाठी तो गांजवे चौकाकडे निघून गेला. तिथे मराठी भाषेशी संबंधित काही चिंतांची भर (मनात) घालून घेऊन तो परत येईल.
चिंत्या पुरंदरेसारखी चिंतातुर माणसे पुण्यात गल्लोगल्ली आणि पेठोपेठी सापडतात. मध्यंतरी आपल्या अत्यंत कामसू, जागरूक आणि जबाबदार आरोग्यमंत्र्यांना अचानक मराठीजनांच्या ताणतणावग्रस्त आयुष्याची चिंता वाटू लागली. हे आरोग्यमंत्री पुण्याचे नसूनही त्यांना चिंता वाटली, हे एक आश्चर्यच. विशेषत: तरुणवर्ग या तणावाला बळी पडतो आहे, या कल्पनेनेच आरोग्यमंत्र्यांना ताण आला असावा. त्या तणावाच्या भरात त्यांनी संपूर्ण विभाग कामाला लावून ‘आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अशी स्लोगन शोधून काढून एक पाहणी उरकली. त्या पाहणीचे निष्कर्ष कुणाचीही चिंता वाढवणारे आहेत.
दोनेक कोटी मराठी लोकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर असं लक्षात आलं की, अखिल महाराष्ट्रात जवळपास पस्तीस लाखांहून अधिक नागरिक कुठल्या ना कुठल्या तणावाचे बळी आहेत. त्यापैकी पाचेक लाख चिंतातुर तर एकट्या पुणे जिल्ह्यात राहतात, हे कळल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी थेट आपल्या फॅमिली डॉक्टरकडे ब्लडप्रेशर तपासायला गेले, असं म्हणतात. खरं-खोटं देव जाणे, आम्हाला पुण्यात ‘वैशाली’च्या कट्ट्यावर ही बातमी कळली.
जगातले तमाम त्रस्त समंध पुण्यात एकवटले आहेत, यात शंका नाही. पण पुणेकरांना चिंता सर्वाधिक का सतावतात, हे मुळात हुडकून काढण्याचे आम्ही ठरवले. त्यानुसार आम्ही आमच्या पद्धतीने वेगळी अशी पाहणी केली. हे सर्वेक्षण अर्थातच गुप्त होते. सर्वेक्षणानंतर आमच्या पाहणीचे निष्कर्ष ढोबळ मानाने येथे मांडतो आहो.
विचारवंतांचे गाव :
मुळात पुणेकर हा मनुष्य विचारवंत या कॅटेगरीत मोडतो, हे कोणीही मान्य करील! विचारवंतांना बेसिकली विचार वगैरे करावा लागतो, आणि ही प्रक्रिया बरीचशी गुंतागुंतीची आणि तणाव निर्माण करणारी आहे, हेदेखील सामान्यत: मान्य व्हावे. तौलनिक अभ्यासाअंती, आजमितीस पुण्यात साडेपाच लाख लोकांना तणावाची बाधा झाली आहे, हे सरकारी पाहणीतले निरीक्षण आम्हाला फारच तोकडे वाटते. वास्तविक हा आकडा बराच मोठा असायला हवा. पुण्याची लोकसंख्या आजमितीला सुमारे कोटीभराच्या जवळ (पिंपरी-चिंचवड समाविष्ट) असेल. त्यातले फक्त पाच लाख लोक तणावाखाली राहतात हे अविश्वसनीय वाटते.
पुण्यातील चालू चिंतेचे विषय येणेप्रमाणे आहेत :
१. ज्यो बायडेन बिनडोक आहे. २. डोनाल्ड ट्रम्प गाढव आहे. ३. इस्रायलचे चुकले. ३. हमास अतिरेकी आहे. ४. पुतिन वेडा आहे. ५. हल्लीच्या पत्रकारितेत राम नाही. ६. उलट हल्लीच्या पत्रकारितेत फक्त ‘राम’च दिसतो! ७. हु इज धंगेकर? ८. हु इज चंद्रकांत पाटील? ९. मेट्रो हा शाप आहे. १०. हेल्मेट हा गुन्हा आहे. ११. पुण्यात वशिल्याशिवाय नोकरी मिळेल; पण पार्किंग नाही! १२. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं इतकं काही कठीण नाही. १३. कुठायत वाघनखं? १४. अमळनेरच्या साहित्य संमेलनात (च्यामारी) शस्त्रांचं प्रदर्शन कशाला? काय दांडपट्टे चालवायचेत? १५. बेडेकर मिसळ बेस्ट की वैद्य उपाहारगृह? १६. चांदणी चौकातल्या वाहतुकीचं क्रॉसवर्ड... कठीण आहे बुवा! १७. विद्यापीठ चौकातील वाहतुकीचा तिढा सोडवणाऱ्यास ‘युनो’मध्ये नेमू!
...ही यादी कितीही वाढवता येईल. कारण पुण्यात चिंतेच्या विषयांना तोटा नाही.
तात्पर्य एवढेच की ज्या व्यक्तीस वैश्विक चिंतांचा डोंगर उपसायचा असतो, त्या पुणेकरांना तणावाखाली जगणे क्रमप्राप्तच आहे. किंबहुना, पुणेकर अचानक बिनधास्त आणि बिनघोर झाले तर मराठी संस्कृतीचे काय होईल, याचा कुणी विचार केला आहे काय? तेव्हा पुणेकरांना चिंता करत राहू दे. त्यातच महाराष्ट्राचे भले आहे. चिंता पुणेकरांची, आरोग्य महाराष्ट्राचे! इत्यलम.
pravintokekar@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.