अश्रू पुसणारी ‘पुण्यजागर’ चळवळ

मी नांदेडला जाण्यासाठी नवी मुंबईवरून पनवेलला गाडीमध्ये म्हणजे रेल्वेत बसलो. पुणे आलं. पुण्यामध्ये लोकलमध्ये चढावीत अशी माणसं गाडीमध्ये आली.
Punyajagar Pariwar Dr. Milind Bhoi
Punyajagar Pariwar Dr. Milind Bhoisakal
Updated on

मी नांदेडला जाण्यासाठी नवी मुंबईवरून पनवेलला गाडीमध्ये म्हणजे रेल्वेत बसलो. पुणे आलं. पुण्यामध्ये लोकलमध्ये चढावीत अशी माणसं गाडीमध्ये आली. दहा मिनिटांमध्ये अवघी गाडी पूर्ण भरली. माझ्या बाजूला असलेल्या एका व्यक्तीनं बाजूला उभे असलेल्या एका माणसाला ‘बसा ना...’ म्हणत जागा दिली. सभोवतालचे प्रवासी एकमेकांशी गप्पा मारत होते. कोण कुठे जाणार आहे? कोण कुठे उतरणार आहे? याची चर्चा सुरू होती.

ज्यांनी एका प्रवाशाला जागा दिली ते माझ्या बाजूला असलेले प्रवासी सांगत होते, आपण या गाडीने नेहमी ये-जा करतो. एवढी गर्दी नेहमी असते. माझ्या बाजूचे दुसरे प्रवासी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही नांदेडचे का?’ ते म्हणाले, ‘नाही, मी पुण्याचा आहे. पण नांदेडला नेहमी येणे-जाणे असते.’

प्रश्न विचारणारे पुन्हा म्हणाले, ‘का, काही व्यवसाय आहे का तुमचा?’

ते हसले आणि म्हणाले, ‘हो. आम्ही आत्महत्या केलेल्या काही शेतकरी कुटुंबीयांना दत्तक घेतलंय. त्या पीडित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या संगोपनाची, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे त्यासाठी मला नांदेडला ये-जा करावी लागते.’

त्यांचे ते बोलणे ऐकूण मी म्हणालो, ‘तुम्ही हे कसं करता ?’

ते म्हणाले, ‘पुण्यातले आम्ही वीस मित्र एकत्र आलो. एकत्र येऊन ‘शंकरराव भोई प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत करतो.’ त्या माणसाचं बोलणं ऐकून आजूबाजूचे सगळे जण एकदम शांत झाले. मोठ्या आश्चर्याने ‘त्या’ माणसाकडं सगळे जण पाहत होते. मग त्याला अनेकजण प्रश्न विचारत होते. त्या माणसानं समर्पकपणे, शांतपणे प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यांनी बॅगमधला डबा काढला आणि सगळ्यांना खायला दिला.

आता प्रश्न विचारायची माझी वेळ होती. मी त्यांना बरचं काही विचारलं. माझ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. मी त्यांना म्हणालो, की मला तुमच्यासोबत उद्या ‘त्या’ गावी यायचंय ज्या गावी तुम्ही हे सगळं काम करत आहात.

ते म्हणाले, ‘हो, चला नक्की जाऊ.’

मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचं नाव डॉ. मिलिंद भोई. डॉ. मिलिंद (९८२३०४७५४४) मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा गावचे. ते आता पुण्यात टिळक आयुर्वेद महाविद्यालय इथं प्रोफेसर आहेत. स्वारगेटजवळ डॉ. मिलिंद यांचा दवाखाना आहे. डॉ. मिलिंद हे स्वर तज्ज्ञ आहेत. डॉ. मिलिंद यांच्या आई नलिनी आणि बाबा अर्जुन दोघेही सरकारी नोकरीमध्ये होते.

त्यांच्याकडून मिळालेल्या छोट्याशा पुंजीमधून आणि डॉ. वसंतराव भगली, बाळासाहेब भारदे यांच्या संपर्क, सहवासातून आपण सेवाभावी काम केलंच पाहिजे या भावनेतून डॉ. मिलिंद यांनी १९९४ ला त्यांच्या आईचे वडील शंकरराव भोई यांच्या नावानं ‘शंकरराव भोई’ प्रतिष्ठान सुरू केले.

कैद्यांसाठी ‘प्रेरणापथ’, तरुणांच्या व्यसनमुक्तीवर ‘व्यसनमुक्त व्हा’ हा उपक्रम, नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये गावोगावी जाऊन काम, शेतकऱ्यांच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या दृष्टीने ‘पुण्यजागर’ नावाची चळवळ डॉ. मिलिंद यांनी त्यांच्या वीस मित्रांच्या सहकार्याने सुरू केली. ज्यांना जमेल तसा वेळ, ज्याला जमेल तेवढा पैसा या मित्राच्या माध्यमातून डॉ. मिलिंद गोळा करू लागले. त्या पैशाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पासंदर्भात त्यांनी पुढाकार घेतला.

नोकरी आणि व्यवसायामध्ये फार न रमलेले डॉ. मिलिंद पूर्णवेळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भामध्ये असणाऱ्या प्रोजेक्टवर काम करू लागले. एका आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो कुटुंबांपर्यंत गेला.

रात्रीचे बारा वाजले तरी आमचं बोलणं सुरू होतं. डॉ. मिलिंद त्यांना आलेले अनुभव, गरीब लोकांचे मिळालेले आशीर्वाद याविषयी भरभरून बोलत होते.

मी झोपताना विचार करत होतो, आपल्या आसपास असणारी डॉ. मिलिंद यांच्यासारखी कितीतरी माणसं मोठमोठं काम करतात. आपण असे चांगले काम उभे केले पाहिजे. विचार करता करता कधी डोळे लागले कळलं नाही. सकाळी थेट नांदेडला आल्यावर जाग आली. मी डॉ. मिलिंद यांच्या गाडीमध्ये बसलो. आम्ही अर्धापूरला पोहोचलो. अर्धापूरला एका घराकडे बोट दाखवत डॉ. मिलिंद यांनी वेगळाच किस्सा सांगितला.

ते म्हणाले, ‘माझी मुलगी गायत्री हिचे लग्न आम्ही ठरवलं. गायत्री इंजिनिअर आहे. तिच्या लग्नाच्या खर्चातून आपण एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला घर बांधून द्यायचं, असा प्रस्ताव मी माझी पत्नी वैशाली आणि मुलगी गायत्री यांच्याकडे ठेवला. त्यांना माझा प्रस्ताव आवडला. पत्नी आणि मुलीने लगेच होकार दिला. त्या पैशातून लक्ष्मीबाई साखरे माउलीला हे घर बांधून दिलं. साखरे माउलीनेही या घराला ‘पुण्यजागर’ असं माझ्या प्रोजेक्टचं नाव दिलं.’

आम्ही त्या घरात गेलो. घरात पाऊल टाकताच त्या तरुण शेतकऱ्यांच्या फोटोला लागलेला हार बघून काळजाचं पाणी पाणी झालं.

लक्ष्मीबाई आपल्या पतीची आठवण काढत रडत होत्या. डॉ. मिलिंद लक्ष्मीबाई यांची समजून काढत होते. लक्ष्मीबाईच्या समीक्षा आणि साक्षी या दोन मुलींचे संगोपन, शिक्षण याची जबाबदारी डॉ. मिलिंद यांनी घेतली होती. डॉ. मिलिंद यांनी जबाबदारी स्वीकारलेले केवळ अर्धापूरमधलं लक्ष्मीबाई यांचंच एक घर नव्हतं, तर आम्ही मालेगाव, धामदरी, नांदलाडी, येळेगाव, कोंढा या गावांमध्ये गेलो, तिथंही अशी अनेक कुटुंबे होती ज्या कुटुंबातला कर्ता माणूस गळ्याला फास लावून गेला; पण त्यांच्या कुटुंबाचे संगोपन, लेकरांच्या शिक्षणाची, घरची चूल पेटवण्यासाठी डॉ. मिलिंद, त्यांची संस्था, त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेतला होता.

केवळ एक नांदेड जिल्हा नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा गरजू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना, त्यांच्या कुटुंबीयांना, मुलांना मदत करण्यासाठी डॉ. मिलिंद यांनी पुढाकार घेतला होता. ज्या मुलींना नेण्यासाठी ते आले होते, त्या मुलींना त्यांनी घेतलं आणि आता ते निघणार होते.

डॉ. मिलिंद यांना मी विचारलं, ‘या मुली शिक्षणासाठी कुठे घेऊन जाणार?’ ते म्हणाले, ‘सासवडला ‘अस्तित्व’ नावाचे गुरुकुल आहे. या गुरुकुलमध्ये पल्लवी वाघ आणि गीतांजली देगावकर या दोघी जणी आहेत. त्या गुरुकुलमध्ये या मुली शिक्षण घेतात. अशा अनेक शाळा-कॉलेजेस, वेगवेगळ्या संस्थांशी आम्ही जोडतो आहोत.’

मी डॉ. मिलिंद यांना नांदेडच्या रेल्वे स्थानकावर सोडायला गेलो. अवघा दिवस डॉ. मिलिंद यांच्यासोबत कसा गेला, हे मला कळलं नाही. डॉ. मिलिंद आणि त्यांच्या मित्रांनी सुरू केलेला ‘पुण्यजागर’ प्रकल्प राज्यातील अनेक कुटुंबीयांचा जीव की प्राण झाला आहे. ही चळवळ दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत होती. त्या चळवळीला गरज आहे ती तुमच्या-आमच्या सगळ्यांच्या सहकार्याची, मदतीची. आपल्या अवतीभवती असे डॉ. मिलिंद वाढले पाहिजेत, बरोबर ना..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com