वैभव दोन हजार वर्षांपूर्वीचं...

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय किल्ल्यांच्या यादीत अग्रेसर असलेल्या राजमाची किल्ल्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात.
Kondhana Caves
Kondhana Cavessakal
Updated on

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय किल्ल्यांच्या यादीत अग्रेसर असलेल्या राजमाची किल्ल्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची किल्ल्यावर पर्यटकांची ये-जा सुरूच असते. श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांची जोडी कित्येक दशकांपासून साहसी गिर्यारोहक, पर्यटक, भटक्यांना खुणावत आहे.

राजमाची किल्ल्याच्या उतारावर असणाऱ्या १६ लेणींचा समूह या परिसराचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांपर्यंत मागं घेऊन जातो. हा लेणीसमूह ‘कोंढाणे लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण करण्यात आलेल्या या लेणी अनेक पांथस्थांना आश्रय देण्याचं मोठं काम करणाऱ्या ठरल्या आहेत. या लेणींना जाण्यासाठी दोन मार्ग आज उपलब्ध आहेत.

पहिला, लेणीच्या पायथ्याला असणाऱ्या गावात गाडी लावून, काही मिनिटांची चढण पार करून आपण लेणी परिसरात पोचू शकतो. तर, राजमाची किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यानं साधारण अर्ध्या-पाऊण तासाचा डोंगरातील रस्ता उतरून आपण या ठिकाणी जाऊ शकतो. मुंबई किंवा पुण्यातून येणारे बरेच पर्यटक हा दुसरा मार्गच बऱ्याच वेळा पसंत करतात.

या लेणीसमूहाच्या अलीकडंच एका लहान ओढ्यावर आपल्याला दगडात एकाच ओळीत खोदलेल्या चौकोनी खाचा दिसतात. प्राचीन काळात वाहत्या पाण्यावर लाकडी बंधारा बांधून पाणी अडवण्यासाठी केलेली सोय आपल्याला दिसते आणि आपण लेणीच्या मुख्य परिसरात प्रवेश करत असल्याची जाणीव होते. इथं असणाऱ्या १६ लेणींपैकी लेणी क्रमांक एक आणि दोन महत्त्वाच्या आहेत. पहिल्या क्रमांकाची लेणी चैत्यगृह आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लेणी विहार आहे.

चैत्यगृह वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी संपन्न आहे. चैत्यकमान आज पूर्णपणे ढासळली असली किंवा तिची पडझड झालेली असली, तरीही आता असलेल्या अवशेषांवरून ती भव्य असावी याचा अंदाज येतो. अभ्यासकांच्या मते, चैत्याच्या प्रवेशद्वारावर असणारी चैत्यकमान ही लाकडामध्ये तयार केली असावी. लाकडांना भिंतीमध्ये व्यवस्थित बसवण्यासाठी केलेली दगडी खाचांची रचना या निरीक्षणाला पुष्टीच देणारी आहे.

या कमानीच्या आजूबाजूला अनेक स्त्री व पुरुषांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या लेणीत सातवाहनकालीन कलेचं दर्शन आपल्याला घडतं. तत्कालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिस्थितीची पुसटशी कल्पना याच लेणींच्या कलाकृतीमधून आपल्याला येते. हीनयान संप्रदायाचा प्रभाव एकूणच लेणीस्थापत्यावर पाहायला मिळतो.

या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला एका यक्षाची प्रतिमा पाहायला मिळते. आज ही प्रतिमा पूर्णपणे नष्ट झालेली आहे. फक्त एक कान आणि त्यावर असणारा शिलालेख सुस्थितीत आहे. हा ‘शंकूकर्ण’ यक्ष असून, त्याच्या बरोबर चेहऱ्याच्या समोर एका दात्याचे, बलकेन नामक व्यक्तीचं नाव वाचावयास मिळतं. अशाप्रकारे चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस शिल्पांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंकन करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे अभ्यासक सांगतात.

चैत्यगृहाची रचना गजपृष्ठाकार आहे. पण या लेणीची सध्याची अवस्था अतिशय विदीर्ण आहे. स्तूप बऱ्यापैकी ढासळला आहे. खांब पडले आहेत. अलीकडच्या काळात लेणीच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. पण हा ऐतिहासिक वारसा अनेक कारणांमुळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या चैत्याच्या बाजूलाच मोठे विहार आहे. विहारातील खोल्यांच्या प्रवेशद्वारावर चैत्यकमान असून खोल्या फारच लहान आहेत.

या विहाराच्या एका भिंतीमध्ये छोट्या स्तूपाची रचना केली आहे. तिथं राहणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या बौद्ध भिक्खुचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ या स्तूपाची निर्मिती झाली असावी. हा स्मृती स्तूप प्रकारातील असावा, असं अभ्यासक सांगतात. स्थापत्याचा विचार करता, हे सर्वांत पहिलं विहार आहे ज्यामध्ये स्तंभांचा वापर करण्यात आला आहे. उर्वरित लेणींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

इथल्या पाण्याच्या टाक्यांमध्येही शेकडो वर्षांपासून गाळ जमा होत आहे. ही लेणी महाराष्ट्र किंबहुना दख्खन भागातील लेणी स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पश्चिम दख्खन भागात किंवा भारतभरात निर्माण करण्यात आलेल्या सर्वांत सुरुवातीच्या लेणींमधील एक असणारी कोंढाणे लेणी आज दुर्लक्षित अवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

२०१९ च्या मार्च महिन्यात काही मित्रांसोबत राजमाची किल्ला पाहायला गेलो होतो. किल्ला पाहून दुसऱ्या दिवशी कोंढाणे लेणी पाहण्यासाठी जायचं, असं ठरले. राजमाचीच्या मागील बाजूनं असणाऱ्या डोंगरवाटेवरून आम्ही सगळे खाली उतरू लागलो. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आम्हाला एक सपाट मैदान लागले. तिथून दोन रस्ते खाली उतरत होते.

आम्ही उजव्या बाजूला एका खोदीव टाक्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय चुकीचा होता. डाव्या बाजूनं खाली गेल्यास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात लेणींजवळ पोचता येत होतं. पण आम्ही उत्साहात दुसऱ्या रस्त्याकडं लक्ष न देता उजव्या बाजूनं खाली उतरलो. ती घळीची वाट होती. अतिशय कष्टानं खाली उतरल्यावर रस्ता चुकल्याची जाणीव झाली.

पुन्हा एकदा वर चढून त्या मधल्या मोकळ्या टप्प्यावर गेलो. तिथे रेंज आल्यावर काही मित्रांना फोन केले. तेव्हा समजलं, की डाव्या बाजूनं उतरायचं होतं. तोवर आमच्याकडील पाणी संपलं. पण उत्साहाच्या भरात ही गोष्ट लक्षात आली नाही. खाली उतरून लेणी पाहिल्या. विश्रांती घेतली. पण परतीच्या प्रवासात राजमाचीची चढण चढत असताना सूर्य डोक्यावर आलेला होता. पाणी सोबत नसल्यामुळं आणि पानगळ झाल्यामुळं फारशी सावली नव्हती.

अतिशय कष्टानं सर्व जण चढत होते. त्यात पाण्याची मात्रा कमी झाल्याने त्रास जाणवायला लागला. मित्रांच्या मदतीने सर्व जण कसेबसे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पण या चढणीत तब्बल दोन-अडीच तास गेले. त्यामुळे कोंढाणे लेणी राजमाचीच्या बाजूनं जाण्याचा विचार करत असाल, तर माहितगार माणूस सोबत घेणं कधीही उत्तम. अन्यथा कर्जत स्टेशनवरून सात-आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंढाणे गावात गाडी पार्क करून काही मिनिटांची चढण पार करणं हा सोपा पर्याय उपलब्ध आहेच.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com