गौरव माय मराठीचा!
राजभाषा दिन नव्हे;
मराठी भाषा गौरव दिन !
२०१७ च्या २७ फेब्रुवारीला माहिती आणि प्रसारण विभागाकडून राज्यभरात जाहिराती प्रकाशित करताना ‘मराठी राजभाषा दिन’ असा चुकीचा उल्लेख केला. तेव्हा मी दै. ‘सकाळ’मध्ये सविस्तर लेख लिहिला. मराठी राजभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन हे दोन वेगवेगळे दिवस असल्याचे स्पष्ट केले. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी लेखाची दखल घेत पुढच्या वर्षीपासून ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा योग्य उल्लेखाच्या जाहिराती प्रसारित केल्या. मात्र अजूनही काही माध्यमे आणि आकाशवाणी, शिक्षक संघ, कथित भाषा तज्ज्ञही त्याच चुका करीत आहेत म्हणून हा पंक्तिप्रपंच.
सदानंद कदम
कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आणि मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय ११ फेब्रुवारी २०१६ रोजी झाला. (महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्र. मभादि-२०१६/प्र.क्र.१०/२०१६/भाषा ३ दि. ११ फेब्रुवारी, २०१६) यात २७ फेब्रुवारी हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
हाच दिवस ही मंडळी ‘राजभाषा दिन’ म्हणून साजरा करतात. मग यापूर्वी या राज्यात ‘मराठी राजभाषा दिन’ नव्हता का? तो साजरा होत नव्हता का? की या राज्याला राजभाषाच नव्हती? तर तसा दिवस होता आणि राजभाषाही होती. भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली तीच मुळी भाषा हे सूत्र घेऊन. ज्या त्या भाषेचे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले आणि तो दिवस त्या राज्याचा, त्या भाषेचा राजभाषा दिवस ही झाला. तसा अधिनियम ही निघाला. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याचा हा अधिनियम ‘सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ५, महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ या नावाने प्रसिद्धही झाला आणि त्यानुसार १ मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा होऊ लागला.
हाच दिवस ‘कामगार दिन’ म्हणूनही साजरा होत होता. एकच दिवस दोन कारणासाठी साजरा होत असताना पुढे ‘राजभाषा दिन’ मागे पडून ‘कामगार दिन’ रुजला गेला. याची जाणीव शासनालाही झाल्याने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा ‘राजभाषा दिना’ची आठवण करून देणारा शासन निर्णय जारी केला. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक मभावा-१०९६/११६/ प्र. क्र. ७/९७/२०-ब, दि. १० एप्रिल, १९९७ च्या निर्णयात याची स्पष्ट नोंद. यात म्हटलेय , ‘१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणून १ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्यात यावा.’
मराठीच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी आणि ‘मराठी भाषा गौरव दिना’ला ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणणाऱ्यांनी, राज्य मराठी अध्यापक संघापासून आकाशवाणीपर्यंतच्या माध्यमांनी हे शासन निर्णय वाचण्याची तसदी घ्यावी आणि कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करावा. विशेष म्हणजे मुंबई दूरदर्शन आज ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त, तर आकाशवाणी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त खास कार्यक्रम सादर करत आहे. एकाच खात्यांतर्गत येणाऱ्या दोन विभागांच्या या दोन तऱ्हा. या सगळ्यांनीच ‘मराठी राजभाषा दिन’ हा महाराष्ट्र राज्य स्थापना दिवशी म्हणजे १ मे रोजी साजरा करावा.
मराठीच्या नावाने हा दिवस साजरा करणारी मंडळी नीट ‘राजभाषा दिन’ असेही लिहित नाहीत, ती लिहितात ‘राज्यभाषा दिन’ यांना कोण आणि कसे समजावणार? एखादादिवस अशा दिनाच्या शुभेच्छांचा रतीब समाज माध्यमांवर घालणाऱ्यांनी हे जाणून घेतले आणि आपल्या बोलण्या-लिहिण्यात संपूर्ण मराठी वापरली; तर ती मराठीची सेवा ठरेल. मातृभाषेचा योग्य तो सन्मान राखला जाईल. आपल्या भाषेविषयीचे हे दोन्ही दिवस समजून घेऊन साजरे करावेत म्हणून गेली पाच वर्ष सुरू असलेले प्रयत्न सार्थकी लागतील.
मराठी भाषेबद्दलची आस्था सर्वांनाच. आज २७ फेब्रुवारी
मराठी भाषा गौरव दिन. माय मराठीच्या गौरवाचा दिवसाचे औचित्य, मराठी भाषा विकासाशी संबंधित उपक्रम, स्वतःच्या पातळीवर टाकता येतील अशी पाऊले कोणती? असं सारं काही
शुद्धलेखनासाठीचे ॲप्स
भाषा शुद्ध म्हणजेच प्रमाणित असण्यासाठी काय करता येईल. विशेषतः आज समाजमाध्यमांमधील मराठी संदेश अचूक आहेत, हे कसे तपासता येईल? यासाठी आपल्याकडे कोणते उपाय आहेत, याविषयी
दिनेश कुडचे
मराठी शुद्धलेखनात पॉकेटबुक्स काढणारे व्याकरणतज्ज्ञ अरुण फडके यांनी शुद्धलेखनाबद्दलचे मोबाइल ॲप तयार केले आहे. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ नावाने ॲप आहे. यात ११ हजार मराठी शब्दांची माहिती आहे. ऱ्हस्व-दीर्घ; विसर्ग हवा नको, स्र किंवा स्त्र याविषयीचा फरक, योग्य पर्यायी शब्द आणि लेखन याविषयी या ॲपमध्ये माहिती आहे. मूळ रूपाला विकार होताना बदलणारे ऱ्हस्व-दीर्घ दाखवले आहेत. विशिष्ट व्यंजनांचा उच्चार, जोडाक्षरे, शब्दातील द्वित्व, शब्दांचे उच्चार, त्यात होणारे लोप, या सर्व प्रक्रियांबाबत योग्य आणि अयोग्य शब्दांचे लेखन या ॲपमध्ये दाखवले आहे. ‘कोशात वापरलेल्या संक्षेपांचे आणि खुणांचे अर्थ’ आणि ‘कोश कसा पाहावा’ ह्या दोन गोष्टी वापरकर्त्यांनी नीट पाहून घेतल्या, तर या ॲपचा वापर करणे सहजसुलभ होईल. त्यासाठी ‘हवा असलेला शब्द शोधण्यासाठी वरच्या पट्टीत अपेक्षित शब्द लिहायला सुरुवात करताच त्याअनुषंगाने शब्द येतात. त्यानंतर काही सेकंदांतच तुमचा शब्द योग्य-अयोग्य लेखन, सामान्यरूपे, असल्यास इतर काही टीप, अर्थभेद, स्पष्टीकरण अशा आवश्यक त्या बाबींसह समोर येतो. ॲपने दाखवलेल्या योग्य-अयोग्य लेखनाबद्दल शंका असेल तर ‘स्पष्टीकरण’ या दुव्यावर जाऊन शब्दाच्या योग्य लेखनाचे शास्त्रीय स्पष्टीकरण पाहता येते. अशी शेकडो स्पष्टीकरणे आहेत. शिवाय व्याकरणाचे प्रचलित आणि सरकारी नियमानुसार ॲपमधील शब्द आहेत. ते युनिकोडवर आधारित आहेत. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर १०० रुपयात उपलब्ध आहे. तसेच एक हजार शब्दांचे निःशुल्क अॅपही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगल सर्च इंजिनद्वारे मराठी शब्दाचे व्याकरण अचूकच असेल याची खात्री नाही. त्यामुळे त्यासाठी सावध राहूनच शब्दव्यवहार करावा लागेल.
संस्था ज्ञानभाषा मराठीसाठीच्या
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालताना मराठी साहित्य संस्कृती विकासासाठी पायाभूत काम करू शकतील, अशी संस्थात्मक उभारणी केली. आजही या संस्था आणि उपक्रम मराठी भाषा संवर्धनात मोलाची कामगिरी बजावत आहेत.
- प्रा. अविनाश सप्रे, सदस्य, ग्रंथ प्रकल्प समिती, साहित्य संस्कृती मंडळ
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादत्वाखाली कार्यरत या उपक्रमांतर्गत आजवर २० खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. नानाविध क्षेत्रातील ज्ञान-माहिती-संशोधन सुबोध मराठीत आणण्यासाठी विश्वकोश निर्मितीचा संकल्प करण्यात आला. वाई येथे आजही याचे काम चालते. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठीच्या मूलभूत प्रयत्नांचा भाग म्हणून याकडे पाहिले जाते. राजा दीक्षित यांच्याकडे या उपक्रमाची मुख्य धुरा आहे.
मराठी भाषा विकास संस्था
मराठीतील विविध बोलींमधील साहित्य प्रकाशनासाठी प्रोत्साहन देतानाच परिभाषा कोश निर्मितीचे काम या संस्थेतर्फे चालते. वाणिज्य, विज्ञान, संरक्षण, समीक्षा अशा नानाविध क्षेत्रांच्या कोश निर्मितीचे काम अखंडपणे सुरू आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे या उपक्रमाची सध्या धुरा आहे.
मराठी साहित्य संस्कृती मंडळ
जगभरातील गाजलेले ग्रंथ मराठीत अनुवादित करणे, मराठीतील ग्रंथांना पुरस्कार देऊन गौरवणे, विविध ग्रंथ प्रकाशनासाठी प्रोत्साहन देणे असे या संस्थेचे काम आहे. प्रा. सदानंद मोरे यांच्याकडे सध्या या उपक्रमाची धुरा आहे.
नाट्यस्पर्धा
महाराष्ट्र सांस्कृतिक संचलनालयातर्फे दरवर्षी राज्यभरातील विविध केंद्रांवर हौशी, व्यावसायिक आणि संगीत नाट्यस्पर्धा होत असतात. मराठी माणसाचे नाटकवेड अधिक समृद्ध करणाऱ्या या उपक्रमाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला अनेक कलावंत दिले. महाराष्ट्रातील नाट्यचळवळीला बळ देण्याचे काम गेली साठ वर्षे अखंडपणे सुरू आहे.
शासकीय मुद्रणालये
राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर येथे शासकीय मुद्रणालये आहेत. शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारी ग्रंथसंपदा तिथून प्रकाशित करण्यात येते. मराठीतील बहुविध दुर्मिळ ग्रंथसंपदा प्रकाशनाचे श्रेय या मुद्रणालयांना आहे.
समग्र खंड प्रकाशन समिती
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड आदी अनेक थोर विभुतींच्या जीवनकार्याविषयीचे समग्र ग्रंथ प्रकाशनासाठी तज्ज्ञांच्या समिती नेमून अखंडपणे ग्रंथ प्रकाशनाचे काम शासनाच्या वतीने सुरू आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारित या समितींचे काम चालते. आजवर या समित्यांनी विद्यापीठांच्या सहकार्यातूनही मोठे काम केले आहे.
साहित्य अकादमी आणि नॅशनल बुक ट्रस्ट
या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्था आहेत. देशातील २२ भाषांमधील साहित्य प्रकाशन करणाऱ्या या संस्थांनी मराठीतील अनेक ग्रंथ अनुवादित केले आहेत. मराठी भाषेसाठीही या दोन्ही संस्थाचे मोठे योगदान राहिले आहे.
सातत्य ठेवण्याची गरज
शासनाच्या वतीने ग्रंथसंपदा प्रकाशनापासून प्रसिद्ध होणाऱ्या विविध उपक्रमांची पुरेसी प्रसिद्धी मात्र होताना दिसत नाही. आजचा काळ दाखवण्याचा आहे. शासनाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ग्रंथाचे आणि एकूणच मराठी प्रकाशन संस्थाचे दरवर्षी जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन व्हायला हवे. वर्षातील ठरावीक दिवस त्या त्या जिल्ह्यात हे प्रदर्शन म्हणजे साहित्योत्सव व्हावा. राज्य नाट्यस्पर्धांप्रमाणे यात सातत्य ठेवण्याची आज गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.