विचार करायला लावणारे, प्रश्न उपस्थित करणारे, अंतर्मनाचा ठाव घेणारे, तुमच्या-आमच्या मुळाशी जाणारे आणि इतिहासाची पाने धुंडाळून आपण नेमके कोण आहोत, याचा विचार करणारे मतप्रवाह कुणालाच नको आहेत. केशव सीताराम ठाकरे, ज्यांना महाराष्ट्र अभिमानाने ‘प्रबोधनकार’ संबोधतो, ते असेच एक विचारसूत्र आहे आणि म्हणूनच ते आज कुणालाही परवडत नाहीत.
अलीकडच्या राजकारणाचा स्तर पाहिला तर राजकारण करण्यासाठी विचार कमी आणि अविचारच अधिक लागतो, असे दिसते. भल्यापेक्षा बुराईची संगत चांगली वाटते. अविवेकी आत्मस्तोमाचा धोशा लावून धरण्यासाठी प्रत्येक जण आज धडपडतोय. त्यामुळे राजकीय जीवनात कुणी विशेष असे एक विचारसूत्र घेऊन चालत नाही; मग ते तुमच्या घरातून उगम पावलेले का असे ना. विचार करायला लावणारे, प्रश्न उपस्थित करणारे, अंतर्मनाचा ठाव घेणारे, तुमच्या-आमच्या मुळाशी जाणारे आणि इतिहासाची पाने धुंडाळून आपण नेमके कोण आहोत, याचा विचार करणारे मतप्रवाह कुणालाच नको आहेत. केशव सीताराम ठाकरे, ज्यांना महाराष्ट्र अभिमानाने ‘प्रबोधनकार’ संबोधतो, ते असेच एक विचारसूत्र आहे आणि म्हणूनच ते आज कुणालाही परवडत नाहीत. विशेषतः राजकीय लोकांनी तर प्रबोधिनी विचारांचे गाठोडे घरातल्या माळ्यावर दूर कुठेतरी फेकून दिलेले दिसते. ते अशा अडगळीच्या ठिकाणी भिरकावले जाते की, सफाई करतानादेखील कुणाच्या नजरेस पडू नये. अविवेकी विचारांची जळमटं मनांच्या भोवती धर्मांधतेचे जाळे विणून हिंदुत्वाची पोलादी भिंत उभी करत असताना प्रबोधनकारांची पदोपदी गरज भासते.
आपण बांधत असलेल्या विचारसूत्रांच्या इमारतीची जागा दलदलीची आहे की दगडी, याचे मातीपरीक्षण करायचे असेल, तर त्यासाठी प्रबोधनकारांच्या धर्मांवरच्या धाडसी विचारांनी आत्मप्रहार करत अगदी खोलवर जावे लागेल. येणाऱ्या परिणामाची पर्वा न करता प्रबोधनकारांचा समोरून सामना करावा लागेल. त्यांना कडीकुलपात बंद केल्याने काहीच होणार नाही; पण आपल्या येणाऱ्या पिढ्या त्याच जुन्या जोखडांच्या ओझ्यात दबतील, कदाचित गुदमरतीलही...
समाजकारण करायचे असेल तर समाजाच्या मनाचा ठाव घ्यावा लागतो. राजकारणाचा मार्ग तर धर्म आणि जातींच्याच महामार्गावरून जातो. राजकारणाचा बुरखा फाडून पाहिला तर आत जातीपातींच्या गट-तटांचे कोंडाळे दिसतील. त्या कोंडाळ्यांना आणि त्यांच्या बुरसटलेल्या विचारांना समाजमाध्यमांच्या विद्यापीठात आज अविवेकी चौकट आहे. इतिहासात मात्र कित्येक वर्षे आधीच प्रबोधनकारांनी ही अविवेकी प्रवृत्ती ठेचून काढली होती. परिस्थितीशी सामना करण्याची तयारी नसलेल्या समाजाच्या नाकातोंडात जेव्हा पाणी गेले, तेव्हापासून त्यांनी प्रबोधनकारांना कडीकुलपात बंद करून ठेवलंय. कडीकुलपात बंद ठेवण्यात त्यांचे काहीच नुकसान नाही; पण त्यांनी दिलेले समाजभान जोपर्यंत आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत आपण धर्मांधतेच्या भूलभुलैयातून बाहेर निघून नवी वाट चोखाळू शकत नाही. समाजव्यवस्थेचे परिवर्तन आणि शुद्धीकरण करण्याच्या हेतूने महात्मा फुले यांनी सुरू केलेली ‘सत्यशोधक चळवळ’ त्यांच्या निधनानंतर थंड पडली होती.
कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी या चळवळीला बळ दिले आणि प्रबोधनकारांनी ती महाराष्ट्रभर जिवंत केली. सत्यशोधक विचारांची बंडखोरी प्रबोधनकारांनी ‘प्रबोधन’च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवली. या चळवळीला पुढे नेण्यासाठी त्यांनी बरेच खटाटोप केले; पण त्यांच्यानंतर सत्यशोधक चळवळीला खंड पडला आणि प्रबोधन विचारांचे गाठोडे झाले. प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये बंडखोरी आणि बेडरता होतीच; पण वर्तमानात होणाऱ्या बदलांच्या वेगापुढे त्यांच्या बंडखोरीचा टिकाव लागला नाही. समाज शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत त्यांना अगदी अलगदपणे बाजूला काढण्यात आले. त्यांनी ज्या ब्राह्मणी हिंदुत्वाच्या विचारांवर प्रहार केले, त्याच हिंदुत्वाच्या गुळगुळीत तलवारीने समाजशुद्धीकरणाच्या सत्यशोधक चळवळीचा खून केला. या खुनाचे गुन्हेगार आजही बेपत्ता आहेत. तेच अजून सापडत नाहीत; तर दाभोलकर, पानसरेंचे खुनी कुठे सापडतील? सत्यच ते... ते शोधण्यासाठी प्रचंड आत्मबळ आणि त्याचा सामना करण्यासाठी असेल नसेल ते सर्वकाही पणाला लावण्याची ताकद असावी लागते. प्रबोधनकारांनी ते सत्य शोधण्याचा मार्ग निवडला तो त्यातल्या काट्याकुट्यांची पर्वा न करता. आज असा समाजाभिमानी माणूस शोधून सापडणार नाही. समाजशुद्धीची प्रक्रिया ही मंत्रोच्चारातून आणि दुग्धस्नानातून होत नाही. त्यासाठी सत्याच्या कडवट घोटाचे आचमन करावे लागते. पुरोगामित्वाचे सोंग घेऊन फिरणाऱ्या पुतळ्यांचे शुद्धीकरण करणाऱ्या पुरोगामी ढोंग्यांना ते झेपणारे नाही आणि म्हणूनच त्यांना प्रबोधनकारही परवडणार नाहीत.
देवळांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे बहुजन समाजाचे शोषण होत असल्याचे धडधडीत वास्तव प्रबोधनकारांनी मांडले. सर्वसामान्य भारतीय समाज हा मुळातच देवभोळा आहे. भक्ती आणि श्रद्धेच्या गुलामगिरीत जगण्याची या समाजाला सवय झाली आहे. भक्तदेखील आता एक नवा संप्रदाय झाला आहे. भक्ती केवळ देवावरच केली जाते असे नाही, तर भक्तीसाठी नवे देवही उदयाला येतात. त्यांची मंदिरेही थाटली जातात. फक्त त्यांचे स्वतःचे असे विचार नसतात. देवालयेही कॉर्पोरेट होत आहेत. त्यांनी समाजमाध्यमांवर भक्त तयार करण्याचे कारखानेच उघडलेत जणू. या कारखान्यांमध्ये घासून गुळगुळीत झालेल्या हिंदुत्वाच्या कन्व्हेअर बेल्टवर एकसारखे भक्त तयार होत असतात.
त्यांच्या विदाकुपीत केवळ एक विचार असतो. त्यामुळे दुसऱ्या विचाराने त्यांच्या विचारांना छेद दिला की जुना विदा त्याला सहकार्य करत नाही. परिणामी संपूर्ण समाज भ्रष्ट होत चाललाय. एकीकडे आपण समाजाच्या जगण्याचा स्तर उंचावत असल्याच्या चर्चा करीत असताना समाजाची वैचारिक वाढ मात्र खुंटत चालली आहे. आपल्या पुढारलेपणाच्या फुशारक्यांसमोर त्यामुळेच जरठबाला विवाहाच्या निषेधार्थ लग्नमंडप जाळणारे प्रबोधनकार कुमारवयातच आपल्यापेक्षा खूपच पुढारलेले ठरतात.
आजचे भारतीय राजकारण धर्म, जात आणि देवळांच्या पलीकडे जात नाही. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा भलेही होत असतील; पण निवडणुकीच्या तोंडावर जातीपातीचाच डंका वाजतो. प्रबोधनकारांचे विचार याच्या अगदी उलट होते. ते म्हणत, गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. हिंदू धर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे. इसवी सनाचा उदय होईपर्यंत भारतीय इतिहासात देवळांचा कोठेच सुगावा लागत नसल्याचाही ते दाखला देतात. त्यावर विशेष टिप्पणी करताना मग तोपर्यंत हिंदू देव थंडी-वाऱ्यात कुडकुडत आणि उन्हातान्हात धडपडत आतापर्यंत पडले तरी कोठे होते, असा खोचक सवालही ते करतात; तर त्याच्या अगदी उलट आज काहींचा धर्मच देव आणि देवळांच्या राजकारणावर चाललेला आहे, त्यामुळे त्यांना प्रबोधनकार परवडतील कसे?
ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आज देशाचे राजकारण सुरू आहे, तो हिंदू शब्दच मुळात अकराव्या शतकापूर्वी किंवा प्राचीन साहित्यामध्ये आढळत नाही, असा दावा लाल मणी जोशींसारख्या अनेक अभ्यासकांनी केला आहे. सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांसाठी अल्ब्युनीने पहिल्यांदा हा शब्द वापरात आणला. तेव्हा निव्वळ भौगोलिक संज्ञा म्हणून हा शब्द वापरात आला होता. पर्शियन भाषेत ‘स’ या अक्षराला ‘ह’ हे अक्षर आहे. त्यामुळे सिंधूचा तो हिंदू झाला. सावरकरांनी हिंदू कोण आहे, हा ग्रंथ लिहून हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली. ही संकल्पना समान भूमी, वंश आणि भाषा या आधारावर आहे. विशेष म्हणजे सावरकरांनीदेखील बौद्ध, जैन व शिखांनादेखील हिंदू धर्माचे भाग मानले आहे.
या सर्व धर्मांना समाविष्ट करून हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला आधार दिला गेला असला, तरीदेखील त्यातून मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माला मात्र वगळण्यात आले होते. जगासमोर विविधतेतील एकता आणि सर्वधर्मसमभावाचे स्तोम माजवणारे आपण आपल्या विकासाच्या सर्व मार्गांवर हिंदुत्वाच्या नावाखाली जागोजागी गतिरोधक उभे करू पाहतो आहोत. या गतिरोधकांना न जुमानता सुसाट वेगाने पारंपरिक जोखडांच्या चिंधड्या उडवत पुढे जायचे असेल तर प्रबोधनकार आठवले पाहिजेत. ते समजून घेतले पाहिजेत.
शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रबोधनकार वाचायचा सल्ला दिला. राज यांनी त्यांना प्रबोधनकार कुणालाच परवडणारे नाहीत, असे उत्तर दिले. सद्यपरिस्थितीत कुणालाच त्या मार्गाने जायचे नाही. वाचणाऱ्यालाही नाही आणि समजणाऱ्यालाही नाही; पण तोपर्यंत राजकारणाच्या आणि सर्वार्थाने समाजाच्या सत्यशोधनातला खंड संपणार नाही. बुद्धीचे शुद्धीकरण होणार नाही.
rahulgadpale@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.