व्यवस्थेतली दुर्गंधी कधी जाणार?

बिल गेट्स यांच्या पुढाकाराने मलमूत्रातून ऊर्जानिर्मिती आणि सांडपाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे.
Drainage Water
Drainage WaterSakal
Updated on

बिल गेट्स यांच्या पुढाकाराने मलमूत्रातून ऊर्जानिर्मिती आणि सांडपाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपण सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्येवर उपाय शोधण्यातच हयगय करीत आहोत. स्मार्ट शहरे वसवण्याच्या संकल्पना मांडतोय; पण प्रत्यक्षात आपल्या मूलभूत सुविधादेखील नीट उभ्या राहू शकत नाहीत. त्यामुळे आपण आजही गटारांच्याच समस्येत अडकलोय.

निवडणूक महापालिका-ग्रामपंचायतीची असो किंवा विधानसभा-लोकसभेची, आमची चर्चा ठरलेली असते. कधी आम्हाला सत्तेत असलेल्यांविषयी बोलायचे असते. कधी एखाद्या नेत्याच्या किंवा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराविषयी किंवा एखाद्या लफड्याविषयी. हे कमी पडले की पाकिस्तान, दहशतवादासारखे कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या कक्षेबाहेरचे विषय चर्चेला आणले जातात. कारण ते फक्त चर्चा करण्यासारखेच असतात. प्रत्यक्षात त्याविषयी काहीही केले नाही, तरी काही विशेष फरक पडत नाही. तेही कमी पडले आणि कुणी घातलाच मूळ मुद्द्याला हात, तर मग आमचे सर्वसामान्य माणसाचे एक स्टेटमेंट ठरलेले, ‘‘आता कुठवर केवळ वॉटर, मीटर आणि गटरवर निवडणुका लढवायच्या?’ प्रश्न रास्त आहे. मात्र उत्तरात समाधान नाही. मुळात आहेत तेच प्रश्न सुटणार नसतील, तर काय करायचे पुढचे प्रश्न घेऊन. फाईव्ह-जी नेटवर्क असलेला मोबाईल घेऊन जर रेल्वे फलाटाच्या बाजूलाच बसायचे असेल, तर असला स्मार्टनेस आपण आपल्याच खिशात गुंडाळून ठेवायला हवा. एकीकडे आपण स्मार्ट शहरे वसवण्याच्या संकल्पना मांडतोय; पण प्रत्यक्षात आपल्या मूलभूत सुविधादेखील नीट उभ्या राहू शकत नसतील, तर पुढे जाण्यात काय हशील आहे? त्यामुळे आपण आजही गटारांच्याच समस्येत अडकलोय. त्यातून बाहेर पडण्यासाठी आणखी बरीच कसरत करावी लागणार आहे, हे समजून घेण्यातच खरी हुशारी आहे.

दुसरीकडे अमेरिकेसारख्या देशाचे सरकार नव्हे, तर एक उद्योगपती सांडपाणी व्यवस्थापनाचे आव्हान स्वीकारतो. सांडपाण्याचे पिण्याच्या पाण्यात आणि ऊर्जेत रूपांतर करतो. जगाची महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या देशाला साधा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर एक-दोन नव्हे तर तब्बल ३२ वर्षे लागतात. तिकडे खऱ्या महासत्तेतला एक नायक दहा वर्षांत सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रयोगांना प्रोत्साहन देऊन त्या क्षेत्रात कायापालट घडवून आणतो. या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या कल्पकतेच्या आणि जगण्याच्या सचोटीचे आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या आहेत.

आपली वाढती लोकसंख्या, त्यातही शहरांवर वाढणारा गर्दीचा ताण आणि त्या पार्श्वभूमीवर तोकड्या पडत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोई-सुविधा, यावर आता तरी मोकळेपणाने व्यक्त व्हायला हवे. त्याशिवाय त्यावर तोडगा निघेल कसा?

प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित करायचे असेल, तर सर्वप्रथम हा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ मुंबईसारख्या महानगरासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी किती महाकाय समस्या घेऊन येऊ शकतो, याचा अंदाज घ्यावा लागेल. सांडपाणी व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या रोगराईतून दरवर्षी पाच वर्षांखालील पाच लाख मुलांचा जगभरात मृत्यू होतो. जसजशी लोकसंख्या वाढत जाते आहे, तसतसा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनत जाणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत जगाच्या लोकसंख्येत दोन अब्ज लोकांची भर पडणार आहे. यातली ९० टक्के वाढ ही शहरांमध्ये आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये होणार आहे. अशा शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थेच्या नावाखाली पुरता अंधार आहे.

मुंबई महापालिकेच्या सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणेच्या कागदी होड्या कोट्यवधींच्या उड्या मारताना दिसतात. प्रत्यक्षात आजही १८४२ दशलक्ष सांडपाणी हे थेट समुद्रात सोडले जाते. प्रक्रिया न केलेले सांडपाणी म्हणजे जमीन, पाणी आणि वायू या तिन्ही प्रकारचे प्रदूषण एकाच माध्यमातून करण्यासारखे आहे; पण अजूनही या व्यवस्थापनाकडे पाहण्याचा सरकारी दृष्टिकोन गांभीर्याचा नाही. त्यामुळे दिवसेंदिवस आपणच आपल्या सभोवतालच्या परिसराची धुळधाण करतो आहोत, याची आपल्याला जाणीवही होत नाही. मुंबईत १९७९ मध्ये ७१ लाख लोकसंख्या असताना तयार करण्यात आलेला सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा थेट २००३ मध्ये तयार होतो. त्याचे आयुर्मान केवळ २५ वर्षांचे आणि त्यासाठीही आपल्याला जागतिक बॅंकेची मदत घ्यावी लागते. १२.९१ दशलक्ष लोकसंख्येच्या मुंबई शहराची लोकसंख्या २०३४ पर्यंत १३.३५ दशलक्ष एवढी वाढण्याची शक्यता आहे; पण या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सेवा देण्याची या महानगराची क्षमता आहे का, हे आता तपासून पाहण्याची गरज आहे. १८६७ मध्ये कुलाबा ते वरळीदरम्यान इंग्रजांच्या काळात पहिली सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली होती. केवळ या एकाच केंद्रात ठरलेल्या मापदंडानुसार सांडपाणी व्यवस्थापन केले जाते. आजही आपण हजारो दशलक्ष लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडून देतो. त्याचा एकंदरीतच संपूर्ण सजीव सृष्टीवर होणारा परिणाम गंभीर आहे.

कुलाबा येथील प्रकल्पात सांडपाणी व्यवस्थापनाचे काम ठरलेल्या मापदंडानुसार होते. दुसरा एकही प्रकल्प किमान मापदंडांच्या पात्रता चाचणीत उत्तीर्ण होण्याइतकेही गुण मिळवू शकत नाही. दुसरीकडे बिल गेट्स नावाची एक व्यक्ती दहा वर्षांपूर्वी सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्येवर प्राधान्यक्रमाने विचार करायला लागते. आज त्यांच्या प्रयोगांचे यश इथवर येऊन पोहोचले आहे की, सांडपाण्यातून पिण्यायोग्य पाणी ते तयार करू शकतात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर लोकांना या विषयाचे गांभीर्य समजावून सांगण्याकरिता एका टीव्हीवरील कार्यक्रमात तेच पाणी पिऊन दाखवतात. एखाद्या समस्येतून मार्ग काढायचा असेल, तर त्या समस्येच्या मुळापर्यंत जायला लागते. त्यासाठी पैशासोबतच बुद्धीचाही वापर करावा लागतो. लोकांसमोर ती समस्या नेमकेपणाने मांडून, त्यांना आव्हान देऊन बिल गेट्स यांनी आता त्यावर तगडा उपाय शोधून काढला आहे. मानवी विष्ठेने भरलेली बरणी सोबत घेऊन त्यांनी हा विषय मांडला होता, तेव्हा त्यांच्या या साहसाचे हसे करण्यात आले होते; पण टीकाकारांच्या हास्याचे फवारे हवेत विरले. बिल गेट्स यांनी मात्र त्याच मलमूत्रातून आता ऊर्जानिर्मितीचा शोध लावलाय. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर सांडपाण्याचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान त्यांच्या पुढाकारातून विकसित होत आहे. एकीकडे आपण सांडपाणी व्यवस्थापनाच्या समस्येवर उपाय शोधण्यात हयगय करत असताना अमेरिकेसारख्या देशाच्या मुख्य अजेंड्यावर हा विषय असतो. आपल्याला तसेही पाश्चिमात्त्यांचे आपर्षण आहे. त्यामुळे त्यांची केवळ फॅशनस्टाईल आणि सिनेमे कॉपी करण्यापेक्षा अशा समस्या सोडवणाऱ्या कल्पनांचाही आधार घ्यायला काही हरकत नाही.

गेट्स यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये शौचालयांसाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता जगभरातील संशोधक आणि अभ्यासकांना आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी अत्यंत कल्पक प्रकल्प तयार केले आहेत. मलमूत्राचे व्यवस्थापन करण्याकरिता वीज, पाणी न वापरता मानवी विष्ठेचे सुरक्षित व्यवस्थापन करणे या प्रयोगांमुळे शक्य होणार आहे. एवढ्यावरच हे प्रयोग थांबले नाहीत, तर यातून स्वच्छ पाणी, खते आणि ऊर्जानिर्मितीचादेखील प्रयोग यशस्वी झाला आहे. काही अभ्यासकांनी तयार केलेली नवी प्रणाली शौचखड्डे, सांडपाण्याच्या जागांमध्ये एकत्र होणाऱ्या मलमूत्रापासून पिण्याचे पाणी तसेच ऊर्जानिर्मिती करू शकते. ओम्नी-प्रोसेसर्स असे नाव असलेल्या या प्रणालीचा सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेकरिता वापर केल्यास त्याला खुपच कमी ऊर्जा, पाणी आणि जागेची गरज भासते. विशेषतः आताच्या पारंपरिक सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेपेक्षा या नव्या तंत्रज्ञानाचा वापर खुपच कमी पैशात करता येऊ शकतो. जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील अभ्यासक डॉ. शॅनॉन यी यांच्या चमूने तर अत्यंत कमी पैशात सेकंड जनरेशन टॉयलेट रिइन्व्हेंशन प्रकल्पाच्या माध्यमातून एक नवा इतिहास रचण्याची तयारी सुरू केली आहे.

या प्रणालीमध्ये जगाचा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर कदाचित आपल्याला सांडपाणी व्यवस्थापनावर अवलंबून राहण्याची गरजच उरणार नाही. विशेष म्हणजे या नव्या प्रणालीचा वापर करून तयार करण्यात येणारी शौचालये ही दुर्गंधीविरहित असतील. डॉ. यी हे काही या विषयातले तज्ज्ञ नव्हते. पेशाने ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत आणि थर्मल एनर्जी विषयाचे ते अभ्यासक आहेत; पण त्यांच्या याच कौशल्याचा वापर करून त्यांनी जगावेगळे तंत्रज्ञान विकसित केले आहे. उष्णता, ऊर्जा आणि दबावतंत्राचा वापर करून हे तंत्रज्ञान तयार करण्यात आले आहे. आताच्या पारंपरिक सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रियेत घरापासून शेकडो कोस अंतरावर सांडपाणी वाहून न्यावे लागते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. एवढे करूनही भागत नाही. जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये तर इतक्या मोठ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणेही शक्य नसते. परिणामी तेच दूषित पाणी समुद्रात सोडले जाते. डॉ. यी यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानामुळे ही सर्व प्रक्रिया शौचालयातच करणे शक्य होणार आहे आणि तेही एक कपडे धुण्याचे मशीन ठेवायला लागते तेवढ्या जागेत. पुढल्या वर्षीपासून या प्रयोगाला युरोप आणि अमेरिकेत प्रत्यक्ष वापरास सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महापालिकांच्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या एकंदरीतच अवस्थेवर खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची गरज आहे.

मुंबई महापालिकेचा विचार केला तर सांडपाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने मुंबईचे कुलाबा, वरळी, वांद्रे, वर्सोवा, मालाड, भांडुप आणि घाटकोपर अशा सात विभागांमध्ये विभाजन केलेले आहे. मुंबईतील हे सांडपाणी व्यवस्थापनाचे जाळे १८३० किलोमीटर लांबीचे आहे. हे सात प्रकल्प असले, तरी केवळ कुलाब्याच्या सांडपाणी व्यवस्थापन केंद्रातच आवश्यक मापदंडानुसार सांडपाणी व्यवस्थापन केले जाते. उरलेल्या सर्वच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातून मात्र दररोज १,८४२ दशलक्ष लिटर दूषित सांडपाणी हे प्रक्रिया न करताच थेट जवळपासच्या नदी, नाले, ओढे किंवा समुद्रात सोडून दिले जाते.

सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली हे मलमूत्राचे अत्यंत सुरक्षित व्यवस्थापन करण्याची अत्यंत जुनी पण चांगली पद्धत आहे. या प्रणालीचा वापर करताना मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन, देखभाल आणि खूप जास्त पाण्याची गरज असते. शिवाय इतका पैसा खर्च करूनही येणारे परिणाम फारसे समाधानकारक नसतील, तर तो पैसादेखील पाण्यात जाण्याची जास्त शक्यता असते. अशा वेळी त्यावर जगात शोधल्या जाणाऱ्या नव्या प्रयोगांकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यासोबतच आपल्या अंतर्गत व्यवस्थेतल्या दुर्गंधीवरदेखील काम करावे लागणार आहे.

rahulgadpale@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.