पर्यटनातून समृद्धी

जगातील अनोख्या देशांची आणि आकर्षक पर्यटनस्थळांची भटकंती वर्षभरापासून आपण करत आहोत.
पर्यटनातून समृद्धी
पर्यटनातून समृद्धीsakal
Updated on

अराऊंड द वर्ल्ड

पर्यटन आनंद तर देतेच, परंतु अनुभवानेसुद्धा आपल्याला समृद्ध करत असते. लहानपणी मामाकडे जाण्यापासूनच आपली पर्यटनाची सुरुवात होते. पर्यटनामुळे आपल्या घराशिवाय आणि आपल्या गावाशिवाय अनोळखी ठिकाणी जाऊन आपण स्वतःची ओळख तयार करू शकतो. अचानक समोर येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाऊन त्यातून बाहेरही पडू शकतो. आत्मविश्वास वाढतो... म्हणूनच मुलींनी एकट्याने प्रवास करायलाच हवा.

-विशाखा बाग

जगातील अनोख्या देशांची आणि आकर्षक पर्यटनस्थळांची भटकंती वर्षभरापासून आपण करत आहोत. नैसर्गिक अविष्कारांनी नटलेली विविध भौगोलिक ठिकाणे, निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेले बर्फाच्छादित डोंगर, नद्या, स्वच्छ निळ्या रंगाने नटलेले तलाव, मानवनिर्मित आणि जगावर छाप टाकणाऱ्या कलाकुसरींनी सजलेल्या इमारतींना भेटी देण्याबरोबरच अनुभवानेसुद्धा आपल्याला समृद्ध करत असल्याची प्रचीती पर्यटनातून मिळते.

लहानपणी मामाकडे जाण्यापासूनच आपली खरं तर पर्यटनाची सुरुवात होत असते. वयानुसार वेगवेगळ्या परीक्षा, शिबिरे, सहली, ट्रीप इत्यादींच्या निमित्ताने भटकंती सुरूच असते. मोठे झाल्यानंतर नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांना भेटी देणे होते. त्यातूनच मग पुढे जगभरातील भ्रमंती सुरू होते. माझा पर्यटनाचा प्रवाससुद्धा याचप्रमाणे सुरू झाला. या प्रवासामधूनच आपण अनेक गोष्टी शिकतो आणि पुढे त्याच गोष्टी आणि अनुभव आपल्याला आयुष्यातील नवीन प्रवासासाठी साथ देतात. ऑफिसच्या कॉन्फरन्सनिमित्ताने जरी मी फिरत असली, तरीही अनेक नवीन गावांना, शहरांना आणि निसर्गनिर्मित पर्यटनस्थळांना भेटी देण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती. अशा प्रवासात घरातील प्रत्येकालाच आपल्याबरोबर येणे शक्य नसते, तेव्हा मात्र स्वतःलाच पुढाकार घेऊन सर्व गोष्टींची तयारी करून पुढे चालावे लागते. देशात किंवा देशाच्या बाहेर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचा स्वतःवरील विश्वास कधी कमी होता कामा नये. कारण जेव्हा एखाद्या प्रवासात आपण आत्मविश्वासाने विविध गोष्टींना सामोरे जातो, तेव्हाच निरनिराळ्या अनुभवांशी आपण जोडले जातो. मी एकटी कशी जाऊ, मी एकटीने प्रवास कसा करू, मला सगळ्या गोष्टी जमतील का? असा विचार करत बसण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष ती गोष्ट मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच त्यातील खाचखळगे कळतात.

आत्मनिर्भरपणे केलेल्या पहिल्या प्रवासातूनच पुढच्या अनेक प्रवासाची मुहूर्तमेढ रोवता येते. प्रवास करण्याच्या याच सवयीचे नंतर आवडीत रूपांतर होत जाते. महत्त्वाचे म्हणजे, प्रवास आपल्याला अनुभवाने समृद्ध करत असतो. सोलो किंवा एकटे बाहेर फिरताना सार्वजनिक वाहतूक सेवासुद्धा वापरावी लागते. जगातील वेगवेगळ्या शहरात मेट्रो, ट्रेन, बसने फिरताना तिकीट कुठे आणि कसे काढायचे, स्टॉप कसा ओळखायचा, ठराविक ठिकाणी कसे उतरायचे, या खूप गोष्टींचं भान ठेवावे लागते.

प्रत्येक ठिकाणची वाहतूक सेवा ही वेगळ्या पद्धतीची असते आणि भाषेची अडचणसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणवते. प्रवासात येणाऱ्या अडचणी, बस, रेल्वे किंवा विमान वेळेवर न पोहोचणे, राहण्याच्या ठिकाणी झालेले गोंधळ, देशोदेशी लागणारे वेगवेगळे सीम कार्ड्स घरच्या लोकांशी होणारे संभाषण आणि हे सर्व करत असताना येणाऱ्या अडचणींमधून आणि परिस्थितीतून मार्ग काढणे, याचे थ्रील अनुभवण्याची मज्जा काही वेगळीच असते. या सर्व गोष्टींमधूनच अनुभव समृद्ध होऊन माणसाच्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. आपल्या घराशिवाय आणि आपल्या गावाशिवाय अनोळखी ठिकाणी जाऊन आपण स्वतःची ओळख तयार करू शकतो, लोकांना ओळखू शकतो. अचानकपणे समोर येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाऊन त्यातून बाहेरही पडू शकतो, हा विश्वास वाढतो आणि आयुष्यात येणाऱ्या नवनवीन अनुभवांना सामोरे जाण्याचे धैर्य आपल्यात नक्कीच येते. त्यामुळे महिलांनी आणि मुलींनी पुढाकार घेऊन एकट्याने प्रवास केला पाहिजे. कारण जगातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा अनुभव घेणे, हेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार

आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.